अतिथी कट्टा

दिनांक : ०६-०२-२०२१

‘अयोध्येचा राजा’चं नव्वदीत पदार्पण…



व्ही. शांताराम दिग्दर्शित नि प्रभात फिल्म कंपनी निर्मित ‘अयोध्येचा राजा’ हा मराठीमधील पहिला बोलपट ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्तानं ‘तारांगण प्रकाशना’ची निर्मिती असलेल्या नि मंदार जोशी लिखित ‘शंभर नंबरी सोनं’ या पुस्तकामध्ये या चित्रपटावरचा हा लेख.

——

दादासाहेब फाळकेंनी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मूकपटांपासून सुरू झालेला भारतीय चित्रपट बोलपटांपर्यंत येऊन पोचला तो 1932 मध्ये. ‘अयोध्येचा राजा’ हा मराठीमधला पहिला बोलपट. ‘प्रभात फिल्म कंपनी’ आणि व्ही. शांताराम यांच्या संयुक्त उपक्रमातून प्रेक्षकांना लाभलेल्या दर्जेदार चित्रपटांपैकी ही पहिली कलाकृती. ती पाहताना आपल्याकडची कलाकार मंडळी किती श्रेष्ठ दर्जाची होती याची खात्री पटते. ‘अयोध्येचा राजा’मध्ये एका चित्रपटासाठी लागणारं सगळं काही होतं. त्यात कारुण्य होतं, वीररस होता, त्यागाची भावना होती. खलनायकांची कुटिल कारस्थानं होती. संगीतानं तो ओतप्रोत भरलेला होता आणि कलावंतांच्या दर्जेदार अभिनयानं तो नटला होता. सरतेशेवटी खलनायकाचा पराजय होऊन नायकाच्या गळ्यात विजयाची माळ पडणारा तो चित्रपट होता. म्हणूनच तो यापूर्वी श्रेष्ठ ठरला आणि यापुढेही राहील.

‘अयोध्येचा राजा’ ही गोष्ट आहे ती राजा हरिश्चंद्र (गोविंदराव टेंबे) आणि तारामतीची (दुर्गा खोटे). चित्रपटाची सुरुवात होते ती युवराज रोहिदासाच्या वाढदिवसापासून. हे निमित्त साधून दानासाठी प्रसिद्ध असणारा हा राजा आपली भांडारं खुली करण्याचे आदेश देतो. शूरवीरांना यथायोग्य देणग्या द्या. गोरगरीब आणि ऋषीमुनींना भरघोस दान देऊन त्यांना तृप्त करण्याचीही सूचना तो आपल्या अमात्यांना देतो. याच वेळी राजदरबाराच्या बाहेर कोणीतरी मोठमोठ्यानं ओरडत असतो. त्याचा आवाज हरिश्चंद्रांपर्यंत जातो. मागाल ते ओरडणार्‍याला आपल्यासमोर हजर करण्याचा आदेश देतात. ती व्यक्ती एका छोट्या मुलासह त्यांच्यासमोर हजर होते. मागल ते मिळेल, असं हा राजा सांगतो. तेव्हा ही व्यक्ती युवराज रोहिदासाच्या डोक्यावरील मुकुट आपल्या मुलासाठी मागते. तेव्हा हरिश्चंद्र मोठ्या आनंदानं हा मुकुट देण्यास तयार होतो. तेव्हा ही व्यक्ती ‘राजा धन्य तुझ्या औदार्याचं…’ असं म्हणून त्याचा गौरव करते. पुढं उभा राजदरबार हरिश्चंद्रांचं कौतुक करतो.

हरिश्चंद्राच्या या कृतीचा डंका अगदी इंद्रसभेपर्यंत पोचतो. त्याला कारणीभूत असतात ते नारदमुनी (मा. विनायक). नारदमुनी इंद्रसभेत हरिश्चंद्राच्या या औदार्याचा भूलोकीचं नवल असा उल्लेख करतात. राजा हरिश्चंद्र हे वसिष्ठ ऋषींचे शिष्य असतात. परंतु, हरिश्चंद्रांचं होणारं कौतुक काही विश्वामित्रांना मानवत नाही. आपण पारखल्याशिवाय उगीचच हरिश्चंद्राचा उदो उदो करणार नसल्याचं ते स्पष्टपणे सांगतात. तो आपल्या सच्चेपणात खरा उतरला तर आपली सारी तपश्चर्या त्याला अर्पण करण्याचीही ते घोषणा करतात.

इकडे राजमहालात तारामती एकट्याच गात असतात. गाणं संपताना त्यांना हरिश्चंद्रांची चाहूल लागते. तेव्हा ते त्यांना आपण पुन्हा गाऊ का असं विचारतात. तेव्हा हरिश्चंद्र तारामतींना म्हणतात, ‘मनाच्या उल्हासानं गाणं आणि दुसर्‍याच्या आज्ञेनं गाणं यात फरक असतो.’ याच वेळी युवराजांच्या डोक्यावरील सोन्याचा मुकुट पाहून हरिश्चंद्रांना प्रश्न पडतो. ते अमात्यांना बोलावून घेतात आणि हा मुकुट ज्याला आपण दान करण्याबद्दल सांगितलं होतं त्याला देण्यास सांगतात. त्यानुसार राजाच्या दरबारात काल आलेली ती याचक व्यक्ती आपल्या मुलासह येते. राजा आपल्या हातानं युवराजाच्या डोक्यावरील मुकुट या मुलाच्या डोक्यावर घालतो. त्याच वेळी विश्वामित्रांचं तिथं आगमन होतं. ‘रोहिदासाच्या डोक्यावरचा मुकुट म्हणजे राजाचं राज्य नव्हे. क्षुल्लक दानाचा राजाला एवढा आनंद का ?’ असा प्रश्न ते हरिश्चंद्रांना विचारतात. तेव्हा हरिश्चंद्र उत्तरतात, ‘दिलेला शब्द खरा केला पाहिजे हे माझं ब्रीद. सत्य हा हरिश्चंद्राचा प्राण आहे.’ त्यावर विश्वामित्र म्हणतात, एखाद्यानं राज्य मागितलं तर ते देशील का ? हरिश्चंद्र त्याला होकार दर्शवितात आणि आपल्या नऊ खंडाचं राज्य विश्वामित्रांना देऊन टाकतात. तेव्हा विश्वामित्र आपल्या शिष्याच्या डोक्यावर राजमुकुट ठेवण्यास सांगतात. दानाचा आनंद घेण्यास आता मी मोकळा आहे, असं जेव्हा हरिश्चंद्र म्हणतात तेव्हा विश्वामित्र त्यांच्यासमोर नवीन अट घालतात. स्वकष्टानं एक हजार सुवर्णमोहरा मिळवल्या तरच तू दानाला पात्र ठरशील, असं ते म्हणतात. या अटपूर्ततेसाठी हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास आपल्या अंगावरचे सुवर्णलंकार उतरवून राजमहाल सोडून शेजारच्या राज्यात जातात.

इकडे राजा झालेली व्यक्ती जनतेला राजदरबारात भेटण्याऐवजी राजमहालात बोलावणं धाडू लागते. हरिश्चंद्र आणि त्यांच्या कुटुंबाची वणवण सुरू होते. एकदा रोहिदास तहानेनं व्याकुळ होतो. तेव्हा विश्वामित्र हरिश्चंद्राचं सत्त्वहरण करण्यासाठी तिथं पाणपोई उपलब्ध करतात. रोहिदास या पाण्याला तोंड लावणार एवढ्यात हरिश्चंद्र तिथं येतात आणि त्याला पाणी पिण्यापासून रोखतात. रोहिदास हा तर हरिश्चंद्रांचाच मुलगा. आई-वडिलांकडे पाहून तो म्हणतो, ‘तुम्हाला पाहून माझी तहान नाही उरली.’ ते पाहून विश्वामित्र आणखी भडकतात. भविष्यातील संकटांची ते हरिश्चंद्रांना सूचना करतात. चालत चालत ही मंडळी काशी राज्यात येतात. तिथं त्यांना गंगानाथ नावाची धनाढ्य व्यक्ती भेटते. तारामतींकडे पाहून तो या तिघांनाही आपल्याकडे नोकरी देतो. हरिश्चंद्रांना लवकरात लवकर एक हजार मोहरा मिळवायच्या असतात. परंतु, त्यासाठी त्यांना पडेल ती कामं करावी लागतात. गंगानाथाची पालखी उचलावी लागते. ताराराणींना गंगानाथाच्या पत्नीची सर्व कामं करणं भाग पडतं. ताराराणींचं सौंदर्य पाहून गंगानाथाची बायको त्याला विचारते, ‘एवढ्या सुंदर स्त्रीला दासी म्हणून कशाला आणलीत?’ यावर बेरकं हास्य चेहर्‍यावर आणीत गंगानाथ म्हणतो, ‘भलतीच तुझी शंका. तुझी सर दुसरीला येईल का ?’

गंगानाथाकडे काम करण्याच्या हरिश्चंद्रांना फक्त दहा मोहरा मिळतात. तेव्हा ते आपल्याला एक हजार मोहरांची गरज असून त्याबद्दल्यात जन्मभर त्याच्या घरी राबण्याची आपली तयारी दर्शवितात. गंगानाथाचे डोळे चमकतात. तो अंतःपुरात जातो. हजार मोहरांच्या बदल्यात तू हवी आहेस, असं ताराराणींना थेट सांगतो. तेव्हा हे स्वाभिमानी कुटुंब तिथून बाहेर पडतं. बाहेर जनावरांप्रमाणे माणसं गुलाम म्हणून विकली जात असतात. ते पाहून हरिश्चंद्र गुलामविक्रीच्या चबुतर्‍यावर उभं राहून स्वतःलाच विकायचं ठरवतात.

‘ऐका हो ऐका… अयोध्येचा राजा हरिश्चंद्र विक्रीला आला आहे…’ अशी दवंडी पिटली जाते. मात्र, हा ऐरावत पोसायचा कोणी, असा प्रश्न काहींच्या मनात येतो आणि हरिश्चंद्रांची विक्री अवघ्या 50 मोहरांमध्ये होते. मग पतीचं सत्त्व टिकवण्यासाठी तारामती चबुतर्‍यावर उभ्या राहतात. त्याचवेळी तिथून जाणारा गंगानाथ त्यांना 950 मोहरांमध्ये विकत घेतो. अशा प्रकारे हरिश्चंद्रांना दान दिल्याचं सुख मिळतं. परंतु आपल्या पत्नीला ते गमावतात. त्यांची रवानगी होते ती स्मशानात आणि तारामतींची गंगानाथकडे. ‘गुलामगिरी फक्त कष्टापुरती मर्यादित असून माझ्या मन आणि देहावर फक्त पतीदेवांचा अधिकार आहे,’ असं ठामपणे तारामती गंगानाथला सांगतात. तो जबरदस्ती करायला लागल्यावर रोहिदास मध्ये पडतो. तेव्हा गंगानाथनं केलेल्या प्रहारात रोहिदासाचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूचा आळ तारामतीवर येऊन तिला मृत्यूदंडाची शिक्षा बजावली जाते. या शिक्षेच्या पूर्ततेसाठी आणि रोहिदासावरील अंत्यसंस्कारासाठी त्यांना स्मशानात आणलं जातं. तिथं तारामती आणि हरिश्चंद्रांची भेट होते. यावेळी विश्वामित्र त्याला हार पत्करली तर राज्य परत करीन म्हणतो. परंतु, तारामती तसं करण्यापासून रोखतात. त्यांचा शिरच्छेद करण्यासाठी हरिश्चंद्र तलवार हाती घेतात आणि अचानक भगवान शंकर तिथं प्रकटतात. राजा हरिश्चंद्राच्या सत्त्वाचं आणि सत्याचं पालन करण्याच्या कृतीचं ते कौतुक करतात आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा राजाचा मुकुट ठेवतात. यावेळी तिथं उपस्थित असलेले विश्वामित्र आपली चूक कबूल करतात. आपल्या शीघ्रकोपी स्वभावामुळे हरिश्चंद्रांना भोगाव्या लागलेल्या यातनांबद्दल ते त्यांची माफीदेखील मागतात.

असा हा ‘अयोध्येचा राजा’. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता नऊ दशकं लोटलीत. परंतु, त्याचा आशय अजूनही पाहणाऱ्याला खिळवून ठेवतो. त्यातले संवाद टाळ्या घेणारे आहेत. राजाचं औदार्य चकीत करणारं आहे. थँक्स टू प्रभात फिल्म कंपनी आणि व्ही. शांताराम!

– मंदार जोशी

(लेख सौजन्य – तारांगण मासिक)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया