अतिथी कट्टा

दिनांक : २१-०१-२०२२

दोन शापित चित्रपट…


ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी २१ जानेवारी २०२२ रोजी ९१व्या वर्षात पदार्पण केले. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे शापित. प्रकाश धुळे यांनी ‘चित्रस्मृती’ पुस्तकामध्ये ‘शापित’ तसेच त्याबरोबरीच प्रदर्शित झालेल्या ‘रझिया सुलतान’ या हिंदी चित्रपटाचा तुलनात्मक अभ्यासपर केलेला लेख समाविष्ट आहे. हा लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

चौदा सप्टेंबरला मुंबईत दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. एक कमाल अमरोहीचा ‘रझिया सुलतान’ – ज्याची रसिक गेली आठ वर्षे वाट पाहत होते, आणि दुसरा ट्रॉयका फिल्मचा ‘शापित’, ज्याला आठ पारितोषिकं मिळाली. याचं प्रदर्शन तसं एकाच दिवशी होण्याचं काही कारण नव्हतं. मराठी चित्रपटाला मुंबईत थिएटर मिळत नाही ही तर नेहमीचीच बोंब ! पण यावेळी जरा विपरीत घडलं. ‘शापित’ प्रदर्शित व्हायची तारीख ठरलेली नव्हती; ‘रझिया’ मात्र तारीख निश्चित करून होता.

‘रझिया’साठी थिएटर शोधतांना शांतारामबापूंचं ‘प्लाझा’ त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. पण बापूंनी चित्रपट पाहून नकार कळवला म्हणे ! शांतारामबापू तसा सडेतोड माणूस आहे, त्यांनी ‘रझिया’ ला थिएटर न देता ते ‘शापित’ ला दिलं आणि मग धावपळ करून ‘शापित’ही त्याच तारखेला ‘रझिया’ बरोबर दिमाखानं, रझियाला नकार कळवणाऱ्या त्या थिएटरात दाखल झाला ! खरं तर या हिन्दी-मराठी चित्रपटात ही टक्कर लागायला नकोच होती. किंवा निदान ती इथंच संपायला हवी होती ! पण तसं झालं मात्र नाही.

एखाद्या दिवशी अचानक भेटलेला माणूस, त्यानंतर मात्र सारखा येताजाता दृष्टीस पडावा असंच काहीसं माझं झालं ! ‘शापित’ आणि ‘रझिया सुलतान’ मला सारखे एकमेकांना धडक देताना दिसू लागले. ‘रझिया’ आणि ‘शापित’ यात सहज जाणवणारं साम्य म्हणजे ‘शापित’ चा नायक ‘बळी’ हा जमीनदाराकडे काम करणारा वेठबिगार मजूर आहे. त्याच्या आधी त्याच्या पूर्वजांनी हेच काम केलं आहे. आपला मालक म्हणजे देव, तो म्हणेल त्याला फक्त मान तुकवायची एवढंच त्याला ठाऊक असतं ! तर ‘रझिया’चा नायक ‘याकूत’ हा सुलतानाचा गुलाम हबशी. म्हणजे एका अर्थानं वेठबिगारीच ! यानंही सुलतानाच्या पायावरून नजर वर उचलायची नाही. सुलतानाची आज्ञा प्रमाण मानून वेळप्रसंगी प्राणत्यागाची तयारी ठेवायची. म्हणजे एका अर्थानं दोन्ही कथांचा नायक सारखाच झाला, नाही का ?

‘शापित’मध्ये कुलदीप पवारनं सुवर्ण रंगविलेली रावसाहेबांची व्यक्तिरेखा, ‘रझिया’मधील कमालपुत्र शानदारनं रंगविलेल्या बाईलवेड्या राजपुत्राशी साम्य सांगतेच. आता रावसाहेब प्रलोभनं दाखवून आपला कार्यभाग साधत असतो; तर रझियाचा राजपुत्र केवळ जुलूम जबरदस्तीच करीत असतो. ‘शापित’मध्ये पुढे रावसाहेब हा ‘नामर्द’ दाखवून त्याच्या या व्यक्तिरेखेला एक वेगळीच डायमेन्शन देण्यात आली आहे. पण त्या दृष्टीने या व्यक्तिरेखेची डेव्हलपमेंट मात्र पुढे होत नाही. बिजलीच्या प्रेमात पडल्यानंतर तर रावसाहेब एकपत्नी व्रताप्रमाणे केवळ बिजलीलाच चिकटून राहतो. इथं त्याचा पूर्वीचा बाहेर ख्यालीपणा संपतो, की दिग्दर्शकाचं त्याकडे दुर्लक्ष झालंय हे सांगता येत नाही. या दृष्टीने ‘रझिया’तील राजपुत्राची भूमिका काहीशी एकांगी असली तरी तो मरेपर्यंत आपला छंदी-फंदीपणा तसाच ठेवत असल्यानं ही व्यक्तिरेखा आपल्या स्वभावधर्माशी इमान राखताना तरी दिसते. ही अशीच इमानदारी रावसाहेबाच्या व्यक्तिरेखेतही अपेक्षित होती.

या दोन्ही कथांत गुलाम नायकाचं प्रेम हाच कथेचा गाभा आहे. ‘रझिया’त याकूतच्या कामगिरीवर खुश होऊन सुलतान त्याला आपल्या गुलामगिरीतून मुक्त करतो खरा, पण तरीही याकूत मनानं आणि इतर तुर्कांच्या नजरेत गुलामच राहतो. ‘शापित’चा बळीही अखेरपर्यंत ‘गुलाम’च राहतो. त्याला अखेरीस गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा आनंदही फक्त काही क्षणच मिळतो. पण तो खऱ्या अर्थानं मुक्त होत नाहीच. ‘रझिया’च्या प्रेमकथेचा शेवट याकूत व रझियाच्या एकत्र मृत्यूनं होती तर ‘शापित’ मध्ये बळीचा मृत्यू होऊन बिजली तुरुंगात जाते, म्हणजेच जगात एकट्या पडलेल्या तिच्या मुलासाठी ती मरतेच असं म्हटलं तर ते वावगं होऊ नये. ‘रझिया’ प्रेमकथा असल्यानं एकाच भाल्याने, एकाच वेळी, एकाच घोड्यावर बसून पळून जाऊ पाहणाऱ्या ‘रझिया याकूत’ च कलेवर छेदण अगदी काव्यमय व योग्यच वाटतं. ‘शापित’ मुळातच प्रेमकथा म्हणून हाताळली जात नसल्यानं त्याचा शेवट वेगळा करणं नैसर्गिकच ठरलं.

हे दोन चित्रपट पाहताना मला आणखी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे ‘रझिया सुलतान’चं कथाबीज हे लहानसं असून, त्याच्याभोवतीच ही कथा कुशलतेने फुलवली गेली आहे. प्रत्येक प्रसंग खुबीनं आणि तपशीलवार दाखवून कथा विकास करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तर याउलट ‘शापित’ ची कथावस्तू इतकी ‘पॉवरफुल’ व वैविध्यपूर्ण आहे, की तिचा विकास अनेक अंगानी शक्य होता. परंतु दिग्दर्शकानं त्याचा एक विशिष्ट दृष्टिकोनातूनच विचार केल्यानं कथेतील अनेक चांगले धागे अखेरपर्यंत तसेच लोंबकळतच राहतात. त्यांची ‘वीण’ मारणं त्यांना साधलेलं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर रावसाहेब ‘नामर्द’ असूनही बिजलीचा उपभोग घेतो. परंतु आपल्याला होणार मूल हे आपल्या पतीचंच आहे असं तिला वाटत असतं ते का ? तिनं बळीची त्या दृष्टीनं आधीच समजूत घातली असती तर, त्या प्रसंगांना आणखी एक नवी ‘डायमेन्शन’ देता आली असती असं वाटून जातं. केवळ पोराच्या छातीवरील जन्मखुणा पाहून तो आपलाच आहे असं बळीनं समजण्यापेक्षा, आपली बायको ज्याच्याकडे जाते तो नामर्द असून बाप होण्यास पात्र नाही हे जर त्याला आधी कळलं असत तर ते निश्चित अधिक परिपोषक ठरलं असत. परंतु सामाजिक जाणिवेच्या वाटेनं चित्रपट नेण्याचं मान्य केल्यामुळे या व्यक्तिरेखा एक माणूस म्हणून होऊ पाहणारा विकास लेखक / दिग्दर्शकांना मध्येच थांबवावा लागला असंही म्हणता येईल.

‘रझिया’ त सुलतान अल्तमशची व्यक्तिरेखा ज्या मार्गानं जाते, काहीशी त्याच वाटेनं ‘शापित’ मधील ‘रंगोबा’ चीभूमिका जाते असं म्हणता येईल. त्या व्यक्तिरेखेत इतकं साम्य आहे की, ‘रझिया’त ती भूमिका करणारा प्रदीपकुमार भाव खाऊन जातो तर ‘शापित’च्या या भूमिकेत निळूभाऊ भाव खाऊन जातात. दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची पूर्ण सहानुभूती जाते. प्रदीपकुमारची व्यक्तिरेखा काहीशी प्रेमळ व करारी आहे, तर निळूभाऊंची व्यक्तिरेखा विनोदाच्या बुरख्याखाली दुःख जपणाऱ्या माणसाची आहे. दोघांनीही आपापल्या भूमिकांना न्याय देण्यात काहीही कसूर केलेली नाही. चित्रपटाची एकूण बांधणी पाहता रंगोबानं शेवटी आपलं दुःख ‘ओकावयास’ नको होतं , असं वाटून जातं. त्याचं दुःख बळीपेक्षा फारस वेगळं नसल्यानं ते तसेच गुलदस्तात ठेवूनच त्याच्या दुःखाचे चटके प्रेक्षकांना देता आले असते व त्यांच्यावर पकडही ठेवता आली असती.

‘रझिया सुलतान’ आणि ‘शापित’ पाहून एक गोष्ट मात्र निश्चित ठरते आणि ती म्हणजे दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकानं चित्रपटाचा ‘बाज’ आधीच निश्चित केला असून त्यानुसारच चित्रपट घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच ‘शापित’मध्ये वेठबिगारांवर अत्याचार म्हणजे फक्त त्यांच्या बायकांची अब्रू तेवढी लुटली जाते असे दिसते. त्यांच्यावर होणारे इतर अत्याचार चित्रपटात दाखविण्यात आलेले नाहीत.

‘रझिया’मध्ये बदफैली राजपुत्रालाही बायकांवर अत्याचार करण्याखेरीज दुसरा कसलाही छंद दाखविण्यात येऊ नये का ? तरी बरं की कमाल अमरोही या मुस्लिम अभ्यासकानंच हे चित्र केलं. इतर कुणी असा सिनेमा घेतला असता तर तो ‘सेन्सॉर’च्या कात्रीत अडकला असता किंवा हेतुपरस्पर चारित्र्यहनन म्हणून थिएटरवर दगडफेक वगैरे तरी झाली असती !

‘शापित’चा शेवटही ‘रझिया’पेक्षा काहीसा गोंधळलेला वाटलो. खरं तर अशा सामाजिक जाणिवेवर नेलेल्या चित्रपटाचा शेवट हा काहीसा सूचक, संकेतावरच व्हायला हवा. या दृष्टीनं श्याम बेनेगलच्या ‘अंकुर’चा शेवट पाहण्यासारखा आहे. त्या लहानग्या मुलं बंगल्याच्या खिडकीवर दगड मारून काच फोडणं हा शेवट प्रेक्षकांना त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर, त्यांना पटेल तो अर्थ काढण्यास लावतो. या दृष्टिकोनातून ‘शापित’चा शेवट खरं तर बळीचा मुलगा शहरात जाऊन शिकण्याचं नाकारतो व रावसाहेब धंदा शिकविण्याचा ठरवतो तिथं व्हायला हवा होता. त्यानंतर बळीचा मृत्यू, रावसाहेबांचा खून, बिजलीच तुरुंगात जाण किंवा किसनच उगवत्या सूर्याच्या दिशेनं दुसऱ्या लहान मुलाचा हात धरून निघणं उगीच वाटतं. अशा चित्रपटांचा शेवट हा काहीसा अस्पष्टच हवा असतो. पेन्सिलीला फार टोक काढलं की ते तुटतं. त्याप्रमाणे सामाजिक चित्रपटात क्रांती उठाव प्रतिक्रिया वगैरे फार जाणीवपूर्णक दाखविण्याचा प्रयत्न केला की दिग्दर्शक फसतो. कारण अशा परिस्थितीवर तोडगा निघणं बरेचदा शक्य नसतं, शिवाय लेखक किंवा दिग्दर्शकानं काढलेला तोडगा प्रेक्षकांना हमखास रूचेलच असंही नसतं. तेंव्हा प्रेक्षकांना विश्वासात घेऊन त्यांच्या कल्पनाशक्तीवर सोडलेला शेवटचं अशा चित्रपटांना अधिक योग्य ठरतो.

‘शापित’ चित्रपटात बिजलीच्या आंघोळीचा एक सीन आहे. काहीसा ‘चक्र’ तील आंघोळीच्या वाटेनंच जाऊ पाहणारा हा प्रसंग. पण त्याची चित्रपटातील अनिर्वार्यता काहीशी खरी वाटते. पंरतु आंघोळीपूर्वी बिजलीची ‘ती’ आंघोळ कथानकाच्या दृष्टीनंही कशी अपरिहार्य आहे हे दाखवणं जरुरीचं होतं असं वाटतं.

रावसाहेबांबरोबर संबंध येऊनही तो ‘नपुसंक’ वा ‘नामर्द’ आहे हे सूचित करणारी ती आंघोळ आहे हे बळीच्या आणि प्रेक्षकांच्याही लक्षात जर आणून देता आलं असतं तर त्या दृश्याची गरज स्पष्टच झाली असती. कथानकातील खरं नाट्य त्याच प्रसंगात होतं. आपण ‘नामर्द’ आहोत हे जाणूनही उगाच स्त्रियांना बंगलीवर घेऊन जाणारा रावसाहेब ‘तसा’ आहे हे जाणूनही केवळ नवऱ्यावर जुलूम होऊ नये म्हणून जाणारी बिजली आणि हे माहित नसल्यामुळे आपल्या मुलाला रावसाहेबांचा मुलगा समजून मानसिक अत्याचार सोसणारे पुरुष यांच्यातील हे नाट्य अधिक प्रभावीपणे रंगवता आलं असतं. खरं तर मानवी मनातील नाट्य म्हणूनही ते पुरेसा प्रभावी ठरलं असतं. पण चित्रपटात ‘मला सारखं वाटतं हे मूल तुमचंच आहे म्हणून’ असा बिजलीचा एक संवाद व मुलाच्या छातीवर असलेली जन्मखूण यावरच वेळ मारून नेलेली दिसते. त्यामुळे हे नाट्य पडद्यावर अवतरू शकत नाही याची खंत वाटत राहते. केवळ वेठबिगारांचा विषय घेतलाच आहे म्हणून तर दिग्दर्शकानं या नात्याचा बळी दिला नाही ना अशीही शंका मनाला चाटून जाते.

सूर्याच्या कवडश्यांच्या मोहरा करून आपल्या स्वप्नांचा महाल उभा करू पाहणाऱ्या प्रेमी दाम्पत्यांचा प्रसंगही गुंफला आहे. पण फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून हा प्रसंग यापेक्षाही अधिक चांगला घ्यावयास हवा होता असं सारखं वाटत राहतं. ‘शापित’च्या सुरुवातीचा बळीला पकडून फटके मारण्याचा प्रसंग मात्र प्रेक्षकानं खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. आणि हो, सहज सुचलं म्हणून सांगतो, ‘शापित’ हे नावही चित्रपटाला का देण्यात आलं असावं हेही तितकंसं लक्षात येत नाही. जाहिरातीत ‘एका स्वाभिमानी स्त्रीनं अत्याचाराविरुद्ध दिलेल्या लढ्याची कथा’ असं काहीसं म्हटलं जातं. परंतु ‘शापित’ मधील बिजली स्वाभिमानी वगैरे वाटत असली तरी तिनं चित्रपटात लढा वगैरे दिलेला नाही. चित्रपटभर रावसाहेबांच्या मनानुसार वागून अखेर तो दारूच्या नशेत असताना त्याच्या पाठीवर कोयत्याने वार करणं म्हणजे लढा देणं असं म्हणता येणार नाही खरं ना ?

‘शापित’च्या नायकाचं बळी हे नाव मुद्दाम, त्याच्या आयुष्याचा विचार करून वगैरे ठेवल्यासारखं वाटतं. शिवाय यात अखेरीस त्याचा बळी जात असल्यानं सुरुवातीस सूचक वगैरे वाटणारं हे नाव अगदीच बटबटीत वाटूं लागतं . त्या तुलनेत ‘रझिया’ च्या नायकाचं नाव ‘याकूत’ अधिक चमकदार वाटलं. ‘याकूत’ चा अर्थ उर्दूत ‘माणिक’ असा होतो. एका काळ्या हबशी गुलामच नाव ‘माणिक’ असणं हे काहीस औचित्यभंग करणार वाटत असलं तरीही एक माणूस म्हणून तो लाखात एक असल्यानं ते नाव त्याला शोभून दिसतं . फुटबॉलपट्टू पेलेचं ‘ब्लॅक पर्ल’ हे नाव याच धाटणीचं नव्हे काय ?

‘रझिया’मधील भव्य सेट्स, त्यातील बुलंद संवाद, साधनसंपत्तीचा केलेला वापर हे बघण्यासारखं आहे यात शंकाच नाही. पण काही प्रसंगांचं रचनाकौशल्य, काही प्रसंगांची गुंफण तर काही प्रसंगांचं चित्रीकरण हे खास लक्षात घेण्यासारखं आहे. या चित्रपटातील सर्वाधिक नाट्यपूर्ण प्रसंग आहे तो सुलतानाचा मृत्युपत्र ‘याकूत’ आपल्या छातीवर कोरवून घेतो तो! त्या प्रसंगच चित्रिकरणही उत्तम झालं आहे. थरथरत्या हातान एकेक अक्षर कोरणारी लैला हे रहस्य आपल्या हृदयात दडवू शकणार नाही म्हणून ते काम पूर्ण होताच तिचं बलिदान मागणारा ‘याकूत’ आपली व्यक्तिरेखा एका नव्या उंचीवर घेऊन जाते.

मन रामविण्याकरिता रझिया आपल्या सखीसमवेत जे काही खेळ खेळते त्यात मोत्याचा खेळ आपलं चित्त आकर्षून घेतो. तलावातील तरत्या बेडवर रझिया पहुडलेली असते. ती समोरच्या तबकात एक मोती उचलून तलावात फेकते. काठावर बसलेल्या दोन तरुणी पाण्यात बुडी मारतात. त्यातील एक तो मोती घेऊन येण्यात यशस्वी होते. तिला मूठभर मोती देऊन रझिया दुसरा मोती फेकते. पुन्हा दुसऱ्या दोघी पाण्यात उतरतात… हा खेळ सुरू राहतो. हा खेळ बघताना चटकन आठवतो तो रझियाच्या राज्याभिषेकाचा प्रसंग ! त्यावेळी याकूतनं एक टपोरा मोती लाल मखमली कापडावर ठेवून तो रझियाला पेश केलेला असतो. वाटून जातं , रझिया ज्या मोत्याशी खेळते आहे तो हाच तर नव्हे ना ? तो मोती तो नसतोच. पण असता तर त्या खेळाला एक नवा अर्थ प्राप्त झाला नसता का ?

‘रझिया सुलतान’मधील लक्षात राहणारे आणखी दोन प्रसंग म्हणजे, एकदा दरबारात बसलेला अल्तमश एका मातेची हाक एकूण तिच्या तरुण मुलीला आपल्या बदफैली मुलाच्या ताडीतून सोडविण्यास जातो तो! आणि दुसऱ्या प्रसंगात तोच नेभळा मुलगा न्यायासनानं सुनावल्या फटक्यांची शिक्षा पूर्ण भोगू न शकल्याने उरलेले फटके अल्तमश आपल्या छातीवर घेतो तो. दोन्ही प्रसंग छान घेतले असून प्रदीपकुमारनं त्यात जान ओतली आहे. रझियाच आपल्या पित्याला अरे तुरे करून बोलणं कानाला गोड वाटत असलं आणि त्यांच्यातील मैत्रीचं नातंही स्पष्ट करीत असलं तरी रझियान आपल्या पित्याला प्रत्येक वेळी ‘सुलतान बाबा’ व त्यानं तिला ‘जानी बाबा’ म्हणणं काहीसं खटकतंच !

कमाल अमरोहीनं चित्रीकरणात अनेक लेव्हल्सचा वापर केला आहे. त्यातही रझियाच्या मनात उभं राहणारं आपल्या लग्नाचं स्वप्न, खरोखरच स्वप्नवत घेतलं आहे. पाच सात शॉट्स टाकून प्रत्येक स्पॉटमध्ये वेगवेगळ्या हालचाली दाखविण्याची कमलची युक्ती अफलातूनच वाटते. अंधाऱ्या रस्त्यानं प्रकाशात वहात येणारी बरात दाखवतांनाच दूरच्या एका टेरेसवर चाललेला जल्लोषही असाच परिणाम घडवून जातो. बरेचदा महागडे सेट्स पुन्हापुन्हा वापरले आहेत. पण सारिकाला मात्र त्या सेट्स इतकही पडद्यावर राहता येऊ नये याची खंत उरतेच.

‘शापित’मध्ये बिजलीच्या भूमिकेत मधु कांबीकर शोभली आणि ‘बळी’च्या भूमिकेत यशवंत दत्तन जान ओतली हे खरंच ! पण तरीही ‘बळी’ जाणारी बळी नावाची व्यक्ती एवढी थोराड किंवा ‘बल्की’ वाटावयास नको होती असं मला वाटतं. भिऊन, दबून, जन्मभर वावरणारी व्यक्ती थोराड असणारच नाही असं नाही पण ती तशी जर मुद्दाम दाखविली गेली असेल तर त्यामागील कारणही प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवं नाही का? ‘रझिया सुलतान’मध्येही खुद्द हेमामालिनी अशीच ‘मिसफीट’ वाटते. तिचं सौंदर्य आणि पर्सनेलिटी मुस्लिम वाटतच नाही. काही समीक्षकांचे मत हेमा यापेक्षाही अधिक पुरुषी व मर्दानी वाटावयास हवी होती. पण मी मात्र याबाबतीत सहमत होऊ शकत नाही. माझ्या मते रझिया तर अधिक नाजूक व जनानी दिसावयास हवी होती. नजाकत हा मुस्लिम सौंदर्याचा आत्मा आहे. कमालसाहेबांनी ‘रझिया’साठी हेमाचीच निवड हट्टाने का करावी याचा खुलासाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयास हवा होता असं वाटत राहातं.

‘शापित’ आणि ‘रझिया’ पाहून बाहेर पडताना प्रत्येक चित्रपटाची एकेक छाप मनावर उठतेच. वाटतं, ‘शापित’चा शेवट जर रावसाहेबांच्या खुनातच व्हायचा होता तर तो पहिल्या रात्रीच्या फसवणुकीनंतरच व्हायला हवा होता. ‘बळी’ चा जीव घ्यायचाच होता तर रावसाहेबांनं तरी इतका वेळ वाट पहायची काय गरज होती ? एकंदरीत काय, एक प्रभावी नाट्यवस्तू. केवळ चित्रपट सामाजिक बांधिलकी वगैरेस धरून राहावा म्हणून व या कोंडीतून सुस्पष्ट वाट शोधण्याच्या प्रयत्नांत हरवून गेलेली दिसते. याउलट फारसं नाट्य नसलेलं लहानसं कथानक, बारीक सारीक तपशील,भव्य-दिव्य सेटस व प्रसंग फुलविण्याची अफलातून कल्पनाशक्ती यामुळे कसं मस्त डवरून येऊ शकतं हे ‘रझिया सुलतान’ मध्ये दिसतं. ‘शापित’ ला आज अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत आणखी काही मिळतीलही पण माझी ही खंत त्यामुळे कमी होणार नाहीए. ‘रझिया सुलतान’ची हवा तशी गेलेलीच आहे. हा चित्रपट ‘शोले’ प्रमाणे आणखी पाच वर्षे तरी झालेला खर्च भरून काढू शकणार नाही हे मलाही ठाऊक आहे. पण तरीही त्यातल्या काही गोष्टी मला आवडल्या आहेत हे निर्विवाद! दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, हे दोन्ही चित्रपट आपल्या नशिबी एकेक शाप घेऊन आलेले ‘शापित’च आहेत असं मी म्हणेन. बघा, तुम्हाला पटतं का ते ?

संदर्भ : चित्रस्मृती (पुस्तक)

लेखक : प्रकाश धुळे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया