काळाबरोबर राहिलेला दिग्दर्शक…
——
राजदत्त यांचं पूर्ण नाव दत्तात्रय अंबादास मायाळू. जन्म अमरावती जिल्ह्यातील धामणगावचा. २१ जानेवारी १९३२या दिवशी जन्मलेल्या दत्ताला बालपणापासूनच विविध कलांची व समाजसेवेची आवड होती. लहानपणी मेळ्यात काम करणार्या दत्तानं मॅट्रिकनंतर वर्धा येथील जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात त्यानं नाट्यस्पर्धेत भाग घेऊन ‘साष्टांग नमस्कार’ नाटकातल्या कवी भद्रायूच्या भूमिकेसाठी बक्षीस पटकावलं होतं. त्याचप्रमाणे गोपुरीतल्या कुष्ठधाम केंद्रातही नियमित जाऊन तो तिथल्या रुग्णांची सेवा करी. बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर प्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या प्रेरणेनं त्यानं नागपूरच्या ‘तरुण भारत’ दैनिकात पत्रकारितेची मुळाक्षरं गिरवायला सुरुवात केली. बालवयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू मिळालेल्या दत्तानं गोवा मुक्ती संग्रामातही भाग घेतला होता.
पुढे ‘दैनिक भारत’ नावाच्या वर्तमानपत्राच्या संपादन खात्यात ते नोकरी करू लागले. त्यावेळी त्यांनी मुद्दाम रात्रपाळी मागून घेतली. कारण दिवसा ते दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या ‘पसंत आहे मुलगी’ व ‘देवघर’ या चित्रपटांच्या सेटवर जाऊन अवलोकन करीत. यातून आपल्याला काही शिकता येईल का? याचा ते अंदाज घेत होते. ‘दैनिक भारत’ बंद पडल्यावर त्यांनी मद्रासच्या (चेन्नई) ‘चांदोबा’ मासिकात नोकरी धरली. या मासिकाचं ऑफिस ‘वाहिनी’ या प्रसिद्ध स्टुडिओत होतं. दत्तांना तिथं इंग्रजी मजकुराचं भाषांतर करायचं काम होतं. त्याचं काम लवकर संपे. उरलेला वेळ काढायचा कसा? हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. दत्तांना वाचनाची खूप आवड असल्यामुळे संपादकांच्या परवानगीनं ते स्टुडिओच्या ‘स्क्रिप्ट विभागा’त जाऊन बसू लागले.
मद्रासमध्ये त्याचवेळी ‘वाहिनी’ स्टुडिओच्या जवळच ‘एव्हीएम प्र्रॉडक्शन’च्या ‘बाप बेटे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजा परांजपे करीत होते. नोकरी करीत असताना दत्तांनी ‘चांदोबा’चे प्रमुख बी. नागीरेड्डी यांच्या परवानगीनं राजाभाऊंकडे सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. हे काम थोडे दिवसच झालं. कारण लवकरच ‘बापबेटे’चं चित्रीकरण संपलं. राजाभाऊ परत निघाले. जाताना त्यांनी दत्तांना विचारलं, ‘आता तू काय करणार आहेस? माझ्याबरोबर पुण्याला येतोस का?’ तेव्हा दत्तांनी घरी वडिलांना पत्र पाठवून सिनेमात जायची परवानगी घेतली. ‘चांदोबा’ची नोकरीही सोडली. ‘चांदोबा’चं प्रमुख बी. नागीरेड्डी यांनी त्याला निरोप देताना ‘चित्रपटात बस्तान बसलं नाही तर परत ‘चांदोबा’त ये,’ असंही सांगितलं.
राजाभाऊंबरोबर दत्ता पुण्यात आले. ते साल होतं 1960. राजाभाऊंच्या ‘जगाच्या पाठीवर’चं चित्रीकरण सुरू होतं. दत्ता त्यांचे पाचवे सहाय्यक होते. एखाद्या हरकाम्यासारखं त्यांना काम करावं लागे. त्यानंतर त्यांनी राजाभाऊंबरोबर आणखी तीन-चार चित्रपट केले. एक दिवस राजाभाऊंनी दत्ताजींना सांगितलं, ‘इथं कुणी कुणाला शिकवत नसतं. तुम्हीच निरीक्षण करायचं. त्यातून बर्याच गोष्टी शिकायच्या. त्यावर चिंतन करायचं.’ राजाभाऊंचा हा गुरुमंत्र दत्तांनी आयुष्यभर जपला. ‘पाठलाग’ चित्रपटावेळी दत्ताजी तिसर्या क्रमांकाचे सहाय्यक झाले. या चित्रपटाच्या वेळी एका गाण्याचं फक्त संगीत तयार होतं. शब्द नव्हते पण तरीही त्या प्रसंगाचे काही शॉटस् दत्ताजींनी इतके अप्रतिम घेतले की राजाभाऊंचे निर्माते त्यांना म्हणाले, ‘आपल्या पुढच्या दोन चित्रपटांपैकी एक चित्रपट दत्ताला देऊ!’ त्यावर राजाभाऊ म्हणाले, ‘तुम्ही माझ्या मनातलं बोललात!’
काही दिवसांनी निर्मात्यानं दत्ताजींना विचारलं, ‘तुला चित्रपट करायचा आहे. तेव्हा तुझ्या मनात एखादी कथा आहे का?’
दत्ताजींनी नुकतीच लेखक प्रा. प्रभाकर ताम्हणे यांची ‘अल्ला जाने क्या होगा आगे’ ही अतिशय हलकीफुलकी विनोदी कथा वाचली होती. त्यांनी ती कथा ऐकवल्यावर सगळ्यांनीच थोडा विरोध केला. कारण दत्ताजी हे गंभीर प्रकृतीचे होते. पहिल्याच चित्रपटाला या असल्या कथेची ‘रिस्क’ न घेता रडारड असणारी कौटुंबिक कथा घेऊन त्यांनी चित्रपट करावा असंच सगळ्यांचं मत पडलं. पण दत्ताजी आपल्या मतावर ठाम होते. त्यांना ती कथा चित्रपटासाठी अतिशय योग्य वाटत होती. शेवटी निर्मातेही त्या कथेवर चित्रपट काढायला तयार झाले.
दिग्दर्शन दत्ताजी करणार होते. त्यांची आपले गुरु राजाभाऊ परांजपे यांच्यावर नितांत भक्ती होती श्रद्धा होती. त्यांच्यामुळेच हा चित्रपट दत्ताजींना मिळाला होता. आपल्या गुरुच्या नावातला ‘राज’ व स्वत:च्या नावातील ‘दत्त’ घेऊन त्यांनी दिग्दर्शक म्हणून ‘राजदत्त’ हे नाव घेतलं. या नावातून आपल्या गुरुची आठवण त्यांनी कायम जपली.
राजदत्त यांचा पहिला चित्रपट तयार झाला. चित्रपटाचं नाव होतं, ‘मधुचंद्र’. हा चित्रपट चांगला चालला. त्याला चांगलं यश मिळालं. राजाभाऊंनीही हा चित्रपट पाहिला. त्यांना तो आवडला. त्यांनी आपल्या शिष्याचं मनापासून कौतुक केलं. त्याला आशीर्वाद दिला! ‘मधुचंद्र’ या पहिल्याच चित्रपटामुळे राजदत्त यांचं नाव प्रथम श्रेणीच्या दिग्दर्शकात जमा झालं! ‘मधुचंद्र’ला यश मिळालं खरं. पण त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीची स्थिती फारशी बरी नव्हती. त्यानंतर आठ-दहा महिने राजदत्तना काहीच काम मिळालं नाही. ते निराश झाले. परत ‘चांदोबा’त जावं असं त्यांना वाटू लागलं. पण राजाभाऊंनी सुचवलं, ‘तू भालजींकडे जा. त्यांचं नवीन पिक्चर सुरु होतंय!’
राजदत्त भालजींकडे गेले. पण भालजी म्हणाले, ‘मी तुला सहाय्यक म्हणून काम देणार नाही. तू एकदा दिग्दर्शक म्हणून काम केलं आहेस. पुन्हा सहाय्यक झालास तर तुला कुणीही चित्रपट देणार नाही. तू असं करू नकोस. तुला पैसे हवे असतील तर मी देतो. पण तू थांब!’ राजदत्त यांच्या मानी स्वभावात ते बसत नव्हतं. ते रात्रीच्या गाडीनं परत निघणार होते. पण संध्याकाळी भालजींकडून निरोप आला. ‘थांब, जाऊ नकोस, उद्या येऊन भेट!’
दुसर्या दिवशी भालजींनी त्यांना स्वत:जवळची काही स्क्रिप्ट्स वाचायला देऊन त्यावर ‘सिनॉप्सिस’ करायला सांगितलं. राजदत्तना त्यापैकी भालजींच्या नेहमीच्या पठडीतलं नसलेलं ‘घरची राणी’ हे स्क्रिप्ट खूप आवडलं. तसं त्यांनी भालजींना सांगताच ते म्हणाले, ‘तुला जर कथा इतकी आवडली असेल तर त्यावर चित्रपट कर!’ भालजी एवढं सांगून थांबले नाहीत तर चित्रपट निर्मितीची पुढची व्यवस्थाही त्यांनी करवून दिली. कथा-पटकथा संवाद भालजींचेच होते. त्यांच्याशी चर्चा करून मग ‘घरची राणी’ हा चित्रपट निघाला. ‘घरची राणी’ला महाराष्ट्र राज्य चित्रपट स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला. त्यानंतर पाठोपाठ तीन वर्षे राजदत्तना हा पुरस्कार मिळत गेला. ‘घरची राणी’ला पुरस्कार मिळाल्यावर आचार्य अत्रे यांनी दत्ताजींना बोलावून त्यांचं अभिनंदन केलं. अशाप्रकारे अत्र्यांशी त्यांची खूप मैत्री झाली. अत्र्यांकडे असणार्या कवी सोपानदेव, चौधरी यांच्याशीही त्यांचं छान जमलं.
राजाभाऊंच्या ‘जगाच्या पाठीवर’च्या वेळी कविवर्य ग.दि.माडगूळकर यांच्याशी त्यांची सुरवातीला नुसती ओळख झाली होती. पण राजदत्त यांचं प्रचंड वाचन, कबीर आणि मीरा यांच्यासाख्या संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास गदिमांच्या लक्षात आल्यावर ते राजदत्त यांच्या प्रेमातच पडले. गदिमांबरोबर राजदत्त यांनी पुढे खूप काम केले. ‘वर्हाडी वाजंत्री’सारखी कानडी-मराठी वादाच्या विषयावरची वेगळी कथाही त्यांनी राजदत्त यांच्यासाठी लिहिली. त्यापुढच्या ‘या सुखांनो या’ यासारख्या चित्रपटाची कथा तर अण्णांनी कॅन्सरसारख्या आजारपणानंतर लिहिली होती.
अनेक साहित्यिकांशी ओळख, त्यांच्याबरोबरच्या गप्पांच्या मैफली, प्रचंड वाचन यातून राजदत्त यांची साहित्यिक जाण प्रगल्भ झाली होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचे लेखकही प्रथितयश साहित्यिक होते. प्रा. प्रभाकर ताम्हणे (मधुचंद्र), चंद्रकांत काकोडकर (अपराध आणि धाकटी बहीण), शंकर पाटील (भोळी भाबडी), बाबा कदम (भालू), पं. महादेवशास्त्री जोशी (अरे संसार संसार), स्नेहलता दसनूरकर (शापित), गो.नि. दांडेकर(देवकीनंदन गोपाला), वसंत सबनीस (आपलेच दात आपलेच ओठ, राघू मैना, सासू वरचढ जावई), अनिल बर्वे (मुंबईचा फौजदार), जोत्स्ना देवधर (अर्धांगी), बाबासाहेब पुरंदरे (सर्जा), रत्नाकर मतकरी (माझं घर माझा संसार), जयवंत दळवी (पुढचं पाऊल), भा. ल. पाटील (दुसर्या जगातली) इत्यादी.
चित्रपट करताना राजदत्त दूरदर्शनच्या मालिकाही करत होते. टिळक व आगरकर यांच्यातल्या मतभेदांवरची ‘मर्मबंध’ मालिका त्यांनी केली. टिळक-आगरकर दोघेही स्वराज्यासाठी लढले. पण दोघांच्या विचारात विरोध होता. आगरकरांना समाजसुधारणा आधी हवी होती. मग स्वातंत्र्य. टिळकांना वाटायचं स्वराज्य आधी मिळवू. सुधारणा काय नंतर करता येतील! टिळक बरोबर होते की आगरकर ? या प्रश्नाचं काळानं दिलेलं उत्तर आपल्यासमोर आहेच! स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली. समाज सुधारला का? तो आहे तिथेच आहे! आणि म्हणूनच टिळकमय संस्काराच्या वातावरणातील घरात जन्म घेऊनही राजदत्त यांच्यासारखा विचारवंत दिग्दर्शक ‘मर्मबंध’मध्ये आगरकरांना झुकतं माप देतो!
‘मर्मबंध’शिवाय राजदत्त यांनी ‘गोट्या’, ‘कल्याणी’ या मालिकाही केल्या. पंजाबराव देशमुख, डॉ.हेडगेवार यांच्यावर अनुबोधपट त्यांनी केले. समर्थ रामदासांच्या जीवनावरचा त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘साऊंड अँड लाईट शो’ भव्यतेमुळे गाजला. पस्तीसपैकी की चौदा चित्रपटांना राज्य पुरस्कार, ‘शापित’, ‘सर्जा’, ‘पुढचं पाऊल’ या तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक राजदत्त हे गदिमा पुरस्कार व व्ही.शांताराम पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत!
राजदत्त हे मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचे सर्वात ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत. बदलत्या काळाचं भान त्यांच्या चित्रपटात दिसतं. त्यामुळे आजच्या तरुण पिढीचेही ते आवडते लोकप्रिय दिग्दर्शक आहेत!
काळाबरोबर राहिलेला दिग्दर्शक…
———-
मराठी चित्रपट दिग्दर्शनात पहिल्याच चित्रपटाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्याचा पराक्रम विख्यात दिग्दर्शक म. गो. ऊर्फ बाबा पाठक यांनी केला होता. त्यांचीच परंपरा आणखी पुढे नेणारे दिग्दर्शक म्हणजे राजदत्त. या दिग्दर्शकानं आपल्या दीर्घ कारकिर्दीत तब्बल 14 राज्य पुरस्कार आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून एक मोठा विक्रमच केला. राजदत्त यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कारकिर्दीवर दिवंगत लेखक मधु पोतदार यांनी टाकलेला हा प्रकाशझोत.
– मधू पोतदार
(लेख सौजन्य – तारांगण मासिक)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया