अतिथी कट्टा

दिनांक : १३-०६-२०२१

आचार्य अत्रे – साहित्याचार्यमराठीतले नावाजलेले लेखक,कवी,नाटककार,पत्रकार,मराठी व हिंदी चित्रपट निर्माते,शिक्षणतज्ञ,राजकारणी व वक्ते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे उर्फ प्रल्हाद केशव अत्रे.यांचा जन्म १३ ऑगस्ट,१८९८ चा.आपण आयुष्यात कधी काळी विनोदी लेखक वा वक्ता म्हणून मान्यता मिळवू याची कल्पना त्यांना सुरुवातीला मुळीच नव्हती. पण लहानपणापासून त्यांना विनोदभाव मनापासून प्रिय होता.त्यांचं मन खिडकी उघडी दिसली की जसं मांजर डोकावतं तसं जीवनात डोकावून भोवतालच्या जगातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी नेमक्या हुडकून काढी.

——

लहानपणी शाळेत असताना प्लेगची साथ आली.तेव्हा मारकुट्या मास्तरांपासून सुटका मिळण्याचा व शाळेला सुट्टी मिळण्याचा एक मार्ग त्यांनी शोधून काढला.त्यांचे वडील म्युनिसिपालटीचे सेक्रेटरी होते.त्यामुळे त्यांच्या अंगणात उंदीर पकडण्याचे पिंजरे असायचे.एकदा पिंजऱ्यात उंदीर सापडला तेव्हा त्यांनी नदीवर जाऊन तो पिंजरा पाण्यात बुडवला अन मेलेला उंदीर शाळेच्या वर्गात सांदीफटीत ठेऊन दिला.दोन दिवसांनी उंदीर कुजून घाण वास सुटला अन हेडमास्तरांनी प्लेगची साथ असताना मेलेला उंदीर सापडला म्हणून एक महिना शाळेला सुट्टी दिली.

विनोदाचा हेतू केवळ मनोरंजन किंवा करमणूक नसून समाजातील दोष,अन्याय, ढोंग,भंपकपणा यांना हास्यास्पद ठरविणे हा आहे.यासाठी त्यांनी आपल्या विनोदी नाटकातून,साहित्यातून,वृत्तपत्रातून,भाषणातून विनोदाचा पुरेपूर उपयोग केला. हजरजबाबीपणा,चातुर्य,विनोद अशा गुणांच्या बाबतीत ते प्रसिद्ध होते.सामान्य माणसाला समजेल अशी उदाहरणे सोप्या भाषेत आपल्या विनोदी,चुरचुरीत शैलीत सांगणे हे त्यांच्या लिखाणाचे तसेच वक्तृत्वाचे वैशिष्टय होते.

कॉंग्रेस नेते विठ्ठलराव गाडगीळ एकदा म्हणाले होते, “ अत्रे बोलताना कधी कधी अतिशयोक्ती करतात.” तेव्हा अत्रे म्हणाले, “ मी जीवनात जे पाहतो,तेच बोलतो.आता
विठ्ठलराव गाडगीळ हे काकासाहेबांचे चिरंजीव आहेत ही काय अतिशयोक्ती झाली?” तसेच ढमढेरे आडनाव ऐकताच म्हणाले, “ ज्याच्या नावात दोन ढ आणि एक मढे आहे ते काय आडनाव आहे?” अशी बोचणारी भाषा असूनही एस.एम.जोशींबद्दल गुणगौरव करताना तीच भाषा मृदू होत असे.एस.एम.म्हणजे सौजन्य आणि माणुसकी,एस.एम. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र अशा प्रकारे.

“ विधानसभेत सरकारला कोंडीत पकडता खरे,पण अत्रे तुम्ही सरकारच्या संख्याबळापुढे एकटे कसे पुरणार?” असा त्यांना प्रश्न विचारला.तेव्हा त्यांनी एका शेतकऱ्याला विचारले,


“तुम्ही किती कोंबड्या पाळता?”

“शंभर एक तरी कोंबड्या आहेत.” तो म्हणाला.

“कोंबडे किती पाळता?” अत्रे म्हणाले.

“एकच.” शेतकरी म्हणाला.

तेव्हा अत्रे म्हणाले, “ एकटा कोंबडा पुरतो ना?” तसेच राष्ट्रपती गिरी यांचे आठ मुलांसह एक छायाचित्र वर्तमानात प्रसिद्ध झाले.तेव्हा त्यांनी शीर्षक दिले, “गिरी आणि त्यांची कामगिरी”.
एकदा अत्रे रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांच्या विरोधकाने त्यांना विचारले,“आज काय पायी?गाडी विकली की काय?” तेव्हा ते हसून म्हणाले, “काय हो, आज तुम्ही एकटेच कसे? वहिनी कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय?”

शनिवार वाड्याच्या सभेत वक्ता म्हणून बोलत असताना त्यांचे अधिक भाषण ऐकण्याच्या उत्सुकतेने श्रोता वर्ग गलका करू लागला की,अजून बोला.तेव्हा शांतपणे
घड्याळाकडे पाहात ते म्हणाले, “आता रात्रीचे बारा वाजत आले आहेत.जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे.” तेव्हा श्रोते वर्गात हास्यकल्लोळ झाला.
पु.ल.देशपांडे आचार्य अत्रेंबद्दल म्हणत, “त्यांच्या खिशालाही चोरकप्पे नाहीत अन मनालाही.त्यांच्या जीवनाचे अनुभव ठणाणा करून त्यांच्याजवळ येतात आणि ठणाणा करत त्यांच्या लेखणीतून बाहेर पडतात.त्यांनी लेखणीला केवळ वीणावादिनी सरस्वतीच केली नाही तर उग्र चामुंडीही केली आहे.”
पंडितांची पगडी हलावी आणि सामान्यांचं अंत:करण हलावं या दोन्ही गोष्टींचा तोल अत्र्यांमध्ये होता.मोंटेसरीबाईंची पद्धत कधी वापरावी अन छडी कधी हातात घ्यावी या दोन्हींचं तारतम्य त्यांना होतं.म्हणूनच “जग काय म्हणेल?,ब्रह्मचारी,कवडीचुंबक, तो मी नव्हेच,बुवा तिथे बाया,भ्रमाचा भोपळा,मोरूची मावशी,लग्नाची बेडी,साष्टांग नमस्कार” अशा अनेक विनोदी नाटकांतून त्यांनी समाजातील अंधविश्वासावर,दोषांवर प्रहार केले. नाटकांतून विडंबनात्मक अजरामर पात्रे निर्माण केली.तसेच “ब्रह्मचारी, ब्रांडीची बाटली” अशा चित्रपटांमुळे खळबळजनक इतिहास निर्माण केला.त्याचवेळी एखादा साक्षात्कार व्हावा असा अत्र्यांमधील विडंबनकार जागा झाला आणि “झेंडूची फुले” या विडंबन काव्याची निर्मिती झाली.आचार्य अत्रे यांनी मराठी साहित्यात ‘विडंबन काव्य’ हा प्रकार आणला आणि नंतर रूढार्थाने समाजाला मान्य झाले की,विडंबन हा टीकेचा अत्यंत प्रभावी प्रकार आहे.श्री रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोक’ या काव्याबद्दल
अत्यंत आदर असूनही त्यांनी रामदासी कृतीचे विडंबन केले.


“ मना नीट पंथे कधीही न जावे

नशापाणी केल्याप्रमाणे चालावे ”

आपले आत्मचरित्र ‘कऱ्हेचे पाणी’ हे आचार्यांनी दहा खंडात लिहिलेले आहे.त्यापूर्वी त्यांनी आपली जडणघडण उलगडून दाखविणारे ‘मी कसा झालो’ हे झकास पुस्तक लिहिले.‘मुर्खांचा बाजार’ हे मस्त छोटेखानी पुस्तक लिहून मराठी माणसाला खळखळून हसायला शिकविले.गेल्या दहा हजार वर्षांत असे झाले नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत असे होणार नाही हा त्यांचा बहुप्रिय वाकप्रचारसुद्धा त्यांच्या भव्योत्कट मानसिकतेचाच आविष्कार असल्याचे आपणास दिसून येते.मुलांकरिता त्यांनी गुरुदक्षिणासारखे सहज सुंदर नाटक लिहिले.

मराठी रंगभूमी जेव्हा हिंदी चित्रपटाच्या प्रचंड आक्रमणामुळे अखेरच्या घटका मोजू लागलेली होती तेव्हा आचार्य अत्रे यांनी केवळ आपल्या लेखणीच्या बळावर पुन्हा मराठी प्रेक्षक आणि अमराठी प्रेक्षकसुद्धा नाट्यगृहाकडे वळविला.या त्यांच्या ऐतिहासिक नाट्यकार्याबद्दल मराठी रंगभूमी त्यांची सदैव ऋणी आहे.त्यांची नाट्यसंपदाही मराठी भाषेची आणि साहित्याची जितीजागती समृद्धी आहे.रंगभूमीवरचा अत्रे लेखनाचा आणि अत्रे थिएटरचा ठसा आणि श्यामची आई,महात्मा फुले या त्यांच्या चित्रकृती अजरामर आहेत.

त्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून जे मराठीपण अखंड पाझरत राहिले ते त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातूनच प्रस्फुरित झालेले होते.संत साहित्याचा त्यांना मनस्वी लळा होता.तुकोबांची संपूर्ण गाथा त्यांना मुखोद्गत होती.त्यांचा उपदेश ते मनोमन जगले.
भले तरी देऊ कासेची लंगोटी/नाठाळाचे माथी हाणू काठी l हे जशास तसे असे तत्वज्ञान त्या संतश्रेष्ठांने सांगितले तेच आचार्यांनी पत्रकार म्हणून आचरणात आणले.
मराठी साहित्यात त्यांनी एक ‘नवयुग’चं आणले.एकूणच आचार्य अत्रे या महापुरुषाने महाराष्ट्र संस्कृती श्रीमंत केली.आणि मराठीपण माथी मिरविण्यात धन्यता मानली.

आचार्य अत्रे यांचा मूळचा पेशा शिक्षकाचा.पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे ते मुख्याध्यापक होते.मुलांचा मानसशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला होता.१९३५ ला मुलांसाठी त्यांनी ‘नवयुग वाचनमाला’ ही अद्यावत शैक्षणिक पुस्तके तयार केली होती.मुलांसाठी विनोदी गोष्टी लिहिल्या.शिक्षणशास्त्राच्या अभ्यासासाठी अत्रे लंडनला गेले असताना बर्नोड शा,नोएल कोवर्ड या प्रख्यात नाटककारांच्या विनोदाचा त्यांना परिचय झाला.विनोदप्रचूर भाषणे ऐकायला मिळाली आणि अधिक प्रखर विनोदबुद्धी घेऊन ते भारतात परतले.चित्रपट निर्मितीसाठी नवयुग चित्रपट लिमिटेड ही सहकारी तत्वाची संस्था काढली तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी १९५६ मध्ये ‘मराठा’ हे दैनिक सुरु केले.

भारताला स्वातंत्र्य मिळाले.पण पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला तेव्हा कॉंग्रेसचे एक पुढारी फाळणीचे समर्थन करत म्हणाले, “फाळणी हा जीनांचा पराभव आहे.त्यांना सबंध पंजाब आणि सबंध बंगाल हवा होता.तो कुठे मिळाला?” या हास्यास्पद वक्तव्यावर अत्रे म्हणाले,“म्हणजे तुमचा प्राण घ्यायला आलेल्या चोराने जर तुमचे नाक कापले तर तुम्ही म्हणाल की कशी चोराची फजिती झाली.माझ्या मुंडक्याऐवजी त्याला माझे फक्त नाकच कापायला मिळाले.” आचार्य अत्रे यांना त्यांचे चाहते अनेक वेळा विचारत असत, “तुम्हाला संत वाड्ग्मयापासून विज्ञानापर्यंत सगळंच कसं समजतं?” या प्रश्नाचे उत्तर अत्रे यांनी त्यांच्या ‘मी कोण आहे’ या आत्मचरित्रातून खूप छान दिले आहे.अत्रे म्हणतात, “ लहान मूल शाळेत जसं रमत गमत जातं,तसंच मी आयुष्यातून रमत गमत चाललो आहे.वाटेत फूल दिसलं,त्यावर कविता कर,मुल दिसलं त्याला गोष्ट सांग.उदास चेहऱ्याचा माणूस भेटला,त्याला हसव,दु:खी स्त्री दिसली,तिच्या जीवनावर नाटक रच.गर्दी दिसली तिच्यापुढे व्याख्यान दे.महापुरुष भेटला,त्याचा जयजयकार कर.आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञासा आहे.सारे आपल्याला दिसले पाहिजे,समजले पाहिजे आणि आले पाहिजे असं मला वाटतं.”

“भारतात जन्माला येणे दुर्लभ असेल तर महाराष्ट्रात जन्माला येणे दुर्लभतर आहे”
असे अत्रे म्हणत.आचार्य अत्रे म्हणजे शंभर नंबरी मऱ्हाटी बाणाच.आचार्य अत्रे यांच्या या भव्यदिव्यतेचे वर्णन करत असताना पु.ल.देशपांडे एकदा म्हणाले होते की, “आपली सारीच गणिते सामान्यत: बे एके बे अशी असतात.पण आचार्य अत्रे यांची गणिते मात्र शंभर एके शंभर आणि शंभर दोन्ही दोनशे अशीच असत.खिशात साधा छदाम नसतानाही या माणसाने लाखो रुपयांचे व्यवहार केले आणि ते यशस्वी करून दाखविले.”

उद्याची काळजी न करता हा महापुरुष आला क्षण समाजाच्या सुखासाठी जगत जगत पुढे चालत राहिला.आपल्या मराठीपणाचा जाज्वल्य अभिमान त्याने आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत बाळगला. “मराठा” दैनिकाचा खप त्याकाळी एक लाखाच्या वर नेला.लाखाच्या घरात खपणारे मराठीतील पहिले दैनिक याच माणसाचे आणि पहिले राष्ट्रपतीपदक मराठीत खेचून आणण्याचा भीमपराक्रमही अत्रे या दोन अक्षरांचाच,याचे कारणही भव्यतेचे आणि दिव्यतेचे मनस्वी आकर्षण हेच होय.दिल्लीश्वरांनी संयुक्त महाराष्ट्र देण्याचे ठरवले तेव्हा नवीन राज्याचे नांव ‘मुंबई’ ठेवावे असे काहींनी सुचवले.पण अत्र्यांच्या हट्टामुळे ‘महाराष्ट्र’ हे नांव मिळाले.अत्रेंचे वक्तव्य घणाघाती,उत्स्फुर्त अन हजरजबाबी होते.तसेच पहाडासारख्या भव्य व्यक्तिमत्वाची अन बुलंद खणखणीत आवाजाची साथ त्यांना लाभली होती.अत्र्यांनी गर्दीला झुलवलं,भुलवलं. गर्दीच्या टाळ्यांच्या बेहोश करणाऱ्या नशेत ते जगले. त्यांच्या मुलुखमैदानी तोफेने मराठी मुलखाला जागं केलं.त्यांनी लेखणीची-वाणीची बत्ती दाखवली अन जनक्षोभाचा वणवा धडाडून पेटला.इतिहास घडला.मुंबईवर मराठीचा झेंडा फडकला.महाराष्ट्रात सुधारणेचं वारं आलं.स्त्री-पुरुष पाश्चात्य पेहराव वापरू लागले. खाण्यापिण्यात मोकळेपणा आला.मुली शिकून नोकऱ्या करू लागल्या.सोवळ्या-ओवळ्याची कल्पना कमी होऊन धार्मिक अवडंबर ओसरू लागलं.खणखणीत आवाज,जळजळीत लेखणी, वाघाच्या नखासारखी विनोदबुद्धी, नि:शंक आत्मविश्वास,आक्रमक व लढावू वृत्ती आणि वादातून तावून-सुलाखून बाहेर पडलेलं हे व्यक्तिमत्व.आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात,“ आयुष्यात मी काय वाटेल ते केलं,पण ढोंग केलं नाही.समाजाच्या बहिरंगात अन अंतरंगात केवढी फारकत आहे हे सत्य जाणण्याचे व सांगण्याचे धैर्य दाखविण्याचा मी प्रयत्न केला.” त्यांना विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अत्र्यांना पुरस्कारांची फुटपट्टी लावणेच अयोग्य आहे कारण ते प्रत्येक माणसाच्या मनात रुजलेले आहेत. नंतर आचार्य अत्रेंच्या नावानेच अनेक संस्थांनी पुरस्कार द्यायला सुरुवात केली हाच त्यांचा फार मोठा सन्मान आहे. असे हे प्रभावी व्यक्तिमत्व १३ जून १९६९ रोजी अंतर्धान पावले.

“ अंतरी निर्मळ,वाचेचा रसाळ

त्याच्या गळा माळ,असो नसो ”


हे तुकोबारायांचे वर्णन सार्थ ठरविणारे होते आचार्य अत्रे.

– जयश्री जयशंकर दानवे,कोल्हापूर

ज्येष्ठ लेखिका

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया