अतिथी कट्टा

दिनांक : १९-०२-२०२०

‌‌‌‌‌‌‌‌‌स्मिता पाटील माझ्या आदर्श – पूनम राणे‘कॉर्पोरेट’ आणि कला अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये ‘बॅलन्सिंग अ‍ॅक्ट’ करणारे कलाकार आत्ताच्या काळात खूप कमी पाहायला मिळतात. पूनम राणे ही त्यापैकीच एक. गेल्या काही वर्षांपासून उत्तम कॉर्पोरेट करिअर सुरू असतानाही ती कला क्षेत्रात स्वतःचं नाव सिद्ध करण्यासाठी मेहनत घेत आहे. आजवरच्या आपल्या प्रवासाबद्दल तिचं हे मनोगत.

——

आमचं कुटुंब कणकवलीचं. परंतु, माझा जन्म पंतनगर-घाटकोपरचा. सीनिअर केजीमध्ये असताना आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो. माझं शालेय तसेच कॉलेजपर्यंतचं सगळं शिक्षण बदलापूरमध्येच झालं. अभ्यासामध्ये मी फार काही हुशार नव्हते. मात्र, परीक्षा जवळ आली की जागरूक व्हायचे नि उरलेल्या दिवसांमध्ये दणकून अभ्यास करायचे. त्यातून मला चांगले मार्क्स मिळायचे. त्या काळात मी हस्ताक्षरस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धांमध्ये अग्रेसर असायचे. कलेची मला सुरुवातीपासूनच आवड होती. त्याची जाणीव नंतरच्या काळात झाली.

शिक्षण संपल्यानंतर नोकरी मिळवण्याची धडपड सुरू झाली. सुरुवातीला मी एका कॉल सेंटरमध्ये काही महिने काम केलं. त्यानंतर ‘फ्रँकलिन’, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल’ या कंपन्यांमध्ये नोकरी केली. नोकरी करीत असतानाच मी ‘एचआर’मध्ये एमबीए पूर्ण केलं. गेल्या आठ वर्षांपासून मी ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’मध्ये काम करीत आहे. इथल्या सर्व सहकार्‍यांमुळे मी आजवर चांगला परफॉर्मन्स देऊ शकले आहे.

साधारण 2011ची ही गोष्ट असेल. त्यावेळी मी बदलापूरहून अंधेरीला दररोज नोकरीसाठी जायचे. दररोज एवढा लांब प्रवास करणार्‍यांना खूप सारं दिव्य पार पाडावं लागतं. ते मी पार पाडायचे. मानसी देवळेकर ही माझी लोकलमधील मैत्रीण. ती एका नाट्य ग्रुपमध्ये काम करायची. एका भूमिकेसाठी तिनं मला काम करशील का म्हणून विचारलं. अमित संसारेसरांनी माझी ऑडिशन घेतली. त्यांनी माझी कॉन्फिडन्स लेव्हल पाहिली. ‘जजमेंट’ नावाचं ते तीन तासांचं नाटक होतं. त्यात माझी मुख्य भूमिका होती. या प्रायोगिक नाटकामधील माझी भूमिका चांगली जमली. याच दिग्दर्शकाबरोबर मी पुढं ‘डार्लिंग डार्लिंग’ नावाचं नाटक केलं. अभिनयाची आवड मला लहानपणापासून होतीच. तसेच मला प्रत्येक नवीन गोष्ट ट्राय करायला आवडते. तसेच ती गोष्ट मी 100 टक्के मनापासून करते. त्यानंतर मी काही मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांचे एपिसोड्स केले. ‘बॅगपायपर’ सोडाची एक जाहिरातही मी केली. साधारण तीन वर्षांपूर्वी ऑडिशन दिल्यानंतर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातही मला एक महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर ‘कॉपी’ नावाचा मराठी आणि ‘वन डे जस्टिस’ हा चित्रपट मिळाला. हे दोन्ही चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाले. ‘वन डे जस्टिस ’या चित्रपटात मला अनुपम खेर यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

कलाक्षेत्राची मला आवड आहे. दुसरीकडे मी नोकरी करीत आहेस. या दोन्ही क्षेत्रांमध्ये ‘बॅलन्सिंग अ‍ॅक्ट’ करताना खूप आव्हानांना सामोरे जावं लागतं. आव्हानं तर दररोजची आहेतच. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनात असते तेव्हा ती गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही 100 टक्के प्रयत्न करता. सध्या तरी मला ही दोन्ही क्षेत्रं महत्त्वाची वाटतात. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांना सारखा न्याय देण्याचा मी प्रयत्न करते आणि आजपर्यंत मला त्यात यशही मिळालंय. ऑडिशन्स, शूट असेल तर मी ‘एसबीआय’मध्ये शनिवार आणि रविवारी येऊनही माझं काम पूर्ण केलं आहे.

कला आणि कॉर्पोरेट या दोन्ही क्षेत्रात मी काम करीत असल्यामुळे माझी धावपळ होत असते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांना वेळ देऊन स्वतःसाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी मेडिटेशन करते. त्याचा मला खूप उपयोग झालाय. नवीन स्कील्स डेव्हलप करण्याकडे माझा नेहमीच कल असतो. सध्या मी कथ्थक हा नृत्यप्रकार शिकतेय. प्राजक्ता साठे नावाच्या माझ्या गुरू आहेत. अंधेरी-पार्ल्यात त्यांचे नृत्याचे क्लासेस आहेत. त्या खूप छान शिकवतात. माझं वाचनही सुरूच असतं.

भविष्यात मला बरंच काही करायचं आहे. पहिलं ध्येय म्हणजे मला अभिनय क्षेत्रात चांगलं काम करायचंय. कारण अभिनय हे माझ्यासाठी पॅशन आहे. त्यासाठी मी सध्या चांगल्या संधीची, वेळेची वाट पाहते आहे. चांगली भूमिका आली तर मी ‘डेली सोप’ही करायला तयार आहे. दोन चांगले चित्रपट सध्या माझ्याकडे आले आहेत. त्याची घोषणा मी लवकरच करेन. वेगवेगळ्या ग्रुप्समधील ऑडिशन्ससाठी मी अप्लाय करीत असते. विशेष म्हणजे ज्यांना ज्यांना मी आजपर्यंत माझं प्रोफाईल पाठवलं आहे तिथून मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बहुतेक ठिकाणी मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं आहे.

मला मोठ्या पडद्यावर पाहून आई खूपच खूश झाली होती. या क्षेत्रात माझी सुरुवात झाली तेव्हा माझ्या कुटुंबियांना, आजूबाजूच्या लोकांना, मित्रपरिवाराला वाटलं नव्हतं की मी इथवर पोचेन म्हणून. परंतु, जिद्दीनं मी माझं कॉर्पोरेट क्षेत्र सांभाळून इथपर्यंत पोचले आहे. या क्षेत्रात मला स्मिता पाटील यांचं काम खूप आवडतं. त्या माझ्या आदर्श आहेत. त्यांचं ‘भूमिका’मधलं काम मला खूप आवडलं होतं. तसेच अक्षयकुमार, रणवीरसिंग हेदेखील माझे फेवरिट आहेत.

– पूनम राणे

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया