वसंत सबनीस, दादा कोंडके आणि ‘विच्छा’…
——
सबनीस साहेबांना तेव्हाच्या सचिवालयात ‘जरा आमचं घोडं पुढे दामटवा’ अशी विनंतीही करुन झाली. त्यांचीही आम्हाला मदत करायची तयारी होती. पण ज्या खात्यात हे काम होत असे त्या खात्यात सबनीस नव्हते. त्यांचाही नाईलाज झाला. शेवटी सरकारी काम होईल तेव्हा होवो, तोपर्यंत आपले आपण काहीतरी करावे असा विचार करुन मी सबनीसांकडे स्क्रिप्ट मागितले. त्यांनी ‘वीणा’ नावाच्या दिवाळी अंकात त्रेसष्ठ साली लिहिलेला’छपरी पलंगाचा वग’ नावाचा वग काढून दिला. मला काही तो खास आवडला नव्हता. मी सबनीस साहेबांना म्हटलं की तुम्ही काहीतरी नवीन माझ्यासाठी लिहा. त्यांनीही ते मान्य केलं. आमच्या धडपड्या स्वभावामुळे आमच्याबद्दल त्यांना एक जिव्हाळा निर्माण झाला होता. पण त्यांच्या कामातून वेळ काढून काही नवं लिहायला त्यांना वेळ मिळत नव्हता. सरकारी कार्यक्रमाचं घोडं अजूनही पेंड खात होतं. टेन्शन वाढायला लागलं होतं. मनाला अस्वस्थता आली होती. जनता कलापथक सोडण्याचा आपला निर्णय बरोबर होता की नाही? काहीच समजत नव्हतं…दिवस जातच होते…..
मी अस्वस्थ होऊन रोज सबनीस साहेबांना फोन करीत होतो. एक दिवस ते मला म्हणाले, ‘तुम्ही ‘छपरी पलंगाचा वग’ पुन्हा एकदा वाचून पहा.’ मी त्याप्रमाणे तो परत वाचला आणि त्यात खूप गंमत करता येईल असे लक्षात आले. आधी मला हा वग का आवडला नव्हता हेच मला कळेना. काही काही गोष्टींना योग्य वेळ यावी लागते हेच खरे! राम नगरकर तुकाराम शिंदे अशा सगळ्या मंडळींनी विचार केला आणि हा छपरी पलंगाचा वग’ करायचा ठरविले. सरकारी कार्यक्रम मिळतील तेव्हा मिळतील, आधी आपण काहीतरी करायला तर सुरुवात करूया. हे ठरल्यावर मी सबनीस साहेबांकडे गेलो. काही भाग मला परत लिहून पाहिजे होता. तो त्यांनी लिहून द्यायचे कबूलही केले. सांताक्रूझच्या साने गुरुजी विद्यालयात ‘छपरी पलंगा..’च्या तालमी होऊ लागल्या. रामने याचे नाव बदलून ‘विच्छा माझी पुरी करा’ असे ठेवू या असे सुचविले. मला पण आवडले ते नाव. रोज रात्री तालीम करायची. तालीमीमध्ये मूळ प्रसंगातून काही वेगळाच प्रसंग बाहेर पडायचा. तालीम संपली की सबनीस साहेबांच्या खारच्या घरी जायचो. त्यांना काय काय बदल आम्ही करून घेतले आहेत ते सांगायचो आणि त्याप्रमाणे बदललेले सीन लिहून मागायचो. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत गप्पा रंगायच्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तालमीला जाताना मी परत त्यांच्या घरी जाऊन बदललेला सीन घेऊन जायचो. हे असं अनेक दिवस चालले. ‘विच्छा..’ हे खऱ्या अर्थाने मुक्तनाट्य होते. कारण अमुक एक असा दिग्दर्शक त्या वगाला नव्हता. प्रत्येकजण स्वतःची अशी भर त्यात घालत असे.
तुकाराम शिंदे ‘विच्छा..’चा संगीतकार. बापू मांग वाटेगावकरांकडे त्याने शिक्षण घेतलेले. हे बापूमांग म्हणजे पट्ठे बापूरावांशी थेट सवाल-जबाब केलेले शाहीर. त्यामुळे काही प्रश्नच नाही. सबनीससाहेब आपले न कंटाळता परत परत लिहीत होते. आता विचार करताना असं वाटतं की, त्यांना आपण किती त्रास दिला. दिवसभर नोकरी. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत गप्पा. कधी कधी तर सकाळपर्यंतसुद्धा. या सगळ्या कोष्टकात ते पुन्हा सीन केव्हा लिहायचे कुणास ठाऊक! पण संध्याकाळी पुन्हा लिहिलेले सीन तयार असायचे एवढे मात्र खरे!
सबनीसांना राम नगरकरने दिलेले नाव अजिबात आवडले नव्हते. ‘विच्छा माझी पुरी करा’ मधील विच्छा’ हा शब्द थोडा जास्तच शृंगारिक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना समजावलं की, नाहीतरी याचे किती प्रयोग होणार आहेत? दोन-चार सत्यनारायणाच्या पूजेत, दोन चार गणेशोत्सवात. दहा प्रयोग वर्षात म्हणजे डोक्यावरून पाणी. आणि चेष्टा नाही, खरोखरच मी मनापासून बोललो होतो. यापेक्षा जास्त प्रयोग होतील असं मला खरंच वाटलं नव्हतं.
सबनीसांनाही ते पटलं. मग झालं…महिनाभर अशा तालमी वगैरे केल्यावर आता प्रयोग करायचा. राणीच्या बागेत तेव्हा अण्णाभाऊ साठे ओपन एअर थिएटर होतं. उघड्यावर अशी लोकनाट्यं तिथे होत असत. प्रयोगामध्ये व्यवस्थापक किती महत्त्वाचा असतो हे मला त्या दिवशी कळलं.जनता कलापथकात काम करीत असताना या गोष्टीचा विचार करण्याची वेळच आली नव्हती. फक्त स्टेजवर जायचं आणि काम करायचं. पण इथे स्वतःचं कलापथक म्हटल्यावर मलाच त्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक होतं. पण आता अगदी खरं कबूल करायला हरकतच नाही, म्हणजे तेव्हाही मला ते मान्य होतंच, की माझा पिंड व्यवस्थापकाचा नाही, कलाकाराचा आहे.
माझी कला जास्तीत जास्त चांगली कशीसादर होईल हे मी पाहतो. पण बाकीच्या व्यावहारिक गोष्टी आपल्याला जमत नाहीत आणि जमणारही नाहीत. तर राणीच्या बागेतल्या प्रयोगाला व्यवस्थापक तुकाराम शिंदेच. सगळा वाद्यवृंद जमला. २००-३०० रुपयांत प्रयोग दिलेला हो! त्यापेक्षा जास्त त्यावेळी मिळतच नव्हते. मैदान जेवढं भरायचं तेवढं भरलं. सबनीसही प्रयोगाला आलेले. गण गवळण सुरू झाली आणि बाजूच्या झाडावरची एक कोकिळा ओरडायला लागली. ढोलकी, हलगी सुरू झाली रे झाली, की ती ओरडायची. सुरुवातीला गंमत वाटली तरी नंतर तिच्या कुऽऽऽ हूऽऽऽ चा त्रास व्हायला लागला. प्रेक्षक असे नाही तसे एन्जॉय करीत होते. पण आम्ही अस्वस्थ. पडद्यामागे असलेली मंडळी जमेल तसे प्रयत्न करून, बारीक बारीक दगड मारून त्या कोकिळेला हाकलवायचा प्रयत्न करीत होते. पण ती काही हलेना.
इकडे गण गवळणीनंतर पडद्यामागे वेगळाच दुर्धर प्रसंग उद्भवला. एंट्री आता कुणाची आहे यावरून राम आणि मी गोंधळलो होतो. मूळची संहिता बाजूला ठेवून रोज नवीन सीन नेऊन नेऊन आम्ही तालमी केलेल्या. पण कुठल्यानंतर कुठला सीन हे कुणाच्या बापाला माहीत? आली का पंचाईत! काय करणार? मग प्रेक्षकांत बसलेल्या सबनीसांना आत बोलावून घेतले आणि त्यांनीच लिहिलेल्या कागदाचा गट्ठा त्यांच्यासमोर टाकला. हे सगळं बैजवार लावून द्या असं म्हटल्यावर त्यांचीही पंचाईत झाली. कारण त्यांचीही तीच अडचण होती. रोज वेगळे सीन लिहून दिल्याने त्यांनाही कोणत्या प्रसंगानंतर कोणता प्रसंग असावा हे माहीत नव्हतं. ते तालमीलाही कधी आले नव्हते आणि सलग तालीम आम्ही कधी केलीच नव्हती. पण शेवटी ते लेखक होते ना! त्यांनी अंदाजाने कुठल्या सीननंतर कुठला सीन येईल याचा अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे कागद लावून दिले. त्यांनी त्यावेळी जे नंबर कागदावर टाकले तोच क्रम नंतर कायम राहिला.
प्रयोग संपला तरी कोकिळा ओरडतच होती.प्रेक्षकांचा रिस्पॉन्स काय फार चांगला नव्हता. पण काहीतरी नवीन सुरू झाल्याचा आनंद मनात होता. कोकिळेने फार त्रास दिला. म्हटल्यावर तिथला एक माणूस म्हणाला, ‘साहेब, तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या पहिल्याच प्रयोगाला कोकिळा ओरडली. शुभ असतं ते! ‘विच्छा माझी पुरी करा’ हिट होणार लिहून ठेवा. आम्ही ते हसण्यावारीच नेलं. अशी कोकिळा ओरडून नाटक हिट होत असेल तर नाटक कंपनी नटाना पाळण्याऐवजी कोकिळाच पाळेल’ असे विनोदही करून झाले. दुर्दैवाने हा विनोद तात्पुरता का होईना,खरा ठरला आणि मोजून चौथ्या प्रयोगानंतर ‘विच्छा माझी पुरी करा’ बंद पडले. पण नंतर ते चालले.
– दादा कोंडके
(शब्दांकन – अभय परांजपे)
(सौजन्य – सुरुची प्रकाशन)
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया