अतिथी कट्टा

दिनांक : २७-०१-२०२३

‘साथ सोबत’मधून कुटुंबव्यवस्थेवर भाष्य…


राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी दिग्दर्शित केलेला ‘साथ सोबत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी केली आहे. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही रमेश मोरे यांनीच केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहेत. त्यानिमित्तानं लेखक-दिग्दर्शक रमेश मोरे यांचं हे मनोगत.


——–

‘साथ सोबत’च्या रूपातून आम्ही कुटुंबव्यवस्थेवर भाष्य केलंय. कोकणात माझं सातत्यानं जाणं होतं. त्यातून मला जाणवलेली गोष्ट म्हणजे इथं आता वयोवृद्ध मंडळीच अधिककरून पाहायला मिळतात. इतर तरुण मंडळी कामानिमित्तानं मुंबई, पुण्यात स्थलांतरीत झाली आहे. तेव्हा ज्येष्ठ नागरिकांची अस्वस्थता मला खूप बोचली. ती आपल्या कुटुंबव्यवस्थेला तडा देणारी आहे. आई-वडील, आजी-आजोबा यांच्यासोबत एका घरात राहणं हे स्वप्न आहे. धकाधकीच्या जीवनात या मंडळींना आपल्या सोबत घेणं हे खरं तर जगण्याचं मर्म आहे. हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केलाय.

माझे मागचे सगळे चित्रपट कोकणातच चित्रीत झाले आहेत. हा संपूर्ण चित्रपट आम्ही सावर्ड्यापासून काही अंतरावर असणार्‍या दहिवली गावात चित्रीत केलाय. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट खूप सक्षम आहे. यातील नयनरम्य निसर्ग मन मोहून टाकणारा आहे. सुरेख कॅमेरावर्क, नयनरम्य लोकेशन्स आणि मातब्बर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट ठरणार असल्याचं टिझरवरूनच जाणवतं. या चित्रपटात गावाकडची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. भपकेबाजपणापासून दूर असलेली साधी भोळी लव्हस्टोरी हेच या चित्रपटाचं खरं सौंदर्यस्थळ ठरणार आहे. प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही चित्रपटात दडलेला आहे.

या चित्रपटात एका डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका आहे. ती भूमिका मोहन जोशी यांनी साकारलीय. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त हेदेखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसतील. अनिल गवस हेदेखील या चित्रपटात एका वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. ही गोष्ट रुक्ष वाटू नये म्हणून त्यात आम्ही एक सुरेख प्रेमकथा गुंफली आहे. मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला संग्राम समेळ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. 2005 मधील माझ्या ‘सलाम’ चित्रपटामध्ये मृणालला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कारदेखील मिळाला होता. त्यामुळे नव्या जोडीची अनोखी केमिस्ट्री ’साथ सोबत’मध्ये रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या गेलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणार्‍या रमेश मोरेंच्या कल्पक दिग्दर्शनाचा स्पर्श या चित्रपटाला लाभला आहे.

‘साथ सोबत’ या चित्रपटात संग्राम-मृणाल या जोडीच्या साथीला राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. सिनेमॅटोग्राफी हर्षल कंटक यांनी केली असून, अभिषेक म्हसकर यांनी संकलन केलं आहे. यशश्री मोरे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतरचना संगीतकार महेश नाईक यांनी स्वरबद्ध केल्या आहेत. महेश नाईक यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. यशश्री मोरे यांनी वेशभूषा करण्याचीही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी रंगभूषा केली आहे. मीनल घाग यांनी नृत्य दिग्दर्शनासोबत केशभूषाही केली असून, प्रकाश कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कौशिक मारू आणि यशश्री मोरे ’साथ सोबत’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. कोकणातल्या स्थानिक कलावंतांना आम्ही स्थान दिलं आहे.

अवघ्या 25 ते 28 दिवसांमध्ये सगळं चित्रीकरण आम्ही पूर्ण केलंय. 2020च्या सुरुवातीला थोडा भाग चित्रीत झाला. लॉकडाऊनच्या काळात आम्ही इतर तांत्रिक सोपस्कार पूर्ण केलंय. जे काही ‘रिसोर्सेस’ आम्हाला उपलब्ध होते, त्याचा उपयोग करून चांगली कलाकृती देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तसेच ज्या काही लोकांना आम्ही हा चित्रपट दाखवला आहे, त्यांना तो खूप आवडलाय.

माझ्या एका मित्रामार्फत मारू यांच्याशी माझा पहिल्यांदा संपर्क झाला. खरं तर त्यांना गाण्याचा एक अल्बम करायचा होता. पण मी त्यांना गाणं नाही तर चित्रपट करू शकेन, असं सांगितलं. तेव्हा ते मला भेटायला माझ्या घरी आले. मला मिळालेल्या पुरस्कारांच्या घरातील भिंतीवरील ट्रॉफीज पाहून ते खूप भारावून गेले. त्याच वेळी त्यांनी माझ्याबरोबर एखादा चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मी दोन-तीन गोष्टी त्यांना ऐकवल्या. त्यामधून या गोष्टीची आम्ही निवड केली. हा सिनेमा पाहिल्यानंतर धानजी मारू आणि आमचे प्रस्तुतकर्ते प्रसन्न वैद्य देखील खूप खुश झाले.

एकंदरीत शूटिंगचा अनुभव चांगला होता. नवीन माणसांकडून काम काढून घेण्याचं मोठं चॅलेंज होतं. ते पूर्ण करताना खूपच मजा आली. माझ्या इतर चित्रपटांच्या तुलनेत हा थोडा संघर्षपूर्ण काळ होता. पण तरीदेखील आमचं काम छान झालं. चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. ती माझी पत्नी यशश्री मोरे यांनी लिहिली असून त्यांना महेश नाईक यांनी संगीत दिलं आहे.

– रमेश मोरे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया