मनोरंजनाबरोबरच प्रबोधन…
——
संतोष तोडणकर या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगतात, “बालपणापासून आपल्या प्रत्येकाच्या घरातील प्रत्येकावर श्री समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांचे संस्कार झालेले आहेत. पुढे मोठे झाल्यानंतर आपल्यावर समर्थांच्या दासबोधारुपी सामाजिक संस्कारही झाले. समर्थांचा विचार, समर्थांचा संदेश या चित्रपटामधून मांडण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या टीमनं केला आहे. त्याला अलकाताई, शंतनूजी, सौरभजी या मान्यवरांनी मोलाची साथ दिली आहे. आमच्या चित्रपटामध्ये चमत्कारांना थारा नाही. चमत्कारांपेक्षा आणि समर्थ रामदासांच्या विचारप्रणालीला अधिक महत्त्व दिलं आहे. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके यासारख्या साहित्यकृतींमधील महत्त्वाचा भाग चित्ररुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समर्थांचा विचार ठसठशीत होण्यासाठी आजच्या काळातील गोष्टीची सांगड़ घालण्यात आली आहे. काही तरुणांना एका ठिकाणी जाताना अपघात होतो. ते अशा ठिकाणी सापडतात की त्यांना तिथून समर्थांचे जीवनसार कळते. समाजात कसं वावरायला हवं, खोटं बोलू नये यासारख्या गोष्टींचा त्यांना इथून बोध होतो. इथून त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात होते.
“वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी सिनेमाची सुमधुर गाणी सिनेमाला आजीवन संजीवनी देत असतात. संगीत रसिकांच्या तोंडी गुणगुणली जाणारी श्रवणीय गाणी वेगळ्याच विश्वात घेऊन जातात यात शंका नाही. असाच उत्तम संगीताचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मेळ असलेला हा चित्रपट आहे. विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि दिशादिपा फिल्म्सच्या सौ. दिपा प्रकाश सुरवसे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे. या सिनेमाची मूळ संकल्पना विधीतज्ञ सौ विजया प्रवीण माहेश्वरी यांची आहे. घराघरातील संस्कारांचा पाया असलेले “मनाचे श्लोक” याचे उदगाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहिलेला ‘दासबोध’ ग्रंथ आजच्या दैनंदिन कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरतो. त्यांनी बलोपासना, नामस्मरणाचे महत्व समजावून दिले. त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि मार्गदर्शन ”श्री राम समर्थ” सिनेमात उलगडणार आहे. लग्नातील ”सावधान” या शब्दामागील नेमका अर्थ समजावून घेणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते होते हे देखील सिनेमात पाहण्यास मिळते.
स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजवलेली संकल्पना आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे. अभिनेता शंतनू मोघे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, महेश कोकाटे, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजयासुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे सिनेमात पाहायला मिळणार आहे. बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा समाजातील सद्य परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमकं भाष्य करतात. कथा-पटकथा-संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केलं आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी दिले आहे. बुद्धिजीवी व रामरायाचे निस्सीम भक्त असलेल्या राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा आहे.
शंतनू मोघे या चित्रपटाबद्दल म्हणतो, ‘’मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो की छत्रपती शिवरायांची भूमिका साकारल्यानंतर मला महाराष्ट्राच्या आणखी एका अशा व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारायला मिळाली की जी आपल्या सर्वांना खूप काही देऊन गेली आहे. संपूर्ण मराठी मातीला ते संस्कार, विचार देऊन गेले आहेत. भक्ती-शक्ती आणि समाजप्रबोधनाचा रामदासस्वामींचा पगडा होता. या चित्रपटाचं चित्रीकरण म्हणजे प्रचंड समाधान देणारा प्रवास होता. लेखक-दिग्दर्शकानं इतिहास आणि वर्तमानाची अतिशय योग्य अशी सांगड घातली आहे. म्हणूनच हा चित्रपट आजच्या पिढीलाही भावणारा ठरेल. आपल्यातील प्रत्येकानं आजी-आजोबांच्या मांडीवर बसून छत्रपती शिवराय, संभाजीमहाराज, संत रामदासांची महती ऐकलेली आहे. परंतु, आजच्या तरुण पिढीला विचारांचा संस्कार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणे हे महत्त्वाचं काम आहे. ते आम्ही या चित्रपटाद्वारे केलं आहे. थोडक्यात मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही होईल असा हा चित्रपट आहे.’’
– शंतनू मोघे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया