हिंदी चित्रपटातील संधीची मी वाट पाहतोय…
——
आक्रंदन हा चित्रपट स्वीकारण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यातली भूमिका मला खूप आवडली. यात मी मुख्य खलनायक साकारला आहे. सर्वसाधारणे प्रत्येक खलनायक ज्या ज्या वाईट गोष्टी करतो, त्या सर्व गोष्टी याही खलनायकानं केलेल्या आहेत. जेव्हा खलनायक अधिक स्ट्राँग असतो, तेव्हा नायकाचं महत्त्व अधिक वाढतं. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांचं आहे. त्यांचे नि माझे संबंध खूप जुने आहेत. या कारणांसाठी मी हा चित्रपट स्वीकारला.
मला स्वतःला केवळ खलनायकी व्यक्तिरेखा साकारायला आवडतात असं काही नाही. परंतु, एखाद्या कलाकाराची एखादी व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरली की साधारणपणे त्याच प्रकारच्या भूमिका त्याच्याकडे येतात. काही वर्षांपूर्वी मी टीव्हीवर साकारलेला देवराज खंडागळे हा खूप लोकप्रिय झाला होता. त्याच्यानंतर माझ्याकडे अनेक खलनायकी व्यक्तिरेखा आल्या. मध्येच एक ‘अग्निहोत्र’ नावाची मालिका आली. कलाकारांकडे फारसा चॉईस नसतो. आपल्या बँक खात्यामध्ये 5 ते 10 कोटी रुपये असतील तर मग एखादा कलाकार भूमिका आवडली नसल्याचं कारण सांगून ती नाकारू शकतो. तुम्हाला या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर काही भूमिका स्वीकाराव्या लागतात.
‘आक्रंदन’मधला खलनायक अत्यंत क्रूर आहे. त्याच्या व्यक्तिरेखेला कसलीही ग्रे शेड नसून तो पूर्णतः काळाच आहे. तो तरुण आहे. तरुणाईचा त्याला माज आहे. त्याच्याकडे भरपूर पैसाही आहे. गावात त्यांची वर्षानुवर्षं सत्ता आहे. आपलं कोणी काहीही वाकडू करू शकणार नाही, या भ्रमामध्ये तो आहे. मग या चित्रपटाच्या कथानकात उपेंद्र लिमयेच्या रुपातून एक वकील येतो. मग तो त्याचं काय करतो, हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे.
इतर चित्रपटांमधील खलनायकी व्यक्तिरेखांबद्दल सांगायचं म्हटलं तर ‘शोले’मधला गब्बरसिंग मला खूप आवडतो. अत्यंत वास्तवदर्शी अशी ती व्यक्तिरेखा होती. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ चित्रपटामध्ये मोहन जोशींनी साकारलेला बिहारचा राजकारणी मला खूप आवडतो. या चित्रपटात अजय देवगण नायकाच्या भूमिकेत होता. असे काही रोल भविष्यात मिळाले तर ते मला निश्चितच साकारायला आवडतील. फक्त हिंदी नव्हे तर सर्वच भाषांमध्ये मला चांगल्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत. फक्त एका संधीची गरज असते. त्या संधीची मी वाट पाहतोय.
माझी महत्त्वाची भूमिका असलेलं ‘हिमालयाची सावली’ हे नाटक सध्या उत्तम चाललं आहे. नाटक आणि चित्रपट हे एकाच वेळी साकारण्याचं आव्हान मी पेललं आहे. मी टाइम मॅनेजमेंट पाळतो. स्वतःला चांगली शिस्त लावून घेतली आहे. डायरी हातात असल्याशिवाय मी कोणालाही शूटिंगची तारीख देत नाही. नाटकाच्या प्रयोगाचा तारखा, त्याचे ठिकाण, येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच मग मी नवीन काम स्वीकारतो. चित्रपट, नाटकाखेरीज मी आता ‘अग्निहोत्र’ नावाची मालिकाही करीत आहे. काही वर्षांपूर्वी ही मालिका नि त्यामधील माझी भूमिका खूप गाजली होती. त्यामुळे या तीनही माध्यमांमध्ये एकाच वेळी काम करताना सध्या मी खूपच आनंदी आहे. ‘हिमालयाची सावली’ या नाटकाचं, त्यातल्या कलावंतांचं तसेच सगळ्या टीमचंच सध्या खूप कौतुक होत आहे. आपल्याबरोबरच सर्व टीमचंही कौतुक होत असल्याचा मला अधिक आनंद आहे. या नाटकाचे आम्ही आम्हाला नि रसिकांना हवे तेवढे प्रयोग करणार आहोत. रसिकप्रेक्षकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी कर्करोगासारख्या मोठ्या संकटातून बाहेर पडू शकलो. या आजारावर मला आता पूर्णपणे मात करता आली आहे. सध्या माझ्यावर होमिओपथीचे उपचार सुरू आहे. आणखी दोन-तीन महिन्यांनी मी पहिल्यासारखाच दिसायलाही लागेन.
– शरद पोंक्षे
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया