मांगल्याची खूण ‘सु’लोचना : सुलोचनादीदी
——
नागपंचमी दिवशी ३० जुलै,१९२९ रोजी खडकलाट इथे त्यांचा जन्म झाला.त्यांचे लाडके नांव रंगू.वडील फौजदार,कडक शिस्तीचे.पण त्या लहानपणापासून बंडखोर,खेळकर.त्यांना तंबूत पडद्याजवळ बसून चित्रपट पाहण्याची खूप आवड.त्यांच्या बनू मावशीची फार इच्छा होती की त्यांनी सिनेमाक्षेत्रात मोठी अभिनेत्री होऊन नाव कमवावं.१९४३ साली अवघ्या १३-१४ वर्षांच्या असतानाच त्या कोल्हापुरात आल्या अन मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल कंपनीत ३० रुपये पगारावर काम करू लागल्या.कामाची वेळ ११ ते ६.त्यांना पहिला मेकअप केला ज्येष्ठ कलावंत भाऊराव दातार यांनी.त्या दिवसापासून यांच्या सवयीनुसार त्या प्रथम आरशाला मेकअपचे बोट लावून मगच स्वत: मेकअप करू लागल्या.कंपनीच्या ‘चिमुकला संसार’ चित्रपटात ज्युनिअर कलाकार म्हणून त्या वावरल्या.
ही नवखी,खेडवळ,गावंढळ,शब्दाचे रीतीरिवाज माहित नसणारी,शुद्ध मराठी बोलणंही न जमणारी,व्यासंगी आणि हिशेबी अभिनय कौशल्य नसणारी कलावंत ..’हे खेड्यातलं ध्यान चुकून तर इकडे आलं नाही ना!’ असा शेरा पाहणाऱ्याच्या डोळ्यात अगतिकपणे पाहणारी… ‘असल्या खेडवळ बायका जर सिनेमात आल्या तर चित्रसृष्टीचे तीन तेरा वाजतील’ असे अनुदगार कानावर पडून अवघडलेली…उगाच या सिनेमाच्या फंदात पडलो म्हणून डोळ्यांतील आसवांवाटे आपला अपमान सहन करणारी कलावंत …पण पुढील काळात सायलेन्स,स्टार्ट,कॅमेरा,क्लैप,शूट अशा रुपेरी जीवनातील अभिनय सजीव करणाऱ्या पंचमहाभूतांनी त्यांचं अवघं कलाजीवन कसं व्यापलं हे पाहणं खरोखरीच इंटरेस्टिंग आहे.
थोड्याच अवधीत मा.विनायकांसह सर्व कलाकारांनी कोल्हापूर सोडलं अन कंपनी मुंबईला गेली.पण तोपर्यंत त्यांनी श्री.आबासाहेब चव्हाण यांच्या बरोबर वैवाहिक जीवनात पदार्पण केलं होतं.म्हणून त्या कोल्हापुरातच राहिल्या अन योगायोगाने त्यांना भालजी पेंढारकरांच्या प्रभाकर स्टुडीओत म्हणजेच आत्ताच्या जयप्रभा स्टुडीओत प्रवेश मिळाला.त्या कोवळ्या वयात अंजनी तारकर,कमल लोमटे,लीला जोशी (सौ.लीला जयशंकर दानवे) या स्टुडीओतील सख्यांबरोबर त्यांचे स्नेहबंध रेशीम धाग्यांनी विणले गेले.त्या काळात आपली सुखदु:खे त्यांनी एकमेकींना वाटली.पुढे हे मैत्रीचे धागे दीदींच्या व्यस्त दिनक्रमामुळे दीदी विसरल्या असतील परंतु त्यांच्या सख्यांच्या मनात ही वीण कायम राहिली. त्यांच्या मैत्रीचा सुगंध आठवणींच्या रूपाने आम्ही वारंवार हुंगला आहे.एका स्तरात जन्माला येण्याचं त्यांच्या नशिबी होतं.सुखसुबत्ताही फारशी नव्हती.जन्म घेतलेल्या खेडेगावांच नावच मुळी खडकलाट.पण या खडकावर रुजलेलं वाढलेलं हे बी प्राजक्ताच्या झाडासारखं अंगोपांगी सर्वांगानं विलक्षणरित्या बहरलं ते असं….
स्टुडीओत ‘महारथी कर्ण’ चं शुटींग सुरु होतं.त्या चित्रपटात दीदी समूह दृश्यातून वावरल्या तोपर्यंत त्यांना कन्यारत्नही प्राप्त झालं होतं.स्टुडीओतील शिस्त वाखाणण्यासारखी होती.स्वत: भालजीबाबा आणि त्यांचे असिस्टंट श्री.जयशंकर दानवे (म्हणजे माझे पप्पा) कलाकारांच्या कसून तालमी घेत आणि मग शॉट शूट केला जात असे.तालमीमुळे कलाकारांना टोनिंग आणि अभिनय या दोन्हीवर एकाच वेळी पकड ठेवणं सोपं जाई.नवीन कलाकाराला श्री.जयशंकर दानवे अक्षरश:छिन्नी हातोड्याने ठोकून तयार करत अन मग तो कलाकार भालजीबाबांसमोर उभा करण्यात येत असे.हाच स्टुडीओत शिरस्ता होता.त्यामुळे कलाकाराला प्राथमिक अभिनयाचे धडे दानवेच देत.याला अपवाद सुलोचनादीदीही नव्हत्या.खडकलाटहून आल्यामुळे तिथल्या बोलीभाषेचा त्यांच्यावर इतका परिणाम होता की तो काढून टाकणं आणि त्यांची भाषा सुधारणं हे जोखमीचं काम होतं.बाबांनी दीदींना एक अभिनेत्री म्हणून प्रथम नाकारलंच होतं.या संदर्भात एक किस्सा मनोरंजक आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी चौकात पूर्वी विल्सन साहेबांचा पुतळा होता. त्याचे उच्चाटन करून तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचे ठरले.तेव्हा शिवचरित्रावर आधारित एक नाटक बसवून निमंत्रितांचे मनोरंजन करावे,अशी अभिनव कल्पना भालजींनी दानवेंसमोर मांडली.दानवेंनी ‘करीन ती पूर्व’ हे मामा वरेरकरांचे नाटक बसवायला घेतले.त्यावेळी सुलोचनादिदींनी प्रथम रंगभूमीवर या नाटकाद्वारे पदार्पण केले.त्यांचे पहिले दिग्दर्शक होते श्री.जयशंकर दानवे.त्यांच्यावर चालणे,बोलणे,हसणे,रडणे या सर्व कायिक-वाचिक अभिनयाच्या तालमी अहोरात्र सुरु झाल्या.या नाटकात ज्येष्ठ अभिनेते सुर्यकांत मांडरे शिवाजी होते.जयशंकर दानवे दिग्दर्शक होते तसेच या नाटकात ‘हिरोजी’ हे पात्र ते स्वत: करत होते.दीदींना ‘गजरा’ ची म्हणजेच हिरोजीच्या पत्नीची भूमिका दिली होती.हळूहळू त्यांच्यातली अभिनेत्री आकार घेत होती.बाबांना हे कळले तेव्हा ते म्हणाले, ‘शंकर, दगडाला देव करण्याचा तुझा हा प्रयत्न आहे.पण लक्षात ठेव हा खडकलाटचा दगड आहे.’ दिदींची भाषा सुधारणे ही पहिली गरज होती.पण शब्द ही त्यांची पडद्यावरची भाषा नव्हतीच.शब्द हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बळ नव्हतेच.त्यांचे व्यक्तित्व उमटत होते,बोलत होते ते मुख्यत: त्यांच्या चेहऱ्याद्वारे,त्यांच्या डोळ्याद्वारे.त्यांचा चेहरा याच माध्यमासाठी बनला आहे हे समजूनच जणू दानवेंनी दगडातून मूर्ती घडवली.
दीदींची रंगभूमीवरची एंट्री एवढी जोरकस झाली की,बाबांनी दानवेंना शाबासकीची थाप दिली.तसेच दीदींची मुक्तकंठाने वाखाणणी करत त्यांचं जुनं
नाव बदलून ‘सुलोचना’ नावाचं बारसं केलं.अर्थात हे नाव मिळवायला त्यांच्या भावपूर्ण डोळ्यांनी चांगलीच मदत केली.त्या नाटकाच्या वेळी पती निधनाची दुष्ट वार्ता कानी पडताच गजरा आर्त किंकाळी मारते आणि चुडा फोडते हा सीन करताना दीदी खरोखरच बेशुद्ध झाल्या.त्यावेळी अभिनय करताना अलिप्तपणे करायचा असतो हे दीदींना श्री.दानवेंनी शिकवलं हे त्या कधीच विसरल्या नाहीत.१९४६ च्या ‘सासुरवास’ चित्रपटातही बाबांनी शांता जोग या नवीन अभिनेत्रीला मुख्य भूमिका दिली अन दीदी सहाय्यक अभिनेत्री होत्या.परंतु १९४७ ला बाबांनी जेव्हा जयशंकर दानवेंना ‘जयभवानी’ हा चित्रपट स्वतंत्र दिग्दर्शनासाठी दिला त्यावेळी त्यांनी दीदीना प्रथम नायिका बनवले.अशाप्रकारे सुलोचनादिदींचे रंगभूमी आणि सिनेसृष्टीतले पहिले दिग्दर्शक ठरले जयशंकर दानवे.भालजी पेंढारकर आणि दानवे या दोघांच्या अभिनयाच्या तालमीत त्या तयार झाल्या.जणू करवीरच्या महालक्ष्मीने या चौदा वर्षांच्या लेकीला जयप्रभा कलामंदिरात आणून सोडले अन पुढे महालक्ष्मीने अभिनय कलेचा रत्नजडीत कोल्हापुरी साज त्यांच्या गळ्यात घातला.
गुरूबरोबर शिष्यही समर्थ,जिज्ञासू आणि प्रज्ञावंत असावा लागतो.जाणकार मार्गदर्शक वाट मोकळी करून देतात पण मूळ झरा हवाच हे जणू त्यांनी दाखवून दिले.त्यानंतरचा इतिहास आपण सर्वजण जाणतो.त्यांनी मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यामुळे चित्रपटसृष्टीला एक सुंदर,हसतमुख,अमृताहुनी गोड बोलणारी,खांद्यावर खानदानी पदर लपेटणारी सुलोचना मिळाली.जिच्यावर अवख्या महाराष्ट्रानं प्रेम केलं.देव,देश धर्म आणि माणुसकीचं व्रत त्यांना कोल्हापुरात मिळालं.हिंदी चित्रपटसृष्टीत भक्कम पाय रोवायचा असेल तर कायम वास्तव्य मुंबईत असलं पाहिजे या त्यांच्या हितचिंतकांचं म्हणणं मान्य करून त्या मुंबईत राहायला गेल्या.
स्नेहबंधातील जे जे पवित्र आहे उदा: माता,भगिनी,वहिनी,पत्नी,मैत्रीण ही सारी रूपं त्यांच्यात सामावली.सात्विकता म्हणजे सुलोचनादीदी असे समीकरण झाले.स्त्रीच्या जवळजवळ सगळ्या रूपांना आणि स्त्रीच्या धवल गुणांना त्यांनी दर्जेदारपणे अभिव्यक्त केले.व्यक्तिरेखेत स्वत:ला झोकून देण्याची किमया त्यांना साध्य होती.दीदी म्हणजे लेखकाच्या कल्पनाशक्तीतील व्यक्तिरेखेला त्याही पलीकडे घेऊन जाऊन त्या व्यक्तिरेखेला स्वत:चा चेहरा देणारी वास्तवातील एक अजरामर व्यक्तिरेखा.ग्रामीण भागात जन्मलेली फारशी न शिकलेली मुलगी चित्रपटासारख्या एका क्षणात स्वर्गात तर दुसऱ्या क्षणी पाताळात अशा अत्यंत चंचल क्षेत्रात स्वत:च्या अविरत कष्टानं,निरीक्षणानं,कर्तृत्वानं,अथक प्रयत्नानं, बोलीभाषा,आंगिक,वाचिक अभिनय आणि भूमिकेच्या प्रकटीकरणावर विलक्षण प्रभुत्व मिळवते आणि सातत्यानं ७० वर्षे या क्षेत्रात टिकून राहते हे कौतुकास्पद आहे.
ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडूलकरांनी दिदींविषयी म्हटलंय, ‘या चेहऱ्याचे डोळे,स्त्रीसुलभ मर्यादा आणि वात्सल्य बोलतात.ओठ कारुण्याच्या दबल्या सुप्त वेदना संवेदनशीलतेने व्यक्त करतात.गालावरची खळी प्रसन्नता देऊन जाते.नाक आणि जिवणी मूर्तिमंत कोमलतेचा प्रत्यय देतात.डोक्यावरून जाड्याभरड्या साडीचा पदर आला की हा चेहरा श्रमजीवी भाबडा होतो तर भरजरी शालूच्या झगमगत्या पदराने हाच चेहरा क्षणाधार्थ राजबिंडा होतो.वृद्धपणात हाच चेहरा तपस्वी वाटतो तर कुशीत तान्हं अर्भक आलं की हाच चेहरा जगण्याच्या उत्साहाने बहरून उठतो.’ म्हणूनच त्यांच्या संदर्भात प्रतिभावान लेखक कवी ग.दि.माडगुळकर म्हणत, ‘एकच सुलोचना मला मिळवून द्या.मी माझा चित्रपट यशस्वी करून दाखवतो.’
‘मीठभाकर,जीवाचा सखा,बाळा जो जो रे,चिमणी पाखरं,वहिनीच्या बांगड्या,धाकटी जाऊ,पतिव्रता,सांगत्ये ऐका,मोलकरीण,साधी माणसं,संत गोरा कुंभार,एकटी’ अशा कितीतरी मराठी चित्रपटातील भारतीय स्त्री व्यक्तिरेखा त्यांनी अजरामर केल्या.तसेच ‘सुजाता,संघर्ष,मेहरबान,रेश्मा और शेरा,नई रोशनी,अंधा कानून,आये दिन बहार के,प्रेमनगर,कटी पतंग,मुकद्दर का सिकंदर’
अशा शेकडो हिंदी चित्रपटात मां,बहन,पत्नी,दादी मां अशा सात्विक भूमिका करून देशभरातील विविध भाषिक,विविध धर्मांच्या रसिक प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने ममतेची खूण पटवली.दिलीपकुमार,अशोककुमार,राजेंद्रकुमार,धर्मेंद्र, देव आनंद,नूतन,आशा पारेख,हेमामालिनी अशा दिग्गज कलाकारसमवेत त्या लखलखीत ताऱ्याप्रमाणे चमकल्या.म्हणूनच सुलोचनादीदी हे नाव उच्चारताच रसिकांच्या मनात एकच भावना निर्माण होते आदराची-जिव्हाळ्याची.
पंतप्रधान इंदिरा गांधी,डॉ.राधाकृष्णन,राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद अशा अनेक थोर समाजविभूषित व्यक्तींकडून त्यांच्या कर्तृत्वाला अनेक वेळा गौरवांकित करण्यात आलं.त्यांच्या अनेक चित्रपटांना आणि त्यांना असंख्य वैयक्तिक सन्मान मिळाले.महाराष्ट्र राज्याची अनेक पारितोषिके मिळाली.ज्यांची गणना शक्य होणार नाही.परंतु ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द,पाचशेच्या आसपास मराठी,हिंदी
चित्रपटांची संख्या,इतकं व्यस्त आयुष्य गेल्यानंतरही या सर्व कर्तृत्वाचं श्रेय त्या ईश्वरी कृपा,वडीलधारी मंडळी व गुरूंचा आशीर्वाद आणि रसिकांचं अमाप प्रेम यालाच देतात ही त्यांची कृतज्ञता स्तुत्य आहे.
कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओतून मिळालेल्या अभिनयाच्या,संवादाच्या भक्कम पायावर प्रेरणा घेऊन कित्येक वर्षे त्या अव्याहतपणे भूमिका करत राहिल्या.चित्रपटाच्या स्थित्यंतराच्या त्या एक डोळस साक्षीदार आहेत.
सुलोचनादिदींसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्रीला,त्यांच्या उत्तुंग सात्विक व्यक्तिमत्वाला आणि कारकिर्दीला एक रसिक म्हणून अभिवादन!
– जयश्री जयशंकर दानवे
ज्येष्ठ लेखिका
कोल्हापूर.
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया