अतिथी कट्टा

दिनांक : ०६-०७-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌मराठी संगीताचा मी विशेष फॅन




हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अली मराठी चित्रपटसृष्टीत मोजकीच परंतु दर्जेदार गाणी गातो. येत्या १२ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हॉट्सअप लव्ह’ या चित्रपटात त्यानं गाणी गायली आहेत. त्यानिमित्तानं त्याचं हे मनोगत.

——

मराठी चित्रपटांमध्ये गाणं हा माझ्यासाठी नेहमीचा आनंदाचा नि अभिमानाचा विषय असतो. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी महाराष्ट्रात राहतो आणि मुंबई माझी कर्मभूमी आहे. मी जरी दिल्लीचा असलो तरी माझ्यासकट बहुतांश कलाकारांना मोठं करण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे. जगातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकून मी मोठा झालो. मंगेशकर कुटुंबाच्या संगीत साधनेचा माझ्यावर प्रभाव आहे. ‘दयाघना…’, व ‘मेंदीच्या पानावर’ ही माझी आवडती मराठी गाणी आहेत. लतादीदींचं ‘मोगरा फुलला’ हे गाणं मला विशेष आवडतं. हृदयनाथ मंगेशकरजींचं ‘दयाघना’ तर क्लासिकच आहे. आशाताईंचं ‘केव्हातरी पहाटे’ हे गाणं मी कितीदाही ऐकलं तरी माझं समाधान होत नाही. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा मराठी गाणं गाण्यासाठी बोलावलं जातं तेव्हा मी खुश असतो. पण, तिथे जाण्यापूर्वी मी गीताचे संपूर्ण बोल शुद्ध उच्चारण कसे होतील, हया कडे लक्ष देतो आणि त्यासाठी मराठी गाणी आवर्जून ऐकतो. जेव्हा मी ते गाणं रेकॉर्डिंगनंतर ऐकतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो की मीपण मराठी गाणं गायलंय!

‘व्हॉट्सअप लव्ह’ या चित्रपटाला नितीन शंकर यांनी अगदी जबरदस्त संगीत दिलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतोय. मी त्यांचा लहान भाऊच आहे म्हणा ना. ते एक्स्ट्राऑर्डिनरी संगीतकार तर आहेतच पण खूप मोठे रिदम अरेंजरही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गाण्याचा प्रस्ताव आल्यानंतर मी त्याला नाही म्हणूच शकत नव्हतो. मी एकूण दोन गाणी गायली आहेत. ह्या चित्रपटात मी दोन अत्यंत वेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. ‘शोना रे’ हे सोलो साँग आणि ‘जवळ येना जरा’ हे श्रेया घोषाल सोबत ड्युएट गायलंय. हे गाणं अत्यंत रोमॅंटिक आहे. माझं दुसरं गाणंसुद्धा रोमॅंटिक असलं तरी त्यात थोडंसं रॉक फिलिंग आहे. या दोन्ही गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरू असताना मला खूपच छान अनुभव आला. ज्या पद्धतीनं या गाण्यावर तयारी झालीय ते पाहिल्यानंतर मला तर आपण एखाद्या हिंदी चित्रपटाचंच गाणं ध्वनिमुद्रित करतोय असं वाटलं. ह्या चित्रपटात आशाताईंनीही एक गाणं गायलंय. त्यामुळे मला खुप उत्सुकता आहे की ‘व्हॉट्सॲप लव’ बद्दल आणि हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतला आजवरचा म्युजिकल हीट ठरेल.

– जावेद अली
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया