नाटकापेक्षा चित्रपटात काम करणं अवघड – अशोक सराफ
विख्यात अभिनेते अशोक सराफ यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्तानं पत्रकार-समीक्षक वसंत भालेकर यांनी ३५ वर्षांपूर्वी सराफ यांची घेतलेली ही मुलाखत आम्ही आज प्रसिद्ध करीत आहोत. ही मुलाखत रोहन प्रकाशनच्या ‘चंदेरी बातचीत’ या पुस्तकामधून प्रकाशित झाली होती. या मुलाखतीमध्ये सराफ यांनी आपल्या गाजलेल्या व्यक्तिरेखांमागचे कंगोरे तसेच आपल्या कलाप्रवासामधील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
——–
१९८५चा एप्रिल महिना. कोल्हापूरचा निसर्गरम्य परिसर. सकाळची वेळ. आम्ही- मी आणि ‘रसरंग’चे सहसंपादक विजय जानोरकर स्टुडिओत प्रवेश करतो. कालपरवापर्यंत येेथे प्रवेशद्वारावर ‘शांतकिरण’ अशी पाटी झळकत असलेली. पण आता तिची जागा ‘शालिनी स्टुडिओ, कोल्हापूर’ या नव्या पाटीनं घेतलेली.
शालिनी स्टुडिओत आता तसं काही उरलेलं नाही. सेटिंग्जचं साहित्य आहे आणि जागा आहे. कामगारांपासून चहापाण्यापर्यंत सारं काही बाहेरून आणून शूटिंग करायचं. स्मिता आर्टच्या ‘छक्के पज्जे’ चित्रपटाचं शूटिंग येथे सुरू होतं. दिग्दर्शक व्ही. के. नाईक यांनी अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यावरील एक महत्त्वाचा शॉट नुकताच चित्रित केलेला. दरम्यान ध्वनीमुद्रण यंत्रात बिघाड झाल्यानं पुढचं शूटिंग ठप्प झालेलं.
कोपर्यातून अशोक सराफ मिस्किल लुक देतो. आमचा मोर्चा तिकडे वळतो. आज प्रामुख्यानं त्याची भेट आणि मोकळेपणानं मुलाखत हाच या शालिनीमध्ये येण्याचा मुख्य हेतू होता ना!
अशोक सराफ एकदम खुशीत. बाविसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या बावीस चित्रपटांपैकी बरोबर निम्मे अकरा चित्रपट- त्याच्या प्रमुख भूमिका असलेले! हा या चित्रपट महोत्सवातील वेगळा विक्रमच. त्यातील ‘बहुरूपी’मधील सावळ्यानं त्याला यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळवून दिलेलं. सोबत शिवाजी गणेशन पुरस्कर मिळालेला.
गेल्या अकरा वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत यापूर्वी अशोकनं अभिनेता आणि विशेष अभिनेता म्हणून चांगला सहा वेळा हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून घेतलेला. पण यंदा त्याच्याच भूमिकांची एकमेकांशी मजेदार स्पर्धा लागलेली.
या भूमिकाही विविध प्रकारच्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’, ‘सगेसोयरे’, ‘सव्वाशेर’, ‘ठकास महाठक’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘बहुरूपी’, ‘गुलछडी’, ‘हेच माझं माहेर’, ‘श्रद्धा’, ‘नवरी मिळे नवर्याला’ आणि ‘जुगलबंदी’ हे अशोकची भूमिका असलेले या चित्रपटमहोत्सव स्पर्धेसाठी दाखल झालेले अकरा चित्रपट.
‘‘हार्दिक अभिनंदन! सरकारकडून आपला आणखी एकदा गौरव झाला!’’ आमची मुलाखत सुरू होते. अशोक सराफच्या चेहर्यावर स्मित हास्य झळकतं. तो सावरून वगैरे बसतो. मुलाखतीसाठी किंचित गंभीरही होण्याचा प्रयत्न. पण त्यात यश येत नाही आणि अशोककडून आम्ही त्याची अपेक्षाही करीत नाही. त्याच्या कलाजीवनातील यशापयशाची मनमोकळी चर्चा करणं एवढी आमची अपेक्षा. अशोकनं त्यासाठी दिलखुलासपणे बोलावं.
‘‘तुझे एकाच वेळी एवढे चित्रपट महोत्सवी स्पर्धेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ. यापूर्वी इतर कोणत्या कलावंताला असं भाग्य लाभलेलं नाही. तेव्हा यंदा सर्वोत्तम अभिनेत्याचं पारितोषिक लाभेल अशी खात्री वाटत असणारच. पण त्यापैकी कोणत्या भूमिकेबद्दल हे पारितोषिक लाभेल असं वाटत होतं?’’ आम्ही सरळ सरळ मुद्यालाच हात घालतो.
‘‘खात्रिबित्री काही नाही हं!’’ सर्वांग घुसळीत अशोक मनमोकळेपणं हसत उद्गारतो. आम्हाला आनंद होतो. कारण आता नेहमीचा खोडकर अशोक सराफ आमच्या समोर बसलाय याची पूर्ण खात्री पटते.
‘‘त्याचं काय आहे, आपण बक्षिसाची अपेक्षा करायची नि ते नाही मिळालं तर रडत, कोकलत बसायचं असंच व्हायचं असतं तेव्हा विचारच न केलेला बरा. परीक्षकांची मतं कशी भिन्न भिन्न! कोणाला काय आवडेल नि कोणाला भावेल हे सांगणं अवघडच. तरीही मला ‘बहुरूपी’मधील भाबड्या ‘सावळ्या’च्या भूमिकेबद्दल खूपच अपेक्षा होत्या. त्यामुळं माझ्या अपेक्षेप्रमाणेच निकाल लागल्यानं मला अपेक्षापूर्तीचा आनंद मिळालाय!’’
‘‘या ‘बहुरूपी’मधील या सावळ्याच्या भूमिकेचं वेगळं वैशिष्ट्य काय?’’
‘‘ती अगदी वेगळ्या प्रकृतीची आहे हेच वेगळं वैशिष्ट्य. एका साध्या भोळ्या तरुणाची ही भूमिका. सावळ्या त्याचं नाव. सावळ्या अत्यंत गरीब. दोन वेळा जेवण मिळण्याची पंचाईत, बायको अकाली निधन पावलेली. ५-६ वर्षांचं मूल. पण ते सदैव आजारी पडणारं. त्याला औषधोपचार करण्यासाठी सावळ्याजवळ पैसा नाही. एकदा मूल खूपच आजारी पडते. हा पैशासाठी दारोदार हिंडतो. पण त्याला प्रत्येक ठिकाणी नकारच मिळतो. त्याच्या डोळ्यादेखत त्याचं मूल औषधाअभावी तडफडून मरतं. एकापरी तो सर्व पाशातून मुक्त होतो.
‘‘विविध सोंगं घेऊन हसविणं, करमणूूक करणं हा त्याचा- बहुरूप्याचा- धंदा. एकदा तो पोलिस इन्स्पेक्टरचा वेष घेऊन जंगलातून हिंडत असताना एके ठिकाणी दरोडेखोर त्याला दिसतात.
त्यांनी फार मोठी चोरी केलेली असते. त्याला खराखुरा पोलिस इन्स्पेक्टर समजून ते आपल्या जवळचं पैशाचं गाठोडं तसंच तेथे टाकून पळून जातात. सावळ्या हे सारे पैसे गोळा करतो आणि गरीब मुलांना त्यातून मदत करू लागतो. आपलं मूल औषधोपचाराभावी गेलं याचं दु:ख त्याच्या पोटात असतं. त्यामुळे याला मुलाबद्दल कणव. पण चोरीचं धन पोलिसात जमा न करता त्याचा स्वत:च वापर केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक होते. तुरुंगवास घडतो.
‘‘या सर्व प्रवासात त्याच्या जीवनात, शिक्षिका असलेली एक तरुण विधवा येते. तिला एक मूल. ते पांगळं. तिला या सावळ्यांबद्दल ममत्व वाटू लागतं त्यामुळं त्याला पोलिस पकडून नेतात. तेव्हा तिचे डोेळे भरून येतात आणि याच वेळी तिच्या हातून पुस्तक खाली पडतं. त्याचं नाव असतं, ‘प्रतिक्षा’. यातून बरंच काही सूचित होतं.
‘‘तशी ती मोठी अफलातून कॉमेडी आहे, वा चार्ली-चॅपलीन छाप तिला दु:खाची किनार वगैरे आहे, वा ती हसता हसता रडविते अशातला भाग नाही. जे काही आहे ते मनाला चटका लावणारं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कोल्हापूरसारख्या ठिकाणी अनेक अडचणींना तोंड देत, ससे-रणदिवे या तरुणांनी हा वेगळा चित्रपट अवघ्या २५-२६ दिवसांचं सलग शूटिंग करून आकाराला आणला हे विशेष. मला या तरुणाचं खूप कौतुक वाटलं त्यामुळंच हा सावळ्या रंगविताना मी आनंदित झालो होतो. काही तरी वेगळं मी करीत होतो व म्हणूनच या जाणीवपूर्वक होत असलेल्या प्रयत्नाची दखल घेतली गेली पाहिजे असं मला मनापासून वाटत होतं. सरकारी पातळीवरून तसं ते मिळालं याचा जरूर आनंद झाला.’’
‘‘महोत्सवासाठी दाखल झालेल्या तुझ्या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेविषयी थोडक्यात माहिती देऊ शकतील का?’’
‘‘हो, हो, का नाही! प्रत्येक भूमिका आठवतेय. या सर्वच भूमिकांचं मूळ पाया विनोद हाच आहे. पण त्याच्या छटा वेगवेगळ्या आहेत. यापैकी ‘जुगलबंदी’ या एकाच चित्रात मी खलनायक आहे. ही भूमिका तशी चटकन प्रेमात पडावं अशीच. कागदावर तिचा चांगला ठसा उमटलेला होता. स्व. बिमल रॉय यांच्या ‘मधुमती’मधील प्राणची भूमिका आठवत असेल तर या भूमिकेची चटकन कल्पना येईल. यातही पुनर्जन्म वगैरे प्रकार आहेच. हा जुन्या काळातील संस्थानिक. पण एकूण सारा मामलाच फसलेला. ही भूमिका हवी तशी विकसित झाली नाही, त्यामुळं ती पडद्यावर परिणामशून्य ठरली. अशा वेळी श्रम वाया गेल्याचं दु:ख होतं.
‘‘ ‘कुलस्वामिनी अंबाबाई’मधील भूमिकेचा बेस कॉमेडी; पण या व्यक्तिरेखेला सहानुभूतीची झालर. तो घरजावई आहे. पत्नी कजाग आणि सासू तोंडाळ अशा कात्रीत तो सापडलेला. त्यामुळं त्या घरी नव्यानं येणार्या सुनेचा चाललेला छळ त्याला सहन होत नाही. तो तिला सहानुभूती जरूर दाखवितो; पण स्वत:च सासुरवाडीला तुकडे मोडीत पडल्यामुळं त्याचं काहीच चालत नाही. आतल्या आत धुसफुसत रहातो.
याच्या उलट ‘बिनकामाचा नवरा’मधील तुका आहे. हा नवरा महा चालू, कमालीचा इरसाल. सर्व गावाला शेंडी लावायला निघालेला. बायको महामायेचा अवतार; पण त्याच्यावर जीव टाकणारी… त्यामुळं ती बापडी राबराब राबणारी आणि हे महाशय गावभर हिंडून फुकट गिळणारे.
‘‘या दोन्ही चित्रपटात रंजनानंच माझ्या बायकोची भूमिका केलेली. महोत्सवातील चित्रपटात आमचे दोघांचे हे दोनच चित्रपट. दोन्ही भूमिकात चांगला रंग भरला. कारण रंजनाकडून उत्तम रिस्पॉन्स मिळतो. विनोद रंगायला टायमिंग महत्त्वाचं. अशा वेळी दोन कलावंतांचे सूर अचूक जुळले की जुगलबंदी हमखास रंगते.
‘‘ ‘सगे सोयरे’मध्येही रंजना होती. पण त्या चित्रपटात आमचा संबंधच आलेला नाही. या चित्रपटातील बबन्या सोनार हा देखील इरसाल नमुनाच या चित्रपटात मी बाप-बेटा अशी दुहेरी भूमिका रंगविली आहे. बाप अट्टल दारूड्या. बेटा मात्र दारुला स्पर्श करीत नाही. पण एकदा ती तोंडाला लागल्यावर तो जी धमाल उडवितो ती हसविणारी. हा बबन्या नाना हिकमती लढवून गावच्या दुष्ट इमानदाराचा आणि त्याच्या पोराचा काटा काढतो.
‘‘असा ‘बाप-बेटा’ मी निर्माते बिपिन वर्टी यांच्या ‘मायबाप’मध्ये रंगविला होता. तो चित्रपट चालला म्हणून मग त्यांनी आपल्या या ‘सगे सोयरे’मध्ये पुन्हा बाप-बेट्याच्या भूमिका मला दिल्या! बिपिन वर्टी यांचा हा ‘सगे सोयरे’ देखील चांगला चालला तेव्हा आता हीच बाप-बेट्याची परंपरा पुढं चालू राहाणार असं दिसतं.
‘‘ ‘मायबाप’चं दिग्दर्शनं सचिननं केलं होतं. या पहिल्याच चित्रपटात त्याच्या अंगच्या दिग्दर्शन-चातुर्याची उत्तम झलक दिसली होती. यावेळी ‘सव्वाशेर’ आणि ‘नवरी मिळे नवर्याला’ या दोन चित्रपटात त्याच्या दिग्दर्शनाखाली मी भूमिका केल्यात. यापैकी ‘सव्वाशेर’मध्ये माझा डबलरोल आहे. पण एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी रूपे असलेला अत्यंत हळवं तर दुसरं कमालीचं कडक. एकाच वेळी दोन वेगळ्या भूमिकांचं अचूक बेेअरिंग सांभाळून कॅमेर्यापुढं वावरणं म्हणजे कसरतच. पण तशी ती करताना आनंद वाटत होता. कारण या व्यक्तिरेखा अगदी सुस्पष्ट, रेखीव झालेल्या. सचिननं या चित्रातील रहस्य मोठ्या कुशलतेनं खेळविलं आहे. क्लायमॅक्स तर जबरदस्त. अगदी उत्कंठा वाढविणारा. विनोदाची पार्श्वभूमी ठेवूनही केवढं गंभीर वातावरण निर्माण करता येतं? हे ‘सव्वाशेर’ पाहताना अनुभवता येतं. साध्याभोळ्या दुकानदार भावाला सारे फसवितात म्हणून त्याचा लष्करी शिस्तीत वाढलेल्या कडक स्वभावाचा कॅप्टन भाऊ गावात पदार्पण करतो आणि येथूनच खरं नाट्य रंगू लागतं. शेवटी तर भावाच्या खुनाबद्दल दुसर्या भावावरच खटला भरला जातो. हा सारा भाग जितका रंजक तितकाच उत्कंठा वाढविणारा.
‘‘सचिन दिग्दर्शित ‘नवरी मिळे नवर्याला’मधील भूमिकेचा बेस कॉमेडीच आहे. संस्थानिकाचा हा खुशाल चेंडू पोरगा. बाळासाहेब त्याचं नाव. कमालीचा आळशी. कामधंदा शून्य. संस्थानिकाची पोरं अशी वागतात तसाच तो वागणारा. त्याला शिकारीचा नाद. फारसा डोक्याला ताण नसलेला हा लाइट कॉमेडी रोल.
‘‘सुषमाच्या ‘गुलछडी’मधील नायक गजाही असाच. तो रंगविताना मला विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत. मसालेदार चित्रपटातील सर्वगुणसंपन्न नाटक जसा महामानव- सुपरमॅन असतो. तसाच तो या गुलछडीतील. तो विनोदी ढंगाचा एवढंच. मातापित्याच्या खुनाचा सूड घेणं हे त्याचे ध्येय. ते साध्य करण्यासाठी प्रसंगी तो लुगडं नेसून स्त्री वेषही धारण करतो. स्त्री वेषात एक गाणंही म्हटलंय. विनोदी नटाला एकदा तरी लुगडं नेसून पडद्यावर वावरावंच लागतं. आमच्या वाट्याला या गुलछडीत लुगडं आलंच.
‘‘या ‘गुलछडी’मध्ये मी लुगडं नेसतो. तर ‘ठकास महाठक’मध्ये मी मोहन गोखलेला लुगडं नेसवितो. नाथमाधव यांच्या खूप गाजलेल्या ‘सोनेरी टोळी’ या कादंबरीवरील या चित्रपटातील राया रंगविताना मला खूप गंमत वाटली. कारण यातील राया ठकवाठकवी करताना सारखे वेष बदलीत असतो. जसा वेष तसं त्या भूमिकेचं बेअरिंग. त्यामुळे काम अवघड होतं. पण सारा चित्रपट विनोदी अंगानं खुलत फुलत गेल्यानं फारसं टेन्शन आलं नाही.
‘‘ ‘बहुरुपी’बद्दल मी मगा सांगितलंच आहे. ‘श्रद्धा’बद्दल फारसं काही सांगण्यासारखं नाही. ‘हेच माझे माहेर’ या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या चित्रपटातील माझी भूमिका मात्र सहानुभूती मिळविणारी आहे. हा आश्रित म्हणून वावरणारा, तो कन्नड भाषिक आहे आणि दोन पिढ्यात वावरणारा. म्हणजे येथेही जुगलबंदीप्रमाणे तरुण ते वृद्ध असा प्रकार आहे. पण या व्यक्तिरेखेला कथेचा मजबूत आधार आहे. संपूर्ण चित्रपटच वेगळा, कथा कसदार, त्यातील माझ्या भूमिकेचं स्थान वेगळं. कन्नड स्टाईलनं संवाद बोलल्यामुळे हशा जरूर पिकतो. पण ही लाईट कॉमेडी नव्हे.
‘‘ह्या सर्वच भूमिका तशा विनोदी आहेत पण त्यात वेगळेपणा काय आहे!’’
‘‘अशोक सराफची भूमिका ती विनोदीच असणार असं जणू ठरूनच गेलंय.
त्यामुळं भूमिका करताना त्या दृष्टीनं मर्यादा या पडणारच. तरीही मी माझी प्रत्येक भूमिका विनोदीबाजी असली तरी भूमिकेत वेगळेपणा आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. या वर्षभरात किमान डझनभर चित्रपट लागोपाठ लोकांपुढं आले. पण प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी करण्याचा प्रयत्न केल्याने माझा कामात तोचतोपणा जाणवलेला नाही. वेगळेपणा दाखवला नसता तर डझनावारी एकछाप भूमिका पाहून पब्लिकनं माझ्या नावानं नक्कीच बोबाबोंब केली असती की नाही?’’
‘‘तू राजाभाऊ परांजपे यांच्यानंतर मराठी चित्रपट विनोदाचा वेगळा ट्रॅक सुरू केला आहेस असं म्हटलं जातं हे मान्य आहे का? त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत का?’’
‘‘त्या थोर कलावंताशी मी माझी बरोबरी मुळीच करू इच्छित नाही. मराठी पडद्यावर राजाभाऊ गोसावी व दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ला लाभलेल्या यशानंतर विनोदी चित्रपटाची एक वेगळीच मालिका निर्माण झाली. दादांच्या ‘पांडू हवालदार’नंच मला सर्वप्रथम विनोदी नट म्हणून पदड्यावर आणलं व गाजविलं. त्यांच्या ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्यानं मला खूप नाव मिळवून दिलं पण मी कधी स्वत:ला टाईप होऊ दिलं नाही. की स्वत:ची विशिष्ट इमेजही मी बनविली नाही. आपल्या कामात ताजेपणा यावा म्हणून विनोदाचे वेगवेगळे प्रकारही हाताळतोय. केवळ फर्सिकल, कॉमेडीवरच मी थांबलेलो नाही. माझे ‘गोंधळात गोंधळ’, ‘बिनकामाचा नवरा’ आणि ‘अरे संसार संसार’सारखे चित्रपट ज्यांनी पाहिले आहेत त्यांना माझ्या या विधानाची सत्यता निश्चित पटेल.
‘‘अनेकदा मी माझ्या वेषभूषेत वेगळेपणा आणला आहे. हावभावाचा योग्य त्या जागी उपयोग केलाय. ‘अरे संसार संसार’मध्ये मी धनलोभी, स्त्रीलंपट सावकार रंगविताना स्त्री पाहताच डोळा उडविला आहे, ओठांवरून जीभ फिरविली आहे, तोंडाला पाणी सुटण्याचं भासविण्यासाठी. नायिकेवर त्याचा डोळा. ती आपल्या पलंगावर यावी ही त्याची जबर इच्छा. दोघंही जख्खड म्हातारी होतात, पण त्याची इच्छा काही पूर्ण होत नाही की त्याची तिच्याविषयीची आसक्तीही कमी होत नाही. त्यामुळं शेवटपर्यंत तिला पाहिलं की त्याचा डोळा फडफडतोच, ओठावरून जीभ फिरू लागतेच.
‘‘याबाबतची एक गंमत सांगतो. ‘अरे संसार संसार’ पुण्यात प्रदर्शित झाल्यानंतर पुण्याच्या एका चित्रपट समीक्षकानं ह्या हावभावाबद्दल मला विचारलं. मी या सार्याच्या सविस्तर खुलासा करताना तो सावकार हताश, निराश कसा झालाय व त्यातूनच पेटलाय हेच मला दाखवायचं होतं हे त्या चित्रपटसमीक्षकाला मी सांगितलं.’
‘‘मग त्यात काय आहे? पहिल्या दृश्यात तसं एकदा दाखवून एस्टॅब्लिश केलं म्हणजे झालं!’’ तो चटकन उद्गारला.
मी कपाळाला हात लावला. म्हणजे एखादं पात्र लंगडं असेल तर पहिल्या दृश्यात त्याला लंगडताना दाखविलं की बस्स. पुढं संपूर्ण चित्रपटात प्रेक्षकांनी समजायचं की हा लंगडा आहे म्हणून, अशातलाच हा प्रकार!’’
‘‘तुझी लोकप्रियता पाहून, तुला डोळ्यांसमोर ठेवून भूमिका लिहिल्या जातात असं लक्षात येतं का?’’
‘‘जात असाव्यात! मला यंदा राजमान्यता मिळवून देणारा ‘बहुरुपी’ मला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिला गेला. एखादा कलावंत डोळ्यासमोर ठेवून जेव्हा एखादी व्यक्तिरेखा आकार घेते, तेव्हा त्या कलावंताला निश्चितच भरपूर वाव मिळतो. पण त्याचबरोबर त्याच्यावर जबाबदारीही तेवढीच पडते. ‘गोष्ट धमाल नाम्याची’ लिहून पूर्ण झाल्यानंतर निर्माते गिरीश घाणेकर मला म्हणाले, ‘अशोक हा नाम्या, म्हणजे तूच बरं का! तुलाच डोळ्यासमोर ठेवून त्याला सारी ट्रिटमेंट दिलीय!’’
‘‘पण हा नाम्या, हसरा, नाचरा होता. तू डान्स वगैरे केलाय. त्यासाठी काही खास शिक्षण!’’
‘‘नाही, तसं काही खास शिक्षण नाही घेतलं. पण मला र्हिदमचा सेन्स आहे. अशा नृत्यांच्या वेळी त्याचा चांगला उपयोग होतो. मला गाण्याचंही अंग आहे. मी अगदीच बेसूरा नाही. रंगभूमीवर फाल्गुनराव, लक्ष्मीधर, शिष्यवर आदी रंगविताना त्यांची गाणी मी गात असे. ‘मदनाची मंजिरी’मध्ये मी ठणकावून गात असे. अलिकडे ‘सगेसोयरे’मध्ये मी गायलो नाही. गाण्यासाठी आधी तालीम वगैरे तयारी हवी; पण त्यात काही कडवी सुरात म्हटली आहेत.’’
‘‘विनोदी नट म्हणून पब्लिकमध्ये जी इमेज निर्माण झालीय तिचा पडद्याबाहेर काय अनुभव येतो?’
‘‘लोकांना मी विनोदी आहे असंच वाटतं. पण मी मुळात तसा नाही हो! मी अगदी गंभीर प्रकृतीचा कलावंत आहे. खाजगी जीवनात लोकांना हसविणं मला मुळीच जमत नाही. त्यामुळं मी कुठं भाषणबिषण करायला जात नाही. लिहिलेले संवाद बोलून लोकांना हसविणं एवढंच मी जाणतो. पण लोक माझ्याकडून भलतीच अपेक्षा करतात. भाषणातही विनोदी किस्से सांगून मी त्यांना हसवावं असं त्यांना वाटतं. मला ते मुळीच जमत नाही. हजारो लोकांसमोर मी विनोदी भाषण करू शकणार नाही. ती वेगळीच कला आहे.’’
‘‘अनेकदा मी हास्यास्पद होतो. आता मी लोकांत फारसा मिसळत नाही. पण चित्रपट, नाटक आणि स्टेट बँकेतील नोकरी असे चालू होते तेव्हा असे चकित वा खजील होण्याचे प्रकार अनेकदा घडलेत.
‘‘असाच एकदा मी मुंबईहून कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसने शूटिंगला चाललो होतो. मी जनता डब्यात होतो. माझा ‘पांडू हवालदार’ चित्रपट तेव्हा गाजून गेला होता. डब्यात मला पाहून काही जणांत कुजबुज सुरू झाली. त्यात एक रेल्वेपोलिसही होता. त्यानंच थोड्या वेळानं मला विचारलं, ‘‘तुम्ही पांडू हवालदारमधील सखाराम हवालदार बनलेले अशोक सराफ ना?’’ मी स्मितहास्य करीत होकारार्थी मान हलवली.
मनातून मी भलताच खूष झालो होतो. त्यानं मग इतरांना मी मोठा नट वगैरे असल्याचं सांगितलं. कौतुकाच्या चार नजरा माझ्यावर खिळल्या.
‘‘त्यानं मग आपल्या शेजारी बसलेल्या दुसर्या पोलिसाला म्हटलं, ‘अरे हे पांडू हवालदारमधले अशोक सराफ! ओळखलं की नाही यांना?
‘‘मी केव्हाच ओळखलं. पण हा एवढा मोठा नट असा जनता क्लासमधून प्रवास करील असं नव्हतं वाटलं!’ तो चेहरा गंभीर करीत उद्गारला मात्र, मी पार खलास झालो. तोंड दुसरीकडे फिरवून त्यावर चादर ओढली नि झोपी गेलो. त्यानंतर पुन्हा म्हणून जनता क्लासमधून प्रवास केला नाही.
‘‘असाच आणखी एक प्रसंग. मी तेव्हा स्टेट बँकेत नोकरी करीत होतो. माझे दोन-चार चित्रपट पडद्यावर झळकले होते. मी ताडदेवला भाटिया इस्पितळाजवळ राहतो. अशाच सकाळी कामावर जाण्यासाठी बस पकडली. गर्दी असल्यामुळं उभं राहूनच प्रवास करीत होतो. एका प्रवाशानं माझ्याकडे पाहिलं. पुन: पुन्हा पाहिलं आणि काहीशा मोठ्यानंच म्हणाला, ‘अरेरे! काय हा मराठी सिनेनटाची अवस्था!’ तेव्हा माझी अवस्था खरोखर दयनीय झाली होती. पुढच्याच स्टॉपवर मी निमूटपणे बसमधून खाली उतरलो.’’
‘‘अशोक, तुझ्या भूमिकांतील तुला आवडलेले विनोदी प्रसंग सांग ना!’’
‘‘पांडू हवालदारमधील बेरक्या सखाराम हवालदारनं मला एकदम प्रसिद्धीच्या झोतात आणलं. तसा हा सखाराम हवालदार या चित्रातला खलनायक. नाना उचापती करून पैसे खाणारा. अनेक वस्तू घरात आणणारा. मासळी, कोंबडीवरही तो राजी होणारा. हातात कोंबडी हलवीत होणारी त्याची एंट्रीच भरपेट हसवणारी.
‘‘ ‘गुपचुप गुपचुप’मधील प्रोफेसर धोंड हादेखील असाच एक नमुना. तो गरीब, लाचार वगैरे नव्हे. तसा विद्वान. गोव्याचा सारस्वत. मधूनच ‘किन्या गो’ म्हणून कोकणीत हेल काढणारा आणि दोन्ही हाताच्या कोपरांनी खाली सरकणारी पँट सारखी वर करणारा. तो रावसाहेबांच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती त्याची विद्यार्थिनी. ती सांगेल तसं मग तो वागू लागतो. तिला खूष करण्याचा एकही प्रसंग हा भाबडा जीव वाया दवडीत नाही. त्यातूनच मग विनोद निर्माण होतो. एकदा तर धोंडमहाशय चक्क लोकमान्य टिळकांचा वेष करून कॉलेजात प्रवेश करतात. दुसर्या एका प्रसंगी तो रोमियोचा वेष करून येतो.
‘‘ती सांगते म्हणून, तिला आवडतं म्हणून तो हे सारे विदूषकी चाळे करतो, पण त्यामागं आचरटपणा नसतो तर तिच्यावरील नित्सिम प्रेमाखातरच तो हे सारं भक्तिभावानं करत असतो, पण त्यातून निर्माण होणारा विनोद पोटभर हसवितो.
‘‘आता ‘एक डाव भूताचा’मधील खंडोजीचंच उदाहरण घ्या ना. हे खरं तर भूत; पण ते कुणीही प्रेम करावं असंच. प्रेमळ भूत हा शापित आत्मा.
‘‘या खंडोजीमुळं भुताबद्दल या भयावह अशा सार्या कल्पनाच नष्ट होतात. हे भूत भाबड्या मास्तरला भेटते. ते फक्त त्याच्याशी बोलते. त्याच्यावर रागावतं. हट्ट धरतं, रुसतं, फुगतं, त्याच्या चक्क शाळेतही जाऊन बसतं. त्याच्याबरोबर गाणंही म्हणते. अर्थात पेटी वाजविताना कुठलंही गाणं ते पोवाड्याच्याच चालीत गातं. कारण शिवकालीन भूत. तेव्हा त्याला पोवाडा तेवढा ठाऊक.
‘‘कल्पना करा, एका मास्तराला दिसणारं एक ‘अदृश्य भूत’ मग ते केवढी धमाल करीत असेल! मात्र हा खंडोजी म्हणूनच ‘खूप’ आवडला. त्यानं गाण्यात उडविलेली धमाल भरपूर हसविणारी. पण त्यातही भूत शाळेत जातं आणि पेटी घेऊन गायला बसतं हे प्रसंग तर पोट दुखेपर्यंत हसवितात.’’
‘‘अशोक, आता तुझ्याबद्दल थोडक्यात माहिती दे बघू.’’
‘‘थोडक्यात कशाला, संपूर्णच सांगतो- माझं नाव अशोक लक्ष्मण सराफ. जन्मदिन ४ जून. गिरगावच्या ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेतून डी.जी.टी. हास्कूलमधून मी शालांत परीक्षेपर्यंत शिकल्यानंतर पुढं ‘विल्सन कॉलेज’मध्ये गेलो. तेथे बी.ए. पर्यंत मजल मारली.
‘‘मी रांगायला लागलो तोच मुळी रंगमंचावर. माझे मामा गोपीनाथ सावकार यांची स्वत:ची नाटक कंपनी असल्यामुळे मी बालपणापासूनच या नाटकाच्या वातावरणात वाढलो. ‘मी प्रथम भूमिका केली ती विनोदीच होती. तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. स्पर्धेसाठी आम्ही तेव्हा एकांकिका बसविली होती. मला चक्क बक्षीस मिळालं. एक रौप्यपदक! अजून जपून ठेवलंय. म्हणजे रंगभूमीवर अस्मादिकांनी पहिल्याच पदार्पणात अभिनयाचं बक्षीस मिळवलं! त्यानंतर दोन वर्षांनी तर महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतच मी उभा राहिलो. मामांनी या स्पर्धेसाठी ‘संशयकल्लोळ’ नाटक बसविलं होतं. मी त्यात नोकराची भूमिका केली. आमचा उत्साह दांडगा. मामांची पाठ सोडायची नाही. म्हणजे अक्षरश: मामांचा हात धरूनच मी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं.
‘‘शाळेत तर धमालच केली. शाळेच्या गॅदरिंगमध्ये आम्ही पुुढं. मग नाटक असो, वैचित्यपूर्ण वेषभूषा म्हणजे आपली फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती. अर्थात माझा त्यात भाग होताच. मी तेव्हा कुष्ठरोगी बनलो होतो. मेकअप वगैरे करू. हुबेहुब महारोगी. शाळेतला दुसरा एक मुलगा बनला होता साईबाबा. म्हणजे मला जोरदार स्पर्धकच. तो नक्कीच बक्षीस मिळवणार. शाळेच्या शेजारीच साईबाबांचे मोठे मंदीर. तेव्हा काहीतरी शक्कल लढवायला हवी होती.
‘‘खूप वेळ डोकं खाजवलं तेव्हा डोक्यात एक आयडिया आली. त्यानं स्टेजपर एंट्री केली आणि त्याचे साईबाबा मागच्या पडद्याला पाठ लावून अगदी स्थिर राहिले. मी संधी साधून हळूच पडद्याच्या पाठच्या बाजूला गेलो. मनोमन साईबाबांना नमस्कार केला. दर्शनी पडदा उघडला मात्र. मी मागून साईबाबांना जोरात चिमटा काढला. त्यासाठी तर त्यांना अगोदर नमस्कार करून त्यांची क्षमा माहितली होती.
‘‘आपण साईबाबा आहोत हे ते पोरगं विसरून गेलं. आणि ‘ओय ओय’ करीत कोकललं तेव्हा मलाच बक्षीस मिळालं. पण साईबाबाशपथ सांगतो त्यानंतरची बक्षीसं मिळविताना अशा काही शक्कल लढविलेली नाही. नेहमीच काही चिमटा उपयोगी पडत नाही.
‘‘तसे शाळेत मी अनंत उपद्व्याप केले. आमचे प्रिन्सिपॉल दातार सर यांच्या आवाजाची तर मी हुबेहुब नक्कल करायचो. लोकांचे आवाज काढायची किमया मला उपजतच अवगत झाली होती म्हणा ना.
‘‘एकदा काय झालं आमच्या वर्ग शिक्षकांना आम्हाला शिकवायचा कंटाळा आला होता, की हातातलं पुस्तक वाचून संपवायचं होतं की काय नकळे! पण त्यांनी आम्हाला बरेच प्रश्न सोडवायला दिले आणि स्वत: खुर्चीत ऐसपैस बसले पुस्तक वाचीत.
‘‘मी नेहमीच मागच्या बाकावर बसे. मला आली हुक्की काहीतरी गम्मत करायची. मी दातार सरांच्या आवाजात किंचित मोठ्यानंच काहीतरी बोललो मात्र. मास्तरांनी खुर्चीवरून टुणकन उडी मारली. त्यांची त्यावेळी अशी काही तारांबळ उडाली, विचारू नका.’’ अशोक आजही खळखळून हसला. अंग घुसळीत. ‘‘कॉलेजमधेही असेच पराक्रम गाजविले असणार?’’ मी म्हणालो.
‘‘गाजवले तर. पण तेथे आंतरकॉलेज नाट्यस्पर्धाच विशेष गाजवल्या. याच काळात मी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. तेव्हा मामांच्याच नाट्यसंस्थेचं ते नाटक. त्यात मी सर्वप्रथम विदूषक रंगविला. दीडशे प्रयोगात मी काम केलं. याच काळात मी ‘आय.एन.टी.’च्या ‘म्हातारा न इतुका’ या नाटकात इब्लिस, बिलंदर म्हातारा रंगविला.
‘‘१९६८ साली मी स्टेट बँकेत नोकरीला लागलो. त्यानंतर काही वर्षे आंतरबँक नाट्यस्पर्धा आम्ही अक्षरश: गाजविल्या. येथेच नट नाटककार रमेश पवार मला भेटला. पहिल्या वर्षी आम्ही सादर केलेली ‘एकदा’ ही एकांकिका साफ कोसळली. पण त्यानंतर आम्ही कधी बक्षीस सोडलं नाही.
‘‘या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये प्रारंभी इमानेइतबारे नोकरी केली. कारण मी तोंडाला रंग लावून नाटकातून वगैरे कामं करावी हे घरच्या मंडळीना पसंत नव्हते. चांगली नोकरी धरावी आणि फावल्या वेळात हे नाटक, सिनेमाचे रंगढंग करावेत असा त्यांचा पोक्त सल्ला. पण पुढे हेच रंगढंग अधिक वाढले आणि बँकेची नोकरी गौण ठरली. त्यामुळं बँकेकडून हातात नारळ मिळण्यापूर्वीच मी सन्मानानं बँकेतून बाहेर पडलो. म्हणजे बँकेतल्याच माझ्यावर प्रेम करण्यार्या अधिकारी मंडळींनी हळूच मला कानमंत्र दिला, ‘अशोक, नाहीतरी आम्ही तुला कामावरून काढून टाकणारच आहोत. त्यापेक्षा तूच बँकेला सोडचिठ्ठी देलीस तर झाकली मूठ’… मी काय समजायचं ते समजलो.
‘‘व्यावसायिक रंगभूमीवरील माझं पहिलं मोठं नाटक म्हणजे ‘हिमालयाची सावली’. १९७२ साली हे नाटक रंगभूमीवर आलं. त्यात मी बयोच्या भावाची भूमिका केली होती. भूमिका तशी छोटीच. पण लोकांच्या लक्षात रहावी अशी वैशिष्ट्यपूर्ण होती. ती तद्दन विनोदी नव्हती. पण मनापासून प्रेम करावी अशी लोभसवाणी व्यक्तिरेखा होती. पुढं अशा अनेक व्यक्तिरेखा मी रंगमंचावर रंगविल्या. त्याची ही सुरुवात होती.
‘‘व्यावसायिक रंगभूमीवर माझी अशी उमेदवारी चालू असतानाच मला गजानन जहागिरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात सॅनेटरी इन्स्पेक्टरची भूमिका मिळाली आणि १९७१ साली मी रुपेरी पडद्यावर झळकलो. हा सॅनेटरी इन्स्पेक्टर तसा फार वेळ पडद्यावर दिसत नाही. पण दिसतो तेवढा वेळ धमाल करून सोडतो. त्यामुळं मला वाटलं आपण विनोदीच भूमिका कराव्यात. त्या आपल्याला जमतील. माझी तेव्हाची काहीशी लठ्ठ शरीरप्रकृती तरीही त्यातील लवचिकपणा आणि शब्द फेकीतील विशिष्ठ ढब यामुळे मी तेव्हा रंगभूमीवर फाल्गुनराव वगैरे रंगवून हसे वसून करू लागलो होतो. हा सॅनेटरी इन्स्पेक्टर रंगविताना मला त्याचा चांगला उपयोग झाला.
‘‘पण या सॅनेटरी इन्स्पेक्टरानं मात्र चित्रपटसृष्टीचा दरवाजा नाही उघडून दिला. त्यानंतर चार-पाच वर्षे मी कॅमेर्यापुढं आलोच नाही. नाटकं आणि नोकरी एवढंच चालू होतं. माझ्या तकदीरचा दरवाजा खुला केला तो दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील बेरक्या सखाराम हवालदारानं.
‘‘१९७४ सालात हा सखाराम मला भेटला आणि १९७५च्या मे महिन्यात तो लोकांच्या भेटीस आला. या पहिल्याच भूमिकेनं मी लोकप्रिय झालो. तेराव्या महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात मला विशेष अभिनेत्याचं पारितोषिकही मिळाले. त्यानंतर ‘गोंधळात गोंधळ’ आणि ‘एक डाव भुतचा’ या दोन चित्रपटांनी मला हा महारा×ष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला. तर ‘बाईलवेडा’ व ‘बहुरुपी’ या चित्रपटांच्या भूमिका सर्वोत्कृष्ट ठरल्या. सर्वोत्तम अभिनेत्याबरोबर शिवाजी गणेशन पारितोषिकही मला त्यामुळं मिळालं. ही पारितोषिकं व फिल्म फेअरचें ऍवॉर्ड धरून मला एकूण नऊ पारितोषिकं मिळाली आहेत.
‘‘पांडू हवालदारनंतर दादा कोंडके यांनी मला आपल्या ‘राम राम गंगाराम’मध्ये म्हमद्या खाटकाची भूमिका दिली आणि माझं कलाजीवन एकदम उजळून टाकलं. कारण हा म्हमद्या इतका गाजला की मला रस्त्यानंही लोक म्हमद्या खाटीक म्हणूनच ओळखू लागले. दादांच्या ‘तुमचं आमचं जमलं’मध्ये मी नागोजी हा तद्दन खलनायक रंगविला.
‘‘येथूनच माझी चित्रपट कारकिर्द जोरात सुरू झाली. या एका तपात मी नायक, खलनायक, विनोदी अशा ऐंशीहून अधिक चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपट वगैरे जमेला धरून माझं चित्रपटांचं शतक नक्कीच झळकलंय. ‘पांडू हवालदार’, ‘रामराम गंगाराम’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘एक डाव भुताचा’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘ठकास महाठक’, ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘सगेसोयरे’, ‘नवरी मिळे नवर्याला’, ‘गुलछडी’, ‘खिचडी’, ‘धुमधडाका’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’ आणि ‘अरे संसार संसार’ आदी चित्रपटांतील भूमिका चांगल्या गाजल्या आहेत.
‘‘१९७२ सालापासून मी व्यावसायिक रंगभमीवर सातत्यानं वावरत आलो. १९७९ साली नाटकातून कामं करणं बंद केलं आणि चित्रपटावरच सारं लक्ष केंद्रित केलं. या अवधीत ‘हिमालयाची सावली’, ‘डालिंग, डार्लिंग’, ‘हमिदाबाईची कोठी’ अशी माझी नाटकं रंगभूमीवर खूप गाजली. ‘ययाती देवयानी’मधील विदूषक, ‘विद्याहरण’ मधील शिष्यवर, ‘संशयकल्लोळ’मधील फाल्गुनराव आणि ‘मानापमान’मधील लक्ष्मीधर रंगभूमीवर रंगवीत असताना त्याची पदंही मी म्हणत असे. मी गायक नाही, पण गाण्याचं अंग आहे. या पदांना मी अनेकदा टाळी घेतलीय. गाणं बंद करण्याबद्दल नव्हे, ती चांगली गायल्याबद्दल. अलिकडे मी निर्माता बिपीन वर्टी यांच्या आग्रहावरून त्यांच्या ‘सगेसोयरे’ या चित्रपटात गायलोय. त्याला संगीत दिलं होतं अनिल-अरुण
यांनी
‘‘मला लाइट कलर विशेष आवडतात. किंचित फिकट रंगाचे कपडे मी अधिक पसंत करतो मात्र ते विविध स्टाइलचे असतात. माझ्या गाडीचा रंग लाइट मिरची आहे. गोड पदार्थ मला विशेष आवडत नाहीत. तिखट पदार्थ मी आवडीनं खातो. सारस्वत असल्यामुळं मासे विशेष आवडीचे. पण आताशा तोंडावर खूपच ताबा ठेवावा लागलोय. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वच आघाडींच्या नायिकांबरोबर मी कामं केली आहेत. ती गाजलीही आहेत. तरीही रंजनाबरोबर माझी चांगलीच जोडी जमली आणि गाजलीही. आम्हा दोघांचे सूर विशेष जुळले आहेत. एकमेकांबद्दल आम्हाला चांगलंच अंडरस्टँडिंग आहे. अलिकडच्या काळात रंजनासारखी सर्वांगिण तयारीची, अभिनयाची जबरदस्त ताकद असलेली अभिनेत्री शोधून सापडणार नाही. तिच्याबरोबर माझी जोडी जमली हे मी माझं भाग्यच समजतो.
‘‘आता मी हिंदी चित्रपटातूनही कामं करू लागलोय. थेट मद्रासपर्यंत पोहोचलोय. कल्पतरू दिग्दर्शित ‘घरद्वार’ हे माझं हिंदी चित्र विशेष चालल्यामुळं मुंबईला हिंदी चित्रपटसृष्टीत आता मला चांगलं स्थान मिळालंय. दूरदर्शन चित्रमालिकांतून मी आता लोकप्रिय झालोय, बस्स? की आणखी काही?’’ अशोकनंच उलट सवाल केला.
‘‘अशोक, तुला आता नाटकातून कामं करावी असं वाटत नाही.’’- मी.
‘‘वाटतं तर. रंगभूमीचं आकर्षण कधीच कमी होणार नाही. पण नाटकांपेक्षा चित्रपटात काम करणं अधिक अवघड आहे. चित्रपटात सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे भूमिकेचं बेअरिंग. नाटकात एकदा एका भूमिकेचा मूड पकडला की एका झटक्यात साडेतीन तासात नाटक पार पडतं. पण चित्रपटाचं मात्र तसं नसतं. येथे काळा वेळाचं काहीच बंधन नसतं. त्यामुळं भूमिकेचं बेअरिंग लक्षात ठेऊन मान राखून काम करावं लागतं. त्या प्रसंगाशी त्या त्या मूडप्रमणं एकरूप व्हावं लागतं आणि ते खरं अवघड असतं.’’
‘‘अशोक, तुझ्या उमेदवारीच्या काळात तुला बसमध्ये, रेल्वेच्या डब्यात इरसाल प्रेक्षक भेटले, तसे पुढे खूप लोकप्रिय झाल्यावरही भेटले असतीलच की नाही?’’
‘‘भेटतात ना. इरसाल प्रेक्षकही भेटतात आणि सुहृदय चाहतेदेखील. ‘अरे संसार संसार’मधील माझा डँबीस स्त्रीलंपट सावकार, लोकांपुढं आल्यावर लोकांनी जोड्यानीच भाषा सुरु केली. ‘तुमचं आमचं जमलं’मधील माझा नागोजीही खलनायक. हा सावकार म्हणजे दुष्टपणाचा अर्कच. मसणात गवर्या गेल्या तरी त्यानं डूक नाही सोडला. तो रत्नाला छळतच राहिला. तिची सत्तरी उलटली तरी तिला आपल्या शेजेची सोबतीण करायची त्याची अभिलाषा काही संपुष्टात येत नाही. मग ‘मेल्याला जोड्यानंच हाणायला हवं.’ असं लोकांनी म्हटलं तर बिघडलं कुठं? नशीब आमचं, आम्ही त्याच्या तावडीत सापडलो नाही. अर्थात त्यांचे जोडेच फाटले असते आमच्या टकुर्यावर हाणून हा भाग वेगळा.
‘‘या दृष्टीनं ‘गोंधळात गोंधळ’मधला पॅण्टवाला हा देखील एक अर्कच. नाटक कंपनीच्या रंगपटात इस्त्री ़िफरवणारा हा मदन्या बाहेर मात्र आव आणतो हिरोचा. आणि एके दिवशी तो अचानक हिरो बनतोही. हा मदन मध्यंतरी पँटवाला म्हणून चांगलाच पॉप्युलर झाला होता. सांगलीची गावरान मंगला, गोव्याच्या शांता दुर्गाच्या देवळात त्याला अचानक भेटते आणि ‘अहो, पँटवाले’ म्हणून साद घालते. परिणामी पुढं बरेच दिवस मी पँन्टवाला झालो होतो.
‘‘एक गंमत सांगतो. असाच मी पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावर उभा होतो. आताशा गाडीबाहेर पडणंही कठीणच. पण त्या दिवशी खुल्या हवेत उभा होतो खरा.
‘‘अहो पँटवाले! इथं का उभे? मंगलाची वाट बघता की काय? फुटपायरीवरून जाणार्या दोघा कॉलेजकुमारीपैकी एकीनं सहज म्हटलं आणि मी उडालोच.
‘‘पण ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्याच्या संदर्भातला किस्सा तर खूपच मजेदार. हा किस्सा आहे श्रीरामपूरचा. मी तेव्हा ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या नाटकात मामाची भूमिका करीत असे.
‘‘नाटकाचा प्रयोग ऐन रंगात आला असतानाच नऊ-दहा खाटिक नाट्यगृहात शिरले. सर्वजण लुंगीत होते. अंगात एक गंजीफ्रॉक. त्यावर रक्ताचे असंख्य डाग. पाच पंचवीस माना उडवून ते थेट नाट्यगृहात आले होते. हे त्यांच्या एकूण अवतारावून सहज लक्षात येत होतं. त्यांच्या हातात सुरे नव्हते इतकंच.
‘‘ते आले ते माझा तपास करीत. माझ्या नावानं हाका मारीत. का माहीत आहे?
माझा त्यांना जाहीर सत्कार करायचा होता. मी त्यांच्याच व्यवसायातला म्हणून! माझ्या म्हमद्या खाटकाची ही करामत. अंकाचा पडदा पडल्यावर त्यांना रंगमंचावर सर्वांसमोर आणणंच भाग पडलं. रक्तानं माखलेल्या अंगानंच ते रंगमंचावर आले. त्यांच्यातील एकानं जोरदार भाषण ठोकलं आणि सार्यांनी माझ्या गळ्यात हार घातले. हा म्हमद्या खाटीक तेव्हा निमूटपणे हार घेण्यासाठी मान वाकवून उभा होता. कसायापुढं गाय मान वाकवते ना! अगदी तसाच.’’ अशोकनं आताही तशीच मान वाकवली होती आणि हात जोडले होते आमचा निरोप घेण्यासाठी!
– वसंत भालेकर
(सौजन्य ः रोहन प्रकाशन)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया