अतिथी कट्टा

दिनांक : १४-१२-२०२०

गोष्ट ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’ची….विख्यात गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा १४ डिसेंबर हा स्मृतीदिन. गीतरामायण हे गदिमा आणि सुधीर फडके यांच्या प्रतिभेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार होता. त्यामधील ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’ या पदाबद्दल प्रमोद रानडे यांनी लिहिलेल्या आणि ‘सुरेश एजन्सी’ने प्रकाशित केलेल्या ‘गोष्टी गाण्यांच्या’ या पुस्तकामध्ये सविस्तर लिहिले आहे. हा संपादित लेख आम्ही पुनर्प्रकाशित करीत आहोत.

——

ही कहाणी आहे एका चमत्काराची. चमत्कार घडतो, घडवता येत नाही. हा चमत्कार मात्र मानवनिर्मित होता. हे चमत्कारी मानव होते महाकवी ग. दि. माडगूळकर आणि युगनिर्माते संगीतकार-गायक सुधीर फडके आणि या चमत्काराचं नाव आहे ‘गीतरामायण’. मराठी सुगम संगीतातील निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट संगीत मालिका. दर्जा आणि लोकप्रियता फारच थोड्या वेळेस एकत्र येतात आणि अशा तुरळक दर्जेदार, लोकप्रिय कलाकृतींतली एक कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण’. कवी, संगीतकार, गायक आणि रसिक श्रोते, सगळ्यांनाच स्वप्नवत वाटेल अशी महान कलाकृती म्हणजे निःसंशयपणे ‘गीतरामायण’च आहे.

अजून एक विशेष बाब अशी की, सुगम संगीत मालिका या स्वरूपात एक वर्षभर अखंड आकाशवाणीवरून थेट प्रक्षेपित होणं हे सर्वप्रथम घडलं आणि एकदाच घडलं ते ‘गीतरामायणा’च्या रूपा आकाशवाणीच्या इतिहासात या विक्रमाची नोंद करण्याचा बहुमान पुणे आकाशवाणीने मिळवला. गीतरामायणाच्या रूपात संगीत मालिका या संकल्पनेतलं आरंभाचं गीत अर्थातच खूप महत्त्वाचं होतं.

प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यावर आधारित रामकथा त्यांचेच सुपुत्र लव-कुश आपल्या मधुर गायनातून श्रोत्यांसमोर मांडताहेत अशा दृश्यावर आधारित हे गीत होतं. आकाशवाणीवरून त्याचं थेट प्रसारण होण्याआधी मात्र जे गंभीर ताणतणाव निर्माण झाले त्याची ही कहाणी आहे. ते लोकप्रिय गीत म्हणजेच ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती,
कुश-लव रामायण गाती’.

रामकथा प्रत्येक आठवड्याला एक गीत अशा पद्धतीने प्रसारित व्हावी आणि एक वर्षभर ती चालावी, अशी आगळीवेगळी आणि अभिनव संकल्पना त्या वेळचे पुणे आकाशवाणीचे संचालक सीताकांत लाड यांची होती. त्यासाठी कवी म्हणून ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके अशी नावं नक्की झाली होती. पहिल्या गीताच्या काव्यासाठी लाडसाहेब गदिमांकडे गेले आणि त्यांनी गीताची मागणी केली. गदिमांनी ते गीत आधीच लाडसाहेबांकडे दिल्याचं सांगितलं; परंतु लाडसाहेबांकडे ते गीत आलेलं नव्हतं, आणि गदिमांना त्यांनी तसं सांगितलं. त्यावर गदिमा चिडले आणि पुन्हा लिहिणार नाही, असं म्हणाले. हे फारच धक्कादायक होतं. अशा जमून आलेल्या प्रकल्पाची अशी सुरुवात म्हणजे सगळ्यांच्या उत्साहावर पाणी पडणार होतं. लाडसाहेबांनी कशीबशी गदिमांची समजूत काढली.

प्रकल्पातलं हे पहिलंच महत्त्वाचं गीत होतं आणि गदिमांना पर्याय ही कल्पना स्वप्नातही करता येत नव्हती. लाडसाहेबांनी गदिमांना त्यांच्या आकाशवाणीतल्या कार्यक्रमाची स्वतंत्र खोली गीत लिहिण्यासाठी दिली. खोली दिली कसली, त्यांना खोलीत कोंडलंच. गीत लिहून झाल्यावर स्वरबद्ध करून त्याचं थेट प्रसारण होण्याकरता असं युद्धपातळीवरच काम करणं आवश्यक होतं. गदिमा एकदा राजी झाल्यावर प्रश्न नव्हता. त्यांनी गीत लिहून हातावेगळं केलं त्यांच्या एकटाकी लेखनशैलीनं. तेच हे अजरामर प्रथम गीत जे भूप रागावर आधारित आहे- ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’. बाबूजींनी अप्रतिम चाल तयार केली. आपल्या जादूमयी शब्दांनी डोळ्यांसमोर दृश्य निर्माण करणारे ग. दि. माडगूळकर आणि रसाळ चाल लावून आपल्या दैवी आवाजात गाणारे सुधीर फडके यांनी रसिकांना जिंकलं. चांगली सुरुवात म्हणजे अर्धं यश हमखास, या म्हणीनुसार गीतरामायणातली पुढची सर्व ५५ गीतं म्हणजे सुगम संगीताचा अक्षय खजिना ठरली.

१ एप्रिल १९५५ला प्रथम प्रसारण झालेल्या गीतरामायणातल्या या आणि सर्वच गीतांनी रसिकांना वेडं केलं ते आजपर्यंत. गीतरामायणाचं श्रवण ही एक सवय होऊन गेली. दिनक्रमाचा, आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग झाला. गीतरामायणाची ती गोडी, निष्ठा, श्रद्धा, भक्ती अजूनही कणभरही कमी झालेली नाही. गीतरामायणाच्या थेट प्रसारणाच्या वेळी तर रसिक रेडिओलाच देवाप्रमाणे हार घालून ऐकायला बसायचे. प्रथम प्रसारणातली विविध गीतं पुण्यातल्या नामवंत गायकांनी गायली आहेत. प्रभू रामचंद्रांच्या तोंडी असलेली सर्व गीतं मात्र स्वतः बाबूजींनी, तर सीतामाईच्या तोंडची गीतं प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा गायल्या आहेत–केवळ एका गीताचा अपवाद सोडून. ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ हे गीत साक्षात लता मंगेशकरांनी गाऊन गीतरामायणाची उंची अधिकच वाढवली. पुढे सर्व ५६ गीतं सुधीर फडके यांनी स्वतःच गाऊन हा गीतसंच कॅसेट्सच्या रूपात प्रसिद्ध केला आणि रसिकांसाठी, सुगम संगीत अभ्यासकांसाठी अभ्यासक्रमच पुढे ठेवला.


– प्रमोद रानडे


(सौजन्य – प्रकाशक-सुरेश एजन्सी)

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया