अतिथी कट्टा

दिनांक : १९-०७-२०२२

श्रीदेवी ही माझी आयडॉल…


प्रसिद्ध नृत्यांगना, अभिनेत्री माधुरी पवार ही सध्या चर्चेत आहे ते ‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळे. हा अनुभव तसेच आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात तिचं हे मनोगत.

——–

‘रानबाजार’मध्ये मी एक राजकारणी स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली. ‘प्रेरणा साने’ असं या व्यक्तिरेखेचं नाव. तिला व्यक्तिमत्त्वाला खूप वेगवेगळ्या छटा आहेत. तिचे वेगवेगळे लुक्स तुम्हाला यात पाहायला मिळालेत. ही वेब सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षक मला ओळखूच शकले नाहीत. या वेब सीरिजमुळे माझी इमेज बदलण्यास मदत होणार आहे. नृत्यासाठी पॅशनेट असणारी एक मुलगी, मालिकांमध्ये काम करणारी मुलगी आणि आता एक वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारी एक मुलगी हा माझा प्रवास आहे. या प्रवासात मला या वेब सीरिजचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या रूपातून एक देवदूत मिळाला. या व्यक्तिरेखेसाठी त्यांनी अक्षरशः मला शोधून आणलं. या वेब सीरिजसाठी पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांनी सुरुवातीला माझ्याबरोबर बसून साधारण तासभर तरी गप्पा मारल्या. त्या झाल्यानंतर त्यांनी प्रेरणा सानेच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगून मला ही भूमिका साकारण्यास सांगितलं. मी आतापर्यंत मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका तसेच डॅशिंग भूमिका केल्या आहेत. परंतु, राजकारणातील स्त्री कधी मी साकारली नव्हती. त्यामुळे मी ही व्यक्तिरेखा साकारू शकेन का, अशी माझ्या मनात शंका होती. परंतु, पानसेंनी ती दूर केली. ही भूमिका तुझ्याकडून करून घेण्याची जबाबदारी माझी, असं सांगून त्यांनी माझ्यावरचं दडपण कमी केलं. आता प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येत पाहून ते पाहून त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो खरा ठरला असंच मी म्हणेन. मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या राजकारण हा विषय आवडत नाही. समाजकारण मला आवडतं. तसेच राजकारणाशी माझा कधी संबंधही आलेला नाही. या वेबसीरिजमुळे मला राजकारणातले बारकावे शोधावे लागले. राजकारणात उतरावं लागलं. दिवसातले 12-12 तास मी राजकारणाचा अभ्यास केला. राजकीय कुटुंबातील महिलांचं जीवन अभ्यासलं. त्यांच्या वेगवेगळ्या लकबी न्याहाळल्या. त्यांच्या बोलण्यातल्या आत्मविश्वास आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. हे शिकत असताना काही गोष्टी या मूलतःच माझ्या अंगात असल्याचं मला जाणवलं. माझ्या सहकलाकारांकडून मला खूप काही शिकायला मिळालं. सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे हे सगळे ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यामुळे या शूटिंगदरम्यानचा प्रत्येक मिनीट हा माझ्या शिकण्यात गेलाय. मोहन आगाशेंबरोबर काम करीत असताना मला आपण ‘जैत रे जैत’ हा चित्रपटच पाहतोय की काय असं वाटलं. पण ‘फ्लॅशबॅक’मधून बाहेर आले तेव्हा लक्षात आलं की आपण प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करतोय, ही भावना खूप आनंद देणारी होती. तसेच एवढ्या मोठ्या कलाकाराच्या शेजारी जाऊन आपण उभं राहणं आणि त्याच्यासोबत परफॉर्म करणं याचं दडपणदेखील असतं. परंतु, त्यांच्याकडून मला खूप प्रोत्साहन मिळालं. ते मला नेहमी ‘सुंदरी’ म्हणायचे. माझ्या आतापर्यंतच्या भूमिका आणि प्रेरणा साने या नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझ्यातली वेगळी माधुरी प्रेक्षकांना पाहायला मिळालीय.

प्रेक्षकांनी माझ्या नृत्याला सुरुवातीपासूनच दाद दिलीय. ती गोष्ट मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे नृत्य हे मी आयुष्यभर करतच राहणार आहे. भविष्यात मी चित्रपट, मालिका नक्कीच करणार आहे. परंतु प्रेक्षकांबरोबरची ‘कनेक्टिव्हिटी’देखील तितकीच महत्त्वाची आहे. मातीचा सुगंध मला खूप आवडतो. पण त्यासाठी गावागावात जावं लागतं. लोकांना भेटावं लागतं. काही मोठे प्रोजेक्ट्स मला आता ऑफर झालेत. दोन चांगले चित्रपट मी नुकतेच पूर्ण केले आहेत. ‘मुक्ता आर्टस्’ची ‘लंडन मिसळ’ ही फिल्म मी नुकतीच स्वीकारली आहे. वेगवेगळ्या भूमिका मला करायच्या आहेत. प्रेक्षकांसाठी मी नृत्याची बिजली आहेच. पण अभिनयाचा वणवा पेटवल्याशिवाय मला जायचं नाहीय. अभिनयात श्रीदेवी या माझ्या आयडॉल आहेत. अभिनेत्री, सेलिब्रिटी, नृत्यांगना… त्या सर्वच काही होत्या. पण त्यांना भेटण्याचं माझं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. त्यांच्यासारखं चांगलं काम मला करायचं आहे. मला मनोरंजन क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नाही. माझी आई गृहिणी आहे, माझे पप्पा त्यांच्या कामात व्यग्र आहेत. मला एक छोटा भाऊ आणि बहीणदेखील आहे. माझ्या पप्पांना नृत्याची खूप आवड. त्यामुळेच ती आवड माझ्यातही उतरलीय. शालेय पातळीवरील लेखन, भाषण अशा सर्व स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायचे आणि त्यात मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळायचे. अभ्यासातही मला चांगले मार्क्स मिळायचे. अभिनय हे माझ्यात नैसर्गिकरित्या आली आहे. ती दैवी देणगी आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रातील होतकरू मुला-मुलींना फक्त कष्ट घेणं आवश्यक आहे. हल्ली प्रत्येकाला वाटतं की मी 15 किंवा 30 सेकंदात सेलिब्रिटी होऊ शकते. पण असं नाहीय. तुम्हाला खूप स्ट्रगल करावा लागेल. कष्ट करा. तुमच्यातल्या टॅलेण्टला पुढं येऊ द्या. मग यश तुमचंच आहे.

– माधुरी पवार

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया