अतिथी कट्टा

दिनांक : २२-०३-२०२१

एक यशस्वी नाटककार व चित्रपट कथालेखकविख्यात लेखक मधुसूदन कालेलकर यांचा २२ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्तानं रमेश उदारे यांनी संपादित केलेल्या नि ‘आमोद प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘तो राजहंस एक’ या पुस्तकामधील हा संपादित भाग.

——

पुण्याचं ‘भानुविलास’ थिएटर. त्यात मुंबईच्या नाटककारानं आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग मोठ्या उत्साहानं जाहीर केलेला. राष्ट्रप्रेमानं बहरलेल्या त्याच्या नाट्यकृतीचं नाव होतं ‘१५ ऑगस्ट!’ नुकतीच देशाची फाळणी झालेली. मानवतेची अपार हानी झालेली, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडलेल्या, अगदी अंग शहारून जाणाऱ्या,काळीज विव्हळणाऱ्या,कारण माणूसच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत होता, पशूलाही प्रसंगी लाज वाटावी अशी अनेक कृष्णकृत्ये माणसाच्या हातून घडली होती. जातीजातीत तेढ निर्माण झाली होती. ज्याच्या गळ्यात गळा घालून गुण्यागोविंदानं नांदायचं, प्रेमानं वागायचं त्याचाच गळा कापायला निघाला होता माणूस. नव्हे गळा कापून मोकळा झाला होता!

या संवेदनशील नाटककारानं म्हणूनच आपल्या या नाटकात बंधूभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रीय वृत्तीच्या या तरुण नाटककारानं रक्ताचं पाणी करून ही नाट्यकृती आकाराला आणली होती. त्यासाठी खूप परिश्रम घेऊन फाळणीनंतरच्या अनंत घटनांचा पायाशुद्ध अभ्यास केला होता. तब्बल तीन-चार वर्ष खर्ची पडली होती. त्याचं हे नाटक आकाराला आणण्यापायी. म्हणूनच आपल्या या नाटकाचं सर्वत्र सहर्ष स्वागत व्हावं, लोकांनी आपलं हे नाटक पाहावं, अगदी गर्दी करून पाहावं आणि त्यातून बंधूभावाचं एक साधं पण तितकच मोलाचं सूत्र आत्मसात करावं असं त्या भाबड्या, भावनाप्रधान, राष्ट्रभक्तीनं पेटून निघालेल्या स्वप्नातील जीवाला वाटत होतं.

पण दुर्दैव! त्यानं रंगविलेली सारी स्वप्नं केव्हाच भंगली. नाटकाचा पहिला प्रयोग पण रात्री नऊ वाजेपर्यंत फक्त एक तिकीट दहा आणेवालं! त्या नाटकाला आला होता अवघा एक प्रेक्षक! नाटकाला प्रेक्षक न मिळण्याचा तो एक नवा विक्रम असू शकेल. पण त्या एकंदर प्रकारानं तो नाटककार कोलमडला. पुणेकरांना त्याचा हा ‘दिव्यसंदेश’ मुळीच मानवला नव्हता. म्हणून तर नाट्यगृह ओस पडलं होतं. शेवटी यानं नाट्यप्रयोग न करण्याचा निर्णय घेतला. त्याला तो घेणंच भाग होतं. रिकाम्या खुर्च्यांना का तो नाटक दाखविणार होता! त्याच्या नाट्यकृतीची कदर करण्यासाठी आलेल्या त्या एकमेव नाट्य रसिकाचे आभार मानून त्याचे दहा आणे परत दिले नि बापडा रात्रभर रडत बसला आपल्या या नव्या प्रयोगाची परवड झाली म्हणून!

‘दिवा जळी दे सारी रात’सारख्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या हृदयस्पर्शी नाटकाचा पंचशतक महोत्सव थाटात साजरा करणाऱ्या नाटककार श्री. मधुसूदन कालेलकर यांच्या जीवनातील हा प्रसंग आठवला की या दोन नाटकातील यशापयशाची मला मोठी गंमत वाटते.

कालेलकरांना लिखाणाची आवड अगदी बालपणापासून. आईकडूनच हा वारसा त्यांना मिळालेला. शाळेत असताना ‘मला न आवडणारी व्यक्ती’ या विषयावरील लेखनस्पर्धेत भाग घेऊन त्यांनी विविधवृत्ता’चं पहिलं पारितोषिक पटकावलं होतं. पण लेखन हा काही पोटाचा व्यवसाय होऊ शकत नव्हता. आपल्या मुलानं कुठं तरी सरकारी नोकरी धरावी म्हणजे कायमचाच भाकरीचा प्रश्न सुटेल, अशीच घरच्या मंडळींची इच्छा. पण या जीवाला तर नाट्यवेडानं पछाडलं होतं. इम्पिरिअल केमिकल कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आदि ठिकाणी नोकऱ्या बऱ्याच झाल्या, कधी नोकरीनं त्यांना सोडलं कधी नोकरीची साथ त्यांनी सोडली. कुठं लिखाण करीतच बसले नि वरिष्ठाचा कोप नि नोकरीवरून काढण्याची नोटीस एकाच वेळी मिळाली. पण गडी मोठा जिद्दीचा कमालीची चिकाटी अंगी. त्यात समाजवादानं झपाटलेला. १९४२च्या क्रांतीयुद्धात इतरांप्रमाणे पेटून उठणारा.

या पेटण्यातूनच ‘उद्याचं जग’ हे नाटक उदयाला आलं. राष्ट्र सेवा दलातील राष्ट्रप्रेमाचे, राष्ट्राभिमानाचे संस्कार साहजिकच त्यांच्या लेखणीवर झाले होते. ‘उद्याचं जग’ कागदावर अवतरले होते १९४३ साली. पण ते लोकांपुढे आलं १९४७ साली. साथी नानासाहेब गोऱ्यांना या नाटकानं प्रभावित केलं नि म्हणूनच सोशलिस्ट पार्टीतर्फे मुंबईच्या हॉलमध्ये त्यांचा पहिला प्रयोग झाला. यावेळी रंगले होते प्रा. राम जोशी, सुधा कोतवाल (सौ. अनुताई वर्दे) आदि स्वातंत्र्य चळवळीतील अनेक तरुण कार्यकर्ते. पुढं हेच नाटक शामलाबाई माजगावकरांनी रंगभूमीवर आणलं व त्याचे शंभर प्रयोग केले.

थोडं नाव मिळालं, थोडा पैसा मिळाला, पण पुढं काय? काहीच नाही, साराच अंधार. सिनेमाच्या गडबडीत नोकरी गेलेली, पदरी दोन मुलं, हाती पैसा नाही, देणेकऱ्यांनी तर भंडावून सोडलेलं, दीन-दोन दिवस हाता-तोंडाची गाठ पडेनाशी झालेली. भगवंतावर भरवसा ठेवून कालेलकर दिवस ढकलत होते, पायपीठ चालूच होती. आता नावावर एक चित्र होते.

भगवान! खरंच भगवान यावेळी त्यांच्या हाकेला धावून आला. चित्रसृष्टीतील मा. भगवान. त्यांना हल्लागुल्ला छापाचं पण उत्तम कथासूत्र असलेलं चित्र काढायचं होतं. ‘अखेर जमलं’ हे चित्र किस्मत टॉकीजच्या इराणी यांच्या आग्रहावरून त्यांनी पाहिलं व चटकन कालेलकरांना पाचारण केलं. १९५४ सालची ही गोष्ट. ‘अखेर जमलं’ हे चित्र प्रदर्शित होऊन तब्बल दोन वर्ष लोटली होती.

मा. भगवान यांच्यासाठी त्यांनी ‘रंगिला’ हे चित्र लिहिलं. एक वर्ष कसं तरी गेलं. नियमित पैसा हाती येत होता, संसार झकास चालला होता नि कामही आवडीचं होतं. वर्ष कसं भुरकन उडून गेलं कापडागत. फिरून प्रश्नचिन्ह उभंच आ वासून. पण यावेळी राजा नेने त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. जी. पी. सिप्पी यांच्या ‘राधाकृष्ण’ या रंगीत पौराणिक चित्राचं ते दिग्दर्शन करीत होते. त्यांनी कालेलकरांना आपले दिग्दर्शनाचे सहाय्यक म्हणून घेतले.

कालेलकरांना कुठून तरी काम हवं होतं. त्यांनी ते काम पत्करलं. दरमहा दोनशे रुपये त्यांना मिळू लागले. आर्थिक बाब सुटली आणि इतरही खूप फायदा झाला. कॅमेऱ्याची हालचाल कळली. दृश्य कसं घ्यावं याची माहिती झाली. आत्मविश्वास दुणावला. पटकथा लेखनाला याच ज्ञानाचा अधिक फायदा मिळाला. बाह्य चित्रणाच्या वेळी तर चित्रणाची जबाबदारी राजाभाऊ त्यांच्यावरच सोपवू लागले. कालेलकरांनी चित्रणाचे सर्वांगीण शिक्षण घेतलं.

‘राधाकृष्ण’ हे चित्र पूर्ण होता होताच भगवान यांच्याकडे परिचय झालेल्या शंकर मुकर्जीनी आपल्या ‘बारीश’ या चित्राच्या पटकथा लेखनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. अनंत माने दिग्दर्शित ‘शुभमंगल’ या चित्राची पटकथा, संवाद त्यांनी लिहिले. ‘आल्हाद’च्या ‘सबसे बडा रुपय्या’ या हिंदी चित्रांचीही पटकथा त्यांचीच. १९५७ पर्यंत त्यांचं बरं चाललं होतं. दोनवेळेच्या जेवण्याची तरी सोय होत होती. पण पुढं मात्र अगदीच वाईट परिस्थिती आली. सारी कामं बंद झालेली. त्यामुळं घरातली चूल पेटणं कठिण झालं. मानी कालेलकरांना कुणापुढे हात पसरणं योग्य वाटेना तो त्यांचा पिंडच नव्हे, त्यामुळे चणे फुटाणे खाऊन व त्यावर पाणी रिचवून ते दिवस कंठू लागले.

कालेलकरांचं दैन्य खऱ्या अर्थानं येथे संपलं. ‘फिल्मिस्तान’मध्ये त्यांनी लिहिलेले ‘आलिया भोगासी’, ‘पहिलं प्रेम’, ‘सौभाग्यवती भव’ व ‘दीप जले’ आदि चित्रपट पडद्यावर आले. पुढे ‘फिल्मालय’ आकाराला आल्यावर शशधर मुकर्जी यांनी त्यांना आर.के. नय्यर यांच्यासह आपल्या या नव्या संस्थेत नेले पण ते तेथे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकले नाहीत. १९५९ साली ते या सर्व नोकरीच्या बंधनातून बाहेर पडले नि त्यांनी स्वत:च चित्रतरंग ही संस्था स्थापन करून ‘याला जीवन ऐसे नाव’ हे चित्र निर्माण केलं.

कालेलकरांना थोडं स्थैर्य प्राप्त झालं नि त्यांनी लिहिलेली चित्र भराभर पडद्यावर येऊ लागली. ‘अवघाची संसार’, ‘सप्तपदी’, ‘पतिव्रता’, ‘कलंकशोभा’, ‘बायको माहेरी जाते’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘मधुचंद्र’, ‘एक दोन तीन’ आदि सुमारे पाऊणशे चित्रांच्या कथा पटकथा नि संवाद त्यांनी लिहिले. केवळ मराठीच नव्हे तर ‘सरहद्द’, ‘बात एक रात की’, ‘प्यार मोहब्बत’, ‘एक कली मुस्काई’सारख्या हिंदी चित्रांच्याही पटकथा त्यांनीच लिहिल्या. एक सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून ते ख्यातनाम झाले.

परवा त्यांना आपल्या नव्या नाटकाला नाव हवं होतं. प्रा. ना. सी. फडके यांच्या ‘अखेरचं बंड’ या गाजलेल्या कादंबरीवरील त्यांचं हे नाटक गेले १५ वर्षे ही कादंबरी त्यांनी डोक्यात ठेवलेली. मनासारखं नाटक लिहून होताच त्यांनी ते गणपतीपुढं ठेवलं नि नाटकाचं नाव लिहिलं ‘हे फूल चंदनाचं’ काही क्षणातच त्यावर फूल पडलं गणपतीच्या डोक्यावरील! या श्रद्धाळू जीवानं ते फूल कपाळाला लावलं. मला वाटतं या अपार श्रद्धेमुळंच कालेलकर आज यशस्वी ठरले आहेत. आजच्या विज्ञानाच्या यांत्रिक जीवनात अशी श्रद्धेवर जगणारी माणसे कमीच!

– वसंत भालेकर (लेखक)

(सौजन्य – आमोद प्रकाशन)

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया