नंदा : इक प्यार का नगमा है
——
अतिशय देखणी आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून नंदा हिने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली होती.नंदाने कधी अभिनय केलाच नाही ती आपली भूमिका जगत असे.साधी राहणी,
सहानुभूतीपूर्वक उदार हृदयाची घरगुती मुलगी तिने पडद्यावर नेहमीच साकार केली.त्यामुळे वास्तविक जीवनात ती अशीच आहे आणि इतर प्रकारच्या भूमिका करू शकणार नाही असं लोकांना वाटे.पण आपल्या प्रतिभाशाली कलाकारात इतकी क्षमता असते की,जी भूमिका मिळेल ती तो कलाकार स्वाभाविकपणे सहजपणे साकार करतो,नंदा अशा कलाकारापैकी एक होय.
नंदाला अभिनयकला वारसाहक्कानं प्राप्त झाली.नंदाचा जन्म ८ जानेवारी,१९३९ चा.प्रसिद्ध दिग्दर्शक मा.विनायक हे नंदाचे वडील.त्यांचे पूर्ण नांव विनायक दामोदर कर्नाटकी होते. मास्टर
विनायक हे काळाच्या पुढं ५० वर्षे चालणारे दिग्दर्शक होते.ज्यांचा ध्यास होता उत्तम चित्रपट बनविण्याचा आणि जोडीला होती अव्वल दर्जाची प्रतिभा.पौराणिक कथानकांमध्ये अडकलेल्या मराठी
चित्रपटांना त्या चाकोरीतून बाहेर काढत बोल्ड विषयांची संयतपणे हाताळणी करून आपला वेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक म्हणजे मास्टर विनायक. त्यावेळी मराठी रसिक प्रेक्षकांना मा.विनायक यांची ओळख असाधारण सृजनशीलता लाभलेले दिग्दर्शक,अभिनेते,निर्माते अशी असली तरी ते सच्चे देशप्रेमी आणि देशसेवकही होते.तो १९४६-४७ चा काळ होता.देशात सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध चळवळ सुरु होती.
मा.विनायक आपल्यापरिने स्वातंत्र्यसैनिकांना सहाय्य करीत असत.त्यांना भूमिगत होण्यासाठी मदत करीत असत.त्यांना देशाविषयी प्रचंड प्रेम आणि आदर होता.ते नेहमी मुलांना सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी,कॅप्टन लक्ष्मी आदी महान नेत्यांच्या गोष्टी सांगत असत.त्यावेळी नंदाच वय होतं पाचेक वर्षाचं. मास्टर विनायकांच्या दिग्दर्शनीय दृष्टीमध्ये गुणग्राहकता होती.यासंदर्भातील एक किस्सा सांगावासा
वाटतो.नंदा पाच वर्षांची होती तेव्हा तिला अभिनयामध्ये जराही रस नव्हता.तिला डॉक्टर व्हायचे होते त्यावेळी मा.विनायक ‘मंदिर’ नावाचा चित्रपट बनवत होते.एक दिवस त्यांनी नंदाला हाक मारली
आणि सांगितले की,नंदिनी,मी एक चित्रपट बनवत आहे.या चित्रपटात तूला मुलाचा रोल करायचा आहे. नंदा रुसली.ती आईकडे गेली आणि म्हणाली,मला चित्रपटात काम करायचे नाही.मला कॅप्टन लक्ष्मी बनायचं आहे.आईने तिची समजूत काढली.अखेर नंदाने हा माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असे म्हणत होकार दर्शवला.दुसऱ्या दिवशी सेटवर आल्यानंतर तिच्या बाबांनी तिचे छान दाट केस कापले आणि तिला मुलगा बनवले.विशेष म्हणजे,या चित्रपटात नंदाच्या मोठया बहिणीची भूमिका लतादिदींनी साकारली.लताजींसारख्या प्रतिभावंत मुलीला पार्श्वगायिका म्हणून मा.विनायकांनी पहिली
संधी दिली हे अनेकांना ठाऊक असेल; मात्र तत्पूर्वी त्या अभिनय करत होत्या हे काहींना आजही माहित नसावे. ‘मंदिर’ चित्रपटापूर्वी लतादीदींनी चार-पाच चित्रपटांमध्ये काम केले होते.‘मंदिर’च्या वेळी लतादिदीनी विनायकरावांना सांगितले की,मी आता गायनावर लक्ष केंद्रित करणार आहे.त्यामुळे अभिनयातील हा माझा शेवटचा चित्रपट असेल.गंमत म्हणजे लतादीदींचा शेवटचा चित्रपट आणि नंदाने शेवटचा म्हणून स्वीकारलेला पहिला चित्रपट अशी ‘मंदिर’ या चित्रपटाची आठवण आहे.
या चित्रपटाच्यावेळी विनायकरावांची तब्येत बिघडली.१५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तब्येत बरी नसतानासुद्धा त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिवाजी पार्कवर महात्मा गांधींचं भाषण ऐकण्यासाठी नेलं होतं आणि चारच दिवसांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला.अवघं ४१ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं.पुढे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वाईट झाल्यामुळे बेबीनंदाने चित्रपटात काम न करण्याचा आपला बालहट्ट सोडून दिला.इथे मा.विनायकांची दूरदृष्टी जाणवते.आपल्यानंतर नंदाच घराची जबाबदारी पेलू शकेल असे वाटत असल्यामुळे त्यांनी तिला अभिनयाच्या क्षेत्रात आणले असावे.लतादिदींचं जसं लहानपणी पितृछत्र हरवल्यानं त्यांना पार्श्वगायन करून घराला आधार द्यावा लागला,अगदी तसंच नंदाला चित्रपटात काम करून घर चालवावं लागलं.वडिलांच्या निधनानंतर मास्टर विनायकांच्या पत्नी आणि सात भावंड त्यांच्या मावशीकडे ताडदेवला राहायला गेली आणि बेबी नंदाला अगदी अल्पवयातच चित्रपटात काम करणं भाग पडलं.मास्टर विनायकांची ‘प्रफुल्ल’ चित्रपट संस्था अडचणीत होती.अशावेळी कुटुंबही चालवणं मुश्कील होतं.त्यामुळे बेबी नंदाला ‘जागृती,अंगारे, जग्गू,जगद्गुरू शंकराचार्य’ या चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम करावं लागलं.याच दिवसांत तिने स्टेज आणि रेडीओ प्रोग्रॅम सुद्धा केले. ‘अंगारे’ या चित्रपटात तिने नर्गिसच्या लहानपणाची भूमिका केली होती.
१९५६ साली तिला महत्वाचा ब्रेक दिला तो व्ही.शांतारामनी ‘तुफान और दिया’ मध्ये.नंदा व्ही.शांताराम यांची भाची होती.बाल कलाकार आणि तरुणीच्या मध्यावस्थेत असलेल्या नंदाला
व्ही.शांताराम यांनी एकदा स्टुडीओत साडी नेसून यायला सांगितले आणि तिला पाहताच तिला पहिला चित्रपट मिळाला तुफान और दिया. तिचा रोल बहिणीचाच पण खूप गाजला.मानसिक,व्यावहारिक
अडचणींचा धैर्यानं कसा सामना करावा या गदिमांच्या कथेला दोन अजाण भाऊ-बहिणींनी चार चांद लावले.यातला भाऊ सतीश व्यास आणि बहिण होती नंदा.या चित्रपटात ती एक आंधळी मुलगी होती.वसंत देसाईंच्या संगीतानं त्यावर कळस चढवला होता.बालकलाकारांतली परकर पोलक्यातली नंदा ‘तुफान और दिया’ मध्ये खूप प्रगल्भ दिसली.तेव्हापासून तिच्या बेबी नंदा नावातला बेबी शब्द नाहीसा झाला आणि लोक सेटवर तिला नंदाजी म्हणू लागले.
तिने काही मराठी चित्रपटही केले. दिनकर पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुलदेवता’ चित्रपटासाठी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याकडून तिला विशेष पुरस्कार मिळाला होता.तिच्या
अभिनयकौशल्याला पुरेपूर वाव देणारा चित्रपट होता १९५७ चा ‘भाभी’.या चित्रपटात पंढरीबाई, बलराज सहानीसारखे सशक्त कलाकार असूनही नंदाचा पतंग हवेत उंचच उंच उडाला.या चित्रपटाच्या भूमिकेसाठी तिला उकृष्ट अभिनेत्रींच फिल्मफेअरचं नामांकन मिळालं.‘एव्हीएम’ चा भाभी आणि एल.व्ही.प्रसादचा ‘छोटी बहन’ या दोन बडया बैनर्सच्या चित्रपटांत बलराज सहानीसारखे मातब्बर कलावंत असूनही नंदा त्यांच्यासमोर कुठंच कमी वाटली नाही.१९५९ च्या ‘छोटी बहन’ मधील ‘भैय्या मेरे राखीके बंधन को निभाना’ हे रक्षाबंधनाच्या सणाचे गीत नंदाची नेहमीच आठवण करून देते. छोटी बहेन या चित्रपटाने ती स्टार बनली.१९५९ च्या बी.आर.चोप्रा यांच्या ‘धूल का फूल’ या अनौरस संततीवरील चित्रपटामध्ये नंदाने राजेन्द्रकुमारची पत्नी बखुबी रंगवली.या चित्रपटातील ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाये’ गाणारी नंदाची मालती विसरता येत नाही.राजेंदकुमार बरोबर तिने एकही गाणे नसलेला ‘कानून’ हा चित्रपट गाजविला.याच वर्षीच्या ‘कैदी नं ९११’ मध्ये ‘मिठी मिठी बातोंसे बचना जरा’ या गाण्यात लहान पद्मिनी कोल्हापुरेसोबत नंदा दिसली.
१९६१ ला आलेल्या ‘चार दिवारी’ चित्रपटापासून तिची जोडी जमली ती शशीकपूरबरोबर.ज्यावेळी शशी कपूर फिल्म इंडस्ट्रीला नवीन होता तेव्हा नंदाच त्याच्यासोबत काम करायला तयार झाली. या चित्रपटात ‘अकेले तुझे जाने ना दूंगी’ गाणारी नंदा आजही डोळ्यासमोरून हटायला तयार नाही.या जोडीनं तरुणाईच्या मनात एक स्थान मिळवलं होतं.१९६५ च्या सुमारास पडद्यावर आलेला ‘जब जब फूल खिले’ हा या जोडीचा अप्रतिम चित्रपट.ही देखणी जोडी प्रेक्षकांना भावली ती त्यातल्या श्रवणीय गाण्यांमुळेही.इतकी की,शशीकपूरचा हैंडसम चेहरा डोळ्यांसमोर आला की,त्या चेहऱ्यापाठी नंदाचे टपोरे डोळे आणि चंद्रासारखा चेहरा दिसायचाच.या चित्रपटातील लोकेशन काश्मीर,बर्फीली वादियां,तलाव,शिकारा आणि रफींच गाणं ‘एक था गुल और एक थी बुलबुल’ सारं काही स्वर्गीय अनुभव देणारं.सफरचंदासारखा लाल शशी कपूर आणि लोभस नंदा ही चित्रपटाच्या यशाची किनार होती.स्वप्नातल्या परीसारखी हळुवार कोमल रीता.नंदाला इतक्या आकर्षक रुपात पडद्यावर पेश करणं दुसऱ्या कुणालाही जमलं नाही.‘ये समां ..समां है प्यार का’ मधल्या तिच्या मादकपणावर आणि ‘ ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे ’ या चुलबुल्या गीतावर अनेकजण लट्टू झाले होते.‘जब जब फूल खिले’ या चित्रपटामुळे नंदाच्या सौंदर्याची जादू प्रेक्षकांवर एवढी चालली की,त्याकाळात भारतीय सेनेतील एका उच्च अधिकाऱ्याने तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण तिने साफ नकार दिला.कारण याच चित्रपटातून इंडस्ट्रीत बाल कलाकार तसेच बहेनवाल्या भूमिकेतून ती नुकतीच ग्लैमरस जगात पाऊल टाकत होती.शशीकपूर व नंदा या रोमैंटिक जोडीनं तब्बल आठ चित्रपट दिले. ‘मेहंदी लगी मेरे हाथ,चार दिवारी,जुआरी,नींद हमारी ख्वाब तुम्हारे,मुहब्बत इसको कहते है,जब जब फूल खिले, राजासाब,रुठा ना करो’. ‘मुहब्बत इसको कहते है’ मधील ‘ठहरिए होश में आ लूं’ या गाण्यात सुमन कल्याणपूरचं ‘अं हं’ नंदानं इतकं गोड म्हटलंय की …हाय मैं मर जावां ! खूपचं अफलातून होतं.
या चित्रपटाबरोबरच आणखी एक तिला मिळालेला महत्वाचा चित्रपट होता १९६९चा ‘इत्तफाक’.एका रात्रीच्या कथेचा हा चित्रपट.कुणाला कुठलाही संशय येणार नाही,अशा पद्धतीने सफाईदारपणे वावरत कटकारस्थानं रचणारी खूनी नायिका नंदानं इतक्या सुंदररीत्या रंगवली होती की,माला सिन्हानं तिचं तोंडभरून कौतुक केलं.साठ सालापर्यंत नंदाचा चांगलाच जम बसला होता. तिने ‘बेदाग,मेरा कसूर क्या है,अपना घर,आग्रा रोड,बंदी, लक्ष्मी,चांद मेरे आजा,नया संसार,पहली रात,आज और कल,उसने कहां था’ हे चित्रपट केले.वसंत जोगळेकर या दिग्दर्शकांनी लिहून ठेवलंय की,तिने त्यांच्या ‘आंचल’ आणि ‘आज और कल’ चित्रपटांत काम केलय पण,त्यांच्या दृष्टीने ती कोल्हापूरवाली बेबी नंदाच राहिली. ‘वेल डन’ असं म्हणून त्यांनी कितीवेळा तिची पाठ थोपटली आहे. ‘ गा रही है जिंदगी ’ असे गाणे म्हणत संदेशकुमार बरोबर ‘आंचल’ या चित्रपटात नंदाने एक रोमैटिक नायिका सादर केली. आंचल मधील भूमिकेसाठी त्याकाळात तिला तिच्या आयुष्यातील एकमेव फिल्मफेअर मिळालं होतं ते देखील सहनायिका म्हणून.१९६३ च्या ‘आज और कल’ मध्ये नंदाची विकलांग राजकुमारी हेमलता अशोककुमारचा रुबाबदार संस्थानिकही झाकाळू शकली.सुनील दत्त बरोबर तिने दोन चित्रपट केले.एक आज और कल,दुसरा नर्तकी.नर्तकीमध्ये पाकिजा प्रमाणेच एक सीन होता.एका नावेत एक कोपऱ्यात सुनील दत्त गात असतो… ‘ जिंदगी के सफर में अकेले थे हम मिल गये तुम तो दिल को सहारा मिला l आ गये इक नये रास्ते पर कदम जब तुम्हारी नजर का इशारा मिला l’ लाखात एक महमद रफींच गाणं,शकील
बदायुनीची प्रतिभा आणि संगीतकार रवीचा स्वरशृंगार.सुनील दत्तसह हे सर्व एका बाजूला आणि नावेच्या दुसऱ्या टोकाला बसलेली नंदा दुसऱ्या बाजूला.कपाळावर मोठी टिकली,सुहास्य वदन आणि
अधूनमधून आपल्या प्रियकराकडे सलज्ज कटाक्ष टाकणारी नंदा.१९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘बडी दिदी’ मध्ये तिचं निर्व्याज हसणं,स्त्रीत्वाच्या सर्व मर्यादा पाळून पडद्यावर नि:संकोच वावरणं प्रेक्षकांना खूप भावलं.त्या नंतर नंदाला व्यावसायिक फिल्म इंडस्ट्रीनं नायिका म्हणून पूर्णपणे स्विकारलं होतं. नूतनप्रमाणे सर्वात जास्त मानधन घेणारी नंदाच होती.
शशीकपूर यांच्यानंतर ७० च्या दशकात सुपरस्टार राजेश खन्ना आणि नंदाजींची जोडीही प्रेक्षकांना आवडली.त्यावेळी राजेश खन्ना फिल्म इंडस्ट्रीला नवीन होता. दि ट्रेन च्यावेळी नंदानच त्याची शिफारस केली आणि फिल्मइंडस्ट्रीला सुपरस्टार मिळाला.‘इत्तेफाक,दि ट्रेन,जोरू का गुलाम’ यासारखे या जोडीचे चित्रपट व त्या सिनेमातल्या गाण्यांनीही बाजी मारून नेली. ‘जोरू का गुलाम’ मध्ये तिने कॉमेडी रोलही अप्रतिम केला. ‘धरती कहे पुकार के,अधिकार’ अशा चित्रपटात वयानं प्रौढ होत जाणारी नंदा तशाच वाढत्या श्रेणीनं प्रेक्षकांना आवडत गेली. ‘परिवार,धरती कहे पुकार के’ या चित्रपटात जितेंद्रबरोबर तिची जोडी जमली. ‘ हमने जो देखे सपने सच हो गये वो अपने’ हे परिवार मधील गाणे लोकप्रिय झाले. मनोजकुमारचे ‘शोर आणि गुमनाम’ हे नंदाचे नायिका म्हणून शेवटचे उल्लेखनीय चित्रपट.एक रुपयाही मानधन न घेता तिनं मनोजकुमारच्या शोर साठी काम केलं.हे तिचं ऋण मनोजकुमार कधीच विसरला नाही.१९६५ च्या ‘बेदाग’ चित्रपटात नंदाने मनोजकुमार बरोबर काम केलं तेव्हाची आठवण मनोजकुमार सांगतात, ‘ वो मुझसे काफी सिनिअर थी,पर उन्होंने मुझे इस बात का एहसास भी नही होने दिया. कहते है की, औरतमें एक हिस्सा ममताका भी होता है और नंदाजीमें इसकी झलक साफ दिखती थी. गुमनाममें कलाकर के साथ मैं निर्देशक भी रहा पर उन्होंने मेरे साथ विनम्रतासे काम किया.शोर के समय उन्होंने एक रुपया भी ना लेनेकी शर्त मेरे सामने रखी.’ ‘काला बाजार’ मध्ये देव आनंदची छोटी बहन शोभणाऱ्या नंदाची प्रतिभा जाणून देव आनंदनी तिला ‘हम दोनो’ मध्ये नायिका बनवलं.‘तीन देवीयां’मध्ये तर नंदाच्या खुबसुरत नजाकतीवर आधारित ‘ऐसे तो ना देखो की हमको नशा हो जाए’ हे गाणे देव आनंदच्या तोंडी आहे त्यावेळची तिची अदा गाण्याच्या अर्थाला शोभणारी आहे. देव आनंदची प्रमुख भूमिका असणाऱ्या आणि कर्णमधूर संगीतानं नटलेल्या ‘तीन देवीयां’ या चित्रपटात हीच बेबी शेवटी देव आनंदचं मन जिंकून जाते.नंतर त्याच्याच ‘हम दोनो’ या चित्रपटाच्या उत्तरार्धात नंदा पूर्ण चित्रपटाचा ताबा घेते. या मधलं ‘अल्ला तेरो नाम,ईश्वर तेरो नाम’ हे संगीतकार जयदेव यांचे भजन पडद्यावर साकार करताना या नंदाच्या डोळ्यातले भाव प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेऊन जातात.या भजनाला हिंदी फिल्मसृष्टीतील गीतात सर्वात सुंदर चाल मानतात.हे गाणं ऐकताना मनांत भक्तीरस साकारतो आणि डोळे आपोआप पाझरू लागतात.हळू हळू नंदाच चित्रपटाची प्रमुख नायिका म्हणून पुढे येते,याला म्हणतात अभिनय! नंदा नायिका म्हणून त्या काळच्या सर्व नवीन नायकांसोबतही चमकली.भारत भूषण (चांद मेरे आजा),अनंतकुमार (बरखा),जॉय मुखर्जी (उम्मीद),जितेंद्र (बडी दिदी,परिवार,धरती कहे पुकार के), मनोजकुमार (बेदाग,गुमनाम,शोर),धर्मेंद्र (मेरा कसूर क्या है,आकाशदीप),संजीवकुमार (पतीपत्नी),संजय (अभिलाषा,वो दिन याद करो),राजेश खन्ना (इत्तेफाक,जोरू का गुलाम,दि ट्रेन).‘एक रात मैं दो दो चांद खिले,गा रही है जिंदगी’ अशा निवडक रोमैंटीक नायिका सादर करत नंदा आपली छाप सोडत पुढे चालली होती. संजयखान बरोबर ‘अभिलाषा’ चित्रपटातील ‘ वादियां मेरा दामन रास्ते मेरी राहे’ हे गाणे खूप गाजले.नंतरच्या काळात तिने ‘आहिस्ता आहिस्ता,प्रेमरोग,मजदूर’ असे चित्रपट केले. ‘मजदूर’ मध्ये काम करून तिची दिलीपकुमार या अभिनय सम्राटाबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली.
कारण दिलीपकुमारबरोबर काम करायला मिळाव हे तिचं स्वप्न होतं.तो तिचा आवडता अभिनेता होता. १९८२ च्या ‘प्रेमरोग’च्या वेळी नंदाला चित्रपटात घेताना राजकपूर छोटी बहेन मधील नंदाची
बहेनवाली प्रतिमा विसरले नव्हते.ते म्हणाले,‘अब छोटी बहेनको मैं छोटी मां बनाउंगा’.नंदाची ही भूमिका इतकी अप्रतिम झाली की तिला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.हा तिचा शेवटचा चित्रपट.राजकपूर बरोबर प्रथम तिने ‘आशिक’ चित्रपटात काम केले होते.नंतर इतक्या वर्षांनी आरकेच्या ‘प्रेमरोग’ मध्ये तिने काम केले.राजकपूरच्या कडक शिस्तीविषयी तिला खूप आदर होता. राजकपूर नंदाला छोटी बहन मानत असत.
नंदाचे डोळे बोलके असून त्यातल्या त्यात काजळ घातलेले तिचे डोळे अधिक सुंदर दिसत.आपल्या परिवारासाठी बेटा बनून आपल्या स्वत:च्या सुखांचा त्याग करणारी ती बेटी होती. ‘बडी दिदी’ या चित्रपटात ओमप्रकाश या कलाकारासोबत तिचा एक सीन आहे ज्यात ती स्वत:चे अश्रू पुसून परिवारासाठी समाजाला हसत मुखाने सामोरी जाते.शुटींगच्या वेळी हा सीन केल्यानंतर तिने खरोखरच ओमप्रकाशना रडत रडत विचारले, मैने अच्छा नाटक किया ना चाचा? मै रोयी थी क्या? मैं नहीं रोयी …..’ आणि हे ऐकताच सेटवर ओमप्रकाशसोबत सर्वांच्या डोळ्यात पाणी तरारलं.
स्वाभाविकपणे या सीनच्यावेळी सिनेमागृहात प्रेक्षकांचे डोळेही पाझरत असत.अशी भावप्रवण अभिनेत्री होती नंदा.नंदा चित्रीकरणासाठी बरोबर दिलेल्या वेळेत पोहोचायची आणि ते संपल्यानंतर
थेट आपल्या घरी जायची.सिनेमाच्या पार्ट्यांना ती कधीच गेली नाही.कुटुंबात बहिण-भावात रमायची. त्यामुळे ग्लैमरस दुनियेत वावरूनही तिच्या स्वभावात एक घरगुतीपणा होता.हिंदी फिल्मसृष्टीत सौंदर्यपूर्ण अभिनेत्रींचा विषय निघतो तेव्हा नंदाची गणना पहिल्या प्रमुख पाच अभिनेत्रीत केली जाते.
नंदा एक अशी नायिका होती जिच्याबरोबर हिंदी फिल्मसृष्टीतल्या छोटया मोठया खऱ्या खोटया प्रेमकथा किंवा गॉसिप जोडलं गेलं नाही.खरं पाहता मास्टर विनायकांच्या या बेबीचा आणि तिच्या अभिनयाचा प्रभाव अनेक वर्षे चित्रपट रसिकांच्या मनावर होता.दोन-चार चित्रपटांच्या चरित्र भूमिकानंतर नंदानं चित्रपटांतून जवळपास संन्यासच घेतला.जवळची मैत्रीण वहिदानं तिला मनमोहन देसाईंशी विवाह करण्याचा सल्ला दिला.एंगेजमेंटनंतर देसाईंचं बाल्कनीतून पडून अपघाती निधन झालं आणि नंदा सरतेशेवटी अविवाहितच राहिली.आयुष्याच्या एका टप्प्यावर मनमोहन देसाईंची ‘दुनिया बसाने वह चली थी’..लेकीन…त्याच्या अचानक मृत्यूने नंदाचीच ‘दुनिया उजड गयी’. ती एकटी झाली.कुणाला भेटेनाशी झाली.अशी एक ‘गुमनाम’ जिंदगी जगत राहिली.वहिदा रेहमान,आशा पारेख,हेलन,साधना,सायरा बानू,माला सिन्हा आणि इतर काही मैत्रिणींच्या सोबतीत तिनं आपलं पुढचं आयुष्य समाधानाने व्यतीत केलं.बऱ्याच वर्षानंतर ‘हम दोनो’ चित्रपट जेव्हा रंगीबिरंगी केला गेला तेव्हा ती त्या प्रिमिअरला जाऊ शकली नाही.पण एका प्रायव्हेट स्क्रीनवर तिने तो चित्रपट पाहिला आणि सरळ देव आनंदला भेटायला गेली.त्यावेळच्या आठवणी काढून हे दोन मित्र एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडले.त्यानंतर त्याच वर्षी देव आनंद गेले आणि नंतर नंदाही गेली..नंदा ७५ वर्षांची झाली आणि गेली सुद्धा,विश्वास बसेना,नाजूक कळीसारखी,फुलपाखरासारखी,सोनपरी नंदा. १९५५ ते १९७५ पर्यंत वीस वर्ष आपल्या शालीन सौंदर्यानं प्रेक्षकांना मोहित करणारी नंदा रसिकांना २५ मार्च,२०१४ ला सोडून गेली.हिंदी चित्रपटसृष्टीतला हा ‘नंदा’दीप शांत झाला…कायमचा!
नंदाने इस दुनियासे और उनके करोडो चाह्नेवालोंसे अपना दामन छुडा लिया.परंतु तिचे अगणित चाहते तिला म्हणतच राहतील,‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’. सुदैवाने तिला सौंदर्याचे आणि अभिनयाचे लेणे लाभले होते.त्यामुळेच अल्पावधीतच एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने नांव कमावले. ‘इक रात में दो दो चांद खिले,गा रही है जिंदगी,सजना काहे भूल गये दिन प्यार के,मचलती आरजू खडी बाहे पसार,झुकती घटा गाती हवा सपने जगाए,अकेले तुझे जाने ना दूंगी,आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये,अल्ला तेरो नाम,लिखा है तेरी आंखो ने किसका फसाना,ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे,जारे कारे बदरा बलम के द्वार, जे हम तुम चोरीसे,हमने जो देखे सपने,वादियां मेरा दामन,इक प्यार का नगमा है ’ अशी कितीतरी गाणी तिच्या अभिनयामुळे गाजली.त्यामुळे आजही नंदा डोळ्यासमोरून हटत नाही हे तिचे वैशिष्टय.अशी ही विनायकांची बेबी,आपली अस्सल मराठी मुलगी,मनस्वी,
एकटेपणातही रमणारी व मैत्रिणीच्यात जीव रमवणारी,तसेच रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय
कलाकार म्हणजे बेबी नंदा.
– लेखिका जयश्री दानवे
(सौजन्य – अथर्व प्रकाशन)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया