अतिथी कट्टा

दिनांक : २०-०४-२०२१

सुमित्रा भावे : एक अथक प्रवास


स‌ुमित्रा भावे यांना श्रद्धांजली वाहताना यांच्या संपूर्ण वाटचालीतील त्यांचे सुहृद सहकारी व सहदिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी सुमित्राताईंच्या पंचाहत्तरी निमित्त लिहिलेल्या या लेखाचे पुनरावलोकन

——

प्रसिद्ध सिनेमादिग्दर्शक स‌ुमित्रा भावे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्या सुहृदाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कलाकारकिर्दीचा घेतलेला सम्यक वेध…

सुमित्रा भावे परवाच्या १२ जानेवारीला पंच्याहत्तर वर्षांच्या झाल्या! अन् मन खूप वर्षं मागे गेलं…!

१९८३-८४ ची गोष्ट. आम्ही काही तरुण मुलं नाटकाचं वेड धरून काहीतरी उद्योग करत होतो. आमच्या सती भावे या मैत्रिणीची आई आम्हां सर्वांची मित्र-सल्लागार-मार्गदर्शक बनली. आणि अचानक या सामाजिक अभ्यास करणाऱ्या बाईंनी चित्रपट बनवायचं ठरवलं. त्यांच्या या वेडेपणात आम्ही पोरंही सामील झालो. ‘बाई’ हा पहिला लघुपट तयार झाला. त्यानंतर गेली पस्तीस वर्षं मी त्यांच्याबरोबर पहिली काही वर्षं सहाय्यक म्हणून काम करत आणि नंतर जोडीने दिग्दर्शन करत, एकत्र आयुष्य जगत पंधरा फीचर फिल्म्स, साठ-सत्तर लघुपट, पाच दूरदर्शन मालिका, काही टेलिफिल्म्स असं काम करत राहिलो. आज या निमित्तानं सुमित्राच्या या वाटचालीकडे पुन्हा पाहावंसं वाटतं आहे.

सुमित्रा अनेकदा असं म्हणते की, चित्रपट बनण्याचं मूळाक्षरही माहीत नसताना तिनं या माध्यमाला आपलंसं केलं. सामाजिक अभ्यास शिकवत असणाऱ्या सुमित्राला नवं तंत्र कसं शिकायचं हे समजत होतं. पण त्याच बरोबर सुमित्राची त्या पूर्वीची कलाकार म्हणून आणि कलासक्त आस्वादक म्हणून असलेली पार्श्वभूमी ही तिच्या चित्रपट-दिग्दर्शक बनण्याच्या मागे निश्चितच आहे. पूर्वाश्रमीची नीला उमराणी- या आगरकर हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलीनं चित्रकला, रांगोळी, नृत्य-दिग्दर्शन यात अनेक बक्षिसं मिळवली होती. तिची आई कमलाबाई या वाळव्याच्या जमीनदार घरातल्या आणि नावीन्याची उत्साही हौस असणाऱ्या होत्या, गाण्याची आवड आणि समजूत असणाऱ्या, स्वतः मनापासून उत्तम गाऊ शकणाऱ्या होत्या. वडील गरिबीतून स्वकष्टाने मोठे झालेले, एसेम जोशी, नानासाहेब गोरे अशा जाणत्या नेत्यांचे लाडके वर्गमित्र होते, स्वतःचा हजारो पुस्तकांचा संग्रह जोपासणारे साक्षेपी वाचक होते. नीला ही गुरु रोहिणी भाटे-बेबीताई- यांची आवडती विद्यार्थिनी होती. शास्त्रीय कथक नृत्य बेबीताईंकडे शिकत होती आणि राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात आवाबेन देशपांडे, प्रमिला दंडवते, सुधा वर्दे अशा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर नृत्याचे कार्यक्रम करत दौरेही करत होती. सुमित्राच्या आई- मोठी आई – सांगायच्या की, नीला त्यांच्या पोटात असतानाच्या काळात सानेगुरुजी भूमिगत होऊन यांच्या घरी येऊन राहिले होते, तेव्हा ते प्रेमाने घरच्या या गृहिणीला स्वयंपाक घरात गोष्टी सांगत बसायचे. मोठी आई गमतीनं म्हणायच्या- नीलाने त्या गोष्टी ऐकल्या असणार! फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए. करताना नीला उमराणीने लिहिलेल्या कविता ‘सत्यकथे’त छापून यायला लागल्या होत्या. तेव्हाचे अनेक मित्र-मैत्रिणी ज्यातले काही आज नामवंत लेखक-समीक्षक झालेत ते या कवितांच्या, नीला उमराणीच्या साहित्य-सहकारच्या वादविवादात भाग घेण्याच्या, सेक्रेटरी म्हणून केलेल्या भाषणांच्या आठवणी सांगतात. तेव्हाच्या काही लोकांच्या कानात ‘नीला उमराणी बातम्या देत आहेत’, अशी दिल्ली आकाशवाणीवरून होणारी घोषणाही आहे. आकाशवाणी मध्ये नोकरी करत, स्वतः दिल्लीसारख्या अनोळखी शहरात एकटीनं राहत असताना नीला उमराणी या मुलीनं गुरुदत्त, सत्यजित राय, बिमल रॉय, डेव्हिड लीन यांचे चित्रपट मुद्दाम जाऊन पहिले होते.

त्यानंतर तिनं मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेत समाजकार्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला, पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए. केलं, पुण्याच्या कर्वे समाजसेवा संस्थेत अध्यापक म्हणून काम केलं, मुंबईच्या ‘कास्प-प्लान’ या संस्थेच्या मोठ्या बालविकास प्रकल्पाचं प्रमुख म्हणून काम पाहिलं, उरळी कांचनला सर्वोदयी विचारातून ग्रामविकास केंद्र चालवलं, अनेक शोधनिबंध लिहिले आणि मग ‘स्त्री-वाणी’ या स्त्रीच्या स्वप्रतिमेचा अभ्यास करणाऱ्या प्रकल्पाची प्रमुख अभ्यासक म्हणून काम करताना चित्रपट बनवण्याचं स्वप्न पाहिलं.

हे सारं विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे, सुमित्राचं दिग्दर्शक बनणं हे एका मोठ्या प्रगल्भ आणि यशस्वी कारकिर्दीचा दुसरा टप्पा होता आणि आम्ही सगळे गेली अनेक वर्षं पाहतो आहोत की, तिच्या या पूर्वायुष्यातल्या अनुभवाचं, शिक्षणाचं आणि कलेच्या प्रांगणात घालवलेल्या दिवसाचं सार्थक या चित्रपटकलेत होताना दिसतं.

सुमित्राच्या चित्रपट कारकिर्दीतली मला सर्वात महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे, तिच्या संहिता. अगदी अलीकडेच ‘संहिता’ या नावाचा चित्रपट आम्ही केला. त्यात तिनं लिहिलं होतं, ‘माणूस आपली संहिता आपण केव्हा लिहिणार?’ जीवनाची कथा आपण स्वतः लिहिण्याबद्दलाचा तो संवाद होता… पण सुमित्राच्या बाबतीत तो दोन्ही अर्थांनी खरा आहे. आयुष्य आपल्या स्वतःच्या निर्णयावर आणि हिमतीवर जगत तिनं त्यातून आलेल्या शहाणपणाच्या, करुणेच्या, सकारात्मकतेच्या कथा सांगितल्या. सुमित्रा भावेंचे चित्रपट सामाजिक आशयाचे असतात, या सपाट वाक्यात अनेकदा त्यांचं वर्णन केलं जातं! पण ते फार त्रोटक आणि शिक्केबाज आहे, असं मला वाटतं. एक नक्की की सामाजिक आशयघन चित्रपटांना मानाचं स्थान सुमित्रानं मिळवून दिलं. आमच्याबरोबर काम केलेले अनेक जण स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून काम करताहेत. त्यांच्यामध्ये आणि इतर अनेक नवनव्या मराठी दिग्दर्शकांमध्ये असणारी सामाजिक जाणीव ही सुमित्राच्या गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या कारfkर्दीचा एक परिपाक आहे हे निश्चित. स्वतःची संहिता स्वतः लिहिणारे खूप कमी दिग्दर्शक आहेत, त्यातली सुमित्रा एक आहे. त्यामुळे आशय, मांडणी, त्यातून सांगितली जाणारी कथा, पटकथा, संवाद, कलादिग्दर्शन, वेशभूषा, रंगसंगती, ठिकाणांची निवड, अभिनेत्यांची निवड या सगळ्यासहित कलाकृती तिच्या मनात उलगडत जाते आणि मग ती पडद्यापर्यंत पोचते. ती एक एकसंध प्रक्रिया असते. तुकडे जुळवून तयार केलेलं कोडं नसतं. यामुळेच त्या संहितांमध्ये असलेला सामाजिक आशय हा लेखिकेच्या जीवनदृष्टीचा भाग असतो, व्यक्तिमत्त्वाच्या आतल्या गाभ्यातून आलेला असतो, वरून घेतलेला अभिनिवेश नसतो. माणूस आणि समाज यांचं अतूट नातं, समाजातल्या सोसावं लागणाऱ्या घटकांबद्दलची सहानुभूती आणि त्या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याची सकारात्मकता हा तिच्या अंतर्मनाचाच भाग आहेत. म्हणून तिच्या कथानकांमध्ये परिस्थितीचं कठोर आकलन असतं आणि त्यातून सार्थकतेच्या दिशेनं नेणारा शेवटही असतो. आमच्या चित्रपटांचे समाधानी शेवट हे गोड-गोड व्यावसायिक तडजोडवादी चित्रपटांपेक्षा वेगळे असतात, असं मला त्यामुळेच वाटतं. आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षात सुमित्रा भावेंचा एक प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. वितरक, वाहिन्यांचे अधिकारी अनेकदा या चित्रपटांच्या व्यावसायिक गणितांविषयी गोंधळात पडून पाठिंबा द्यायला कचरतात, पण समोर आलेला प्रेक्षक या चित्रपटांकडे कधीच पाठ फिरवत नाही, उलट आमच्यापर्यंत तो पोचत नाही अशी तक्रार करत राहतो. सुमित्रामधली बंडखोर कवयित्री तिला केवळ समस्याप्रधान मांडणी करू देत नाही. त्यापलीकडच्या मोठ्या आध्यात्मिक आणि तरल भावविश्वात बुडी मारायला लावते. तिच्यातली चित्रकार प्रत्येक फ्रेम काटेकोरपणे पाहिल्याशिवाय, त्यातल्या व्यक्ती, पोषाख, वस्तू, रंगसंगती, छाया-प्रकाशाचा खेळ यांचा परामर्श घेतल्याशिवाय कॅमेऱ्यात बंदिस्तच होऊ देत नाही. तिच्यातलं रांगोळीचं कसब तिला संहितेतल्या घटनांचे ठिपके पुन्हा संकलनाच्या संगणकावर नव्या प्रकारे मांडून पाहण्याची ऊर्जा देतं, नव-नव्या शक्यतांकडे पुन्हा पाहण्याची मोकळी नजर देतं. सुंदर हस्ताक्षराची तिची आवड तिला चित्रपट बनवताना बारीक तपशीलांपर्यंत घेऊन जाते. पार्श्वसंगीत निवडताना किंवा चित्रपटाच्या अमूर्त लयीचा अंदाज घेताना तिला नृत्याचे-संगीताचे गिरवलेले धडे आठवत राहतात.

इतकी वर्षं काम करता करता पहिल्या लघुपटाच्या वेळी ज्या काही मूल्यव्यवस्थेचा अंगीकार केला होता ती आजही कार्यरत आहे, असं दिसतं. कलावंतांकडे, चित्रिकरण स्थळांकडे पाहण्याचा साधेपणा आणि खरेपणा, कामाचं घरगुती वाटावं असं डामडौल विरहित व्यवस्थापन, पण त्याचबरोबर खऱ्या व्यावसायिक परिपूर्णतेचा आग्रह, वक्तशीरपणा, सहकाऱ्यांमधली स्पर्धा नसलेली दोस्ती, गोष्टी जाहिरातवजा वेष्टनात बांधण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींना पूर्ण फाटा… या गोष्टी ‘बाई’ लघुपटापासून ते आज ‘कासव’ आणि आगामी ‘वेलकम होम’पर्यंत टिकून आहेत.

सुमित्रा ही या संघाची नेता असल्याचा अभिमान बाळगत, सर्व सहकारी त्या प्रक्रियेत आपला जीव ओतत असतात. चित्रपट हा अंतिम कलाकृती म्हणून महत्त्वाचा तर आहेच, पण त्यापेक्षाही मोठी आहे ती बनवतानाची प्रक्रिया- हा दृष्टिकोन सर्वांच्या मनात नीट बिंबवला गेला आहे. आम्ही सुरुवातीचे काही सहकारी वगळता पुढच्या पिढ्या तिला मावशी म्हणतात. मावशींच्या छिद्रान्वेषी नजरेतून काही निसटत नाही आणि आपण आळस केला तर त्या ते काम करूनही टाकतील या भावनेतून सगळी टीम निगुतीनं काम करते….! आणि पुढे जाऊन त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र कामातही त्याच कार्यप्रणालीचं प्रतिबिंबही पडताना दिसतं.

स्वतःचे सर्वच चित्रपट स्त्री-प्रधान बनवण्याचा तिचा अट्टाहास नाही. तर एका विचारी स्त्रीच्या अंतर्मनातून तयार झालेला दृष्टिकोन त्यामागे आहे. म्हणून तिची स्त्री-पात्रं जेंव्हा कथानकाच्या केंद्रस्थानी असतात तेंव्हा ती घटनांना फक्त प्रतिसाद देणारी दुय्यम नसतात, तर स्वतः घटना घडवणारी असतात. आणि तिची पुरुष पात्रं त्यांच्यातल्या मृदुपणाचा शोध घेणारी असतात- एक वेळ असहाय्य असतील, पण सूड म्हणून दुष्ट किंवा एकसुरी नसतात.

मुळात चित्रपट निर्मितीची अंतःप्रेरणाच सुमित्रासाठी व्यवसाय करणे किंवा स्वतःच्या कलानंदात अति-मश्गुल राहणे ही नाही, तर स्वतःचं अनुभवविश्व- जे मुळात चार भिंतीत संपत नाही- आणि आपलं भवताल यांच्या देवाणघेवाणीतून तयार होणारं मंथन जगासमोर मांडण्याची उर्मी ही आहे. त्यामुळे हे चित्रपट वेगळे आहेत आणि त्यांचं स्थान आज कोणाला उमजो न उमजो, पण उद्याच्या सांस्कृतिक इतिहासात आजच्या काळाचा आरसा बघायची वेळ येईल, तेव्हा उद्याचा अभ्यासक-प्रेक्षक याच चित्रपटांकडे वळेल, अशी मला खात्री वाटते. या साऱ्याचा मी एक महत्त्वाचा भाग आहे. सुमित्राच्या पंच्याहत्तरीनिमित्त मला व्यक्त करावसं वाटणारं हे मोठं समाधान!

– दिग्दर्शक सुनील सुकथनकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया