अतिथी कट्टा

दिनांक : ०६-०९-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌‘खारी बिस्कीट’ माझ्या कारकीर्दीला वेगळे वळण देईल – संजय जाधव




इंट्रो…
मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंतांना घेऊन बिगबजेट चित्रपट करण्यासाठी दिग्दर्शक संजय जाधव प्रसिद्ध आहेत. मात्र ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रथमच सगळे नवीन चेहरे निवडले आहेत. त्यानिमित्त त्यांचं हे मनोगत.

——

‘खारी बिस्कीट’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप विशेष आहे. त्यामागचं कारण म्हणजे हा माझा ५०वा चित्रपट आहे. यापैकी ४० चित्रपट हे मी सिनेमॅटोग्राफर म्हणून केले आहेत, तर १० चित्रपटांचं मी दिग्दर्शन केलेलं आहे. वास्तविक यापूर्वीही अनेकांनी एवढ्या संख्येने चित्रपट केले आहेत. पण, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, तिथं अर्धसतकी पल्ला गाठणं ही मनाला खूप आनंद देणारी गोष्ट आहे, असं मला वाटतं.

‘खारी बिस्कीट’ या शीर्षकावरूनच हा चित्रपट खारी आणि बिस्कीट या दोन पात्रांभोवती आहे, हे लक्षात येतं. शीर्षकामधूनच पात्रांवरचा फोकस कळल्यामुले त्यांची निवड हीदेखील आमच्यासाठी एक मोठं आव्हान होतं. ‘खारी’ ही अगदी लव्हेबल मुलगी आहे. त्यामुळे पाहताक्षणीच ती आवडणं गरजेचं होतं. तर ‘बिस्कीट’ हा बोलबच्चन असून त्याला अगदी स्मार्ट मुलगा आहे. त्यामुळे तशापद्धतीनं बोलणाराच मुलगा आम्हाला हवा होता. या दोन्ही व्यक्तिरेखांसाठी आम्ही मुलं-मुली शोधली. अखेर तब्बल तीन महिन्यांच्या शोधानंतर आम्हाला हवे असलेले ‘खारी बिस्कीट’ मिळाले. आमचे प्रयत्न एवढे सार्थकी लागले आहेत की याच्यापेक्षा चांगले खारी नि बिस्कीट तुम्हाला मिळू शकले असते, असे कोणीही म्हणू शकणार नाही.

मी आजवर खूप वेगवेगळे चित्रपट केले आहेत. ‘दुनियादारी’ हा माझा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. त्यामुळे माझा कोणताही नवीन चित्रपट आला की त्याची तुलना ‘दुनियादारी’शी केली जाते. अर्थात हे अयोग्यच आहे. कारण प्रत्येक चित्रपट हा नवीन असतो. विषयांपासून कलाकारांपर्यंतची वेगळी टीम प्रत्येक चित्रपटावर काम करीत असते. ‘खारी बिस्कीट’ तर हा लहान मुलांचा विषय आहे. मी फक्त मोठमोठ्या कलाकारांबरोबरच काम करतो, असा एक आरोप सर्वसाधारणपणे माझ्यावर केला जातो. ‘खारी बिस्कीट’ केल्यामुळे माझ्यावरचा हा आरोप पुसला जाईल असं मला वाटतं. सई ताम्हणकर, सोनाली खरे यासारख्या नायिकांना यावेळी माझ्यावर रागावण्याचं काहीच कारण नाही. कारण त्यांचा वयोगट खारीच्या वयाशी काही मिळताजुळता नव्हता. नामवंत कलाकारांबरोबर काम करण्याचा फायदा म्हणजे त्यांनाही काहीतरी सांगायचं असतं. चित्रपटाच्या भल्यासाठी ते उपयोगी पडतं. परंतु, खारी बिस्कीटमध्ये मी सांगतील तसं मुलांनी काम केलं आहे. त्यामुळे मी अधिक पॅशनेटली या चित्रपटासाठी काम केलंय. त्यामुळे हा चित्रपट माझ्या कारकीर्दीलाही वेगळं वळण देईल असं मला आत्ता वाटतंय.

खारी बिस्कीट’ म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. तर ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. ही गोष्ट आहे ह्या दोघांची. पदरी गरिबी असली तरी तिच्या डोळ्यात कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची. याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच रिलीज झालेल्या त्यांच्या गाण्यातून येतो. क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आहेत. संगीतकार सूरज-धीरज या जोडीने संगीत दिले असून कुणाल गांजावाला यांनी स्वरबद्ध केलेले हे गाणं झी म्युझिकच्या द्वारे श्रोत्यांच्या भेटीस आलं आहे.

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केलीय तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने. याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

संजय जाधव

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया