‘बंदिशाळा’मुळे फायटिंगचं तंत्र शिकले
——
‘बंदिशाळा’मध्ये मी एका जेलरचा रोल केला आहे. सत्यघटनेवर आधारलेला हा चित्रपट आहे. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशी ही जेलर आहे. जिचा जेलमध्ये वचक असतो. सगळे जण तिला घाबरून असतात. कारण ती कधीही तिच्या कामात चुकत नसते. त्यामुळे अन्यायाविरूद्ध आवाज उठविणाऱ्या या माधवी सावंतची भूमिका साकारताना मला खूप छान वाटलं. ही वर्दी कमवायला खऱ्या आयुष्यात खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावताना मला खूप अभिमान वाटला. मी स्वतःला खूप लकी मानते. मी वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अनेक जणींच्या आयुष्याकडे बघू शकते. पण आतापर्यंत जगलेल्या भूमिकांपेक्षा मी खूप वेगळी भूमिका घेऊन तुमच्यापुढे आलेय.
या चित्रपटाची गोष्ट ऐकल्यानंतर संजय पाटीलसर आणि विजय लेले सरांनी माझी बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांबरोबर गाठ घालून दिली. मी या चित्रपटात महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असली तरी सगळ्याच महिला पोलीस अधिकाऱ्यांना भेटले नाही. पोलीस दलातील प्रोटोकॉल्स समजून घेण्यासाठी मला पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनाही भेटणं गरजेचं होतं. सिनेमातला निम्म्याहून अधिक भाग हा जेलमध्ये घडतो. त्यामुळे चित्रीकरणावेळी आम्ही फारशा चुका करत नाही ना, हे पाहण्यासाठी पोलीस अधिकारी सेटवर यायचे. पोलिसांची मेडल्स नीट लावली आहेत ना, पोलीस अधिकाऱ्यांच्या टेबलवरील भारताचा झेंडा नीट लावलाय ना याची आम्ही काळजी घ्यायचो. कारण कोणत्याही सिस्टीमचा आपल्याकडून अवमान होऊ नये, असं मला वाटत होतं.
लेखक संजय पाटील यांचे आजवरचे सगळे चित्रपट हे सामाजिक भान जपणारे आहेत. हा चित्रपट त्याच पठडीतला आहे. चांगल्या आशयाचा चित्रपट साकारताना एक अभिनेत्री म्हणून मला खूप आनंद मिळाला. मनोरंजनाच्या पलीकडे हा चित्रपट प्रेक्षकांना बरंच काही देऊन जातो. खूप विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.
– मुक्ता बर्वे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया