अतिथी कट्टा

दिनांक : २७-०२-२०२४

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त


‘ असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ’


——–

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे इच्छाशक्तीच्या ध्येयपथावर चालताना अशी जिद्द बाळगणारे कलाकार. एखाद्या व्यक्तीविषयी लिहिलं, बोललं जातं तेव्हा ते बोलणं गुणगौरवपर असतंच, पण अशा
निमित्त्याने संबंधित व्यक्तीच्या कार्यकर्तृत्व गुणांचा आढावा घेतला जातो. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांची सिने-नाट्यसृष्टीतील कारकीर्द होती पांच तपांची म्हणजेच ६० वर्षे ते सिने-नाट्यसृष्टीत यशस्वीरित्या कार्यरत होते.

मोठा झाल्यावर डॉक्टर होणार, इंजिनीअर होणार, शास्त्रज्ञ होणार असे आपल्या मनावर लहानपणापासून घरची मंडळी ठरवतात; पण मी नट होणार अशी जाणीव होणारी अनुकूल परिस्थिती त्यांच्या घरात नव्हतीच. उलट त्या काळात सिने-नाट्यक्षेत्र हे बदनाम होतं. पण तरीही मी नाटकांत काम करणार अशी जिद्द बाळगत त्यांनी घराशेजारच्या रुस्तुम मोदी म्हणजेच सोहराब मोदींच्या भावाच्या ‘आर्य सुबोध नाटक मंडळी’त हजेरी लावली, तीही वयाच्या १२ व्या वर्षी घरातून पळून जाऊन. नाटक संपल्यावरही घरी जाण्यास नकार दिला अन् तिथले ज्यू दिग्दर्शक मि. बेंझामीन यांच्या कमरेला मिठी मारली. घरच्यांचा नाईलाज झाला. त्यांचे आई-वडील पुण्याच्या प्लेगच्या साथीत कामी आले होते. त्यामुळे त्यांना घरची ओढ नव्हतीच आणि या नाटकमंडळीत ते मोठे झाले. बेंझामिन सरांनी त्यांना सर्व नाट्यांगाची पूरती ओळख करून दिली, इतकी की, हिंदी आणि उर्दू भाषेवर त्यांचे प्रभूत्व जडले. त्या संस्थेत त्याकाळी दर महिन्याला वीस-वीस नाटके होत. त्यामुळे उर्दू रंगभूमीवर त्यांची अनेक हिंदी, उर्दू, मराठी नाटके गाजली. त्यांना ‘हैम्लेट’ नाटकातून हैम्लेटची व्यक्तिरेखा तसेच कधी कधी हैम्लेटची आई व प्रेयसी अशा स्त्री भूमिका करण्याचीसुद्धा अपूर्व संधी लाभली होती. पुढे नाट्यसंस्था बंद पडताच कोल्हापूरच्या चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांनी त्यांना जयप्रभा स्टुडीओत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून खास बोलावून घेतले. मग सुरु झाला त्यांचा खऱ्या अर्थाने सिने- नाट्यकलेतील योगदानाचा प्रवास.

जयप्रभा स्टुडीओत नवखा कलाकार प्रथम दानवेंच्या समोर उभा केला जाई. त्याची ड्रेपरी, संवाद, चालणे, बोलणे, अभिनय या व्यक्तिरेखेची दोन दोन महिने तालीम घेऊन मग तो कलाकार भालजीबाबांसमोर उभा केला जाई असा स्टुडीओचा शिरस्ता होता. याचवेळी हिंदी बुजुर्ग कलाकार पृथ्वीराज कपूर आपल्या मुलांसोबत ‘वाल्मिकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्टुडीओत आले. दानवेंचे खास मित्र बनले. साल होतं १९४४. वाल्मिकी चित्रपट निम्मा शूट झाला तरी नारदाचे काम करायला कलाकार मिळत नव्हता. तेव्हा जयशंकर दानवेंनी १६ वर्षाच्या राजकपूना चालणे, बोलणे, हिंदी संवाद, हातातील चिपळ्या अशा सर्व मेकअपसह भालजीबाबांसमोर उभे केले अन् त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीला हा ‘शोमन’ सापडला. तसेच हिंदी- मराठी सिनेसृष्टीवर एकेकाळी अधिराज्य गाजविणाऱ्या सुलोचनादीदींनासुद्धा दानवेंनी दिग्दर्शक म्हणून प्रथम रंगभूमीवर ‘करीन ती पूर्व’ या नाटकातून शिकवले. स्वत: दिग्दर्शित केलेल्या जयप्रभा स्टुडीओच्या ‘जयभवानी’ चित्रपटात प्रथम नायिका बनवले अन् सुलोचनादिदींसाठी मराठी-हिंदी सिनेसृष्टीची कवाडे उघडली गेली. हा इतिहास आहे.

तसेच विक्रम गोखले, शांता जोग, पद्मा चव्हाण, जयश्री गडकर उमा, सुर्यकांत, चंद्रकांत, रमेश देव, रत्नमाला, उषा नाईक, राजशेखर, गणपत पाटील असे पुढील काळात गाजलेले मराठी कलाकार अनेक चित्रपट व नाटकांच्या माध्यमातून दानवेंच्या हाताखाली शिकले. ते उत्तम सिने-नाट्य अभ्यासक्त होते. त्यांना शिकवण्याची कला आत्मसात होती.यामुळे ते त्याकाळी प्रभावी प्रशिक्षक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वातला वेगळेपणा काही औरच होता. त्यांचं राजबिंड रूप, अपटूडेट असा पेहराव अन् कडक स्वभाव. त्यामुळे उठावदार व्यक्तिमत्व. पण त्यांची शिकवण इतकी जबरदस्त की, नवख्या नवशिक्या कलाकारालासुद्धा स्वत: अभिनय करून सहज समजावत. त्यामुळेच अनेक कोल्हापूरच्या संस्थातून सवर्सामान्य माणसांनासुद्धा नाटकातून ताकदीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी उद्युक्त केले. त्याचं शिकवण इतकं प्रभावी अन् प्रसिद्ध होतं की, त्यांच्या तालमी पहायलासुद्धा लोक यायचे. ते स्वत: नटराजाचे भक्त असलेने नाट्यकलेचे पावित्र्य सांभाळण्यासाठी तत्पर असत. या कलासक्त गुणांमुळेच त्यांनी अनेक नाट्यांगाना स्पर्श केला होता. ते स्वत: उत्तम चित्रं काढत त्यामुळे एखाद्या नाटकाच्या प्रवेशाचे स्वत: रेखाटन करत. त्यामुळे नेपथ्यकाराला सुद्धा सोपे जात असे. स्वत: उत्तम शिवणकाम करत. संगीताचं प्रॉपर शिक्षण न घेताही संगीत नाटकांच्या गाण्यासाठी तसेच पार्श्वसंगीतासाठीही समर्पक चालीवर बोट ठेऊन मला हे असं हवं असं सांगण्याइतपत ते याही कलेत निपूण होते.

एवढं कलासक्त जीवन असूनही सिने-नाट्यसृष्टीतला दबदबा घराबाहेर ठेवून अत्यंत मध्यमवर्गीय अशी त्यांची राहणी होती. अनेक दिग्गज कलाकार व लेखक यांच्याशी त्यांचा उत्तम संपर्क होता. ठराविक काळानंतर त्यांनी मोठ्या मनानं आयुष्यभराची स्वत:ची सर्व नाट्य प्रॉपर्टी पुण्याच्या भरत नाट्य मंडळाच्या सुपूर्द केली होती. शूटिंगच्या वेळी घोड्यावरून पडले अन् त्यांना अंथरुणावर बसण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी हातात लेखणी घेतली अन् सरस्वतीची सेवा सुरु केली. आपल्या स्वतंत्र संकल्पनेतून स्वत: भरपूर नाट्यलेखन, कथा- कादंबरी लेखन करून ठेवले. तो सर्व दस्तावेज नुकताच त्यांच्या कुटुंबाने पुण्याच्या फिल्म अर्काइव्हजच्या सुपूर्द केला आहे. दिवस दिवस ते लिहित असायचे. यातूनच साकारले होते त्यांचे आत्मचरित्र ‘हिरवी चादर रुपेरी पडदा’ ज्यात १९११ ते १९८५ पर्यंतचा जीवनप्रवास होता अगदी डिटेल. त्यानंतर साकारला गेला ‘कलायात्री’ हा त्यांच्या जीवनावरील ३००-३५० पानांचा ग्रंथ. त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांचे सिने-नाट्यसृष्टीतले योगदान यानिमित्ताने रसिकांसमोर आले. वडिलांच्या या कष्टाचे, परिश्रमाचे चीज व्हावे नि त्यांचे स्मरण व्हावे म्हणून दानवे परिवाराने त्यांच्या नांवे दरवर्षी ‘कलायात्री पुरस्कार’ सुरु केले. सिने-नाट्य क्षेत्रावर पकड असणाऱ्या कलाकारांना आजवर हा पुरस्कार देण्यात आला. श्री.दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ.गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर असे कलाकार कलायात्री पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. ‘विरले सगळे सूर तरीही उत्तररात्र सुरेल’ हे वास्तव मागं उरतंच’ असं कवी बोरकर म्हणत. एखादा कलाकार दृष्टीआड झाला तरी त्याचे कार्यकर्तृत्व इथल्यापुरते संपते पण ते रसिकांच्या मनात सदैव कोरलेलेच राहते, असे कलाकार होते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे.

जयश्री जयशंकर दानवे

एम.ए.(हिंदी),संगीत विशारद
ज्येष्ठ लेखिका, चित्रपट-नाट्य अभ्यासक
कोल्हापूर.

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया