अतिथी कट्टा

दिनांक : १७-१०-२०२०

तेजस्विनी…



दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त लेखिका जयश्री दानवे यांच्या “कलानिधी’ पुस्तकामधील स्मिता पाटील यांच्यावरील एक लेख आम्ही संपादित स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत.

——

भारतीय रजतपटावरील एक स्मित… खरंखुरं तेजस्वी व्यक्तित्व स्मिता पाटील. प्रकाशाचा छोटासा कवडसा एकदम आपल्या उजेडानं व्यापणारा तेजोगोल व्हावा तसा एक चमत्कार म्हणजे स्मिता पाटील. मराठी-हिंदी चित्रपटातील नायिकेच्या व्यक्तिरेखेला अभिनयाचं एक वेगळंच परिमाण देणारी स्मिता पाटील. अभिनयातील वास्तवाच्या पाकळ्या न् पाकळ्या फुलवणारे एक उग्रगंधी रानफूल म्हणजे स्मिता पाटील. सूर्योदयाच्यावेळी कमलपत्रावरून दवांचा एक बिंदू चमकावा आणि घरंगळावा एवढा सहज नाजूक अभिनय करणारी स्मिता पाटील.

घरचं वातावरण, आजूबाजूचं वातावरण, राष्ट्रसेवादलाचे संस्कार अशा वातावरणात सिनेमावर गप्पा तर सोडाच पण रेडिओ सिलोन, विविध भारतीवरील गाणीसुद्धा कधी वाजली नव्हती आणि योगायोग पाहा या घरातून त्या घरात पाऊल टाकावं इतक्या सहजतेने स्मिता रुपेरी पडद्यावर आली. एक सावळी मुलगी चित्रपटसृष्टीत आली, मुरब्बी तारकांना मागे सारून चर्चेचा विषय झाली अन् अभिनयाचे सर्वोच्च सन्मान पटकावून बसली. अल्पावधीत उत्तुंग यश मिळवणारी कारकीर्द तिच्या वाट्याला आली.

शिवाजीराव पाटलांची ही सुविद्य मुलगी. आई नर्स असल्याने दलित, पीडित, श्रमिक लोकांविषयींचा आपलेपणा तिच्या हृदयात पाझरला. सेवादलाच्या शिबिरातून सर्व तऱ्हेच्या लोकांतून मिसळण्याची आवड आणि धीटपणा लहानपणीच तिच्यात निर्माण झाला. तिला शाळेत टकांतून काम करण्याची हौस, पण ती सिनेमात जाईल ही कल्पना तिच्या कुटुंबाच्याच नव्हे तर तिच्याही कधी मनात आली नव्हती. पण नियतीनं तिला ढकललं टी.व्ही. च्या ऑडिशन टेस्टमध्ये. तिचा आवाज व तिचं एकूण व्यक्तिमत्त्व पाहताच टी.व्ही. निवेदिका म्हणून तिची निवड झाली. तिथेच ती कलापारखी सिनेमामंडळींच्या नजरेत भरली.

‘तीव्रमाध्यम’ हा तिचा पहिला लघुपट. ‘राजा शिवछत्रपती’मध्ये येसूबाईची भूमिका तिने केली अन् नंतर आला शाम बेनेगलचा ‘निशांत’ मग “मंथन, सामना’, ‘भूमिका” असे तिचे चित्रपट गाजू लागले. “भूमिका’ चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पदक मिळालं अन् दहा हजार रुपये बक्षिसीसुद्धा. हे पाहून आईच्या गळ्यात पडून ती म्हणाली, “हे पैसे कशासाठी? मी चित्रपटात काम केलंय त्याचा मोबदला मला मिळालाय. आता या दहा हजार रुपयांचं मी काय करू?” तिनं ते बक्षीस ताबडतोब एका अनाथ संस्थेला देणगी म्हणून अर्पण केलं. ती एकीकडे स्वत:च्या व्यक्तित्वाशी सुसंगत मते परखडपणे मांडणारी होती तर दुसरीकडे कामगारांसोबत जेवणारी, आदिवासींसोबत झोपड्यात रमणारी संवेदनक्षम होती.

ती स्त्री जीवनाचे अनेक रंग – अनेक तरंग अंतरंग उलगडून दाखविणारी फक्त अभिनेत्री नव्हती तर ती होती जिवंत अनुभवसिद्ध नायिका, चित्रपट रसिकांची अस्मिता. स्त्रियांची दु:खे, त्यांच्या वेदना, संवेदना याचं यथार्थ दर्शन, पडद्यावर समर्थरितीने… संवेदनशीलतेने, अतिसंयमाने पेश करणारी अभिनेत्री. भूमिकांची चोख निवड करून त्या समजून उमजून समजूतदारपणे रसरशीत करण्याचं तिचं तंत्र सर्वांपेक्षा निराळं, वेगळं अन् अनुपम होतं. चंदेरी दुनियेच्या चमचमाटात आपलं मराठमोळं व्यक्तिमत्त्व अगदी साधेपणानं सर्वांच्या हृदयात ठसवण्याचं कसब स्मितानं केलं. शांत, गंभीर भावपूर्ण पण धारदार बोलके डोळे आणि तलवारीच्या पात्याचा लपलपीत आवाज हेच स्मिताचं भूमिका फुलवण्याचं, खुलवण्याचं प्रमुख अस्त्र.

केवळ मनोरंजनाचं साधन ही समाजाची सिनेमाबद्दलची दृष्टी असली तरी ती बदलण्याचा व सिनेमाला अधिक जीवनदर्शी बनविण्याचा ज्या अनेक दिग्दर्शकांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नाचे पडद्यावरचे काम अधिक बोलके करण्याचे व सामान्य रसिकापर्यंत ही जाणीव पोचवण्याचे कार्य स्मिताच्या अभिनयाने केले आहे. श्याम बेनेगल, सत्यजित रे, मृणाल सेन, गोविंद निहलानी, महेश भट्ट, जब्बार पटेल, कुमार साहनी, केतन मेहता यांसारख्या उच्च दर्जाच्या चित्रपटनिर्माते दिग्दर्शकांनी या अभिनेत्रीचे अभिनयगुण प्रेक्षकांसमोर मांडले. कारण तिचा एकूण सारा चेहराच भावनांचं आवर्तन होता.

“अर्थ’मध्ये मानसिक आजाराने पछाडलेली कविता, “भीगी पलके” मधील कर्तव्यदक्ष पत्नी, “मेरा घर मेरे बच्चे” व “आखिर क्यूँ” मधील बंडखोर नायिका, “उंबरठा’मधील स्वत:चे कार्यक्षेत्र गाजविण्यासाठी संसाराकडे पाठ फिरवणारी नायिका,” “गिध”मधील “देवदासी’, “चक्र’मधील “अम्मा’ अशा तिच्या अविस्मरणीय भूमिका स्मरणीय आहेत. तिचा ‘स्मिता टच’ लोकांना फार प्रिय होता. तिचे दर्शन विजेच्या लोळाप्रमाणे दीपवून टाकणारे होते. मराठी-हिंदी चित्रपटातील ती “ए” ग्रेडची कलाकार होती. दहा वर्षांत तिने स्वत:ची ‘जागा’ निर्माण केली होती.

कारण सामाजिक संस्कार घेऊनच ती सिनेसृष्टीत प्रविष्ट झाली होती. त्यामुळे पडद्यावर सामाजिक जाणीव असलेल्या भूमिका ती करत असे आणि प्रत्यक्ष जीवनात स्त्री मुक्ती चळवळीचा एक भाग म्हणून सामाजिक कार्यात रस घेत होती. फिल्मी पार्ट्या, गॉसिप, ग्लॅमर यापासून ती नेहमीच दूर राहिली. सामाजिक आशयाचे, स्त्रियांचे प्रश्न मांडणारे तिचे चित्रपट पाहून लक्षात येते की स्त्री मुक्ती हा तिचा ध्यास होता. तिचे वैयक्तिक जीवन व रुपेरी पडद्यावरची प्रतिमा एकच होती. जीवनात आव्हान स्वीकारणे आणि प्रवाहाविरुद्ध जाऊन पोहणे हा तिचा स्वभाव होता. ‘उंबरठा’तील सुलभा महाजन मध्यमवर्गीय ध्येयवेडी तर ‘अर्थ’मधील कविता ग्लॅमरस फिल्मस्टार सुखासीन, दोन्ही ठिकाणचा भावनाविष्कार अगदी वेगळा, पण स्मिताने कलात्मक आणि कमर्शियल दोन्ही चित्रपटात सारखेच बस्तान बसवले. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, राज बब्बर यांच्याबरोबर काम तर केलेच पण “जैत रे जैत’मध्ये आदिवासी चिंधी’ म्हणूनही शोभली. ही सहज ‘कात’ टाकून वावरण्याची विद्याही तिला अवगत होती. उत्स्फूर्त, अंत:त्स्फूर्त आणि नैसर्गिक अभिनय हा स्मिताच्या अभिनयाचे शक्तिस्थान होता. ती विलक्षण प्रतिभाशाली कलाकार होतीच पण अभिनयगुणाएवढाच तिच्यात माणुसकीचा प्रभावही होता.

“भूमिका’, ‘मंथन’, ‘चक्र’, ‘भीगी पलके’, ‘मंडी’, ‘दर्द का रिश्ता’, ‘बाजार’, ‘अर्थ’, ‘अमृत’, ‘सुबह’, ‘मेरा घर मेरे बच्चे’, ‘निशांत’, ‘आखिर क्यूँ’, ‘राही’, ‘गमन’, ‘अर्धसत्य’, ‘आज की आवाज’, ‘दहलीज’, ‘काँच की दिवार’, ‘शक्ती’, ‘गुलामी’, ‘नमक हलाल”… असे हिंदी चित्रपट त्याचबरोबर “जैत रे जैत’, ‘उंबरठा’, ‘सूत्रधार” अशा अनेक मराठी चित्रपटांतूनही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे चित्रपटही तिने केले.

आर्ट फिल्मप्रमाणे व्यावसायिक चित्रपटातून काही ग्लॅमरस रोलही केले. निशीगंधाचं मादक फूल अन् गुलाबाचं साधं नाजूक फूल यातला नेमका फरक तिच्यात व इतर अभिनेत्रीत होता. बघता बघता सर्व चित्रपटसृष्टीच तिनं आपल्या विलक्षण समर्थ अभिनयानं व्यापून टाकली.

राज बब्बरशी विवाह करून ती गॉसिपची शिकार झाली. पण तिने तो विवाह जाहीर करून टाकला. तिचे वैयक्तिक जीवन व रुपेरी पडद्यावरची प्रतिमा एकच आहे हे तिने दाखवून दिले. खरं तर चाहत्यांच्या दृष्टीनं कलाकारांचे अन् रसिकांचे पडद्यापुरतं हितगुज असतं. पण स्मिता पाटीलसारखी कलाकार आपल्यातलीच कोणीतरी आहे ही भावना त्या कलाकाराच्या सुखदु:खाशी रसिकाला जोडते. जीवनाचे वर्णन रंगभूमी असे महाकवींनी केले आहे पण स्मिता इंटरव्हल मध्येच निघून गेली. परंतु ‘आनंद’प्रमाणे ग्रेट कलावंत कधीच मरत नाहीत.

१४ डिसेंबर, १९८६ला ही अभिनयाची उजळलेली दीपमाळ अर्ध्यावरच काळाने विझवली. भारतीय चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा अशी ही अभिनेत्री रंगभूमीवरील कलाकाराने तोंडावरील रंग पुसून मध्येच निघून जावे तशी पडद्याआड निघून गेली. ती आली, तिने पाहिले, तिने जिंकले आणि ती निघून गेली. सारच अतय॑ अकल्पित. म्हणतात ना, जगण्यात मौज आहे तोवर माणसानं मरावं. पण स्मिताच्या जीवनाच्या अभिनयाचे तंबोरे जुळून आले होते तेवढ्यात एवढी तिच्या मरणाची घाई करण्याचे नियतीने कसे ठरवले असेल? एखाद्या धूमकेतूप्रमाणे कला-आकाशात स्मिता उगवली अन् नाहीशी झाली.

गुरुदत्त, राजकपूर, सत्यजित रे यांना फ्रान्समध्ये जो मान मिळायचा तो स्मिताने सहज मिळवला. माजी राष्ट्रपती झैलसिंग, राजीव रेड्डी अशा मान्यवरांच्या हस्तs राष्ट्रीय पारितोषिके मिळवली. १२ वर्षांत तिने अनेक मानसन्मान आणि सुजाण रसिकांचे प्रेम मिळवले ते केवळ अलौकिक अभिनयाच्या बळावर. तिचे ५०-६० चित्रपट हा ठेवा चिरंतन राहणारा आहे. दूरदर्शनवरून बातम्या सांगणारी स्मिता एक समृद्ध व्यक्तिमत्त्व असलेली स्त्री… लता मंगेशकर, दुर्गा खोटे, लीला चिटणीस, ललिता पवार यांच्याप्रमाणे अस्सल मराठी बाणा’ असलेली स्त्री… कालाच्या भाळावर जिचे कलाकर्तृत्व अक्षय अक्षरांकित राहील असे नक्षत्रांचे देणे लाभलेली स्त्री…

तीस वर्षांचा जीवनपट तो काय पण एवढ्याशा जीवनपटात साठ-सत्तर वर्षांच्या काळातही जे गाठी बांधता येणार नाही ते सर्व तिने मिळवले. ‘पद्मश्री’सारखा नजराणा मिळवणे आणि ५०-६० चित्रपटांत काम करणे हे खरंच कौतुकास्पद आहे. तिच्या अष्टपैलूत्वामुळे तिला भाषेचं कुंपण लाभलंच नाही. बंगाली, तामिळी, गुजराथी, हिंदी, मराठी या सर्व भाषांतील चित्रपटातून तिनं स्त्रियांची अस्मिता जागृत ठेवली. स्मिता पाटील आपल्यातून गेली परत न येण्यासाठी पण तिची एक झलक किंवा छायाचित्र दृष्टीस पडले तरी तिची विविध रूपं डोळ्यासमोर तरळतात आणि ती किती मोठी अभिनेत्री होती याची जाणीव होते. योगायोगाने चित्रपटसृष्टीच्या क्षितिजावर उगवलेली ही तारका पाहता पाहता आपल्या स्वयंतेजाने ध्रुवपद मिळवून बसली.

“तुम्हारे बाद महफिल में

अफसाने बयाँ होंगे।

बहारे तुमको ढूँढेगी

न जाने तुम कहाँ होंगे ।।”

– जयश्री दानवे

(सौजन्य – अथर्व प्रकाशन, कोल्हापूर)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया