भरत जाधवचा मी फॅन आहे – सुबोध भावे
——
‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटामध्ये काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. एक तर अश्विनी चौधरीसरांच्या कामाचा मी फॅन आहे. ‘ऑफिस ऑफिस’सारख्या मालिका ज्या माणसानं लिहिल्याहेत त्यांचं आतापर्यंतचं सगळंच काम उत्कृष्ट आहे. त्यांची गोष्ट सांगण्याची पद्धत अफलातून आहे. आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत, त्यात त्यांना विनोद दिसतो. अश्विनसरांच्या स्वभावामध्ये जो एकंदरीत तिरकसपणा आहे, तो संपूर्णपणे या चित्रपटामध्ये उतरला आहे. ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या सेटवर हा चित्रपट मी स्वीकारला होता. या चित्रपटाचं शूटिंग सांगलीला सुरू असताना अश्विनीसर मला भेटायला आले होते. तिथं मी गोष्ट ऐकली. त्यांच्याकडून मला सहकलावंतांची नावं कळली नि मी लगेचच हा चित्रपट स्वीकारला.
भरत जाधवबरोबर मी तब्बल नऊ-दहा वर्षांनंतर काम करतोय. यापूर्वी आम्ही ‘उलाढाल’ नावाचा चित्रपट केला होता. त्या चित्रपटामध्ये मी व्हिलनची व्यक्तिरेखा साकारली होती आणि भरत हीरो झाला होता. भरतचा मी वैयक्तिक खूप मोठा फॅन आहे. त्याची एनर्जी, त्याचा टायमिंग सेन्स, त्याची नाटकं, त्याचं सिनेमे आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं हा नेहमीच आनंददायी अनुभव राहिला आहे. ज्याला आपण पडद्यावरती कायम बघतो, नाटकात कायम बघतो, त्याच्याबरोबर जेव्हा आपण स्क्रीन शेअर करतो, हीदेखील खूप आनंददायी बाब असते. दिलीपभैय्यांबरोबरही (दिलीप प्रभावळकर) माझा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी मी त्यांच्याबरोबर बऱ्याच वर्षांपूर्वी ‘कवडसे’ नावाचा चित्रपट केला होता.
शूटिंगदरम्यान खूपच मजा आली. महत्त्वाची बाब म्हणजे दिग्दर्शक अश्विनीसर आपल्याला काय करायचंय याबाबत अगदी स्पष्ट होते. या चित्रपटाचा लेखक अरविंद जगताप तर सध्याचा मराठी चित्रपटसृष्टीतला उत्तम लेखक आहे. त्याचे संवाद या चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटाला खूप चांगली टेक्निकल टीम मिळाली आहे. नाटकाच्या तालमीसारख्या छोट्या छोट्या जागा मी आणि भरतनं वर्कआउट केल्या. या चित्रपटात मी ‘बाप्पा’ची भूमिका केलीय. पण तो या आप्पाचा मित्र आहे. तो त्याच्या का येतो, केव्हा येतो, कशासाठी येतो, काय करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्येच पाहायला मिळतील. गणपतीबाप्पा तर माझ्या गळ्यातील लॉकेटमध्येही आहेत. आपण कोणत्याही कामाची सुरुवात ही त्याच्या नामस्मरणानंच करतो. त्याला वंदन करतो. त्याचं नाव घेतलं नाही, असा दिवस आपल्या कोणाचा जात असेल असं मला वाटत नाही. जेव्हा जेव्हा आपण त्याचं नाव घेतो तेव्हा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते, सद्बुद्धी मिळते. आपला विश्वास वाढतो नि त्या विश्वासानं आपण नवीन कामात स्वतःला झोकून देतो. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे दिग्दर्शक अश्विनी धीर आणि लेखक अरविंद जगतापला द्यायला हवं.
-सुबोध भावे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया