स्त्रीकेंद्रित भूमिका मला साकारायच्यात…
——–
‘चक धूम धूम’ नावाच्या एका ‘डान्स रिअॅलिटी शो’मध्ये मी जवळपास दहा वर्षांपूर्वी झळकले होते. त्यातला माझा ‘परफॉर्मन्स’ पाहून महेशपप्पांनी मला ‘कुटुंब’मध्ये घेतलं. हा शो करीत असताना मी सातार्यात राहायचे. महेशपप्पांनी मला शोधून या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. ‘कुटुंब’ करीत असतानाच त्यांनी मला सातार्यावरून मुंबईला आपल्या घरी राहण्याची संधी दिली. त्यानंतर मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं. दहावी झाल्यानंतर मी पुढील शिक्षण ‘नालंदा’ विद्यापीठामधून घेतलं. तिथं मी भारतीय शास्त्रीय नृत्य शिकले. तिथं मला भावना कशा व्यक्त करायच्या, याचं खूप चांगलं शिक्षण मिळालं. त्याचा उपयोग मला अभिनय करताना झाला. मग ‘पांघरूण’ची संधी मला मिळाली. कोव्हिडमुळे त्याच्या प्रदर्शनाला थोडा विलंब झाला. आता माझा ‘दे धक्का 2’ येतोय. त्यानंतर महेश पप्पा बरोबर असल्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. ‘पॉवर’ चित्रपट तसेच ‘1962’ या वेब सीरिजसाठी मी त्यांना दिग्दर्शनात मदत केली होती.
‘दे धक्का’ येऊन आता 14 वर्षं झालीत. यातील ‘सायली’ ही भूमिका मी आता साकारीत आहे. ही भूमिका साकारणारी कलाकार आता या क्षेत्रात नसल्यामुळे मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे या सगळ्या मोठ्या टीमबरोबर ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत असल्यामुळे मी स्वतःला खूप ‘लकी’ मानते. शिवाजी काका, मकरंद काका, आई, पप्पा… अशा दिग्गजांबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. सिद्धू दादा, सक्षमबरोबरही काम करताना खूप मजा आली. या चित्रपटात जसं एक आमचं कुटुंब प्रेक्षकांना पाहायला मिळतं, तसंच आमचं कुटुंब आहे. या चित्रपटात माझा एक खूपच छान डान्स आहे. त्यासाठी मला फारशी तयारी करावी लागली नाही. कारण मी वयाच्या तिसर्या वर्षापासून नृत्य करीत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझा वाढदिवस साजरा केला गेला. तो अनुभव कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील.
पप्पा जसं सांगतात तसं मी काम यापूर्वीही केलंय आणि या चित्रपटातदेखील त्यांनी जे काही सांगितलंय ते ते सगळं मी केलंय. पप्पा दिग्दर्शक म्हणून किती मोठे आहेत हे आता सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याची बरीच वैशिष्ट्यं आहेत. त्यांच्या चित्रपटासाठी सेटवर गेल्यानंतरच कलाकाराला आपले संवाद मिळतात. ऐन वेळी संवाद दिल्यामुळे कलाकाराच्या अभिनयातून येणारी ‘स्पाँटॅनिटी’ त्यांना जास्त आवडते. त्यामुळे सेटवर आल्यानंतरच मलाही त्या दिवशीचा सगळा प्रसंग समजायचा आणि त्यातले संवाददेखील. मात्र संबंधित सीन कशा चित्रित होणार आहे, हे पपा प्रत्येक कलाकाराला स्वतः करून दाखवतात. त्याचा फायदा माझ्यासह सर्वच कलाकारांना झाला. मलाही त्यांनी एखादा प्रसंग कसा साकारायला हवा, याच्या सूचना दिल्या. त्या लक्षात घेऊन मग मी माझ्या पद्धतीनं काम केलं. कधी कधी ते पपांना खूप आवडायचं. कधी नाही आवडलं तर ते आणखी चांगलं करण्यासाठी मला प्रोत्साहित करायचे.
पप्पांबरोबर शूटिंग करायचं असलं की आई मला म्हणते की, ‘तू पप्पा सांगतील तसंच कर. आपल्या कलाकाराकडून काय हवंय, हे पप्पांना खूप चांगलं ठाऊक असतं. त्यामुळे तू त्यांचं ऐक. आपोआप चांगलं काम तुझ्याकडून होईल.’ ‘पांघरूण’मध्ये मला नऊवारी साडी नेसायची होती. ती नेसून कसं ‘कम्फर्टेबल’ वावरता येईल, यासाठी मला आईनं खूप मदत केली होती. शूटिंगच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये तुला तेवढा मोकळेपणा वाटणार नाही, परंतु नंतर तुला त्याची सवय होईल, असं आईनं मला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या शूटिगंदरम्यान ‘अनकम्फर्टेबल’ असूनही मला त्याचं फारसं टेन्शन आलं नव्हतं. आईच्या सांगण्यानुसार तिसर्या दिवसापासून मला या नऊवारीची चांगलीच सवय झाली. इतकी सवय झाली की नऊवारी साडी नेसून मी या चित्रपटात छान बॅलेदेखील सादर केलाय.
‘पांघरूण’ या चित्रपटाची ‘ट्रायल’ पाहिल्यानंतर आईला खूप आनंद झाला होता. तेव्हा आईनं मला तिचे सोन्याची कानातले भेट म्हणून दिले होते. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. ‘पांघरूण’च्या शूटिंगदरम्यानच मला पप्पांकडून लगेचच शाबासकी मिळायची.
अभिनेत्री दीपिका पदुकोणचं काम मला खूप आवडतं. ती आपल्या ‘इमोशन्स’ खूप सहजपणे चेहर्यावर आणते असं मला वाटतं. आलिया भटदेखील मला आवडते. ती माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. रणबीर कपूरदेखील मला खूप आवडतो. मराठीमध्ये मला नागराज मंजुळे, रवी जाधव, प्रसाद ओक यांच्याबरोबर काम करायला आवडेल. हिंदीतील सगळ्या मोठ्या बॅनर्सबरोबर मला काम करायचंय.
‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन’ सारख्या प्लॅटफॉर्म्सवर सध्या विविध भाषांमधील खूप चांगल्या मालिका, चित्रपट येत आहेत. त्या मी पाहते. तसेच वर्कआऊटदेखील बरंच करते. नृत्याची प्रॅक्टिस माझी सुरूच असते. वाचन ही अशी एक गोष्ट आहे, की जी मी सध्या करीत नाहीय. परंतु त्याची सवय मला लावून घ्यायचीय.
जसं माझ्याकडे नवीन काम येतंय, तसं ते मी करतेय. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही मला चांगल्या, ताकदीच्या भूमिका करायच्या आहेत. विशेषतः स्त्रीकेंद्रीत भूमिका मला साकारायला आवडतील. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्हावं असं माझं स्वप्न आहे.
– गौरी इंगवले
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया