अतिथी कट्टा

दिनांक : १९-०६-२०२०

शेतीमध्ये मला आनंद मिळतो – भाऊसाहेब शिंदे



लॉकडाऊनच्या काळात बरेचसे कलावंत आपापल्या वेगवेगळ्या कला जोपासत असताना ख्वाडा, बबन चित्रपटांचा नायक भाऊसाहेब शिंदे मात्र शेती करतोय. नुकताच त्याचा वाढदिवसही साजरा झाला. शेतीबद्दलचे आपले अनुभव त्यानं शेअर केलेत.

——

अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी हे माझं गाव. इथंच मी वाढलो. या गावात आमचं शेत आहे आणि त्या शेतामध्येच घर. लहानपणापासून मला शेतकामाची सवय आहे. कॉलेजला असतानाही मी दुधाचा व्यवसाय करीत होतो. ‘ख्वाडा’, ‘बबन’ चित्रपटांना यश मिळाल्यापासून माझं पुण्यात बराच काळ राहणं असतं. परंतु, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मी आमच्या गावी आलो आणि मी स्वतःला शेतीच्या कामात झोकून दिलं. इथल्या मातीत काम करताना मला खूप आनंद मिळतो. जूनच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतर आम्ही लगेचच पेरणी सुरू केली. सध्या आम्ही बाजरी लावली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आम्ही पेरणी केली. मान्सूनचं नुकतंच आगमन झालं आहे. त्यामुळे या भागात चांगला पाऊस झाला तर मग काहीच चिंता नाही.

पूर्वी आम्ही दुधाचा व्यवसाय करीत होतो. मी स्वतः आमच्या गाडीमधून दूध घालत असे. परंतु, कला क्षेत्रामध्ये व्यग्र झाल्यानंतर मला तेवढा वेळ देता येईना. त्यामुळे आमच्या शेतात सध्या घरापुरतंच दूध देणारी जनावरं आहेत. तरीदेखील दूधसंकलनाच्या कामात मी वेळ मिळेल तसं लक्ष घालतो. ख्वाडा, बबन चित्रपटांच्या यशानंतर मला भरपूर यश मिळालं. अनेक ऑफर्स आल्या.

परंतु, मला मोजकंच आणि चांगलंच काम करायचं आहे. त्यामुळेच मी या काळात फक्त राजकुमार हा चित्रपट स्वीकारला. दक्षिणेतल्या निर्मात्यांनी हा चित्रपट बनवला आहे. ‘बबन’मध्ये काम करणारी गायत्री या चित्रपटात माझी नायिका आहे. खरं तर हा चित्रपट गेल्या मे महिन्यातच प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकललं गेलं. हा चित्रपट खूप चांगला बनला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तो लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा, अशी माझी इच्छा आहे.

नुकताच माझा वाढदिवस झाला. वाढदिवस साजरा करणं मला फारसं आवडत नाही. कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यातच रमायला मला आवडतं. यावेळी मला माझ्या चाहत्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या. मी सर्वांचा आभारी आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर माझ्या नवीन चित्रपटाला सुरुवात होईल. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील.

– भाऊसाहेब शिंदे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया