अतिथी कट्टा

दिनांक : ०६-०५-२०२०

मान्यवर कलावंतांनी मदतीसाठी पुढं यावं-मेघराजराजे भोसले



गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाचा फटका मराठी चित्रपटसृष्टी, मालिका, नाटके, लोककला यांना बसला आहे. त्यामुळे अनेक कलावंत-तंत्रज्ञांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानिमित्तानं मराठी मनोरंजन उद्योगापुढील आव्हाने याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी नुकतीच आपली सविस्तर भूमिका फेसबुक लाईव्हद्वारे मांडली. त्यामधील त्यांनी व्यक्त केलेल्या महत्त्वाच्या मुद्यांचा हा गोषवारा.

——

जगभरात कोरोनाच्या साथीनं थैमान घातलेलं असताना आपल्या मराठी मनोरंजन उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. चित्रपट, मालिका यांचं शूटिंग गेल्या दीड महिन्यांपासून थांबले आहे. तसेच तमाशा, नाटके तसेच विविध लोककलांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आपल्या क्षेत्रामधील अनेकांचं पोट हे दररोज चालणाऱ्या शूटिंगवर भरत असतं. शूटिंगच ठप्प झाल्यामुळे बहुतेकांचा रोजगार बुडाला आहे. मी बऱ्याच कलाविषयक संस्थांचा अध्यक्ष आहे. गेल्या महिन्याभरापासून माझं अनेकांशी सविस्तर बोलणं झालं आहे. त्यामधून आपल्या चित्रपट उद्योगासमोर जे गंभीर संकट उभं राहिलं आहे, याची कल्पना येते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने तसेच आमचे सर्व संचालक मंडळाचे सदस्य गेले महिनाभर ज्यांना फटका बसला आहे, अशांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहोत. काहींना आम्ही आर्थिक मदत केली आहे, काहींना जीवनावश्यक धान्य, वस्तूंचीही मदत करण्यात आली आहे. ही मदत अपुरी आहे, याची आम्हांला कल्पना आहे. परंतु, आमच्याकडून जी काही मदत तातडीनं करणं शक्य आहे, ती आम्ही करीत आहोत. महामंडळाकडे येणारा निधी हा फक्त सदस्यांच्या निधी शुल्कामधून येतो. आमच्या संचालक मंडळानं सूत्र स्वीकारून आता चार वर्षं झाली आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही काटकसरीनं कारभार करीत कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे महामंडळाची स्वमालकीची कार्यालयं उभी केली. आमच्या सर्व कार्यालयांमधून सध्या मदत केली जात आहे.

कोरोनाचं हे संकट लवकर संपणारं नाही. त्यामुळे आपणा सर्वांना दीर्घकालीन लढाई लढावी लागणार आहे. परंतु, इतर काही व्यवसायांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सोयी-सुविधा, सवलती राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत, तशा त्या आपल्या मनोरंजन क्षेत्रालाही मिळाव्यात अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. या सर्वांनी आम्हांला राज्य सरकार मनोरंजन क्षेत्रातील सर्वांच्या पाठीशी आपले सरकार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे रेड झोनवगळता इतर ठिकाणी शूटिंग सुरू करून आपला व्यवसाय कसा पूर्वपदावर आणता येईल, याबद्दल आमची राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. या चर्चेतून लवकरच मार्ग निघेल, याची आम्हांला आशा आहे.

गेल्या महिन्याभरात महामंडळाशी संलग्न असलेल्या तसेच आर्थिक स्थिती चांगली असलेल्या बऱ्याच कलाकारांनी आम्हांला वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली आहे. मात्र या मदतीचं प्रमाण अजून वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे मान्यवर कलावंत-तंत्रज्ञांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांची घरची चूल पेटण्यासाठी मदत करावी, असं मी आवाहन करतो. आपलं मोठं नुकसान झालंय याची आम्हांला कल्पना आहे. परंतु, या संकटानंतरही आपण खचून गेलेलो नाही. या संकटावर आपण मात करणार याची आम्हांला खात्री आहे. फक्त आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या चित्रपट संघटनांशीही आपली बोलणी सुरू आहेत. त्यांच्याकडूनही आपल्याला मदत मिळते आहे. थोडक्यात ज्या ज्या ठिकाणहून मदत घेणं शक्य आहे, त्यांच्याशी आम्ही बोलतो आहोत.

मेघराजराजे भोसले

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया