अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०८-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌मराठी सिनेमा मला करायचाय
बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने आपल्या संजय दत्त प्रॉडक्शन या बॅनरखाली ‘बाबा’ या आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यानिमित्तानं त्याचं हे मनोगत.

——

मी सर्वप्रथम स्वतःला मराठीच मानतो. माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. मराठी चित्रपट नेहमीच चांगले विषय घेऊन लोकांपुढे घेऊन येत असतो. त्यामुळे बाबासारख्या चांगल्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा मी निर्णय घेतला. मात्र बाकी सगळं क्रेडिट आमच्या टीमचं आहे. चित्रपटाचं ‘बाबा’ हे शीर्षक मला खूप आवडलं. चित्रपटसृष्टीत मला ‘संजूबाबा’ म्हणत असले तरी शीर्षकामध्ये माझा काही हात नाही. ती कल्पना दिग्दर्शकाचीच आहे. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मला पत्नी मान्यता दत्तची खूप मोठी साथ लाभली. मराठी चित्रपटसृष्टीतील लेखक किंवा दिग्दर्शक माझ्याकडे जर चांगली भूमिका घेऊन आले तर ती मी नक्कीच साकारीन. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून ‘सैराट’ चित्रपटाचं नाव घेतलं जातं. परंतु, या चित्रपटातही फक्त मनोरंजन नव्हतं. एक खूप गंभीर समस्या या चित्रपटामधून मांडण्यात आली होती. या चित्रपटात मनोरंजनाबरोबरच आशयालाही मोठं स्थान होतं. ‘लई भारी’ हा केवळ मनोरंजनात्मक चित्रपट होता. ‘बाबा’मध्ये आम्ही खूप वेगळ्या विषयाला हात घातलाय. त्यामुळे केवळ मनोरंजन किंवा केवळ गंभीर सिनेमा आम्हाला करायचा नाही. आमच्याकडे जे चांगलं येतंय ते आम्ही प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणार आहोत.

झाडे आणि नायिकांमागे धावण्याचे माझे दिवस आता सरले आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे भविष्यात काही तरी वेगळ्या आणि ग्रेट भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे. हॉलिवुडमध्ये आपण पाहिलं तर अशा भूमिका साकारताना अभिनेते मेल गिब्सन, डेन्झिल वॉशिंग्टन यांना पाहिलं आहे. या कलाकारांप्रमाणे भविष्यात काही तरी चांगलं आणि वेगळं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. ‘रॉकी’पासून माझा आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा राहिला आहे. या काळात मला खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे.

‘प्रस्थानम’, ‘समशेरा’, ‘पानीपत’ असे वेगवेगळे चित्रपट पुढच्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होत आहेत. ‘मुन्नाभाई’ मालिकेतील तिसरा चित्रपट लवकरात लवकर बनावा अशी माझी स्वतःचीही इच्छा आहे. परंतु, तो नेमका कधी बनणार याचं उत्तर या चित्रपटाचा दिग्दर्शक राजकुमार हिरानीच देऊ शकतो. मराठीबरोबरच आम्ही इतर भाषांमध्येही चांगले चित्रपट करणार आहोत. ‘बॅंक लोन’ नावाचा चित्रपट आम्ही सध्या करतोय. या वर्षाच्या अखेरीस त्याच्या शूटिंगला सुरुवात होईल.

– संजय दत्त

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर

जयश्री दानवे यांचा स्मिता पाटील यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा "तेजस्विनी" हा लेख अत्यंत उत्तम असा आहे .स्मिता पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे अत्यंत समर्पक शब्दात लेखिका जयश्री दानवे यांनी मुल्यमापन केलेले आहे .

संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया