अतिथी कट्टा

दिनांक : ३१-०७-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌पारिजातकाचं फूल
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा ९१ वा वाढदिवस. त्यानिमित्तानं सुलोचनादीदी यांच्यावर दिवंगत लेखक-पत्रकार वसंत भालेकर यांनी लिहिलेल्या ‘सुलोचना’ या पुस्तकामधील थोडा भाग आम्ही संपादित रूपात प्रकाशित करीत आहोत.

——

पारिजातकाची फुलं ! अत्यंत नाजूक कोमल नि तितकीच सुगंधी. तांबूस देठाची, पांढऱ्याशुभ्र रंगाची. सारखं पाहत राहावं त्या ताज्या टवटवीत फुलांकडे. त्यात सौंदर्य आहे, गंध आहे, मृदुता आहे आणि त्यात आगळीच सात्विकता आहे; पावित्र्य आहे, मांगल्य आहे. ओंजळीत भरून घ्यावी नि भावमनानं देवला वाहावीत अशीच पवित्र भावना निर्माण होते ती दृष्टीस पडली की आपल्या तेजानं, सुगंधाने वातावरण भारावून टाकतात, पवित्र करतात. सुगंधी करून टाकतात ती! डोळ्यानीच ती आनंद देतात, नाकाला सुवास देतात नि चित्तवृत्ती फुलवून टाकतात. पण तरीही त्यांत मादकता औषधालाही सापडत नाही.

सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सुलोचना यांना पाहिलं की मला चटकन स्मरण होतं ते या पारिजातकाच्या फुलाचं. त्या टवटवीत सुगंधी पुष्पात नि सुलोचनाबाईंच्या सदासतेज चेहऱ्यात खूपच साम्य आहे. बांधेसूद शरीरसंपदा, तेजस्वी भावपूर्ण डोळे, सरळ धारधार नासिका, मुखावर सदैव विलसत असलेलं निर्व्याज हास्य, मोत्याप्रमाणं चमकणाऱ्या त्या शुभ दंतपंक्ती; असं हे गोड, चंद्रप्रकाशाप्रमाणं शांत, शीतल सौंदर्य असलेल्या सुलोचनाबाईंकडे पाहिलं, शुभ्र वस्त्र ल्यालेली त्यांची ती शालीन प्रसन्न मूर्ती बघितली की आगळंच समाधान लाभतं. विजेच्या झगझगाटानं क्षणभर डोळे दिपतात खरे. पण नंदादीपातील पावित्र्य नि सौम्यता काही निराळीच असते. विजेच्या प्रकाशनं दिपतात फक्त डोळे पण अंतःकरण उजळून टाकतो नंदादीपच! मंदिरात व देवघरात मानाचं स्थान मिळतं ते या नंदादीपालाच ! आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने, भावपूर्ण अभिनयानं नि सालस, प्रेमळ वागणुकीने बाईंनी चित्रसृष्टीत हे नंदादीपाचं स्थान निश्चित पटकावलं आहे. !

गेली अनेक वर्षे त्या या चंदेरी दुनियेत वावरत आहेत. या दीर्घ कालावधीत येथे अनेक कलावंत आले. काही काळ प्रखर तेजानं तळपले आणि तितक्याच वेगानं लुप्त झाले. त्यांची जागा मग नव्या कलावंतांनी घेतली. अनंत घडामोडी घडल्या या दोन तपाच्या कालावधीत ; पण सुलोचनाबाईंच्या स्थानाला मात्र कधीच धक्का पोहोचला नाही. त्यांनी आपलं स्थान ढळू दिलं नाही. प्रफुल्ल पिक्चर्सच्या श्री. वसंतराव जोगळेकर दिग्दर्शित ‘चिमुकला संसार’ या चित्रात एक छोटीशी भूमिका करून १९४३ साली त्यांनी आपल्या कलाजीवनाला शुभारंभ केला नि कोल्हापूरच्या परिसरात श्री. भालजी पेंढारकर यांच्या करड्या नजरेखाली त्यांचे कला जीवन कलेकलेने विकसित होत गेलं. ते पूर्णत्वाला पोहोचलं.

मा. विनायक यांच्याकडे काहीतरी शिकायला मिळेल या अपेक्षेनं कोल्हापूर गाठणाऱ्या सुलोचनाबाई जेव्हा नाराज, निराश, हताश होऊन हातपाय गाळू लागल्या होत्या, पुनः आपल्या खेड्याकडे जाऊन चारचौघींसारखं संसारी जीवन जगण्याचे बेत रुचू लागल्या होत्या तेव्हा श्री. भालजी पेंढारकर यांनीच त्यांना आधार दिला. धीर दिला. सतत प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. अक्षरशः नावासह नवी सुलोचना आकाराला आणली त्यांनीच. या हिऱ्याला कौशल्यानं व मेहनतीनं पैलू पाडून त्याची प्रभा दशदिशांना अधिक प्रखर तेजानं फाकविण्याच अवघड काम केलं ते कोल्हापूरच्या या चतुर, अनुभव संपन्न किमायागारानंच. भालजींचं हे ऋण भारतीय चित्रसृष्टी कदापी विसरणार नाही. सुलोचनासारखा एक अजोड कलावंत त्यांनी उदयास आणला. चित्रसृष्टीला सुलोचनाच्या रुपानं त्यांनी एक अनमोल भेट दिली आहे.

श्री. भालजी पेंढारकर यांच्याकडेही त्यांनी काही दिवस उमेदवारी केली. महारथी कर्ण, वाल्मिकी यासारख्या पौराणिक चित्रपटांतून त्यांनी नगण्य अशा छोट्या छोट्या भूमिका केल्या. पण १९४५ साली पडद्यावर आलेल्या प्रभाकर चित्राच्या ‘सासुरवास’ नं त्यांना नव्याच स्वरुपात पडद्यावर आणलं. अगदी नव्या ‘सुलोचना’ या त्यांच्या विशाल भावपूर्ण डोळ्यांना शोभणाऱ्या गोंडस नावानिशी ! या चित्रात त्या लोकांच्या डोळ्यात भरल्या. त्यांचं विलोभनीय व्यक्तिमत्व त्यांच्या मनात ठसलं आणि येथूनच त्यांच्या कलाजीवनाला वेगळी कलाटणी मिळाली.

संदर्भ – सुलोचना (पुस्तकाचे नाव)

लेखक – वसंत भालेकर

प्रकाशक – परचुरे प्रकाशन मंदिर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया