’शांतारामा’ आत्मचरित्राचा माझ्यावर मोठा प्रभाव
——
महानगरीय अवकाशात एका लहानशा गावातून आलेला तरुण ही संकल्पना ‘कोसला’ या कादंबरीवर आधारित आहे का? आधीचा ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा डॉक्युफिक्शन बनवताना ‘त्रिज्या’चं बीज तिथे रुजलं का?
– खरं तर याचं उत्तर मी ‘नाही’ असेच देईल. नेमाडेंच्या साहित्याचा प्रभाव असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे ‘त्रिज्या’चं बीज ‘कोसला’मधून रोवलं गेलं असं मी म्हणणार नाही. तसं असतं तर मी सरळ ‘कोसला’वरच चित्रपट बनवला असता. नेमाडेंच्या लिखाणाचा प्रभाव माझ्यावर आहे, तसाच इतर बर्याच लेखकांचा आहे. त्यात चेकॉव्ह, जी. ए. कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी हे लेखक सांगता येतील. जसं नेमाडेंच्या कादंबरीत असलेलं वातावरण मला महत्त्वाचं वाटतं, तसंच इतरही लेखकांच्या कादंबर्यांमधील वातावरण मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ‘त्रिज्या’ची कल्पना सुचली कशी याबद्दल मला असं वाटतं की, मी ज्यावेळी छोट्या गावातून महानगरात आलो, त्यावेळीच ‘त्रिज्या’चं बीज माझ्या मनात रोवलं गेलं. मग पुढे जेव्हा पहिलाच सिनेमा करायचं निश्चित केलं तेंव्हा वाटलं की आपण आपलीच गोष्ट का नाही चित्रित करावी? थोडक्यात हे माझं पडद्यावरचं आत्मकथन आहे आणि त्यातूनच ‘त्रिज्या’च्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली.
सिनेमाची जमवाजमव कशी झाली ?
– 2010 मध्ये मी या चित्रपटाचा पहिला आराखडा लिहिला होता. ‘त्रिज्या’चं बीज रोवल्यापासून तर चित्रपट पूर्ण होईपर्यंतची प्रक्रिया ही सात ते आठ वर्षे अशी दीर्घकालीन होती. सध्याच्या काळात जो मराठी सिनेमा बनतो त्या काळात एक आत्मचरित्रपट बनवणं ही एक मोठी जोखीम होती. त्यामुळे मी सुरुवातीला फारसा विचार न करता लिहीत गेलो. जगाचा विचार न करता आपल्याला हवी ती गोष्ट सांगावी यावर मी ठाम होतो. त्यामागचं आणखी कारण म्हणजे जगभरात जे उत्तम दिग्दर्शक झालेत, त्यांनी स्वतःच्या समाजाविषयी गोष्टी चित्रपटातून सांगितल्या आहेत. मी याला आत्मकेंद्री सिनेमा म्हणणार नाही. फक्त आपलं जगणं मांडणारा चित्रपट मला करायचा होता. आपलं जगणं दुसर्याला भिडलं पाहिजे एवढाच माझा प्रयत्न होता. मी मूळचा लोककलावंत. भटक्या विमुक्तांमधला. कर्नाटकातील इंडी गावाचा. या पिढीत आमच्या वाट्याला स्वतःचं घर आलं. स्थिरस्थावर झालो. माझे वडील अकलूजला आता प्राध्यापक झाले. दहावीनंतर मग पुढील शिक्षणासाठी आणि नव्या शक्यता शोधण्यासाठी माझं पुण्याला पहिलं स्थलांतर झालं. स्थलांतर या विषयाचे वेगवेगळे पदर उलगण्याचा माझा प्रयत्न होता. अशी कोणती जागा आहे की जिथं आपल्याला शांतता मिळते? असा प्रश्न अनेकांना पडतो. ही जागा दुसरीतिसरी नसून आपलं स्वतःचं मनच आहे का? सुरुवातीला ‘त्रिज्या’ची कथा ही ‘यात्रा’ या नावाने लिहायला सुरू केली होती. हीच माझी पहिली कथा असल्याने हे स्वप्न आपण बरोबर बाळगण्यास हरकत नाही असं मला वाटलं. स्वतःबद्दलची पाचशे पानं मी सुुरुवातीला लिहिली. मग त्यावर पुढे काम करत असतानाच पटकथेचा आराखडा लिहून झाला. नंतर पुढील प्रक्रियेसाठी अनेक निर्मात्यांची दारं ठोठावली. पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मी भालचंद्र नेमाडेंना भेटलो. खरंतर ‘त्रिज्या’मध्ये त्यांची एक कविता आहे. त्यासंदर्भात मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्या भेटीतून असे जाणवले की या माणसावरच आपण एक फिल्म का करू नये. याच विचारातून मग ‘त्रिज्या’चं काम थोडंसं बाजूला राहिलं आणि ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या फिल्मची प्रक्रिया सुरू झाली.
‘त्रिज्या’साठी तुला निर्माते लगेचच मिळाले का?
– ‘चित्रकथी’ या संस्थेच्या निर्मिती सहकार्याने ‘उदाहरणार्थ नेमाडे’ ही फिल्म पूर्ण झाली. पुढे चालून याच निर्मिती संस्थेने ‘त्रिज्या’ या फिल्मसाठीही निर्मिती साहाय्य करायचं ठरवलं. थोडासा उलट्या दिशेने प्रवास झाला, परंतु पुन्हा एका पातळीवर ‘त्रिज्या’चा प्रवास सुरू होऊन फिल्म बनली.
नेमाडेंच्या फिल्मपूर्वी मी 30-40 निर्मात्यांना भेटलो होतो. परंतु त्यांच्या सूचना या विचारात घेण्याजोग्याही नव्हत्या. त्यामुळे मला बराच काळ वाट बघावी लागली. या प्रवासात मला मराठी चित्रपटांबाबतच्या विविध समस्या समजल्या. त्यापैकी इथली मुख्य समस्या म्हणजे इथं निर्माते नाहीत तर अर्थपुरवठादार आहेत. परंतु सिनेमाला फक्त पैसा ही एकच गोष्ट लागत नाही. आपण लावलेला पैसा योग्य पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवा याचं निर्मात्याला भान असणं आवश्यक आहे. कोणत्या चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविला पाहिजे, त्यानंतर तो महाराष्ट्रात प्रदर्शित केला पाहिजे, अशी स्ट्रॅटेजी माहीत असलेला निर्माता आम्ही शोघत होतो. सुदैवानं आम्हाला ‘चित्रकथी’ची साथ मिळाली. कालांतरानं आमच्याबरोबर एक कंपनी आली. या कंपनीला आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा अनुभव आहे. त्यांनी आमच्यातील गुणवत्ता ओळखली नि तिथून आमची ताकद वाढली.
‘त्रिज्या’साठी लोकेशन्स कोणकोणती होती?
– लोकेशन्स तर खूप होती. अगदी या कथेसाठी लोकेशन्स शोधणे ही सुद्धा एक मोठी प्रक्रिया होती. लोकेशन्स शोधणे हीच या फिल्मसाठी छान गोष्ट होती असं मी म्हणेल. जवळपास यासाठी वीसेक हजार किलोमीटर आम्ही फिरलो. त्यातून मग महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, कोकण, पुणे शहर, भीमाशंकर अशा अनेक ठिकाणी शूटिंग करण्यात आलं.
शूटिंग किंवा लोकेशन हंटिंगदरम्यान एखादा लक्षात राहण्यासारखा प्रसंग घडला का ?
– लक्षात राहण्यासारखा म्हणण्यापेक्षा मला खूप काही शिकवून जाणारा प्रसंग अगदी शूटिंगच्या पाहिल्याच दिवशी घडला. सेटवर सगळी तयारी झालेली होती. परंतु त्या दिवशी मला अचानक ताप आला. ताप जवळपास 103 डिग्री होता. त्यातच सर्वांगावर कांजिण्यासदृश्य पुरळही उठले. हॉस्पिटलला गेलो असता डॉक्टरांनी हा ताप साधा नसून खूप जास्त आहे तसेच अंगावर कांजिण्या आल्या आहेत आणि हे गंभीर आहे असं सांगितलं. तसंच कमीत कमी 3-4 दिवस अॅडमिट व्हायला सांगितलं. मी अंतर्बाह्य हादरून गेलो. डोळ्यासमोर फक्त शूटिंग दिसत होतं. अश्यावेळी अचानक मला कसलीशी ऊर्जा आली आणि मी सेटवर जाऊन शूटिंग करायचं ठरवलं. जे होईल ते पुढे पाहता येईल या विचाराने मी शूट सुरू केलं. मला त्या इच्छाशक्तीच्या जोराने माझ्या आजारपणावर मात करता आली. यात माझ्या टीमचा सर्वात मोठा वाटा होता हे सांगावंसं वाटतं.
‘त्रिज्या’चा शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान झाला. या चित्रपटाचा तिथं ‘वर्ल्ड प्रीमियर’ झाला. हा सगळा प्रवास स्वप्नवत वाटतो का ?
उत्तर – हो नक्कीच. आपण सिनेमा बनवताना एक विचार करतो की हा सिनेमा सर्वच स्थरांत पोहोचावा, जगभरातील वेगवेगळ्या लोकांनी आपला सिनेमा बघून प्रतिक्रिया द्याव्यात, भावना व्यक्त कराव्यात. चीनमध्ये अलीकडच्या काळात आपले हिंदी चित्रपट खूप चांगली कामगिरी करताहेत. ते गेल्यावर मला अनुभवायला मिळालं. विमानतळावरच आम्हाला रिसीव्ह करायला आलेल्या प्रतिनिधीनं ‘थ्री इडिएट्स’ चित्रपटामधील गाणं म्हणून आमचं स्वागत केलं. आमिर खानचे आम्ही खूप मोठे फॅन आहोत, असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. माझ्या सुदैवानं प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानीही याचवेळी चीनमध्ये आले होते. आम्ही दोघे एकाच हॉटेलमध्ये उतरलो होतो. त्यांच्याबरोबर माझी बरीच चर्चा झाली. चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटांचे चाहते आहेत. चीनमध्ये फिरत असताना मला स्वतःला ‘आवारा’ची ट्यून वाजवणारा एक बासरीवादक भेटला. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्या चित्रपटाचा शो होतोय, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. पहिलाच शो हाऊसफुल झाला. त्यामुळे काहीतरी अफलातून घडलंय याची मला जाणीव झाली. शांघायमधील ग्रँड थिएटरमध्ये हा शो झाला. 1920 पासून हे थिएटर अस्तित्वात आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर एका जपानी महिलेनं खूप आपुलकीनं आमच्याशी चर्चा केली. चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर बरेच प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी मी भारतीय तत्त्वज्ञानावर हा चित्रपट कसा आधारलाय याची मी माहिती दिली. काहींना हा चित्रपट ‘बुद्धीजम’च्या जवळ जाणारा वाटला तर काहींना स्वतःचा शोध वाटला. काहींनी तर आधुनिक काळातला हा सिद्धार्थ आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला. शांघायमधील मराठी प्रेक्षकांचीही प्रतिक्रिया खूप चांगली होती. चीनमध्ये त्यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपट पाहिला. नामांकित शांघाय फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपटाला उत्कृष्ट फिल्म, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट छायांकन असे तीन तीन नामांकनं मिळतात ही गोष्ट सुखावणारी आहे. शांघाय फिल्म फेस्टिवलच्या इतिहासात एखाद्या भारतीय सिनेमाला तीन नामांकन मिळणं ही ‘त्रिज्या’च्या निमित्ताने पहिलीच वेळ आहे. या पुरस्कारांचे ज्युरी हे कानमध्ये गौरविलेल्या चित्रपटांची फिल्ममेकर मंडळी होती. तसेच तेथील जागतिक दर्जाच्या ज्युरीसमोर आपली फिल्म दाखवली जाणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. ज्युरींबरोबर मी दीर्घ काळ चर्चा केली. आयुष्यभर जपून ठेवावा असा हा अनुभव होता. त्यामुळे केलेल्या कामाचं आता समाधान मिळतंय.
शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 4500 सिनेमांमधून 10 सिनेमे आणि त्यातूनही नंतर 6 सिनेमे निवडले गेले. त्यात ‘त्रिज्या’चा समावेश होता. या निवडप्रक्रियेबद्दल काय सांगशील?
– खरं तर सिनेमा निवडीचे त्यांचे अंतर्गत निकष काय होते याबद्दल मला माहिती नाही. परंतु शांघाय फिल्म फेस्टिव्हलच्या संबंधित एका व्यक्तीने ‘त्रिज्या’ बघितला. नंतर त्यांनी या चित्रपटाला अधिकृतरित्या फेस्टिव्हलमध्ये दाखवण्याविषयी मेलद्वारे विचारणा केली. इकडे आम्हीसुद्धा जगभरातील चांगल्या फेस्टिव्हलमध्ये ‘त्रिज्या’ पाठवण्यासाठी प्रयत्नशील होतोच. अश्यातच शांघायची आयती संधी चालून आल्याने आम्ही होकार दर्शवला. त्यातूनच मग पुढच्या गोष्टी घडत गेल्या.
आजच्या काळात तरुणाला पूर्वीपेक्षा जास्त संधी उपलब्ध असतानाच अनेक नवीन आव्हानेदेखील त्याच्यासमोर उभी आहेत. ‘त्रिज्या’ त्यावर भाष्य करतो का?
– खरं तर काही प्रश्न किंवा आव्हानं ही काळाच्या पलीकडे असतात. त्यामुळे त्यांना आपण काळाच्या चौकटीत बसवू नाही. हॅम्लेटलासुद्धा जगावं की मरावं हा प्रश्न पडलाच होता. त्यामुळे मला प्रश्न कोणत्याही काळातील असो त्याविषयी आत्मीयता आहे. जेव्हा आपण उत्तराच्या शोधात निघतो तेव्हा काळ ही गोष्ट गौण ठरते. प्रश्न, उत्तर आणि काळ ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. त्यामुळे प्रश्न कोणत्याही काळातील असोत ते विचारणं म्हणजे मला सिनेमा वाटतो. हा तरुणाईचा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या स्वाधीन होऊन तुम्ही तो बघितला तर तुम्ही आधीची व्यक्ती राहणार नाही याची मी खात्री देतो. या चित्रपटात गाणी नसून कविता आहेत. लोकसंगीताचा त्याला आधार आहे. नेहमीचं टिपीकल संगीत घेण्याऐवजी आम्ही रोजच्या आयुष्यातील ध्वनी वापरला आहे. तोच कालांतरानं आपोआप संगीतात परावर्तीत होतो. या चित्रपटाच्या दोन प्रमुख बाजू म्हणजे त्याचा ध्वनी आणि सिनेमॅटोग्राफी. त्याच्या ध्वनीवर आम्ही दीड ते दोन वर्ष काम केलं. त्यासाठी आठ ते नऊ साउंड डिझायनर बदलले आम्ही. शेवटी मंदार कमलापूरकर यांच्याशी माझं ट्यूनिंग जमलं. पुणे, सातारा, भीमाशंकरचे जंगल, कोकणात हा चित्रपट चित्रीत झाला.
आजच्या घडीला सिनेमाचं बर्यापैकी लोकशाहीकरण झालेलं आहे. अगदी बड्या दिग्दर्शकांनाही काही साधारण परंतु कल्पक दिग्दर्शक मात देत आहेत. या सिनेक्रांतीबाबत तुला काय वाटते?
उत्तर – मला तरी अशी क्रांती झालीय असं वाटतं नाही. हो कदाचित सिनेमा बनवण्याच्या तंत्रात जलदपणा आला असेल किंवा तांत्रिक बदल झाले असतील. परंतु खूप लोक सिनेमा बनवायला लागले म्हणून क्रांती झाली असे म्हणता येणार नाही. बडे दिग्दर्शक किंवा इतर काही चौकटी ठेवून सिनेमे बनवणारे लोक हे काही गरजा समोर ठेवून सिनेमा बनवतात. अनेक लोकांनी कविता लिहायला सुरुवात केली म्हणून त्यातून दर्जेदार कविता तयार होतीलच असे नाही. तसंच सिनेमाचही आहे. जो सिनेमा माझ्या आत डोकावू शकेल, मला जो आत्मभान देईल, जो मला जगता येईल त्याला कदाचित चांगला सिनेमा म्हणू शकू आणि चौकटी तोडून जेव्हा अशा विचारसरणीतून सिनेमे बनवणं सुरू होईल तेव्हा खर्या अर्थाने सिनेक्रांती झाली असे आपण म्हणू शकू.
सिनेमा हे माध्यम तुला इतर कलाप्रकारांत नेमकं कसं वेगळं वाटतं?
– सिनेमा हे माध्यम एकाचवेळी विविध कलांना सामावून घेणारं माध्यम आहेच आणि त्या पलिकडे जाऊन सिनेमा आपलं स्वतंत्र वातावरण निर्माण करतो. मानवी प्रश्नांची उकल करण्यासाठी सिनेमा हे एक प्रभावी माध्यम असल्याचं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे आजच्या काळाचं माध्यम वाटतं. कारण इतर कलांपेक्षा सिनेमा ज्या दृकश्राव्य पद्धतीने लोकांपर्यंत जातो ती ताकद मला फार महत्त्वाची वाटते. एका माणसाचा अनुभव दुसर्या अनेक माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सिनेमा हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे इतर कलाप्रकारात सिनेमा हे माध्यम मला वेगळं वाटतं.
कोणकोणत्या दिग्दर्शकांचा प्रभाव तुझ्यावर आहे असं तुला वाटतं?
– जगभरातील अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. त्यात अनेक भारतीय दिग्दर्शकांचाही अंतर्भाव आहे. अमित दत्ता या फिल्ममेकरचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. पण हे नाव अनेकांना माहीत नाही. लहानपणापासून अनेक ठिकाणी आपली सिनेमाशी गाठ पडत असते. लहानपणी बघितलेले सिनेमे मग ते ‘प्रभात’चे असो, किंवा शाळेत दाखवले जाणारे विविध सिनेमे… ते आपल्यावर काहीतरी परिणाम करत असतात. त्यातल्या त्यात थिएटरमध्ये बघितलेल्या ‘बॉर्डर’ ह्या सिनेमाने माझ्यावर प्रचंड गारुड केलं होतं. सिनेमा ही काय जादू आहे आणि किती विशाल जीवनदर्शन आपण त्यातून दाखवू शकतो हे मला कळण्यात ‘बॉर्डर’चा मोठा हात आहे. राज कपूर यांचं काम बघून ते काहीतरी वेगळं होतं याची जाणीव झाली. मग व्ही. शांताराम यांचं ‘शांतारामा’ आत्मचरित्र हातात आलं. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. दहावीतून अकरावीला गेल्यानंतर पैसे साठवून मी शांतारामा पुस्तक दिवाळीत विकत घेतलं होतं. हिरव्या-पिवळ्या प्लास्टिकच्या कव्हरमध्ये हे पुस्तक आजही माझ्या संग्रहात आहे. ते कायम माझ्या समोर होतं. ‘शेजारी’, ‘माणूस’, ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटांचाही माझ्यावर प्रभाव आहे. ‘दो आँखे बारह हाथ’ हा चित्रपट मी प्ले आणि पॉज करून किमान शंभरपेक्षा जास्त वेळा तरी पाहिला आहे. लगानचा माझ्यावर प्रभाव आहे. भव्य स्वप्न पाहायची ताकद या चित्रपटानं दिली. पुण्यात आल्यावर फिल्म इन्स्टिट्यूटला यायच्या आधी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालायत विविध चित्रपट बघायला मिळाले. सत्यजित राय यांचं नाव सर्वात पहिल्यांदा तिथे ऐकलं आणि मग त्यांचे असतील तेवढे सिनेमे बघितले. ‘पाथेर पांचाली’ तर खूपच वेळा. त्यांच्यावर लिहिलं, त्यांच्या प्रत्येक फ्रेमचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर व्ही. शांताराम. सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन, मणी कौल, कुमार साहनी हे दिग्दर्शक तर परदेशातील तार्कोव्हस्की, मायकेल एंजलो अॅन्टोनिओनी, नुरी बेलगे जलान या माणसांचा प्रभाव नकळत पडत गेला. ‘अब्बास किरोस्तामी’ हे नाव मी प्रामुख्याने यात घेईन. कारण या माणसाने मला सिनेमातला साधेपणा दाखवला. माणसांकडे बघायची एका वेगळी दृष्टी त्याच्या सिनेमांमुळे मला मिळाली. त्यामुळे अब्बास किरोस्तामी यांचा सिनेमा मला तितकाच महत्त्वाचा वाटतो आणि प्रभाव असं म्हणताना तो वेगवगळ्या सिनेमांमधल्या वेगवेगळ्या फ्रेम्सचा पडू शकतो. संगीताच्या एका तुकड्याचाही प्रभाव पडत असतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे नेमाडेंच्या साहित्याचाही माझ्यावर प्रभाव आहे. तसाच चेकॉव्हच्या साहित्याचाही आहे. माणूस म्हणून जगत असताना एक रसिक म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टींना सामोरे जातात त्या त्या गोष्टींचा प्रभाव आपसूकच तुमच्यावर होत असतो आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे चांगलं कशाला म्हणावं याची आपली व्याख्या तयार होत असते. जगभरातील विविध दिग्दर्शक पाहात असताना त्यांनी करून ठेवलेलं काम किती उत्कृष्ठ दर्जाचं आहे याची जाणीव माझ्या मनावर कोरली जाणं महत्त्वाचं होतं. त्या जाणिवेमुळे सिनेमात झालेल्या वेगवेगळ्या प्रयोगांना मी सामोरे जायला लागलो. ते प्रयोग स्वत:च्या सिनेमावर करून बघायला लागलो आणि त्यातून मग माझा सिनेमा घडत गेला.
तुझ्या फिरत्या सिनेमाबद्दल काय सांगशील?
– मुळात फिल्म इन्स्टिट्यूटला असताना एका मल्याळी दिग्दर्शकाबाबत मी ऐकलं. त्यांचं नाव अदूर गोपालकृष्णन. ज्यांना दादासाहेब फाळके, पद्मविभूषण असे पुरस्कार मिळालेले आहेत, अशा या दिग्गज माणसाने सिनेमा आपल्या भाषेमध्ये रुजावा म्हणून, फिल्म इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झाल्यानंतर ‘चित्रलेखा’ नावाची एक फिल्म सोसायटी स्थापन केली आणि त्या फिल्म सोसायटीच्या माध्यामातनं, त्यांनी वेगवेगळे सिनेमे पाहणारा, ते स्विकारणारा एक प्रेक्षकांचा वर्ग तयार केला. असा प्रेक्षकवर्ग तयार करणे ही कुठल्याही कलावंताची, दिग्दर्शकाची मला प्रमुख जबाबदारी वाटते. त्यातूनच आमचा ‘फिरता सिनेमा’ हा उपक्रम सुरू झाला. गावोगावी जाऊन सिनेमा दाखवणे, लहान मुलांच्या कार्यशाळा घेणे हे त्यात आम्ही करत होतो. आमची आधीची ‘उदाहरणार्थ नेमाडे’ ही फिल्म आम्ही महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी जाऊन दाखवत होतो. त्यानंतर ती भारतातही बघितली गेली आणि जगभरातही गेली. फिरता सिनेमा, हे सिनेमा या माध्यमासाठी जे जे चांगलं आणि उपयुक्त आहे त्या सर्वांची माहिती लोकांपर्यंत जावी यासाठी तयार केलेलं प्लॅटफॉर्म आहे. फिरता सिनेमाअंतर्गत आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. त्याच्यामध्ये नवीन लोकांच्या कामाला चांगलं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. निर्मितीही करण्याची भविष्यात इच्छा आहे. फिरता सिनेमामुळे अनेक होतकरू तरुणांना एकत्र करून काही निर्मिती करण्याचा प्रयत्न असणार आहे.
आता एक थोडा वेगळा प्रश्न, भयपट आणि रहस्यपट असे प्रकार मराठी सिनेमात फारसे आढळून येत नाहीत. भविष्यात जर संधी मिळाली तर तुला यातला कुठला प्रकार हाताळायला आवडेल?
– नाही. मला वाटतं असा सिनेमा ठरवून बनवू नये. सिनेमा स्वाभाविकपणे सुचला पाहिजे. तो असा ठरवून बनवला तर त्यात फारसं वास्तव राहात नाही. आपल्याला सिनेमात जे सांगायचं आहे, ते सांगायची आंतरिक गरज निर्माण व्हायला पाहिजे. ते सांगणं आतल्या आत तुम्हाला अस्वस्थ करत असलं पाहिजे. तर सांगण्यात गंमत आहे. ठरवून एखादा पायंडा पाडायला गेलो तर त्याला खूप मर्यादा येतात. समजा उद्या मी ब्लॅक रोएर, ब्लॅक कॉमेडी किंवा कॉमेडी यातला ठरवून कुठला प्रकार करायला गेलो तर त्या प्रकारांच्या सिनेमांच्या असलेल्या मर्यादा तुमच्या मर्यादा होत जातात. हे सगळे प्रकार अभ्यासकांनी तयार केलेले आहेत. मी त्याचा फारसा विचार करत नाही. माझ्या मनात जेव्हा विचार येतो, की माझा सिनेमा कुठल्या प्रकारातला आहे? तेव्हा मीच स्वत:ला बजावतो की का बसवायचं आपण आपल्या सिनेमाला एखाद्या विशिष्ट पठडीत? त्याला मुक्त असू द्यावं. शेवटी तो एक सिनेमा आहे. कुठल्याही प्रकारातला असो. तो चांगला किंवा वाईट असू शकतो पण सिनेमाच.
शेवटचा प्रश्न. ‘त्रिज्या’नंतर आता पुढे काय? भविष्यातल्या कुठल्या सिनेमाची तयारी सुरू आहे?
– आता सर्वात पहिलं म्हणजे ‘त्रिज्या’ लोकांपर्यंत पोहोचवणं. ‘उदाहरणार्थ नेमाडे’ बनवून तो लोकांपर्यंत पोहोचवणं, फिरता सिनेमा नावाची जी चळवळ आम्ही सुरू केली आहे, सिनेमा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही ‘उदाहरणार्थ नेमाडे’ गावोगावी घेऊन फिरलो. आता अशीच इच्छा आहे की ‘त्रिज्या’ही जगात वेगवेगळ्या ठिकाणी दाखवली जावी. ‘त्रिज्या’ महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या विविध गावांत कसा प्रदर्शित करता येईल त्याचा विचार आता आम्ही करतो आहोत. जगभरातील प्रत्येक देशाच्या भाषेत आपला चित्रपट पोचविण्याची माझी इच्छा आहे. युरोपातील एक मोठा महोत्सव मिळण्याची आम्ही वाट बघतो आहोत. चित्रपट महोत्सवाचं वर्तुळ पूर्ण करून, जगभरातला प्रेक्षकवर्ग सोबत घेऊन मला मग हा चित्रपट आपल्या प्रेक्षकांपुढे आणायचा आहे. आपला मराठी चित्रपट इतर भाषांमध्ये नेण्याची माझी इच्छा आहे. इंडोनेशियातील एका फेस्टिव्हलच्या डायरेक्टरला हा चित्रपट आवडला. त्यानं लगेचच त्यांच्या महोत्सवात सहभागी होण्याचं निमंत्रण आम्हाला दिलं. नाचगाणी, मेलोड्रामा या पलीकडचा चित्रपट असू शकतो, हे यामुळे सिद्ध होत जातं. आणि पुढील सिनेमा बाबत बोलायचं झालं, तर मी सिनेमा लिहितो आहे. त्याचा आराखडाही तयार झालेला आहे. परंतु ते आत्ताच बोलणं योग्य नाही. सिनेमा बनवत असताना सिनेमाचं कथानक ही माझ्यासाठी काही अंतिम गोष्ट नाहीये. सिनेमाची पटकथा ही सिनेमाचा एक घटक आहे. तो म्हणजे काही संपूर्ण सिनेमा नाही. पटकथा लिहून झाली की लगेच त्याचं चित्रिकरण करायचं हे काही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे सिनेमा सुचण्याची प्रक्रिया माझी शेवटपर्यंत सुरूच असते. जोपर्यंत आपल्याला संपूर्ण आत्मविश्वास येत नाही की आपली कल्पना सिनेमा बनवण्याइतकी परिपक्व झाली आहे तोपर्यंत तिचं लिखाण सुरुच असतं आणि ते सिनेमा लोकांपर्यत आणायच्या वेळेपर्यंत सुरूच असतं. ‘स्थलपुराण’ नावाच्या एक सिनेमाचं चित्रिकरण पूर्ण झालेलं आहे. पण पुढे त्याचं एडिटिंग वगैरै कधी पूर्ण होईल हे आत्ताच सांगता येत नाही. जोपर्यंत ती कलाकृती मनासारखी झाली आहे असं वाटत नाही तोपर्यंत ते करत राहावं. ‘त्रिज्या’च्या संगीताबाबत आम्ही दीड वर्ष विचार करत होतो. एक एक तुकडा मनासारखा मिळत नाही तो पर्यंत तो शोधत राहणं पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करत राहणं असं आमचं सुरू होतं. त्यामुळे जेव्हा ते मनासारखं होईल तेव्हाच त्याबाबत स्पष्टपणे बोलता येईल.
– मयुरेश मांडे, गौरव धर्माधिकारी
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया