अतिथी कट्टा

दिनांक : २५-०४-२०२१

‘राजा’ दिग्दर्शक


मराठी चित्रपपटसृष्टीला समृद्ध दिग्दर्शकांची देणगी लाभली आहे. त्यापैकी प्रमुख दिग्दर्शक म्हणजे राजा परांजपे. २४ एप्रिल हा राजा परांजपेंचा जन्मदिन. त्यानिमित्तानं दिवंगत लेखक मधु पोतदार यांनी ‘तारांगण’ मासिकासाठी परांजपे यांच्या कारकीर्दीवर लिहिलेला हा लेख आम्ही प्रकाशित करीत आहोत.

——

महाराष्ट्रात तीन परांजप्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यातील पहिले रँग्लर र. पु. परांजपे. जगातले सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि फर्गसन कॉलेजचे गाजलेले प्राचार्य. दुसरे, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे- ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या जहाल व वक्रोक्तीपूर्ण भाषणांनी महाराष्ट्रात प्रबोधन केलं आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात प्रबोधन केलं आणि लेखक म्हणून महाराष्ट्र गाजवून टाकला आणि तिसरे, राजाभाऊ परांजपे- ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला. स्वत:च्या कर्तृत्वाने एक देदिप्यमान कालखंड निर्माण केला.

एक अग्रगण्य अष्टपैलू अभिनेता, असामान्य प्रतिभासंपन्न दिग्दर्शक आणि द्रष्टा निर्माता या नात्याने या ‘राजा’ने मराठी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवले.

इतकं महान कर्तृत्व करणार्‍या या माणसाचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं उपजतच वेड होतं. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थी दशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. राजाभाऊंनी पेटीवादनात प्रावीण्य मिळवलं. गणेशोत्सवात शाळा-कॉलेजच्या कार्यक्रमात आणि निरनिराळ्या क्लबमधून त्यांच्या पेटीवादनाचे कार्यक्रम होत. त्यांना प्रसिद्ध नाटक मंडळींच्या बिर्‍हाडी आमंत्रणे येऊ लागली. गंमत म्हणजे ती पेटीवादनाची नव्हती तर कॅरमच्या खेळातही ते पटाईत होते, चॅम्पियन होते, त्यासाठी होती. पण कॅरमच्या निमित्ताने नाटक कंपनीत शिरलेल्या राजाभाऊंच्या डोक्यात नाटक शिरलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला.

त्याकाळी ‘ग्लोब’, ‘आर्यन’ या थेटरात मूकपट दाखवले जात. मूकपट चालू असताना तो परिणामकारक व्हावा म्हणून तबलापेटीच्या सहाय्याने प्रसंगाला साजेसं पार्श्वसंगीत वाजवावे लागे. मूकपट व मोठ्या सिरियल्समुळे तबलापेटी वाजवणारे कंटाळून जात. नेमके अशावेळी तेथे राजाभाऊ जात आणि ‘तुम्ही पाय मोकळे करून या, तोवर मी बसतो तुमच्या जागी…’ म्हणत संगीताचा सारा बाज सांभाळत. पडद्यावरच्या नटांचा अभिनय बघत बघत त्यांच्याही मनात नट व्हायची इच्छा जोर धरू लागली. त्यांच्या पावलांना रंगभूमीची ओढ लागली. योगायोगाने याचवेळी त्यांनी शाळेच्या (नाईट स्कूल्स) संमेलनात ‘विश्ववैचित्र्य’ नावाच्या नाटकात पहिली विनोदी भूमिका केली. ती भूमिका इतकी अप्रतिम झाली की सगळ्या शाळेनं त्यांना डोक्यावर घेतलं. त्यांच्या भूमिकेचा बोलबोला झाला. पुण्याच्या काही नाटकमंडळींनी त्यांना बोलावून घेतलं. त्यातून काही विनोदी कामे त्यांनी केली आणि लवकरच ते ‘नाट्यमन्वंतर’ या गाजलेल्या संस्थेत दाखल झाले.

या संस्थेत ते केशवराव दात्यांच्या शिफारशीवरून आले खरे. पण त्यांना सुरुवातीला काम मिळाले ते ऑर्गन वाजवायचं. या संधीचाही त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. काही कविता-भावगीतांना चाली लावल्या. सुप्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस यांना ‘आंधळ्याची शाळा’ या नाटकातली बिंबाची भावगीतं बसवून दिली. संगीतात ते रमले खरे. पण मनातून वाट पहात होते नट म्हणून प्रेक्षकांपुढे यायची!

दैवयोगाने लवकरच ती संधी आली. कै. श्री. वि. वर्तक यांच्या ‘लपंडाव’ या नाटकात ‘वाटाणे’ ही महत्त्वाची भूमिका करणारा नट कंपनी सोडून गेला. हे काम कुणाला द्यावे अशा संभ्रमात असतानाच केशवराव दाते यांच्या मनात ते काम राजाभाऊंना द्यावे असे आले. भूमिका अवघड होती. पण अवधी होता. दात्यांनी दिवस-रात्र मेहनत करून तालमी घेतल्या. राजाभाऊंनीही अपार कष्ट घेऊन ती भूमिका इतकी उत्कृष्ट वठवली की एका रात्रीत राजाभाऊंना विनोदी नट म्हणून प्रसिद्धी मिळाली. पुढे ‘नाट्यमन्वंतर’ बंद पडल्यावर राजाभाऊ नाशिकच्या ‘गोदावरी सिनेटोन’मध्ये संगीत दिग्दर्शक कै. बापूराव केतकर यांचे सहायक म्हणून राहिले.

याच सुमारास कोल्हापूरला ‘शालिनी सिनेटोन’च्या नव्या ‘सावकारी पाश’ या चित्रपटाची तयारी बाबूराव पेंटर करत होते. त्यातल्या महतत्त्वाच्या भूमिकेसाठी केशवराव दात्यांची निवड झाली होती. त्यांनीच बाबुरावांना राजाभाऊंचं नाव सुचवलं आणि त्यावरून राजाभाऊंना सावकाराच्या उधळ्या मुलाची भूमिका मिळाली.

राजाभाऊंना व्यावसायिक रंगभूमीवर ज्या केशवराव दात्यांनी उभे केले त्याच दात्यांनी त्यांना पडद्यावर झळकवलं. ‘सावकारी पाश मधली त्यांची विनोदी भूमिका उत्तम झाली आणि विनोदी नट म्हणून त्यांचा खूप नावलौकिक झाला. त्यांना कामावर कामे मिळू लागली. त्यानंतर भालजी पेंढारकरांच्या ‘कान्होपात्रा’, ‘थोरातांची कमळा’, ‘सूनबाई’, ‘गोरखनाथ’ अशा अनेक चित्रपटातून त्यांना भूमिका मिळाल्या. लवकरच भालजींकडे ते सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. त्यावेळी भालजींकडे द. स. अंबपकर, परांडेकर, प्रभाकर मुजुमदार हे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते.

भालजींच्या सहवासात राजाभाऊंना अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे मिळाले. भालजींच्या चित्रणाची पद्धत म्हणजे आधी भरपूर तालमी घेणे, नटांना हालचाल व हावभाव कसे करावेत हे सांगणे असे होते. अभिनयातील सूक्ष्म बारकावे तसेच त्यातील लकबी ते नुसते समजावून सांगत नसत तर प्रत्यक्ष करून दाखवत. हे सारं राजाभाऊ बघत होते. भालजींच्या दिग्दर्शनाचा गुरुमंत्रच त्यांनी घेतला. पुढच्या काळात ‘नवयुग’मध्ये काम करताना तिथले दिग्दर्शक र. शं. जुन्नरकर त्याचप्रमाणे हिन्दीतील दिग्दर्शक नजम नकवी, शौरी दोलतानवी, शहीद लतीफ अशा दिग्दर्शकांबरोबर चित्रीकरण करण्याच्या काही क्लृप्त्या त्यांनी शिकून घेतल्या. त्यांच्याही दिग्दर्शनाचे सारे तंत्र आत्मसात करून हळूहळू अनुभन घेत राजाभाऊंनी दिग्दर्शक म्हणून आपले व्यक्तिमत्व समृद्ध केले.

राजाभाऊ दिग्दर्शक म्हणून तयार झाले आणि लवकरच म्हणजे 1948 साली त्यांना स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी मिळाली. शहा प्रॉडक्शनचा ‘बलिदान’ हा त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट. तो ‘दो कलियाँ’ या नावाने हिंदीतही निघाला होता. 1936 साली राजाभाऊ ‘सावकारी पाश’मध्ये नट म्हणून पडद्यावर आले आणि जवळजवळ एका तपाच्या खडतर तपश्चर्येनंतर 1948 साली दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा झळकले. पण यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांच्यावर मंगलाक्षता उधळल्या त्या ‘मंगल पिक्चर्स’च्या ‘जिवाचा सखा’ या रौप्यमहोत्सवी चित्रपटानं या चित्रपटाने मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाची मुहूर्तमेढ रोवली. या चित्रपटाच्यावेळी एकत्र आलेल्या राजाभाऊ परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रयीने मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दाखवला.

राजाभाऊंनी 1936 च्या ‘सावकारी पाश’पासून ते 1964 सालच्या ‘या सुखांनो या’ या चित्रपटापर्यंत 64 चित्रपटात अभिनय केला. तर 1948च्या ‘बलिदान’पासून ते 1969च्या ‘आधार’पर्यंत 27 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात ‘दो कलियाँ’, ‘चाचा चौधरी’, ‘बाप बेटे’ आणि ‘लव्ह अँड मर्डर’ हे चार हिंदी चित्रपट होते. दिग्दर्शनाच्या काळात राजाभाऊ चित्रपटात इतके रंगून जायचे की त्यांना दुसरा विषय त्यावेळी माहित नसायचा. रात्रंदिवस त्यांना चित्रपटाचा ध्यास असायचा.

सत्यजित रे यांनी बंगाली चित्रपटात जो नववास्तववाद आणला, अगदी त्याच धर्तीवर राजाभाऊंनी मराठीत ‘पुढचं पाऊल’, ‘उनपाऊस’, ‘देवघर’ असे काही कलात्मक चित्रपट देण्याचा धाडसी प्रयोग केला. चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जिद्द राजाभाऊंमध्ये होती. मा. विनायक यांनी निर्माण केलेली विनोदी चित्रपटांची अभिजात परंपरा राजाभाऊंनी ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘इन मिन साडेतीन’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘आधी कळस मग पाया’, ‘बायको माहेरी जाते’, ‘गुरुकिल्ली’- असे विनोदी चित्रपट देऊन यशस्वीपणे चालवली.

मा. विनायकांच्या विनोदी चित्रपटाचे घराणे खानदानी होते. ती परंपरा राजाभाऊंनी जपली. मा. विनायक व राजाभाऊ यांच्यात खूप साम्य होतं. दोघांनाही विनोदाची चांगली जाण होती. दोघंही संगीत चांगलं जाणत. दोघंही कुशल नट व कुशल दिग्दर्शक होते. तरीही राजाभाऊ हे ‘भालजी स्कूल’चेच दिग्दर्शक होते!

‘पाठलाग’सारख्या चित्रपटातून त्यांनी मराठीत रहस्यमय चित्रपटांना एक नवीन दिशा दिली. राजाभाऊंच्या बहुतेक चित्रपटांच्या पटकथा ग. दि. माडगूळकरांनी लिहिल्या होत्या. पटकथा लिहितांना माडगूळकर अनेक बारीकसारीक तपशील बाजूला लिहून ठेवत. तो दिग्दर्शकला मार्गदर्शक ठरे. यावरून प्रसिद्ध चित्रपट लेखक-समीक्षक इसाक मुजावर यांनी एकदा माडगूळकरांना विचारलं, ‘तुमच्या पटकथेतल्या बारीकसारीक तपशीलावरून दिग्दर्शकाचे काम सोपे होते तर मग तुमच्याच कथेवरून दिग्दर्शित केलेल्या इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटांना राजाभाऊंच्या चित्रपटाची उंची का गाठता आली नाही?’

यावर माडगूळकर म्हणाले होते, ‘सोने कितीही बानवकशी असले तरी ते बावनकशी आहे हे ठरविण्यासाठी त्याला परिसाचा स्पर्श हवा असतो. राजाभाऊंच्या दिग्दर्शनात हा परिसाचा स्पर्श होता. त्यामुळे माझ्या कथेवरील त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट खर्‍या अर्थाने बावनकशी ठरले!’

बंगाली चित्रपटांचा कलात्मक दर्जा उंचावणारा सत्यजित रे यांच्यासारखा कल्पक दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीत का निर्माण होऊ नये? असा वाद निर्माण झाला होता, त्यावर शांतारामबापूंनी ठणकावून सांगितले होते, ‘मराठी चित्रपटांचा कलात्मक दर्जा उंचावायचा असेल तर मराठीला आज सत्यजित रेंची नव्हे तर राजाभाऊ परांजपेंची आवश्यकता आहे!’

राजाभाऊंकडे कुशल दिग्दर्शनाप्रमाणेच वेधक आणि शोधक दृष्टी होती. म्हणूनच त्यांनी राजा गोसावी, शरद तळवलकर, सीमा, रमेश देव, डॉ. काशिनाथ घाणेकर आणि सचिन पिळगावकर यांच्यासारखे पुढे महान झालेले कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला दिले. जवळजवळ अडीच तपे राजाभाऊंनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. शंकराचार्यांनी त्यांना ‘चित्रपटसम्राट’ हा किताब बहाल केला होता. त्यांच्या ‘पाठलाग’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘जगाच्या पाठीवर’ आणि ‘काका मला वाचवा’ या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले होते. तर ‘पाठलाग’ आणि ‘हा माझा मार्ग एकला’ या दोन चित्रपटांना राष्ट्रपतींचे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पदक मिळाले होते. या व्यतिरिक्त कलावंत म्हणूनही ते अनेक बहुमानांनी सन्मानित झाले होते. राजाभाऊंचे अजरामर चित्रपट पुढच्या पिढीला त्यांच्या कल्पकतेची आणि प्रतिभेची वर्षानुवर्ष साक्ष पटविल्याखेरीज राहणार नाहीत!

– मधू पोतदार

(सौजन्य – तारांगण मासिक)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया