अतिथी कट्टा

दिनांक : १२-०३-२०२१

‘सोंगाड्या’ची जन्मकथा…



विख्यात निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ५० वर्ष पूर्ण झाली. दादांचा हा पहिलाच चित्रपट. दादांचा येत्या १४ मार्चला स्मृतीदिनही आहे. त्यानिमित्तानं लेखक अभय परांजपे यांनी दादांवर लिहिलेल्या आणि ‘सुरुची प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या ‘सोंगाड्या या पुस्तकामधील हा संपादित भाग.

——

‘विच्छा’च्या लोकप्रियतेमुळे मला चांगले पैसे मिळू लागले होते. चांगले म्हणजे ६९-७० सालच्या हिशेबात, आजच्या नव्हे! नाही, अशासाठी म्हटलं की नाही तर तुमच्या डोळ्यांसमोर लाखाचे आकडे नाचू लागायचे. तर मुद्दा असा की, बऱ्यापैकी पैसे मिळताहेत म्हटल्यावर मध्यमवर्गीय मराठी माणसांचे विचार माझ्या मनात घोळू लागले होते. कोल्हापूरला एखादी खानावळ काढावी आणि गल्ल्यात हात खुळखुळवीत निवांत बसून राहावे असा माझा विचार जवळजवळ पक्का होत आला होता. पण मी ज्यांना मनोमन गुरू मानू लागलो होतो त्या बाबांना म्हणजे भालजी पेंढारकरांना विचारावे, त्यांचा सल्ला घ्यावा या हेतूने मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली .बाबा हसत हसत म्हणाले, ‘कलाकारांनी खानावळी काढायच्या मग खानावळवाल्यांनी सिनेमे काढायचे काय?’ मी मनातून हबकलो. मनात म्हटलं, बाबा काय मला सिनेमा काढायला सांगताहेत की काय, माझ्या मनातला विचारसुद्धा पूर्ण व्हायच्या आता बाबा म्हणाले, ‘तुम्ही असं करा, सिनेमा काढा.’

‘अहो पण बाबा, मला त्यातलं काही कळत नाही. ‘तांबडी माती’च्या वेळीही एका खोलीत डांबून कॅमेऱ्यासमोर माझी तालीम तुम्हीच करून घेतलीत ना, मला कसं जमणार हो…’

‘जमतं हो सगळं पाण्यात पडल्यावर पोहायला येतं. मी करेन मदत तुम्हाला…’ माझ्याकडे एका गोष्टीची रूपरेखा आहे.सबनीसांना लिहायला सांगा. होऊन जाईल सिनेमा…

बाबांनी भरीस घातलं, सबनीसांना एका साध्या भोळ्या माणसाची कथाही चार ओळींत सांगितली आणि म्हणाले, लिहा आता!’ सबनीसही हादरले. ‘नाही-हो’ करायला लागले. ‘मला जमणार नाही हो बाबा’, असे त्यांनी म्हटल्यावर बाबा त्यांना म्हणाले, ‘नाटकं, कथा लिहिता की नाही? तसंच नाटक समजून लिहा. त्याचा सिनेमा मी करून देतो’, सबनीससाहेब लिहायला लागले. चर्चा रंगू लागल्या. हा जो नाम्या आहे. सोंगाड्याचा हीरो, तो जास्त बावळट दिसण्यासाठी काय करावं यावर चर्चा चालली होती. मी पटकन् म्हणलो, त्याला गुडघ्यापर्यंत हाफ पॅण्ट द्या. अर्धी चड्डी घातलेला माणूस नक्की बावळट वाटतो.’ बोलून गेलो आणि पटकन जीभ चावली. कारण बाजूला बाबा बसलेले आणि ते नेहमी हाफ पॅण्टच घालत असत. घाम फुटला. बाबा आता चिडणार असं वाटत असतानाच बाबा शांतपणे म्हणाले, बरोबर आहे… बरोबर आहे हो दादा. हाफ पॅण्टपेक्षा बावळट वेष मिळणारच नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला.

सिनेमाचं नाव काय ठेवायचं यावरही अशीच चर्चा झाली. बहुरूपी, भाबडा अशी नावं डोळ्यांसमोर येत असतांना बाबांनीच म्हटलं, कशाला दुसरी नावं शोधताय… गावगन्ना सोंगाडेगिरी करीत फिरताना. ठेवा ‘सोंगाड्या’ असं नाव!’ नावही असं फायनल झालं. सबनीससाहेबांनी जीवाच्या कराराने म्हणतात तसं स्क्रीप्ट लिहिलं आणि ते बाड घेऊन आम्ही बाबांकडे गेलो. त्या स्क्रीप्टचा आकार पाहून बाबा म्हणाले, ‘अहो यात चार-पाच सिनेमे होतील हो…’ मग असलेल्या त्या स्क्रीप्टच्या डोंगरातून वेचून वेचून बाबांनी स्क्रीप्ट तयार केलं. हिरॉईन कोण घ्यायची? ग्रामीण कथा म्हटल्यावर पटकन जयश्री गडकरच डोळ्यासमोर आली. बोलणी सुरू झाली. पण त्या बोलण्यांना अंत काही मिळेना. दिवस फुकट चालले होते. शेवटी बाबांनीच उषा चव्हाणचं नाव सुचविलं. नवीन आहे, पण चांगली पोरगी आहे… बाबा म्हणाले आणि हिरॉईनही फायनल झाली.

गोविंद कुलकर्णी दिग्दर्शक,राम कदम संगीतकार…संच तर सगळा जमला. ‘राया मला पावसात नेऊ नका’ आणि ‘काय गं सखू’ ही गाणी आमच्या पूर्वीच्या जनता कलापथकातून गाजलेली होती. त्याची त्यावेळी एचएमव्हीने रेकॉर्डही काढली होती. अर्थात त्यावेळी त्या गाण्याच्या चाली वेगळ्या होत्या. रामभाऊंनी त्या गाण्यांना परत वेगळ्या ठेकेबाज चाली दिल्या आणि पुन्हा ती रेकॉर्ड केली.

‘सोंगाड्या’चे शूटिंग चालू झाले. पैसे कमी पडले की ‘विच्छा’चा दौरा काढायचा, पैसे जमवायचे आणि शूटिंग करायचे असे चालू होते. सोंगाड्या’ १ लाख ५ हजार रुपयात तयार झाला. पुण्यात रीलिज करण्यासाठी मोठ्या मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. फालतू कसलं तरी पिक्चर कुठलं लावताय’ असं म्हणत बऱ्याच लोकांनी काड्याही घातल्या. नाझ बिल्डिंगमधल्या वितरकांकडे खेपा घालून तर आम्ही थकलो होतो. तिथे सगळे पंजाबी लोक.त्यांना आधी तर आमच्या सिनेमाचं नावच कळायचं नाही. ‘सौगांड्या का मतलब क्या होता है’, असं विचारायचे हो. समजावून सांगताना पुरेवाट व्हायची कुठून या सिनेमा काढण्याच्या फंदात पडलो असं व्हायचं. शेवटी आम्हीच सिनेमा वितरित करण्याचा निर्णय घेतला. पुण्याला सिनेमा रीलिज झाला. ‘भानुविलास’ने दोन आठवडे दिले होते. मुंबईला ‘कोहिनूर’मध्ये सिनेमा लावला, पण त्यांनी दोन आठवडेच बुकिंग दिले. सिनेमा प्रदर्शित झाला आणि धो-धो चालू लागला. पण केवळ करार दोन आठवड्यांचा असल्यामुळे ‘कोहिनूर’ने त्यानंतर सिनेमा दाखवायचा नाही असा निर्णय घेतला. मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांकडे धाव घेतली. मराठी माणसाच्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध खणखणीतपणा आवाज उठविणारी संघटना म्हणून शिवसेनेकडे असंख्य मराठी तरुण आकर्षित होत होते. शिवसेनेची चित्रपट शाखाही सुरू झाली होती. गजानन शिर्के या शाखेचे अध्यक्ष होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि माझी व्यथा मांडली. ‘कोहिनूर’च्या व्यवस्थापक-मालकांशी बोलणी जेव्हा यशस्वी होईनात तेव्हा लातों के भूत बातों से नहीं मानते’ असं लक्षात येऊन ‘कोहिनूर’ थिएटरवर शिवसैनिकांतर्फे निदर्शने करायचे ठरविले गेले आणि तसे केल्यावर योग्य तो परिणाम झाला आणि त्यानंतर ३६ आठवडे तुफान गर्दीत ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’वर झळकत राहिला.

(शब्दांकन – अभय परांजपे, सौजन्य – सुरुची प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया