अतिथी कट्टा

दिनांक : ३०-०४-२०२२

‘चंद्रमुखी’साठी मी माझं सर्वस्व ओतलंय…


विख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अमृता खानविलकरचं हे मनोगत.

——–

‘चंद्रमुखी’ चित्रपट ऑफर झाल्यानंतर खरं तर सुरुवातीला मी खूप घाबरले होते. कारण हे खूप जबाबदारीचं काम होतं. या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक हा सुरुवातीला माझ्याकडे ही फिल्म नव्हे तर प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांनी लिहिलेली ‘चंद्रमुखी’ कादंबरी घेऊन आला होता. तेव्हाच त्यानं सांगितलं होतं की ही फिल्म जेव्हा बनेल तेव्हा मी दिग्दर्शित करीन आणि त्यामधील ‘चंद्रमुखी’ची व्यक्तिरेखा तू साकारशील. तेव्हा आमच्याकडे निर्माता नव्हता. साधारण दोन वर्षांपूर्वी लंडनमध्ये माझी भेट झाली ती ‘प्लॅनेट मराठी’च्या अक्षय बर्दापूरकर यांच्याशी. त्यांना मी ‘चंद्रमुखी’ चित्रपटाबद्दल सांगितलं. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर मी आणि प्रसादनं त्यांना ही गोष्ट ऐकवली. त्यांनी लगेचच आम्हाला हा चित्रपट करण्यास होकार दिला. त्यानंतरची पायरी होती ती विश्वास पाटील यांच्याकडून चित्रपटाचे हक्क मिळवणे. कारण या कादंबरीवर चित्रपट करण्याची परवानगी त्यांनी आजवर कोणालाही दिली नव्हती. पण ही फिल्म निर्माता अक्षय बर्दापूरकरांच्या नशीबात होती. कारण विश्वास पाटील यांनी आम्हाला हा चित्रपट करण्यास परवानगी दिली. विश्वासजींनी आम्हाला कोणतीच अट घातली नाही. फक्त या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत द्यावं अशी त्यांची इच्छा होती. आम्ही त्यासाठी प्रयत्न केला आणि हा एकमेव असा चित्रपट आहे की चित्रपटाचं ‘नरेशन’ न ऐकताही अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत देण्यास होकार दिला. ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण सध्या मराठी चित्रपटसृष्टीचे कर्तेधर्ते म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यामुळे आपली चित्रपटसृष्टी आज जगभरात प्रसिद्ध आहे. या जोडीचं संगीत या चित्रपटाला लाभलं, यासारखी सोन्याहून पिवळी दुसरी गोष्ट नव्हती. लेखक चिन्मय मांडलेकरनं सहा महिने घेऊन या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले. ते विश्वास पाटील यांना आवडले. त्यामुळे सगळ्यांनी आता उत्तम काम करा, फक्त एवढीच त्यांची अपेक्षा होती.

2020च्या मकर संक्रांतीला आम्ही ‘चंद्रमुखी’चा चेहरा लपलेला पोस्टर रिलीज केला. परंतु, त्यानंतर कोरोनाची साथ सुरू झाली. त्यानंतर पहिलं लॉकडाऊन जेव्हा उघडलं तेव्हा आम्ही चित्रपट शूट केला. या चित्रपटामधील शीर्षक व्यक्तिरेखेसाठी मी खूप वेगळी तयारी केली. या चित्रपटामधील माझ्या व्यक्तिरेखेची भाषा मी कधी अनुभवली नव्हती, तसेच ऐकलीही नव्हती. ही मावळ भागामधील भाषा असून थोडासा गावरान टच तिला आहे. ज्यात ‘पण’ नाही तर ‘पर’ असं म्हणतो. तसेच ‘म्हणतो’ हा शब्द ‘म्हंतो’ असा बोलला गेलाय. माझी भूमिका चांगली वठण्यासाठी प्रसादनं खूप मेहनत घेतलीय. कसं लाजायचं, डोळे कसे पाणावलेले आहेत ते दाखवायचे, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मी कसं बोलायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यानं मला समजावून सांगितल्या. त्याचं बोट धरून मी ‘चंद्रमुखी’ची वाटचाल केलीय. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच आम्ही खूप तयारी केली असल्यामुळे नंतरचं आमचं काम थोडं सोप्पं झालं. छायालेखक संजय मेमाणे सरांबरोबर प्रसादला बराच वेळ हवा होता. तो त्यानं घेतला. प्रसाद एक उत्तम नट आहे. त्यामुळे त्याच्यासोबतच्या आठवणी मला आयुष्यभर कामी येतील.

मृण्मयी देशपांडेबरोबर यापूर्वी मी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे आमचं ट्युनिंग फारच उत्तम होतं. मुन्ना आणि मी तेवढीच मस्तीही करायचो. एक अभिनेत्री म्हणून ती खूपच उजवी आहे. आदिनाथ कोठारेबरोबरचं माझं ट्युनिंग हळूहळू वाढत गेलं. आदिनाथ आणि माझ्यातील एक कॉमन गोष्ट म्हणजे आम्ही कलावेडी लोक आहोत. आम्ही दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखेत अगदी ओतून काम केलंय. या भूमिकेसाठी माझ्याकडे जे काही होतं, ते सर्व काही मी ओतलं आहे. ‘ंचंद्रमुखी’ बेभान होऊन नाचत असली तरी ती तिच्या कलेसाठी नाचत असते. ते दिसणं खूप जास्त गरजेचं होतं. नृत्यदिग्दर्शक दिपाली विचारे आणि आशीष पाटील यांच्याबरोबर मी वर्कशॉप्स करीत होतं. परंतु, माझी नृत्याची कार्यशाळा प्रसाद ओकनंही घेतली. जयश्री गडकर, मधु कांबीकर, रंजना यांच्या गाण्यांवर त्यानं माझ्याकडून नृत्य बसवून घेतलं होतं. तसेच ऑफबीट त्यानं मला नाचायला लावलं. चंद्रामधील ग्रेस, नाजूकपणा त्याला तिच्या नृत्यात हवा होता. यात खडी लावणी आहे, बैठकीची लावणीही आहे. मराठी चित्रपटामध्ये अनेक वर्षांनी प्रेक्षकांना बैठकीची लावणी ‘चंद्रमुखी’मुळे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माझं नॉर्मल नृत्य आणि या चित्रपटामधील नृत्य खूपच वेगळं आहे. माझ्या करिअरमधला हा सर्वाधिक चॅलेंजिंग रोल आहे. करोनाच्या साथीमुळे आम्हाला भरपूर वेळ मिळाला या चित्रपटाच्या तयारीसाठी. वजन वाढविण्यापासून ते नाक टोचण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी मी या चित्रपटासाठी केल्या. या चित्रपटाचा निर्माता अक्षय बर्दापूरकरनी आपलं सगळं पॅशन या चित्रपटात आणलंय. ते आम्हाला सतत ऊर्जा देत आलेत. हे अजिबात सोपं काम नाहीय. मराठी फिल्म म्हटलं की पैशाचा प्रश्न खूप मोठा असतो. पण त्यानं खूप स्ट्रगल करून ही फिल्म बनवलीय. म्हणूनच मी आयुष्यभर अक्षयची ऋणी राहीन.

– अमृता खानविलकर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया