कॉपी ही चांगल्या आदर्शांची असावी – प्रतीक्षा साबळे
——
या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू असताना माझी मैत्रीण नीता दोंदेचा मला फोन आला. तिनं या चित्रपटामध्ये अंशुमन विचारेंच्या पत्नीची भूमिका केली आहे. या चित्रपटाचं बरंचसं कास्टिंग अजून बाकी होतं. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक दयासागर वानखेडे यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी या चित्रपटात काही आव्हानात्मक भूमिका असल्याचं सांगितलं. त्या साकारण्यासाठी कोणी ओळखीच्या चांगल्या अभिनेत्री आहेत का, असं त्यांनी मला विचारलं. या भूमिकांना संवाद कमी असले तरी भावनांमधून बरंच काही दाखवण्यासाठी संधी होती. नीताबरोबर मी यापूर्वी ‘अंगाई’ नावाचा चित्रपट केला होता. त्यामुळे तिनंच माझं नाव या चित्रपटासाठी सुचवलं. त्यानुसार मी वानखेडे यांना जाऊन भेटले. विशेष म्हणजे त्यांनी मला या चित्रपटात तीन आव्हानात्मक भूमिका असून त्यातली एका भूमिकेची निवड तू स्वतःच कर असं सांगितलं. याअगोदर मी ‘ज्योती सावित्री’ नावाचं एक नाटक केलं होतं. या नाटकाची वानखेडे यांना कल्पना होती. म्हणूनच त्यांनी मला भूमिकेची निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. त्यानुसार मी स्क्रीप्ट वाचली नि प्रकाशच्या आईची भूमिका स्वीकारली.
ही भूमिका खूप आव्हानात्मक आहे. मुळात ग्रामीण भागातल्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, असा ध्यास इथल्या आई-वडिलांचा असतो. त्यांची ही तळमळ-धडपड दाखवणारी माझी ही भूमिका आहे. मी एकटीनंच प्रकाश या माझ्या मुलाला वाढवलेलं असतं. मुलानं मोठं व्हावं म्हणून ती अहोरात्र कष्ट करीत असते. मी एका वीटभट्टी कामगाराची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला खरेपण येण्यासाठी मी १२-१२ तास काम केलं. एक गोष्ट तर अशी घडली की शूटिंगच्या आधी माझ्या भूमिकेचा लुक आम्हाला नीट सापडत नव्हता. वीट कामगाराच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेला स्कीन टोन मॅच होत नव्हता. त्यावेळी मग घमेलीभरून माती माझ्या डोक्यावरून ओतण्यात आली. अनेक तास उन्हात बसल्यानंतर मग कुठे स्कीन टोन मॅच झाला.
माझा शूटिंगचा पहिलाच प्रसंग लक्षात राहण्याजोगा होता. सर्वसाधारणपणे सेटवर गेल्यानंतर दिग्दर्शकाकडून आपण सीन समजावून घेतो नि तसा तो साकारतो. परंतु, शूटिंगच्या आदल्या रात्री दिग्दर्शक वानखेडे यांनी स्क्रीप्ट न वाचता थेट मला सेटवर येण्यास सांगितलं. मी खरं तर ते ऐकून गोंधळले होते. परंतु, दिग्दर्शकानं सांगितल्यानुसार दुसऱ्या दिवशी मी सेटवर जाऊन त्यांनी सांगितलं तसं केलं. सागरसरांना त्या प्रसंगातून कोरी पाटी असलेला माझा अभिनय हवा होता. दिग्दर्शकाचा हा आऊट ऑफ दि बॉक्स विचार मला खूपच भावला. दिग्दर्शकाला त्याच्या दृष्टीनं सिनेमा करायचा असतो. सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. माझ्या मुलाचं काम करणाऱ्या अज्ञेशबरोबर मी सेटवर खूपच धमाल केली. एक कुटुंब असल्यासारखं आम्ही सर्वांनी एकत्र काम केलं.
कॉपी या विषयाकडे आपण खूप नकारात्मकतेनं पाहतोय. परंतु, कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कॉपी करत माणूस जन्मल्यापासून उत्तरोत्तर मोठा होता. कॉपी ही गोष्ट वाईट नाही. पण ती चांगल्या आदर्शांची करावी. चांगल्या विचारांची, चांगल्या व्यक्तिमत्त्वांची करावी. आपण कोणाचे तरी विचार फॉलो करीत असावी. शिक्षणव्यवस्थेमधील कॉपी कोणी करू नये. या प्रकरणात आपण कोणा एकाला दोष देऊ शकत नाही. शिक्षकांनी मुलांना शिक्षणाची गोडी लावायला हवी. मग मुलं कॉपी करणार नाहीत. थोडं खिलाडूवृत्तीनं शिकवलं तर मुलांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. पूर्वी ज्ञानदान करताना पैसा कमाविणे हा हेतू नव्हता. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.
– प्रतीक्षा साबळे
– शंतनू मोघे
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया