अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०५-२०२१

जगदीश खेबूडकर – सरस्वतीपुत्र



मराठी चित्रपटसृष्टीच्या ग्रंथातले सोनेरी पान,वयाचं कॅलेंडर झुगारून लेखणीनं तरुण राहण्याची किमया जाणणारे लेखक,पन्नास वर्षे मराठी रुपेरी पडद्याला जीवनमंदिर मानून सात्विक समर्पणाने चित्रपट व्यवसायात घट्ट पाय रोवून उभं राहता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मराठी गीतसम्राट जगदीश खेबूडकर.प्राजक्ताची फुलं आख्खं झाड व्यापतात आणि आसमंत सुवासिक करतात तसं आपल्या प्रत्येक कवितेनं रसिकांना आनंद देऊन आपली गीतं अजरामर करणारे कवी.

——

खेबूडकर म्हणत,“मी प्राजक्ताच्या झाडासारखं जगत आलो.चरितार्थ म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आतला “माणूस” फुलवत जगणं महत्वाचं वाटलं.मनाने नेहमी तरुण राहावं.
“वयाच्या मानानं” म्हणण्यापेक्षा “मानाचं वय” म्हणावं.सोन्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते तेव्हा संधीचं सोनं करावं.”
खेबूडकर हे मूळचे कुलकर्णी.म्हणजेच लिखित दस्तऐवज लिहिणारे.कोल्हापूर जिल्ह्यातील खेबवडे गांवचे.वडिलांचे नांव गोविंदराव बाळकृष्ण खेबूडकर.वडील वारकरी पंथातले.आई राधाबाई भक्तीपंथातल्या,त्यामुळे गुरुचरित्र,व्यंकटेशस्तोत्र,
जात्यावरच्या ओव्या तोंडपाठ.वडिलांचे स्वत:चे भजनी मंडळ होते.त्यामुळे मृदंग,टाळ,चिपळ्या, एकतारी,वीणा ही भजनाची वाद्ये घरात होतीच.पण वडील हे पेशानं प्राथमिक शिक्षक त्यामुळे बदल्या होत.हळदी या बदलीच्या गांवी १० मे,१९३२ रोजी रात्री ३ वाजता ‘जगदीश’ चा जन्म झाला.त्यामुळे हळदी हे खेबूडकरांचे जन्मगांव म्हणावे लागेल.त्यांचे लहानपण सुखात गेले.आईच्या जात्याची घरघर व मधुर भजनं
ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे त्यामुळे संगीताचा संस्कार हा तिथूनच सुरु झाला लहानपणापासून निसर्गात रमणार त्यांच मन.घोडेस्वारी हा छंद.स्वछंदपणे रानावनात भटकणे,झाडावर चढणे,मोटेवरची गाणी,वासुदेव,बहुरूपी,डोंबारी,नंदीवाले,
कडकलक्ष्मी यांचे खेळ,देवळातील अंबाबाईचा जागर या सर्व गोष्टी त्यांच्या बालमनाने टिपल्या.तसेच वाद्यावरही त्यांचा हात सफाईने फिरे.

१९३९ ला ते कुटुंबासह कोल्हापूरला आले.१९४८ मध्ये गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत मध्यरात्री त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं.सारं कुटुंब उघड्यावर आलं.त्या आत्यंतिक वेदनेतून वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांची पहिली कविता जन्माला आली.


“ मानवते,तू विधवा झालीस ”

१९५६ मध्ये एसटीसी होऊन ते शिक्षक झाले.पुढे आयुष्यभर शिक्षकाची नोकरी केली.एकीकडे शिक्षक दुसरीकडे प्रतिभेला बहर असे फुलणे आणि फुलविणे एकाच वेळी
दोन कर्तव्यं ते पार पाडत होते.१९५६ रोजी त्यांचे पहिले गीत आकाशवाणीवर प्रसारित झाले.तसेच १९६० रोजी त्यांचे पहिले चित्रगीत प्रेक्षकांसमोर आले.पानिपतकार विश्वास पाटील,अविनाश धर्माधिकारी, विसुभाऊ बापट,दिग्विजय खानविलकर असे अनेक कर्तुत्वसंपन्न विद्यार्थी त्यांनी घडविले.सांगली आकाशवाणीसाठीही त्यांनी गाणी
लिहिली.तेव्हा संगीतकार वसंत पवार यांनी १९६२ च्या ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी त्यांना तीन लावण्या लिहिण्याची संधी दिली.


“ नाव गाव कशाला पुसता

अहो,मी आहे कोल्हापूरची

मला हो म्हणत्यात लवंगी मिरची ”

या लावणीने ते जनसामान्यांचे कवी झाले.


“ तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं


सोळावं वरीस धोक्याचं गं ”

“ कसं काय पाटील बरं हाय का

काल काय ऐकलं ते खरं हाय का ”

अशा सहज स्वाभाविक बोलल्यासारख्या लावण्या त्यांनी लिहिल्या.त्यांच्या लावण्या अधिक शृंगारसूचक असत.


“ डेरेदार बहरलं झाड,लागला पाड

पानाच्या आड खुणावतो आंबा

नका तोडू पाव्हणं जरा थांबा ”

“ या रावजी बसा भावोजी ”

“ पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ”

“ याच्या डोक्यात अक्कल पिकवा

कुनी माझ्या रायाला शानपन शिकवा ”

“ माझ्या कुलुपाची किल्ली हरवली

कोतवाल तुमी डायरीत ही केस न्हाई लिवली ”

“ मला लागली कुनाची उचकी ”

“ दिसला गं बाई दिसला ”

या लावण्यांची ही वैशिष्टये आहेत की,त्यांच्या लावणीत सोपे शब्द असत.जोडाक्षरे कमी असत.छोटया,छोटयाशा ओळी,कॅची ध्रुवपदे हा त्यांच्या लेखणीचा विशेष होता.
‘धन्य ते संताजी धनाजी’ मधील ‘बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा’ ही लावणी लय,तालाचे सौंदर्य निर्माण करते.खेबूडकरांची लावणी गुलजार,गुलछडी नसून घडीघडी नाचणारी,नखरा करणारी लावण्यवती होती.म्हणूनच ती जडवलेली,घडवलेली न वाटता उत्स्फूर्त वाटे.तमाशा हा मराठी मातीचा वारसा.लोकसंगीताचा शृंगारप्रिय आरसा.ग.दि. माडगुळकरांप्रमाणे लावणी लिहिताना आपल्या कुलीन व संस्कारी लेखणीचा आब व तोल त्यांनी सावरून धरला.आपल्या अभिजात कलात्मकतेच्या स्पर्शाने तिला अधिक उंचीवर नेऊन ठेवलं.म्हणून तर त्यांच्या लावण्या रेडीओ,टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या.आयुष्यात कधीही तमाशा न बघितलेल्या खेबूडकरांनी एकापेक्षा एक अशा फर्मास लावण्या लिहिल्या हे एक नवलच.

उत्कट भावभावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार त्यांच्या लेखणीतून साकारत गेला आणि त्यांनी मराठी गीत संगीत प्रेमीना मोहून टाकले. “अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग,आज प्रीतीला पंख हे लाभले रे,एक लाजरा न साजरा मुखडा,ऐरणीच्या देवा तुला ठिणगी,गं बाई बाई झोंबतो गारवा,चंद्र आहे साक्षीला,टाळ बोले चिपळीला,देश हा देव असे माझा,धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना,नाच गं घुमा,मी आज फुल झाले,रुणझुणत्या पाखरा,सख्या रे घायाळ मी हरिणी” यासारख्या बहुरंगी बहुढंगी गाण्यांनी रसिकांना अक्षरश: वेड लावले.

गदिमा म्हणाले,“माडगुळाकरानंतर कोण हा पेच या मुलाने पुसून टाकला.” क्षणाचाही विलंब न लावता खेबूडकर म्हणाले, “गदिमा माझ्या गुरुस्थानी आहेत.ते एक पर्वत आहेत.मी त्या पर्वताला प्रदक्षिणा घालतो आहे.अजून एकही प्रदक्षिणा पूर्ण झालेली नाही.माझ्या गुरुंची पावलं म्हणजे वाळूवरचे ठसे नाहीत.ते दगडाचे ठसे आहेत. पादुकांइतकेच ते मला पवित्र आहेत.त्या एकेक पाऊलखुणेवर काव्याचं एकेक फुल वाहात मी पुढे चाललो आहे.हा प्रवास न संपणारा आहे.” हे ऐकताच सद्गदित होत गदिमांनी त्यांना मिठी मारली.या दोन प्रतिभावंताच्या डोळ्यातून आसवांचा पाऊस आला.त्या आसवात श्रोतृसमुदाय चिंब भिजून गेला.गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मीकी पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबूडकरांनी आपल्या प्रकाशानं रसिक मनाचा दिवाणखाना उजळून टाकला.गदिमांच्या शब्दांनी मोहरलेल्या अवकाशात खेबूडकर लिहिते झाले.गुरुंचे आशीर्वाद तर त्यांनी घेतलेच पण या शिष्याने आपले वेगळेपणही जपले.

त्यांच्या बहुतेक चित्रपटांची पार्श्वभूमी ग्रामीण असल्यामुळे त्यातील गाणी ही सणांची,चालीरीतींची रूढी,परंपरेची होती.त्यात गणगवळण,सवालजबाब,भारुड,भूपाळी,विराणी, वासुदेव,कीर्तन,नागोबाची गाणी,रंगपंचमीची गाणी,गौरीची गाणी,हादग्याची-मंगळगौरीची गाणी,हळदीची,लग्नाची गाणी,मोटेवरची गाणी,कोळीगीते,धनगराची-डोंबाऱ्याची गाणी,लेझीम,शेकोटी असे अस्सल मराठी मातीचे असंख्य
गीतप्रकार होते.“बालवयात पाहिलेला व अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आला आहे.”असे ते नेहमी म्हणत.देवाने आपल्याला प्रतिभा दिली आहे,बुद्धी दिली आहे.
आपण कितीही गाणी लिहू शकतो या दैवी देणगीची त्यांना सतत जाणीव असे.

व्ही.शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा चित्रपट राम कदम व खेबूडकर यांच्या कलाजीवनाचा कळसबिंदू ठरला.“पिंजरा” साठी त्यांनी ११० गाणी तर कदम यांनी १३५ चाली बांधल्या.त्यातून शांतारामबापूंनी ११ गाणी निवडली.म्हणूनच ‘देहाची तिजोरी’ अशा गीतापासून ‘गावात होईल शोभा हे वागनं बरं नव्हं’ अशा गीतापर्यंत ते सहज लिहू शकले.श्राव्यता,गेयता,प्रस्ताविकता हे सारे गीतगुण जपून त्यांनी ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ म्हणत मुक्त भावनांना शब्दरूप दिले.तर कधी ‘आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी,देरे कान्हा चोळी-लुगडी’ असं म्हणून द्वैतातून अद्वैतात नेले.सात्विक मनाचं मोहापायी होणारं अध:पतन ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ अशा गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त केले.आपल्यावर केवळ ग्रामीणतेचा शिक्का बसू नये यासाठी सुधीर फडके यांच्याबरोबर ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ अशा सामाजिक चित्रपटांना गाणी दिली.

‘आरं आरं मानसा तू येडा का खुळा रं?,देवापुढ मानूस पालापाचोळा रं’ अशा भक्तिगीतांपासून प्रार्थना गीतापर्यंत अर्थपूर्ण गाणी लिहिली. ‘गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,
सत्यम शिवम सुंदरा’ अशा त्यांच्या प्रार्थनांना शाळेची प्रार्थना होण्याचंही भाग्य लाभलं.

ते मुळात शिक्षक असल्यानं ते गुरुपण त्यांच्या प्रबोधनपर प्रार्थनांतून व्यक्त झालं.केवळ लावणीसम्राट हे लेबल बसू नये म्हणून त्यांनी भजनं,बालगीतं,धम्मालगीतं तसंच जाहिरातीची गीतंही लिहिली.हात लावला त्या शब्दांचं सोनं केलं.भावगीतापासून भक्तीगीतापर्यंत आणि भावूक प्रेमगीतांपासून शृंगार गीतापर्यंत गीतलेखनाचे सर्व प्रकार हाताळले.कथा,पटकथा,संवाद,लघुकथा,नाटके,मालिका असा त्यांच्या कर्तुत्वाचा आलेख आहे.राम कदम,सुधीर फडके,अनंत माने,व्ही.शांताराम,वसंत पवार,सुरेश वाडकर अशा दिग्गजांबरोबर काम केलेच पण अलीकडचे संगीतकार अजय-अतुल यांच्याबरोबर केलेलं ‘मोरया-मोरया’ हे गाणं तर लोकांनी डोक्यावर घेतलं.त्यांची प्रतिभा इतकी असामान्य होती की, लेखणीतून जे निघे ते उत्कृष्ट असे.

त्यांच्या या कलाप्रवासात छानछोकी नव्हती.साधी राहणी,एस.टी.चा प्रवास, लोकसंग्रह इतका की मंत्री,राजकारणी,कलेक्टर हे जेवढे जवळचे तेवढाच तिकटीवरचा रिक्षावाला जवळचा.नेहमी संगीतकार आणि दिग्दर्शक यांच्या गराड्यातून राहून गाणी गाणे,स्क्रिप्टची चर्चा करणे वा काहीही लिहित राहणे याच दृश्यात ते दिसत.रफ आणि फेअर हा प्रकार त्यांच्याकडे नव्हताच.ते निर्व्यसनी होते.पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यावरील लावण्या लिहिण्यात ते तरबेज होते.चित्रकला,शिल्पकला यात ते रमत होते.हिंदी,उर्दू,मराठी,अवधी या भाषांचे ते जाणकार होते.कोऱ्या कागदाचे निमंत्रण यायचे,लेखणी ते स्वीकारायची आणि बघता बघता गीतगंगा वाहू लागायची.
लेखणी ही त्यांची तिसरी नाकपुडी होती.त्यांच्या लहानसर चणीच्या देहाच्या तिजोरीत प्रतिभा किती समृद्ध होती,हे अवघा महाराष्ट्र जाणतो.त्यांची गाणी म्हणजे मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव.त्यांनी स्वर्गीय गीतांची निर्मिती केली.कारण ते अष्टपैलू गीतसम्राट होते. चित्रमयता,लयींची जाणीव,भावमयता,नाट्यात्मता,प्रासंगिकता,
वर्णनपरता असे कितीतरी लेखनगुण त्यांच्या यशस्वितेच्या पाठीमागे होते.तसेच त्यांचा लोकवाडग्मयाचाही अभ्यास होता.

जगदीश खेबूडकर या सरस्वतीपुत्राला भेटण्याचे भाग्य मलाही लाभले आहे.१९७२-७३ च्या सुमारास त्यांच्या ‘रामदर्शन’ या कार्यक्रमात मला गायिका म्हणून त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘तुझा आवाज श्रीखंडासारखा आहे’ असे त्यावेळचे त्यांचे बोल माझ्यासाठी आजही प्रशस्तीपत्रं आहेत. २०१० साली माझे वडील नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा ‘कलायात्री’ हा चरित्रग्रंथ मी लिहिला.या कलायात्रीच्या प्रकाशनासाठी अध्यक्ष व पाहुणे म्हणून नामवंत मान्यवर येणार होते.पण योगायोग पहा,माझ्या तीन सन्माननीय पाहुण्यापैकी दोन पाहुणे काही अपरिहार्य कारणाने येऊ शकले नाहीत.आम्ही कुटुंबिय हवालदिल झालो.त्यावेळी मला बातमी मिळाली की,खेबूडकर आज कोल्हापुरात आहेत.मी त्यांना भेटायला गेले.त्यांनी खूप आस्थेनं माझी अडचण समजून घेतली आणि आमंत्रण पत्रिकेत नांवही नसताना या निगर्वी माणसाने ऐनवेळी येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.कलायात्रीचे प्रकाशन त्यांच्या हातून व्हायचे होते.अशा निस्वार्थी माणसाचा कृपा आशिर्वाद म्हणूनच माझ्या कलायात्री पुस्तकाला दहा पुरस्कार लाभले.ही माझी श्रद्धा आहे.

५०-५२ वर्षांच्या कारकिर्दीत साडेतीन हजार कविता,पावणे तीन हजार चित्रगीते,२५ पटकथा-संवाद,५० लघुकथा,पाच नाटके,चार दूरदर्शन मालिका,पाच मालिका गीते,चार टेलीफिल्म त्यांच्या नावावर जमा आहेत.ते तीन पिढ्यांचे लोकप्रिय कलाकार होते.४० ते ५० गायक,गायिकांनी त्यांची गाणी गायिली. जवळपास ५० संगीतकारांनी त्यांच्या गीतांना संगीत दिले.वाचकांच्या आणि नव्या पिढीच्या सोयीसाठी मूळ चित्रपटाचे नाव तसेच ठेवून ‘पटकादंबरी’ हा नवा प्रकार त्यांनी साहित्यक्षेत्रात आणला.

“शुभ बोल नाऱ्या,भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,अशीच एक रात्र होती,नेताजी पालकर,देवघर,गौरी,चंदनाची चोळी अंग अंग जाळी,फटफजिती.” अशा ८ महोत्सवी चित्रपटांच्या पटकथांचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.तसेच अक्षरपान,बकुळगंध,भक्तीचा मळा,एकतारी संगे, सडा प्राजक्ताचा,टाळ चिपळ्या.” हे त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.“मी साहित्यिक झालो माझ्या जन्माचं सार्थक झालं.” अशा भावना ठाण्याच्या साहित्य संमेलनात त्यांनी व्यक्त केल्या होत्या.


“ कागद ही माता, पेन हा पिता

लिहिलं जातं ते, बिजारोपण

स्वर,संगीताचे संस्कार ही गर्भवाढ

चित्रपटगृहात गीत प्रसूत होते

रसिक त्याला आनंदान उचलतात

ओंजारतात,गोंजारतात,घरी घेऊन जातात

त्याला ते अंगाखांद्यावर खेळवतात

‘ऐरणीच्या देवाच’ आणि इतरांचं असंच झालंय

त्यांनी त्यांना जिवापलीकडे जपलंय

जगदीश खेबूडकरला भरून पावलंय….”

असं एका मुलाखतीला उत्तर देताना खेबूडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं.चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे ११ पुरस्कार मिळाले.फाळके प्रतिष्ठान,कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार,बालगंधर्व पुरस्कार,
गदिमा पुरस्कार,कोल्हापूर भूषण,जीवनगौरव अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले.त्यांच्या अनेक चित्रपटांना गीतलेखनासाठी राज्य पुरस्कारही मिळाले.तृप्त आयुष्य
भोगून,अवीट गोडीच्या असंख्य गीतांचा खजिना रसिक श्रोत्यांसाठी ठेवून या आनंदयात्रीची “अनंत प्रतिभा” वयाच्या ८० व्या वर्षी ३ मे,२०११ रोजी अनंतात विलीन झाली.


“ आकाशी झेप घे रे पाखरा,तोडी सोन्याचा पिंजरा ”

असे अप्रतिम गाणे लिहिणारे जगदीश खेबूडकर,आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या देहाचा पिंजरा सोडून गेलं असलं तरी त्याचा धुमारा,नाद हा कायमचा राहणार आहे.हा एक अढळ स्थान असणारा तारा आहे.त्याचा प्रकाश सृष्टीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकाइतकी मोठी असलेने गदिमा नंतरचे मोठे गीतकार म्हणजे जगदीश खेबूडकर असं मी म्हणेन.

– जयश्री जयशंकर दानवे

(कोल्हापूर)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया