अमिताभजींबरोबर शूटिंग ही आयुष्याची शिदोरी – मिलिंद लेले
——
‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात विक्रम गोखलेंनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्याभोवती कथानक गुंफण्यात आलं आहे. ते चित्रकार नि निवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून दोन मुलं नि सुना, नातवंडांसह ते निवृत्तीचं जीवन जगत असतात. जुन्या पिढीकडे तरुण पिढी फारशा गांभीर्यानं पाहत नाही, असा आजकालचा अनुभव आहे. तसाच काहीसा अनुभव या चित्रपटामधील नायकालाही येत असतो. हा ठरवून केलेला अपमान नसला तरी एकलेपणामुळे नायकाला तो अधिक टोचत राहतो. या नायकाची नातवंडं त्यांच्याशी खूप ‘क्लोज’ असतात. आपल्या आजोबांची समस्या त्यांना कळते नि त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, हे त्यांना जाणवतं. विक्रम गोखले यांच्या व्यक्तिरेखेनं अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अलाहाबादेतच शालेय शिक्षण घेतलेलं असतं. चित्रकलेची आवडही त्यांना तिथंच लागली. दरम्यानच्या काळात अशा काही घटना घडतात की विक्रम गोखले आणि अमिताभजी यांच्या मैत्रीचा धागा त्यांच्या शेजारी-पाजारी नि मित्रपरिवाला समजतो. त्याानंतर चित्रपटाच्या नायकाचं विश्वच बदलून जातं. ज्येष्ठ नागरिक क्लबतर्फे विक्रम गोखलेंच्या पंच्याहत्तरीला अमिताभलाच बोलवायचं ठरवतात. विक्रमजींच्या नातवंडांनी त्या आधी एक वेगळीच गंमत केली असते. ती काय असते, पुढे हा चित्रपट कसं वळण घेतो, याचं रहस्य 13 मार्चलाच उघड होईल.
अमिताभ बच्चन यांचा होकार कसा मिळवण्याची प्रक्रिया विलक्षणच होती. हेमंत एदलाबादकर यांचं लेखन या चित्रपटाला लाभलं आहे. साधारण दोन वर्षांपूर्वीपूर्वी आम्ही या चित्रपटाचा विचार केला. परंतु, अमिताभ बच्चन यांचा होकार मिळेपर्यंत हा चित्रपट घडूच शकला नसता. त्यामुळे त्यांचा होकार मिळवणं खूप आवश्यक होतं. विक्रमजींना आम्ही पहिल्यांदा गोष्ट ऐकवली. त्यांनाही ती आवडली. मात्र, अमिताभजी आले तरच हा चित्रपट होऊ शकेल, असं सांगितलं. तसेच अमिताभजींना आपल्या चित्रपटात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीदेखील आम्ही विक्रमजींना केली. त्यानुसार ‘केबीसी’च्या सेटवर विक्रमजींसमवेत मी आणि हेमंत एदलाबादकर अमिताभजींना जाऊन भेटलो नि त्यांना चित्रपटाची गोष्ट ऐकवली. त्यांनी त्यावेळी तिथं काहीच निर्णय दिला नाही. फक्त मला त्यांच्या देहबोलीवरून वाटत होतं की, त्यांना चित्रपटाची गोष्ट आवडली असावी. तसेच विक्रमजी आणि अमिताभजींची मैत्री तर होतीच. जवळपास महिन्याभरानंतर विक्रमजींनी फोन करून आमचं अभिनंदन करून अमिताभजींनी हा चित्रपट करण्यास होकार दिल्याचं सांगितलं. त्यानंतर मग आमचं चित्रपटावर प्रत्यक्ष काम सुरू झालं.
चित्रपटाचे मुख्य निर्माते अक्षय बर्दापूरकर यांच्यासह आमच्या सर्व निर्मात्यांनी, सहनिर्मात्यांनी आम्हांला संपूर्णपणे मोकळीक दिली. चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवातच आम्ही अमिताभजींवरील प्रसंगांद्वारे केली. जुलैमध्ये आम्ही इतर प्रसंग चित्रीत केलं. पावसामुळे थोडं आउटडोअर शूटिंग लांबलं. भोरलाही आम्ही थोडंसं चित्रीकरण केलं. सुबोध भावे, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, शर्वरी लोहकरे, अक्षय, सायली संजीव, जयंत सावरकर असे इतर चांगले कलाकारही मिळाले. या चित्रपटामध्ये एकूण दोन गाणी आहेत. प्रख्यात गायिका देवकी पंडीत यांची एक मैफल चित्रपटात पाहायला मिळते. त्याला संगीत आशीष मुजुमदार यांनी दिलं आहे. दुसर्या गाण्याची चाल मयुरेश पै यांनी बांधली आहे. ही दोन्ही गीतं वैभव जोशी यांनी लिहिली आहेत. अवघ्या 22 दिवसांमध्ये आम्ही हा चित्रपट चित्रीत केला.
मी दिग्दर्शनाचं शिक्षण घेतलेलं नाही. मी नामवंत दिग्दर्शकांचे चित्रपट पाहूनच शिकल गेलोय. विजय आनंद, गुरुदत्त, बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी यांचे सिनेमे मला आवडतात. प्रियदर्शनही मला खूप आवडतो. त्याचा ‘सजा ए काला पानी’पासून ते ‘हंगामा’पर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. तो कोणताही विषय अत्यंत सहजतेनं हाताळतो. जगातले सगळे जॉनर त्याचेच आहेत, अशा पद्धतीनं तो कोणताही विषय हाताळतो. दिग्दर्शकानं असं अष्टावधानी असलं पाहिजे.
– मिलिंद लेले
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया