अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०९-२०२०

सत्शील कलावंत…‘माणूस आपल्यासोबत जे घेऊन फिरतो ते त्याचं अस्तित्व असतं आणि त्याच्या माघारी जे चर्चिलं जातं, ते त्याचं व्यक्तिमत्त्व असतं. व्यक्तिमत्त्व जर स्वच्छ आणि सुंदर असेल तर त्याच्या अस्तित्वालासुद्धा नेहमीच लोकांचा मुजरा असतो. आदराचा… मानाचा… अगदी मनापासून…. आयुष्यभर अभिनय कलेची मनापासून व्रतस्थपणे सेवा करून त्या कलेचे अनेकांना दान करून कलाकारांची ललाटरेखा कालातीत बनविणारे मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील नायक, खलनायक, चरित्र नायक आणि दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे असंच एक अनोखं व्यक्तिमत्त्व …. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त (३ सप्टेंबर) काही मान्यवरांनी त्यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आठवणी….

——

ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार श्री.शं. ना. नवरे :

जयशंकर दानवे यांच्या भूमिका मला आवडत होत्या. त्यांची सुरुवातीला मला भीती वाटायची, पण त्यानंतर ते मला आवडायला लागले. कारण मग त्यांच्या अभिनयातली गंमत मला कळू लागली. हा कोल्हापूरचा मोठा कलाकार इथंच का राहिला? मुंबईच्या समुद्रात का नाही आला? असं एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं, पण हे सर्व वरच्यांनी लिहून ठेवलेलं असतं,पण एक प्रेक्षक म्हणून हे माझं दु:ख आहे. हा कलाकार जर मुंबईला आला असता तर त्यांनी नुसती धमाल उडवून दिली असती.

——————————————

ज्येष्ठ साहित्यिका माधवी देसाई :

दानवेकाकांनी अत्यंत साधेपणाने कलेची साधना केली. ६७ चित्रपटांत कामे केली. असा हा प्रचंड काम करणारा मनुष्य अगदी साधा जगला. दानवे जर मुंबईला गेले असते, तर प्राणची छुट्टी झाली असती आणि प्रेम चोप्रा जन्मालाच आला नसता; परंतु दानवेसाहेब कोल्हापुरात राहिले म्हणून त्यांनी अनेक कलाकार निर्माण केले.

——————————————

दिवंगत पत्रकार श्री. अनंत दीक्षित :

जयशंकर दानवे नावाचं आभाळ आहे आणि आपण सर्व जण या जमिनीचा भाग आहोत. इथं आभाळ जमिनीला बिलगलेलं आहे. हा एक क्षितिजाचा क्षण आहे असं मला वाटतं. माटे मास्तरांना एकदा कुणीतरी विचारलं की, माणसाचं आयुष्य किती असतं? तर ते म्हणाले, ‘एखादा माणूस गेल्यानंतर जितकी वर्षे त्याची आठवण काढतात तितके त्याचे आयुष्य असते. कलाकार संस्कारावर, शिक्षणावर, सहवासावर, अभिव्यक्तीवर, आविष्कारावर जगत असतो, तेव्हा फक्त कलावंत जगत नसतो तर मराठी संस्कृतीच त्या रूपाने जगत असते. जयशंकर दानवे मराठीसंस्कृती अविरतपणे चिरंतन जगत राहावी यासाठी व्रतस्थपणे जगणारे एक चौफेर कलावंत होते. हल्ली लोक म्हणत असतात की, ही भूमिका मी करतो म्हणजे त्या भूमिकेत जातो वगैरे, पण आपण एखादं चित्र काढतो आणि टक लावून ते चित्र आपण पाहतो तसं कलावंताला आपली भूमिका अशी लांबून पाहता आली पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण जयशंकर दानवेंनी दिलं.’

——————————————

ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे :

दानवेंचा मी एक चित्रपट बघितला होता, ‘मीठभाकर.’ त्यात ते सुरुवातीला म्हणतात, ‘डोळे असून बघायचं नाही, कान असून ऐकायचं नाही आणि जीभ लांब करून बोलायचं नाही, समजलं.’ या गोष्टीचा उल्लेख मी माझ्या कथेमध्ये केला होता. तो तरी करावासा का वाटला. कारण त्यांचा अभिनय जबरदस्त, लो टोनमध्ये व्हिलन भूमिका दाखविणे…पण शेवटी दुधामध्ये केशर किती टाकतात सांगा? एखादी काडी; पण दुधाचा रंग बदलण्याची ताकद आणि सुगंध देण्याची क्षमता त्या एका केशराच्या काडीत असते. मला दानवेंचं केशरासारखं दर्शन झालं. तेवढ्यावरून त्यांच्या अभिनयाची चुणूक काय असेल ते मला कळलं.

——————————————

ज्येष्ठ लेखक श्री. शिरीष कणेकर :

‘बहिर्जी नाईक’ या भालजींच्या चित्रपटात एक सीन होता. त्यात एका पात्राशी दानवे बोलत असतात आणि ते पात्र गयावया करत त्यांना म्हणतं की, माझं जर काही चुकलं, मी माझी अट पाळू शकलो नाही तर तोफेच्या गोळ्यांनी मला उडवा. त्यावर जयशंकर दानवे म्हणतात, ‘दारूगोळा आजकाल महाग झालाय. तेवढाही खर्चायचा नाही मला तुमच्यासाठी!’ ज्या पंचनी त्यांनी हे वाक्य टाकलंय ना ते महत्त्वाचं आहे. त्यांना आयुष्यात कुठलंही पारितोषिक मिळालं नाही. पण रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतलं.त्यांच्या नावाचा कोल्हापुरात ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे पथ’ निर्माण होतो, याहून मोठं पारितोषिक काय असणारं ?’

——————————————

ज्येष्ठ साहित्यिक श्री.द. मा. मिरासदार :

नाट्यसृष्टीतून चित्रपटसृष्टीकडे यायचा प्रयत्न अनेक नटांनी केला, परंतु त्यातले फार थोडे यशस्वी झाले. त्यांपैकी दोन-तीन नावं मला आठवतात. एक चिंतामणराव कोल्हटकर,दुसरे दिनकर कामाण्णा आणि तिसरं नाव मला दिसतंय श्री. जयशंकर दानवे यांचं. दानवे यांनी रंगभूमीही समर्थपणे हाताळली आणि चित्रपटांतही तितक्याच भूमिका केल्या. ही माध्यमं अगदी वेगळी आहेत. दोन्ही माध्यमांवर पकड ठेवणं, प्रभुत्व असणं ही अगदी अवघड गोष्ट आहे.

——————————————

ज्येष्ठ अभिनेते श्री.विक्रम गोखले :

‘दानवेकाकांची आणि माझी पहिली ओळख १९६४ किंवा ६५ साली मुंबईला शिवाजी मंदिरात एका तालमीच्या ठिकाणी झाली. ‘रायगड गातो शंभू गाथा’
नावाचं नाटक दानवेकाका दिग्दर्शित करत होते. तोपर्यंत रंगभूमीत व्यावसायिक नट म्हणून माझा जन्म झाला नव्हता. अनेक वेळा मी त्यांना भेटलो आहे. त्यांनी माझी कामे पाहून वेळोवेळी शाबासकी दिली आहे. असा हा सत्शील कलावंत अन् शिस्तप्रिय दिग्दर्शक, मी अतिशय नवीन होतो तेव्हा मला लाभला होता.’

——————————————

नटवर्य श्री. प्रभाकर पणशीकर :

‘नाटकात आणि सिनेमात यशस्वी झालेली अशी मोजकीच माणसे आहेत त्यापैकी दानवे एक. अनेक कलाकारांना त्यांनी जन्म दिला. माझ्या दृष्टीनं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते नुसतेच नट राहिले नाहीत, तर ते शिक्षक झाले. आयुष्यभर त्यांनी अनेक कलाकार घडविले.शिष्यांची नावं वाचल्यानंतर मी अवाकच झालो. टाकीचे घाव घालण्याचं काम या माणसानं केलं.’

——————————————

ज्येष्ठ वात्रटिकाकार श्री. रामदास फुटाणे :

‘दानवेसाहेब चित्रपट व्यवसायात धर्म म्हणून जगले. आज सगळा समाज एकसंध ठेवायचा असेल, तर पुढच्या पिढीच्या कलाकारांना आपण ज्यांच्या खांद्यावर वाढलो खेळलो, त्याची जाणीव असणे गरजेचे आहे. म्हणून मला वाटतं, हा कलाकार खूप मोठा आहे. त्यांचं ‘कलायात्री’ पुस्तक वाचलं, की लक्षात येतं, त्यांच्या एक दशांशसुद्धा आम्ही काही काम केलेलं नाही.’

——————————————

ज्येष्ठ साहित्यिक श्री. फ. मु. शिंदे :

‘न मिला है न मिलेगा आराम कही,मैं मुसाफिर हूँ, मेरी सुबह कही मेरी शाम कही l’

‘दानवेसाहेबांच्या संपूर्ण आयुष्याची कथा पाहिली की त्याचंच हे शीर्षक आहे की काय ‘टायटल साँग ऑफ लाइफ’ असं वाटतं. चित्रपटाचा एक दीर्घ कालखंड त्यांच्या आयुष्याशी, जगण्याशी जोडलेला आहे. हा नुसता शिक्षक नव्हता, समाजामध्ये साने गुरुजी जसे संस्कार शिक्षक होते त्या अर्थाने कलेच्या प्रांतामध्ये जयशंकर दानवे हे संस्कार शिक्षक होते. नारदाला निळे डोळे देणारे शिक्षक आणि त्या निमित्ताने भारतीय चित्रपटाच्या पडद्याला राज कपूर नावाचं सुंदर स्वप्न देणारे शिक्षक म्हणून जयशंकर दानवे, मला गुरूच्या ठिकाणी आहेत.’

——————————————

ज्येष्ठ अभिनेते श्री.मोहन जोशी :

‘दानवेंसारख्या दिग्गज कलाकारांनी मराठी रंगभूमी, मराठी स्क्रीन जास्त व्यापक व ताकदवान बनविण्यासाठी केवढी मेहनत घेतली आहे हे तरुण पिढीला माहीत नाही. मला ही गोष्ट ऐकून अभिमान वाटला की, दानवेसाहेबांनी सुलोचनाबाईंना इंट्रोड्यूस केलं आणि आज त्या किती मोठ्या कलाकार झाल्या आहेत.’

(सौजन्य : ‘कलायात्री’ चरित्रग्रंथ २०१०)

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया