‘टाइमपास ३’ हा चित्रपटगृहांमध्येच पाहण्याचा सिनेमा…
——–
‘टाइमपास १’ला मोठं यश मिळेल की नाही हे मला ठाऊक नव्हतं. त्यापूर्वीचे माझे ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ आणि ‘बालक पालक’ हे गंभीर धाटणीचे सिनेमे होते. ‘बालक पालक’ हा जरी वरून विनोदी वाटला तरी त्यातला विषय हा गंभीर होता. त्यामुळे हे तीन गंभीर विषयांवरचे चित्रपट केल्यानंतर मला स्वतःलाच वाटलं की आपण थोडा आता टाइमपास करायला हवा. डोंबिवलीत माझं लहानपण गेलं. तेव्हा तिथली आजूबाजूची माणसं यावर आपण एक चित्रपट करायला हवा असं मला वाटलं. तमाशा आणि नाट्यसंगीताचा डाय हार्ड फॅन नसूनही मी ‘नटरंग’ आणि ‘बालगंधर्व’ अगदी प्रामाणिकपणे केला. कॉलेजमध्ये असताना मला गोविंदा आणि मिथुन चक्रवर्ती खूप आवडायचा. डिस्को हा प्रकार खूप आवडायचा. त्यामुळेच मग मी ‘टाइमपास’ हा चित्रपट केला. सुदैवानं माझ्या आजूबाजूची गोष्ट सगळ्यांना आपलीशी वाटली. प्रत्येकानं आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पाहिलं. ‘टाइमपास’ यशस्वी ठरल्यामुळे ‘टाइमपास २’चा जन्म झाला. या चित्रपटाच्या वेळी थोडं मला टेन्शन होतं. कारण पहिल्या भागानंतर हा भाग लगेचच आला. त्यानंतर मात्र मी थांबायचं ठरवलं. काहीतरी चांगलं सुचलं तरच आपण तिसरा भाग करावा, असा मी निश्चय केला.
दरम्यानच्या काळात माझे काही चित्रपट झाले. माणसाचं पहिलं प्रेम साधारणपणे ९९.९९ टक्के यशस्वी होत नाही. पहिलं प्रेम अपयशी ठऱल्यावर माणूस गंभीर होतो. परंतु, त्याच्या आयुष्यात जेव्हा दुसरी मुलगी येते, तेव्हा तो आपलं आधीचं प्रेम बाजूला ठेवतो. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला की, दगडूची दुसरी गर्लफ्रेंड कोण असेल? की जी हा दगड फोडेल? असा विचार करता करता पालवी हे नाव सुचलं. ही पालवी अशी आहे की फुटत नाही, फोडते. मग ती कोणाची मुलगी असेल असा माझा विचार सुरू झाला. तेव्हा आपोआप मग एक सुंदर पटकथा तयार झाली आणि मी हा चित्रपट करायचं ठरवलं.
नायिका म्हणून हृता दुर्गुळेची निवड करण्यामागेही थोडी वेगळी गोष्ट घडली. मार्च २०२० मध्ये मी माझा ‘अनन्या’ चित्रपट पूर्ण केला. शूटिंगची शेवटची रात्र. सगळं काम पूर्ण झालं. तोपर्यंत सगळी हॉटेल्स बंद झाली होती. मग आम्ही कुठूनतरी बिर्याणीचे पॅक्स मागवले आणि रस्त्यावरच आमची रॅप अप पार्टी केली. यावेळी गाडीमधले स्पीकर्स लावून आम्ही रस्त्यावरच नाचायला लागलो. आमच्याबरोबर हृतादेखील ‘ब्रेक फ्री’ होऊन नाचायला लागली. तिच्या नाचण्याचा व्हिडीओ मी स्वतः शूट केला. हा व्हिडीओ नंतर पाहात असताना मला जाणवलं की हीच आपल्या चित्रपटामधली पालवी असू शकते. आमचा लेखक प्रियदर्शन जाधवच्याही कानावर मी ही गोष्ट घातली. त्यालाही ते पटलं. हृताला जेव्हा मी ही गोष्ट सांगितली तेव्हा हृतालाही खूप मोठा धक्का बसला.
चौथीपर्यंत मी वरळीच्या आदर्शनगरात राहायचो. तिथं मी बरंच लोकसंगीत ऐकलं. नंतर डोंबिवलीला गेल्यानंतर वेगळं संगीत माझ्या कानावर पडलं. जे. जे. कला महाविद्यालयात गेल्यानंतर मी अत्यंत वेगळ्या संगीताच्या प्रकाराला सामोरा गेलो. मला तमाशा, नाट्यसंगीत, पाश्चिमात्त्य संगीत, कोळी गीतं… असं सर्व काही आवडतं. मला असं वाटतं की गाण्याच्या चालीबरोबरच त्यातले शब्ददेखील लोकांना भिडले पाहिजेत. त्या दृष्टीनं ‘टाइमपास ३’मधील गाण्यांची निवड केली. माझ्या भावाची रिक्षा आहे. त्यातून मग ‘वाघाची डरकाळी’ गाण्याची कल्पना सुचली. ही रिक्षा आमच्यासाठी मर्सिडिज कार आहे. १९८७-८८च्या काळात कोल्ड्रिंक ही खूप महागडी गोष्ट होती. एक कोल्ड्रिंक आम्ही तीन भावांमध्ये प्यायचो. थोडक्यात कोल्ड्रिंक ही खूप हवीहवीशी वाटणारी गोष्ट होती. त्यातून मग गर्लफ्रेंडला कोल्ड्रिंक नावानं संबोधणं आणि तसं गाणं आलं. क्षितिज पटवर्धननं ही गाणी खूप छान लिहिली असून अमित राजचं तेवढंच आकर्षक संगीत त्याला लाभलं आहे. ‘टाइमपास ३’ हा थिएटरमध्येच आपल्या कुटुंबियांसमवेत बसून पाहाण्यासारखा चित्रपट आहे. त्यामुळे तो प्रेक्षकांना आवडेल, अशी मला आशा आहे.
– रवी जाधव
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया