अतिथी कट्टा

दिनांक : ०९-०३-२०२३

शूटिंग संपलं की मी शेती करतो…


‘ख्वाडा’, ‘बबन’ यासारखे चित्रपट आपल्या अदाकारीनं गाजविणारा प्रसिद्ध अभिनेता भाऊसाहेब शिंदे ‘रौंदळ’ या चित्रपटाच्या निमित्तानं येत्या 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचा नायक भाऊसाहेब शिंदे यांचं हे मनोगत.


——–

कोणतीही चांगली कलाकृती बनण्यासाठी वेळ हा लागतोच. या चित्रपटाची कथा, पटकथा, गीत-संगीतासाठी आम्हाला बराच वेळ द्यावा लागला. मुळात चांगली गाणी बनण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तो आम्ही या चित्रपटासाठी दिला. या चित्रपटाचं कथानक सुचलं ते आमचे दिग्दर्शक गजानन पडोळ यांना. त्याच्याबरोबर माझी आधीपासूनची ओळख होती. गजानन माझ्याकडे एकूण दोन गोष्टी घेऊन आला होता. त्यातली पहिली गोष्ट मला आवडली नव्हती. त्यानंतर आणखी दोन महिने गेले आणि तो दुसरी नवीन गोष्ट माझ्याकडे घेऊन आला. पण तीदेखील गोष्ट माझ्या पसंतीस उतरली नाही. तेव्हा मी त्याला काहीतरी आणखी वेगळा प्रयत्न करण्यास सांगितलं. माझ्या या बोलण्यानं गजानन नर्व्हस होणं साहजिक होतं. त्याला वाटलं की या पिक्चरवाल्यांचं काही खरं नाही. तेव्हा मीच एके दिवशी त्याला फोन केला आणि त्याला त्याच्या नवीन गोष्टीबद्दल विचारलं. यावेळी त्याला माझा सीरियनेस जाणवला. त्यानंतर मग तो माझ्याकडे ‘रौंदळ’ची गोष्ट घेऊन आला.

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांची ही गोष्ट आहे. माती आणि मातीशी निगडीत असलेल्या शेती तसेच नात्यांबद्दल हा चित्रपट बोलतो. पिकवणं आपल्या हातात आहे, पण बाजारभावाच्या गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे मग रौंदळसारखा प्रकार घडतो. जुन्नर, मंचर, श्रीगोंदा, बारामती आदी ठिकाणी हा चित्रपट आम्ही शूट केलाय. जवळपास 52 ते 55 दिवस आम्ही त्याचं शूटिंग केलंय. माझे आधीचे दोन चित्रपट मी भाऊराव कऱ्हाडेंसमवेत केले होते.

भाऊरावांची दिग्दर्शनाची धाटणी वेगळी आणि गजाननचीही वेगळी आहे. त्याची मांडणीदेखील वेगळी आहे. त्याचा कलाकृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनदेखील निराळा आहे. गजाननचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असला तरी पाहणार्‍याला तसं जाणवणारदेखील नाही, एवढ्या सफाईनं त्यानं काम केलं आहे. एवढी परिपक्वता त्याच्यात आहे.

चित्रपटाव्यतिरिक्त बोलायचं झालं तर मला वेळ मिळतो तेव्हा मी शेती करतो आणि सिनेमा मिळतो तेव्हा मी अभिनय करतो, एवढं सहज नि सोपं माझं आयुष्य आहे. श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणे गावी माझी शेती आहे. मुंबई आणि पुण्यात माझं येणं झालं तरी सकाळी आलो तरी मी सायंकाळी माझ्या गावी परततो. भविष्यात मला वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करायचे आहेत. या चित्रपटाच्या यशावर बरंच काही अवलंबून आहे. मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडून बर्‍याच ऑफर्स आल्या आहेत. परंतु, मला मराठी चित्रपटांचाच हीरो म्हणून राहावंसं वाटतं. मी आधी एक महाराष्ट्रीयन आणि मराठी आहे. तीच ओळख माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. त्या मराठी भाषेसाठी, त्या मराठी मातीसाठी, त्या मराठी माणसांसाठी आपण सिनेमा करावा असं मला वाटतं. आपल्या मराठी गोष्टी इतर भाषीक लोकांनी पाहायला हव्यात असं मला वाटतं. म्हणूनच ‘रौंदळ’ चित्रपट आम्ही हिंदी भाषेतही करीत आहोत. महाराष्ट्रातल्या मातीमधली गोष्ट दिल्ली, पंजाब, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहारमधल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी असं मला वाटतं. इतर भाषांचे चित्रपट महाराष्ट्रात येऊन चालतात, मग महाराष्ट्रात बनलेला सिनेमा इतर राज्यांमध्ये का चालू नये असं मला वाटतं.

– भाऊसाहेब शिंदे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया