अतिथी कट्टा

दिनांक : ०१-०६-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌प्रभात पंढरी




भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रभात फिल्म कंपनीला सर्वात मोठे स्थान आहे. १ जून १९२९ रोजी ही संस्था स्थापन झाली. या संस्थेच्या ९०व्या वाढदिवसानिमित्ताने पंडित दामले यांनी लिहिलेल्या ‘प्रभात समयो पातला…’ या पुस्तकाधील एक संपादकीय प्रकरण आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

——

भाविक ज्या श्रद्धेने पंढरपूरला जातात, तशाच श्रद्धेने प्रभातचे अनेक चाहते प्रभात स्टुडिओला भेट देत. ‘प्रभात‘ हीच त्यांची पंढरी!

‘प्रभात‘चा तो सुवर्णकाळ होता. तुकाराम, कंकू, गोपाळकृष्ण, माणूस, संत ज्ञानेश्वर या ‘प्रभात‘च्या चित्रपटांची यशस्वी घोडदौड चालू होती. ‘प्रभात‘ची तुतारी दाही दिशांना निनादत होती. साहजिकच ‘प्रभात‘चे अनेक चाहते गावोगावाहून ‘प्रभात‘ स्टुडिओ पाहण्यासाठी पुण्याला गर्दी करू लागले. दैनंदिन कामात अडथळा येऊ नये म्हणून ‘प्रभात‘च्या चालकांनी या मंडळींसाठी स्टुडिओ रविवारी व बुधवारी सकाळी आठ ते साडे नऊ पर्यंत मुद्दाम करण्याचे ठरवले. स्टुडियो दाखविण्यासाठी निष्णात व निष्ठावंत मार्गदर्शकांची नेमणूक केली

वीस-पंचवीसच्या तुकडीने हजारो रसिक ह्या सुसंधीचा लाभ घेत होते. काही वेळा स्टुडिओ चक्क रिकामा असायचा. परंतु ज्या जागी तुकाराम महाराज पांडुरंगाच्या गरुडावरून सदेह वैकुंठाला गेले हा सीन चित्रीत केला होता तेथे भाविक चक्क साष्टांग नमस्कार घालीत. काहीतर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेल्या जागी जमिनीची माती कपाळाला लावून धन्य होत.शांता आपटेने ‘कुंकू‘ चित्रपटात वापरलेल्या फणीघराच्या आरशात बघून आपल्या कपाळावरचे कुंकू सारखे करून सुवासिनी खुश होऊन जात. पण आपल्या मुलाला शांता आपटेने ज्या काठीने झोडपले त्या गाठीचे दुरूनच दर्शन घेत. शाहू मोडकने ‘माणूस‘ चित्रपटात घातलेला पोलिसाचा ओव्हरकोट काही जवान हौसेने मिरवत शांतारामबापूंच्या बैठकीच्या खोलीत डोकावून कृतार्थ होत, तर दामले-फत्तेलाल यांच्या खोलीला मुजरा करीत.

केवळ ‘प्रभात‘ स्टुडिओ पाहण्यासाठी काही मंडळी परप्रांतातून येत असत. बिचाऱ्यांना स्टुडिओ दाखवण्याच्या वेळेची, वारांची कल्पनाही नसेल तशात सुट्टीचा दिवस म्हणजे स्टुडिओ बंद. परतण्याची तिकिटे वेळेवर मिळणे कठीण म्हणून ती आगाऊच काढलेली असत. ते फारच हिरमुसून जात. ‘प्रभात‘चे पहारेकरी त्यांना दामलेमामांची म्हणजे आमच्या वडिलांची परवानगी देण्यास आमच्या बंगल्यावर पाठवीत. दामलेमामा कुणालाही विन्मुख पाठवणार नाहीत याची पहारेकऱ्यांना खात्री असे. सुट्टीमुळे गाडीचा सुद्धा पत्ता नसे. तेव्हा दामलेमामा आम्हा भावंडांना पैकी कोणाला तरी- खूप वेळा मला- आज पाहुण्यांना स्टुडिओ दाखवण्यास सांगत. मी म्हणजे प्रत्यक्ष मालकांचा मुलगा व ‘तुकाराम‘ चित्रपटातील महादेवाने आपल्याला स्टुडिओ दाखविला या कृतज्ञतेचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असे आणि हे पाहून मी सुद्धा सुखावत असे अशा तऱ्हेने ‘प्रभात‘चे हजारो चाहते या गोड अशा आठवणींची जन्मभर पुरणारी शिदोरी गाठीला बांधून आनंदाने आपापल्या मुक्कामी पोहोचत.

– पंडित दामले

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया