अतिथी कट्टा

दिनांक : १२-०९-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌खारी बिस्कीट म्हणताहेत, ‘आम्ही खूप धमाल केलीय!’




संजय जाधव दिग्दर्शित खारी बिस्कीट चित्रपट येत्या २० तारखेला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटामधील खारीची व्यक्तिरेखा साकारलीय ती वेदश्री खाडिलकर हिने आणि बिस्कीट साकारलाय तो आदर्श कदमनं. या दोघांचा ट्रेलरमधील अभिनय सध्या अनेकांच्या पसंतीस उतरलाय. या चित्रपटाबद्दल त्यांचं हे मनोगत.

——

खारी बिस्कीटमध्ये बिस्कीटची व्यक्तिरेखा साकारणारा आदर्श कदम म्हणतो, ‘’या चित्रपटात काम करण्यापूर्वी मी एक-दोन मालिकांमध्ये मी काम केलं होतं. पण त्या दोन्ही व्यक्तिरेखा छोट्या होत्या. परंतु, या चित्रपटात मी लीडची व्यक्तिरेखा साकारलीय. त्यामुळे मी सध्या खूप खुश आहे. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मी गेलो तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. संजयदादा हे खूप मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांच्याबद्दल मी खूप काही ऐकलं होतं. ऑडिशनला गेलो तेव्हा खूप मुलं आली होती.

मी चांगली तयारी करून गेलो होतो. परंतु, एवढ्या सगळ्या मुलांमधून आपली निवड होईल का, याची सतत मला भीती वाटत होती. परंतु, ऑडिशन घेणाऱ्यांनी आम्हाला खूप चांगलं समजावून सांगितलं नि त्यांनी आम्हाला काही करायला न सांगता आम्हाला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मला जे करता येतं होतं ते मी केलं नि माझी निवड झाली.
खारीला दृष्टी नसल्यामुळे तिला हे जग दाखवण्याचं काम मी करीत असतो. खारीनं खूप छान काम केलंय चित्रपटात. संपूर्ण चित्रपटभर तिला लेन्स लावाव्या लागल्यात. संजयदादा चित्रपटाच्या सेटवरचं वातावरण खूपच छान ठेवायचे. कधी खूप काम केल्यामुळे मरगळल्यासारखं वाटलं की संजयदादा काहीतरी छान बोलून आमची एनर्जी वाढवायचे.”

खारीची व्यक्तिरेखा साकारणारी वेदश्री खाडिलकर अवघ्या सहा वर्षांची आहे. ती म्हणाली, सिनेमासाठी आम्हाला मेकअप करायला लागायचा नि तो करताना खूप छान वाटायचं. संजयदादांनी आमचे खूप लाड केले. त्यांच्याबरोबर आम्ही सेटवर क्रिकेटही खेळायचो. मला टाकीवरचा सीन खूप आवडला. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या पडद्यावर पाहताना खूप मस्त वाटतंय. आदर्शनं या सिनेमात माझ्या भावाचं काम केलंय. लेन्स लावून मला काम करावं लागलं. सुरुवातीला थोडं कठीण वाटलं. पण नंतर मला ते जमायला लागलं.

संजय जाधव

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया