अतिथी कट्टा

दिनांक : १२-०७-२०२१

…आणि माझी भीड चेपली१२ जुलै हा विख्यात अभिनेते मोहन जोशी यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं ‘नटखट’ या त्यांच्या आत्मचरित्रामधील काही निवडक भाग संपादित स्वरूपात आम्ही प्रकाशित करीत आहोत.

——

‘टऽऽऽ टऽऽऽ टऽऽऽ’ घड्याळाचा गजर कर्कशपणे वाजला. मी ताङकन बिछान्यातून उठलो. गजर बंद केला. मला निघायला पाहिजे होतं. वेळ गाठायची होती. खरं तर झोप पुरेशी झाली नव्हती. पहाटे उठून पोहचायचं हे टेन्शन, आणि त्यात अनेक विचारांची मनात गर्दी. त्यामुळे रात्री स्वस्थ, गाढ झोप मिळालीच नव्हती. भराभरा तयार झालो. बॅग रात्रीच भरून ठेवली होती. ती घेतली आणि घर सोडलं. घड्याळ पहाटेचे साडेपाच ही वेळ दाखवित होतं. हमरस्त्यावर आलो. सामसूम होती. मुंबई हळूहळू जागी होत होती. एकही रिकामी रिक्षा कुठं दिसेना. घड्याळातला सेकंद काटा, मिनिट काटा वेगानं धावत होता. क्षण न् क्षण मोलाचा होता. सुदैवानं एक रिक्षा दिसली. रिक्षावाल्याशी काही एक न बोलता मी सरळ रिक्षात जाऊन बसलो आणि म्हणालो, “सांताक्रूज एअरपोर्ट.”

“साब?” रिक्षावाल्याचा प्रश्नार्थक चेहरा.

“अरे भाई! जल्दी है, चल तू! दस-बीस रुपया जादा देता हूँ।”

प्रश्नार्थक चेहरा सुखावला. रिक्षा सुसाट निघाली. रिक्षाबरोबर माझे विचारही पळत होते. बघायचं नाही, असं ठरवूनही हातातल्या घड्याळाकडे नजर खेचली जात होतीच. वेळेवर पोहचू ना? मध्येच काही भलतीसलती अडचण तर येणार नाही ना? अशा नाना शंकाकुशंका मनात डोकावत होत्या. एअरपोर्ट आलं, हायसं वाटलं. चला, पहिली बाजी जिंकली. बॅग घेऊन धावतच निघालो. एअरपोर्टवर पांढराशुभ्र सूट घालून एक देखणा माणूस माझीच वाट पाहत उभा होता. मी ज्याची अपेक्षा करत होतो, तोच हा माणूस! रुबाबदार, हँडसम! तो माणूस मला म्हणाला, “गुड मॉर्निंग! कम ऑन! हरि अप!”

बोर्डिंग पास घेतला आणि आम्ही दोघंजण विमानात स्थानापन्न झालो. विमानानं टेक ऑफ केलं. निवांत वाटलं. आता दुसरी बाजी पार केली होती. बऱ्याच काळानं विमानप्रवास घडत होता. विमान वेगानं उडत होतं…

बेंगलोरकडे ….बेंगलोर!

बेंगलोर एअरपोर्ट दृष्टिक्षेपात आलं, विमान ‘लँड’ झालं आणि मी निर्धास्त झालो. एक कार आम्हाला घ्यायला आली होती. हॉटेलवर पोहोचलो. हॉटेल ‘हॉलिडे इन’ फाइव्ह स्टार! इतकं पॉश, आलिशान हॉटेल मी प्रथमच बघत होतो. साल होतं १९९४. माझ्याच नावानं ‘स्वीट’ रिझर्व्ह केला होता. त्याच स्वीटमध्ये माझ्याबरोबरचे ते सहप्रवासी राहणार होते.

आमच्या पिक्चरचे प्रोड्यूसर! मला आश्चर्य वाटलं. एका बिग बजेट सिनेमाचे निर्माते आणि मी, एकच स्वीट शेअर करणार? नंतर मात्र सगळा उलगडा झाला. ते आमच्या सिनेमाचे प्रोड्यूसर साजिद नाडियादवाला नव्हतेच. आमच्याच सिनेमात काम करणारे एक आर्टिस्ट होते- श्री. दिनेश आनंद. मला माझंच हसू आलं. सिनेमातल्या एका आर्टिस्टला मी प्रोड्यूसर समजत होतो. अर्थात, त्याचं कारण म्हणजे त्याआधी मी साजिद किंवा दिनेश या दोघांनाही कधीच बघितलं नव्हतं, त्यात ते दोघंही दिसायला स्मार्ट आणि पॉश कपडे घालणारे!

शूटिंग आमच्या ‘हॉलिडे इन’ मध्येच होतं. तिथं मला प्रोड्यूसर साजिद पहिल्यांदा भेटले. सिनेमाचे डायरेक्टर होते- अझीज सजावल. सिनेमाचं नाव होतं ‘आंदोलन’. प्रमुख कलाकार होते, संजय दत्त, गोविंदा आणि दिव्या भारती. अझीज सजावल या दिग्दर्शकाला मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कारण असं की मी माझ्या हिंदी चित्रजीवनात प्रथमच संजय दत्त, गोविंदा यांच्यासारख्या बड्या ‘स्टार्स’ बरोबर काम करणार होतो.

मी जरी यापूर्वी काही हिंदी सिनेमात काम केलेलं असलं, तरीही हिंदी सिनेमासृष्टीच्या दृष्टीनं तसा नवखाच होतो. या मोठ्या स्टार्सबरोबरच्या पहिल्या शूटिंगच्या कल्पनेनं मला थोडं टेन्शन आलं होतं आणि माझं हे टेन्शन, हा ताण मी कुणाबरोबरही शेअर करू शकत नव्हतो. पण ‘अझीज’ या शब्दाचा अर्थ ‘प्रिय मित्र’ असाच आहे. या अनुभवी आणि कसबी डायरेक्टरला माझ्या मनःस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी मला इतरांचं शूटिंग बारकाईनं पाहायला सांगितलं. त्याचं कारण ‘त्या’ वातावरणाचा फील घेणं, त्या माहोलमध्ये मिसळून जाणं अत्यावश्यक होतं. त्यामुळेच माझी भीड चेपली जाणार होती. मी शूटिंग बघत राहिलो आणि आपोआपच त्या वातावरणाचा एक भाग झालो, थोडा रिलॅक्स झालो. अझीजनं मुद्दाम आधी त्या बड्या स्टार्सचे शॉट्स घेतले व माझे शॉट्स नंतर घेण्याचं ठरविलं. माझा त्याच दिवशी महत्त्वाचा सीन शूट होणार होता. मला त्यात महत्त्वपूर्ण ‘डायलॉग्ज’ म्हणायचे होते. अझीजच्या अनुभवी सूचनांमुळे व सहकार्यामुळे माझ्या मनावरचं दडपण दूर झालं आणि माझा परफॉर्मन्स’ त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाला. अझीज खुश झाले. मलाही समाधान वाटलं.

दुसरा दिवस. माझं शूटिंग नव्हतं. मी शांतपणानं बिछान्यावर पडून विश्रांती घेत होतो. अचानक डोक्यात एक विचार आला. त्या विचारानं मग मनाचा ताबाही घेतला. माझ्या आईशी मी संपर्क साधला. ती पुण्यात होती.

“आई, मी मोहन! मी सध्या शूटिंगसाठी बेंगलोरला आलोय…. मला- मला मलेश्वरमला जायचं आहे.’

“मोहन! मलेश्वरमला जा! तिथं पोहोचलास की मला फोन कर!” रिक्षा मलेश्वरमला पोहोचली. आईला फोन लावला. तिनं पुढचा रस्ता सांगितला. मी रिक्षावाल्याला त्याप्रमाणे सूचना करत केल्या व निघालो. अनेक वळणं आली, चौक लागले, कधी उजवीकडे, कधी डावीकडे. माझी रिक्षा पळत राहिली. तिनं सांगितलेल्या एका पांढऱ्याशुभ्र इमारतीसमोर आल्यावर मी रिक्षा थांबविली. अधीरतेनं रिक्षातून उतरलो. खूण बरोबर होती. मी त्या इमारतीसमोर जाऊन उभा राहिलो. पुन्हा आईला फोन.

“आई ऽऽऽ इथं, ‘डॉ. पार्थसारथी’ अशी पाटी आहे! त्या पाटीसमोरच मी आता उभा आहे.

आई आनंदाने हसली, म्हणाली, “अगदी बरोब्बर! हाच दवाखाना! इथंच, याच हॉस्पिटलमध्ये तुझा जन्म झाला.”

मी अंतर्बाह्य थरारलो. अनिमिष नेत्रानं त्या वास्तूकडे, ‘डॉ. पार्थसारथी’ लिहिलेल्या पाटीकडे बघत राहिलो. माझं जन्मस्थळ. शब्दांत वर्णन करता येणार नाहीत अशा सुखद संवेदना शरीरभर-मनभर व्यापून राहिल्या. मी स्तब्ध उभा राहून पाहतोय. १९९४ साल आहे आज आणि मी अनुभवतोय माझा पहिलावहिला श्वास, पहिला हुंकार, पहिला ‘ट्याँहांऽऽ’… माझा जन्मदिवस १२ जुलै आणि जन्मवर्ष १९५३.

– मोहन जोशी

(शब्दांकन – जयंत बेंद्रे, सौजन्य – मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई)

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया