अतिथी कट्टा

दिनांक : १४-०७-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌मराठी चित्रपटांना प्राइम स्लॉट मिळायला हवा – विक्रम फडणीस




प्रसिद्ध फॅशन डिझायनर-दिग्दर्शक विक्रम फडणीस ‘हृदयांतर’ या चित्रपटानंतर ‘स्माइल प्लीज’ हा दुसरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. येत्या १९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यानिमित्तानं त्यांचं हे मनोगत.

——

आपली स्वप्नं काही असू शकतात, आपल्या महत्त्वाकांक्षासुद्धा काही असू शकतात. परंतु, स्वप्नपूर्ती किंवा महत्त्वाकांक्षापूर्ती करायची असेल तर तशी तगडी टीम तुमच्याकडे असायला हवी. ती असेल तरच तुम्हाला जो रिझल्ट अपेक्षित आहे तो मिळतो. ‘स्माइल प्लीज’च्या रूपानं मला सगळं हवं ते मिळालं. उल्लेखनीय बाब म्हणजे १ मार्चला आम्ही या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आणि आता आम्ही हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित करतोय. त्यावरून रसिकांच्या लक्षात येईल की किती नेमकेपणानं आमचं या चित्रपटावर काम झालं ते. त्यामुळेच माझ्या या टीमचा मला प्रचंड अभिमान आहे.

दिग्दर्शकासाठी प्रत्येक दिवस हा एक शिकण्याची प्रक्रिया असते, असं मला तरी वाटतं. हा माझा दुसरा चित्रपट असला तरी ‘स्माइल प्लीज’ हा आपला पहिलाच चित्रपट आहे, असं समजून मी या चित्रपटावर काम केलं. त्यामागचं कारण म्हणजे मी ज्या फॅशन इंडस्ट्रीमधून आलोय तिथं तुम्ही काल काय चांगलं केलं याला फारशी किंमत नसते. तुम्ही आज केलंय नि करताय हे अधिक महत्त्वाचं असतं. म्हणूनच माझ्यासाठी प्रत्येक नवीन चित्रपट ही नवीन सुरुवात असते. ‘हृदयांतर’ संपवली नि लगेचच मी स्माइल प्लीज चित्रपट सुरू केला. ‘हृदयांतर’च्या आठवणी सोबत ठेवून मी हा चित्रपट सुरू केला. पण ‘स्माइल प्लीज’चा प्रवास हा स्वतंत्र नि वेगळासुद्धा आहे. या प्रवासात मला प्रसाद ओक तसेच इतर अनेकांकडून खूप काही शिकायला मिळालं. या चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका करणाऱ्या वेदश्रीकडूनही मी बरंच काही शिकलो. थोडक्यात मी ‘हृदयांतर’कडून खूप काही शिकत ‘स्माइल प्लीज’ केला. नि ‘स्माइल प्लीज’कडून खूप काही शिकत मी पुढची फिल्म करीन.

शिकण्याची माझी ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहील. ‘स्माइल प्लीज’चा कॉश्च्युम डिझायनर म्हणून माझं नाव येणार असलं तरी त्याचं क्रेडिट माझ्या सगळ्या टीमचं आहे. मी त्यांना केवळ मला काय हवंय एवढंच सांगितलं होतं, बाकी मी दिग्दर्शनात व्यग्र असल्यामुळे त्या टीमनं पुढील सगळं छान पद्धतीनं साकारलं. बॉस्कोनं या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तो हिंदी चित्रपटांमध्ये खूप व्यग्र असतो. मी त्याला माझ्या मराठी चित्रपटाबद्दल विचारलं तेव्हा त्यानं मला कोणती तारीख तुझ्या मनात आहे हे विचारलं. त्या तारखेला तो मुंबईत असेल तर नक्की आपण एकत्र काम करूया असं तो म्हणाला.

‘स्माइल प्लीज’ हा एक स्ट्रगल आहे. मोबाईल फोन किंवा कॅमेरा कोणासमोर धरला की आपण त्याला किंवा तिला ‘स्माइल प्लीज’ असं म्हणतो. थोडक्यात तसं पाहायला गेलं तर ‘स्माइल प्लीज’ हा अगदी कॅज्युअल शब्द आहे. परंतु त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही. या चित्रपटामधून मला हेच सांगायचं की स्माइल प्लीज हा शब्द आपण एका फोटोसाठी किंवा लेन्ससाठी वापरलेला नाही. ‘स्माइल प्लीज’ हा स्ट्रगल आहे. हा संघर्ष मानसिक, शारीरिकही असू शकतो. परंतु, अशाप्रकारच्या संघर्षातून जाणाऱ्यांना जर का तुम्ही ‘स्माइल प्लीज’ हा शब्द वापरलात तर त्यांचं अर्धं दुःख कमी झालेलं असतं.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल मी आता थोडंसं बोलेन. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये चांगल्या वेळा-प्राइम स्लॉट्स मिळत नाहीत, तसेच भरपूर संख्येनं स्क्रीन्सही मिळत नाहीत याचं मला खूप दुःख वाटतं. हा दुःखद प्रकाराला सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्व कलाकार-निर्माते-दिग्दर्शकांना सामोरे जावं लागत आहे. आपण महाराष्ट्रातले असूनही महाराष्ट्रातच आपला चित्रपट प्रदर्शित करण्यात अडचणी याव्यात यासारखी दुःखद गोष्ट नाही. परंतु माझ्या चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी मला खूप चांगली टीम मिळाली आहे. अमित भानुशाली, अंकित, समीर भोसले, मिलिंद मठकर अशी चांगली माणसं माझ्यासोबत आहेत. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोचेल याची मला खात्री आहे.

– विक्रम फडणीस

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया