सिनिअर नव्हे तर सिरिअस सिटीझन बना – अजय फणसेकर
——
‘सिनिअऱ सिटीझन’ ही एका निवृत्त मेजर जनरलची कथा आहे. या व्यक्तिरेखेचं नाव आहे अभय देशपांडे. ती मोहन जोशी यांनी चित्रपटात साकारली आहे. हा मेजर अत्यंत धाडसी असून त्यानं देशासाठी विलक्षण शौर्य गाजवलेलं आहे. त्याबद्दल त्यांना वीरचक्र हा पुरस्कारही मिळालेला आहे. सर्वसामान्य लोक त्याला ‘टायगर’ या नावानं हाक मारीत असतात. वैयक्तिक आयुष्यात त्याला बरेच बालमित्र आहेत. तेही आता ७५ वर्षांचे झाले आहेत. मात्र हा टायगर स्वतः ७५ वर्षांचा असला तरी तो स्वतःला सिनिअर सिटीझन समजत नसतो. तो फिट आहे. तो रोज व्यायाम करीत असतो. रोज बॉक्सिंगही करीत असतो. मनानं नि विचारानं अगदी फिट असतो. तो सतत सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही सिनिअर सिटीझन न बनता सिरिअस सिटीझन बना. सरकारच्या काही सेवा मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला म्हातारपण आणता. तसा प्रकार करू नका. सिरिअस सिटीझन बनण्यासाठी तुम्ही सतत अलर्ट राहिलं पाहिजे. फिट राहिलं पाहिजे. तसेच स्वतःवर तसेच इतरांवर आलेल्या संकटांवर तुम्हाला मात करता आली पाहिजे. अडचणीत असलेल्याला मदत करता आली पाहिजे असं या मेजर जनरलचं मत असतं. त्याची पत्नी लक्ष्मी देशपांडे. ही व्यक्तिरेखा स्मिता जयकर यांनी साकारलेली आहे. हे दोघे वांद्रे येथे आपल्या वडिलोपार्जित घरात राहत असतात. निवृत्तीनंतर देशपांडे हे एका सुरक्षाविषयक कंपनीत सुरक्षा सल्लागार म्हणून काम करीत असतात. लक्ष्मीबाई या स्वतःच्या नृत्याचे क्लासेस घेत असतात. या देशपांडेंचं सगळं कुटुंबच लष्करातील असतं. त्यांचे वडील, मुलगा यांना युद्धात हौतात्म्य आलेलं असतं. त्यांच्या घरात सौम्या नावाची एक मुलगी येते. तिच्याशी या दोघांचं एक भावनिक नातं बनतं. परंतु, ही मुलगी पुढे अंमली पदार्थांच्या व्यसनात सापडते. त्यानंतर पुढं काय घडतं ते या चित्रपटात दाखवलं.
– अजय फणसेकर
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया