अतिथी कट्टा

दिनांक : २६-१०-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌‘ट्रिपल सीट’ म्हणजे दिवाळीचा तिखट-गोड फराळ – अंकुश चौधरी



प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेला ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील या त्याच्यासोबत या चित्रपटात झळकल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानं अंकुशचं हे मनोगत.

——

ही गोष्ट जेव्हा माझ्यासमोर आली तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ती आपण मोठ्या पडद्यावर साकारायलाच हवी. त्यामुळे ही गोष्ट ऐकल्या ऐकल्या लगेचच मी होकार दिला. लेखक-दिग्दर्शक मंडळींचा हा पहिलाच चित्रपट असूनही मी गोष्टीच्या वेगळेपणासाठी होकार दिला. मी नेहमीच कोणताही चित्रपट करताना त्याच्या विषयाला प्राधान्य देतो. तीच गोष्ट यावेळीही मी केली. माझा नेहमीच पूर्ण कुटुंबाला आवडेल अशी गोष्ट देण्याचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न या चित्रपटाच्या लेखक-दिग्दर्शकांनी केलाय आणि आम्ही कलावंतांनी त्यांचे प्रयत्न पडद्यावर दिसायला चांगले वाटतील याची काळजी घेतली आहे. अगदी लहान मुलांपासून ते शंभरी पार केलेली मंडळीदेखील हा चित्रपट एन्जॉय करू शकतील, हे मी ठामपणे सांगू शकतो. बेंगलोरमध्ये घडलेली ही खरी गोष्ट आहे. ती आमच्या लेखकांच्या लक्षात आली. आपला प्रेक्षक सर्वाधिक महत्त्व देतो ते गोष्टीला. त्यामुळेच ही गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची मला पहिल्यापासूनच खात्री होती. दिवाळीचा सण हा आनंदाचा आहे. त्यामुळेच ऐन दिवाळीत आम्ही ही गोष्ट घेऊन प्रेक्षकांसमोर आलो आहोत. छानसा तिखट-गोड असा हा दिवाळीचा फराळ आहे. प्रवीण तरडेसारखे मोठमोठे फटाकेदेखील या चित्रपटातून फुटणार आहेत. दोन छान लवंग्यादेखील या चित्रपटात आहेत.

या चित्रपटाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांनी मनापासून हा चित्रपट केला आहे. डबल सीट हा माझा चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. त्यामुळे आता ट्रिपल सीटबद्दल काय घडेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. मात्र कथानकाच्या दृष्टीनं डबलसीटचा या चित्रपटाशी काहीच संबंध नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मराठी प्रेक्षकांना नातेसंबंधांवर आधारलेले चित्रपट आवडतात. तोच विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात मी कृष्णा ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे. तो खूप छान आहे. प्रामाणिक आहे. तो सगळ्यांशीच चांगला वागत असतो. तो सगळ्यांनाच सांभाळून घेत असतो. शब्दाला तो पक्का असतो. आजच्या काळात दिलेला शब्द पाळणं ही खूप दुर्मीळ गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीत कृष्णानं दिलेला शब्द पाळल्यामुळे त्याच्या आयुष्यात काय काय घडतं त्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट आहे. ही गोष्ट आम्ही चित्रीत केली ती अहमदनगरमध्ये. लेखक आणि निर्माते मंडळीदेखील तिकडचीच आहेत. खूप छान चित्रपट जमला आहे. त्याचं संगीत मस्त आहे.

– अंकुश चौधरी

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया