अतिथी कट्टा

दिनांक : २४-०९-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌चार वर्षांनी मी चित्रपट करतोय – भरत जाधव
गणेशोत्सव नुकताच पार पडलाय. परंतु, सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाची. या चित्रपटात आप्पाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव चार वर्षांनी मराठी चित्रपट करताहेत. त्यानिमित्त त्यांचं हे मनोगत.

——

चांगली कथानकं मिळत नसल्यामुळे मी गेल्या चार वर्षांपासून मराठी चित्रपट केला नव्हता. या काळात माझ्याकडे त्याच त्याच भूमिका येत होत्या. म्हणून मी थांबलो होतो. मला आजपर्यंत आपण केलं नाही असं वेगळं काम करायचं होतं. जे वेगळेपण मी शोधत होतो, ते मला नेमकं या चित्रपटामधून मिळालं. या चित्रपटाची गोष्ट खरंच वेगळी आहे. हिंदी मालिका तसेच चित्रपट करणारे अश्विनी धीर यांची गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांनी मला जी गोष्ट सांगितली ती ऐकल्यानंतर मी त्यांना विचारलेला पहिला प्रश्न म्हणजे, तुम्ही जी गोष्ट मला ऐकवलीत, तशीच ती पडद्यावर दिसणार आहे ना? तसं असेल तरच मी हा चित्रपट करतो. कारण आजवर चित्रपट स्वीकारण्यापूर्वी गोष्ट चांगली ऐकवली जाते. मात्र ती पडद्यावर भलत्याच रूपात सादर केली जाते.

या चित्रपटाच्या गोष्टीबरोबर त्याचं कास्टिंग मला खूप आवडलं. या चित्रपटात दिलीपभैय्या, सुबोध, संपदा आणि मी आहे म्हणून माझं हे वक्तव्य नाही. आम्ही सर्व कलाकार आपापल्या भूमिकांना अगदी चपखल बसलेलो आहोत. या व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना दुसरा कोणी दिसूच शकणार नाही. या चित्रपटामध्ये मी आप्पा या सर्वसामान्य माणसाची भूमिका साकारली आहे.

या व्यक्तिरेखेला वडील, बायको, मुलगा-मुलगी आहेत. ठराविक पगारात त्याचं घर चाललंय. घरात गणपती आणण्याची चर्चा सुरू होते. मात्र आपली मिळकत पाहून या व्यक्तिरेखेला आपल्या घरी गणपती आणू नये असं वाटत असतं. परंतु, घरच्यांच्या आग्रहामुळे त्याच्या घरी गणपतीची मूर्ती आणली जाते.या व्यक्तीच्या अपेक्षेनुसार घरातला खर्च दुप्पट-तिप्पट होतो नि मग जो काही गोंधळ होतो, ते या चित्रपटातच तुम्ही पाहा. माझ्या आयुष्यात गणपतीला मोठं स्थान आहे. शाहिर साबळे पार्टीमध्ये मी काम केलं असलं तरी मला पहिलं स्टेज मिळालं ते सार्वजनिक गणेशोत्सवाचं रंगमंच. तिथं मी स्कीट करायचो, प्रहसनं करायचो. आता सगळ्याला इव्हेंटचं स्वरूप आलंय. मुलांच्या कलागुणदर्शन कार्यक्रमात माझा सहभाग असायचा. यावेळी एक नारळ आणि ५१ रुपये बक्षीस मिळायचं. आता सगळंच लक्षावधी आणि कोट्यवधीच्या घरात जाऊन पोचलंय. तिथून माझा प्रवास सुरू झाला. अशाप्रकारे गणेशाचा आशीर्वाद मिळाला. नाटकाच्या दौऱ्यासाठी बस निघाली की पहिल्यांदा आपोआप प्रत्येकाच्या तोंडून गणपती बाप्पा मोरया हे शब्द निघतात.

सुबोधबरोबर माझा हा दुसरा चित्रपट आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी मी सुबोधबरोबर उलाढाल हा चित्रपट केला होता. तसेच दिलीपभैय्यांबरोबरही माझा हा दुसरा चित्रपट आहे. त्यांच्याबरोबर मी महेश कोठारेंचा पछाडलेला हा चित्रपट केला होता. परंतु, आम्ही तिघे जण पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येतोय. गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्यूसर अजितसिंग आहेत. ‘पॅनोरमा स्टुडिओज् डिस्ट्रीब्युशन एलएलपी’ तर्फे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.लागलं.

भरत जाधव

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया