अतिथी कट्टा

दिनांक : २५-०५-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌जख्खड मनांना थापड
दुष्काळ पाण्याचा नाही तर त्याविरूद्ध लढण्यासाठीच्या इच्छाशक्तीचा

दुष्काळाच्या भीषण वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारा ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातून दुष्काळाच्या भीषण वास्तव परिस्थितीवर भाष्य व उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या चित्रपटाचे लेखक नि गीतकार आशिष निनगुरकर यांनी उलगडलेली लेखन नि निर्मिती प्रक्रिया.

——

एका सिनेमाच्या निमित्ताने लोकेशन शोध भटकंती सुरू असताना मराठवाड्यात जाण्याचा योग आला. तेव्हा रस्त्यावर एक विदारक चित्र दिसून आले. 4 ते 5 लहान मुले व मुली डोक्यावर हंडा घेऊन अनवाणी चालताना दिसले. कडक ऊन नि त्यात दुपारची वेळ. हे असे दृश्य पाहून मन स्तब्ध झाले आणि माझ्या एसी कारमध्ये मला घाम फुटला. त्या मुलांशी चर्चा गेल्यावर कळले की, ही मुले शाळेत जात नाहीत. कारण त्यांना 4 ते 5 किलोमीटरवरून रोज पाणी आणावे लागते. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ त्यातच जातो. मग शाळेत जाणार कधी? आम्ही जर पाणी आणले नाही तर घरात काहीच काम होणार नाही. हे सर्व सांगताना त्या मुलांच्या डोळ्यांमधून पाणी येत होते. त्यांच्या बोलण्यातून हे नक्की जाणवले की, पाणी त्यांच्यासाठी अमृत आहे आणि ते लोक पाण्याची मनोभावे पूजा करतात. पण याहून शहरातील परिस्थिती वेगळी आहे. काही दुर्गम भागात व खेडेगावात लोकांना प्यायला पाणी नाही, तर शहरात काही ठिकाणी पाणी ओसंडून वाहते आहे. कुठेतरी ही भीषण वास्तवता लिखाणात यायला हवी म्हणून या विषयावर मी लेखन करायचे ठरवले. त्यासाठी अभ्यास सुरू केला. जवळपास तीन वर्षे मी या स्क्रिप्टवर काम करत होतो. रायगड जिल्ह्यातील काही आदिवासी भागात फिरतांना असे जाणवले की, ही मंडळी शौचालयाला जातानादेखील पाणी वापरत नाहीत. कारण त्यांचा जल हा देव आहे. पाण्याला देव मानणारी ही मंडळी पाण्यावाचून तडफडून मरत आहेत. म्हणून या विषयावर लेखन सुरू असताना जर पाणी संपले तर काय होईल? किती भयानक स्थिती असेल? आता सर्व गोष्टी पाण्यावर अवलंबून आहेत. मग पाण्यावाचून जीवन कसे जगता येईल? असे अनेक प्रश्न पडत गेले आणि मग ही टॅगलाईन सुचली…. एक होता राजा, एक होती राणी… उद्या म्हणू नका, एक होतं पाणी.

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. या समस्या दूर करण्यासाठी शासनाने प्रयत्न करूनही ठोस उपाय निघत नाहीय .अशातच दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी मंजूर करण्यात आलेला निधी प्रत्यक्षात दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहचत नाहीय. दुष्काळ परिस्थिती निवारणासाठी सुरुवातीला चर्चा होती की यंदा दुष्काळ फक्त विदर्भातील जिल्ह्यात आहे. परंतु महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई अन् दुष्काळ असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. ही दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई अकस्मात उद्भवलेली आहे का? मागच्या वर्षी पाऊस कमी पडला. याचाच परिणाम भूजलाचाही बेसुमार उपसा शेतकरी व मानव समूहाने केला. त्यामुळे येत्या काही दिवसात तीव्र पाणीटंचाई उद्भवणार असून त्यातूनच जीवनावश्यक गरजांची समस्या उभी राहणार हे दिसते आहे. महाराष्ट्राच्या खूप कमी ठिकाणांवर पाऊस झाला आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. परिणामी विविध ठिकाणच्या धरण-तलावांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. मोठया धरणांना क्षमतेच्या तुलनेत फारच कमी पाणी मिळाले. दुष्काळ ही काही अलीकडेच घडणारी घटना नाही. बहुतेकांना वाटत असते की आपण भरमसाठ वृक्षतोड केली किंवा काँक्रीटची जंगले उठवली म्हणून हा दुष्काळ पडतो. पण तसे नसावे. पिण्याचे पाणी, चारा ही समस्या तर गंभीर आहेच. मात्र कर्जात बुडालेले शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. भीषण दुष्काळात पूर्वी जनावरे कसायाकडे विकणे ही सर्वात गंभीर बाब समजली जात असे. मरण अतिशय स्वस्त झाले की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, जवळ पैसा नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे अशा अंधःकारमय स्थितीत जगणे कठीण होवून बसले आहे.

दुष्काळात पहिला फटका बसतो तो पिण्याच्या पाण्याला. याचे नियोजन करण्याची गरज आहे. केवळ पैसा उपलब्ध केला की सरकारची जबाबदारी संपत नाही. आज प्रत्येक गावात कागदोपत्री टँकर पाठवले जाताहेत. पण ते टँकर प्रत्यक्षदर्शी त्या गावापर्यंत पोचत आहेत का? बरं टँकरमधून पाण्याची थेंब-थेंब गळती होते. याउलट दूध, पेट्रोल व डिझेल यांच्या टँकरची झाकणे कडेकोट बंद असतात. मग पाण्याच्या टँकरची ही अवस्था का? त्याबद्दल कुणी भाष्य करताना दिसत नाही. दुष्काळासारख्या परिस्थितीत पैशांचा परिणामकारक उपयोग करून नियोजनाचे कौशल्य पणाला लावून गरजू जनतेपर्यंत या मदतीचा लाभ पोहोचविणे जास्त महत्त्वाचे आहे. अनेक खेड्यांत, विदर्भ व मराठवाड्यात हे पिण्याचे पाणी गावापर्यंत पोहोचविले, तरी तेथे पाणी साठविण्याची रचना नाही. दोन वर्षांपूर्वी या टँकर्सनी सोपा मार्ग म्हणून गावातील कोरड्या विहिरीत हे पाणी टाकले होते. तेथे पाणी घ्यायला जाऊन पाण्यात पडून काही माणसे दगावली होती. अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेत सूक्ष्म नियोजनाची गरज आहे. भीषण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता ही एक संधी असल्याचे मानत काही मंडळी यातही आपल्या तुंबड्या भरण्याचे उपद्व्याप करत असतात. त्यांना संधी मिळणार नाही अशा खबरदारीने हे आपत्ती व्यवस्थापन केले गेले पाहिजे.

शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अगदी आकडेवारी काढून असाही युक्तिवाद केला जातो की या सगळ्या आत्महत्या शेतीच्या म्हणजेच, पाण्याच्या कारणाने केलेल्या नाहीत. त्यातील काही कारणे वैयक्तिक आहेत. मात्र ती तशीअसली, तरी त्यामागे अर्थिक विवंचना व पाण्यामुळे उद्भवलेली परिस्थिती हे दुरान्वयाने दडलेले कारण असतेच. ग्रामीण अर्थरचना शेतीवरच अवलंबून आहे, हे सत्य स्वीकारलेच पाहिजे. हरितक्रांतीनंतर शेतीचे अर्थशास्त्र बिकट झाले आहे. संकरित बियाणे आणि रासायनिक खते अव्वाच्या सव्वा किमतीत विकत घेणे पेरणीआधी क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी शेतकर्‍याला कर्जच काढावे लागते. घरात मुलीचे लग्न असले तरी कर्ज काढावे लागते. ते फेडण्याचे नियोजन शेतीत होणार्‍या उत्पादनावर अवलंबून असते. मात्र आता शेतकर्‍यांना ही कर्जे देणार्‍या जिल्हा सहकारी बँका आणि त्यांच्या अंतर्गत गावोगावच्या सेवा-सोसायट्या या सर्व भ्रष्टाचाराने मोडीत निघालेल्या आहेत. कर्जे फेडणे जमले नाही, तर आत्महत्या करण्याइतकी नाजूक मनःस्थिती झालेल्या शेतकर्‍यांना नागरी बँका दारात उभे करत नाहीत. यामुळे शेतकर्‍याला कर्जासाठी खाजगी सावकाराच्या दारातच जावे लागत आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश मी माझ्या ‘एक होतं पाणी’ या सिनेमाच्या लेखनातून वास्तवता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. वेगवेगळे विषय, नवनवीन कल्पना या गोष्टीलाही रसिक भरभरून दाद देत आहेत.रोजच्या जगण्यातील आज पाण्याच्या गंभीर विषयावर विचार केला. पण सुरुवात कुठून करावी हा प्रश्न पडतो. त्यामुळे काही कालावधी गेल्यावर असेच बोलावे लागणार आहे, ‘पाणी पाहिले का पाणी’? ज्याप्रकारे पाण्याचा अपव्यय होतोय, ते पाहता पुढचे दिवस भयानक आहेत. अशाच एका दुष्काळग्रस्त गावाची या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे. आपण हे थांबवू शकतो, हा विचार करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. जगात जर महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल हे वेगळं सांगायला नको. पाण्याचा प्रश्न अजून गंभीर होण्याची वाट पाहू नका, आजपासून, आत्तापासून पाणी वाचवायला सुरू करा. असाच काहीसा सामाजिक, प्रबोधनात्मक उपदेश या सिनेमाद्वारे करण्यात आलाय. हंडाभर पाण्यासाठी दुष्काळग्रस्त भागात सुरू असलेली ओढाताण भयानक आहे. पावसाने दडी मारल्याने सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे. पाण्याला चव नसते, रंग नसतो, वास नसतो. तरी पंचमहाभूतातील या घटकाचं जीवनांत अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा लांबलेल्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे तर पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. एक दिवस पाणीच मिळाले नाही तर काय होईल? या भीषण वास्तवतेचे दर्शन व त्यावरची उपाययोजना या ‘एक होतं पाणी’तून बघायला मिळणार आहे. या सिनेमाचे कथा, पटकथा, संवाद व गीतलेखन मी स्वतः केले असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन सातघरे यांनी केले आहे. व्ही.पी.वर्ल्ड मूव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मूव्हीज यांच्या सहयोगाने या सिनेमाची निर्मिती झाली असून मुंबई व नगर जिल्ह्यातील डोंगरगण, ब्राह्मणी, टाकळीमियाँ, राहुरी व वांबोरी या भागात या सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाचे पोस्टर अत्यंत बोलके असून त्यातून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमाचे छायांकन योगेश अंधारे यांनी केले असून या सिनेमात चार गाणी आहेत. चित्रपटाला संगीत विकास जोशी यांचे असून रोहित राऊत, आनंदी जोशी, ऋषिकेश रानडे, विकास जोशी व मृण्मयी दडके-पाटील यांनी या गाण्यांना स्वरसाज दिला आहे. कलादिग्दर्शन संदीप बेरा यांचे असून संकलनाचे काम स्वप्नील जाधव यांनी केले आहे. निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतिश सोनवणे, सुनील जाधव, सिद्धेश दळवी, प्रदीप कडू, स्वप्नील निंबाळकर, स्वरूप कासार व अजय जाधव यांचे सहकार्य मोठे आहे. या चित्रपटाने ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’मध्ये तब्ब्ल 6 नामांकनं पटकावली होती. त्यातील 2 पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार-चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आम्ही ठसा उमटवला तर नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व ‘इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती’ या पुरस्काराने या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे.

ही गोष्ट अशाच एका गावाची आहे, ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते. पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे…. पाण्यासाठी वणवण करणार्‍या गावकर्‍यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय? या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देणार तरी कोण… याचा उहापोह या सिनेमात होतो. एका ज्वलंत विषयावर प्रकाश टाकत प्रशासनाचे डोळे उघडू पाहणारा हा चित्रपट समाजात जनजागृती निर्माण करेल असा विश्वास वाटतो. सामाजिक बांधीलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे, हा संदेश हा चित्रपट अधोरेखीत करतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ची सध्या नितांत गरज असून ‘एक होतं पाणी’ म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आणण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल.

सामाजिक बांधीलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश हा चित्रपट अधोरेखीत करतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ची सध्या नितांत गरज असून ‘एक होतं पाणी’ म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, यतिन कार्येकर, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रीया मस्तेकर, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ, कृतिका कोळपकर तसेच रणजीत कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ.राजू पाटोदकर, अनुराग निनगुरकर, राधाकृष्ण कराळे, कांचन दोडे, वर्षा पाटणकर व संदीप पाटील आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील.

पाणी अडवा, पाणी जिरवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी वाचवा. आपण पाणी वाचविले तर पाहिजेच पण साठविलेही पाहिजे व पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. जमिनीतील पाणी उपसून आपण ते संपवत आहोत. मात्र जमिनीतील पाणी साठवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. आपण ‘रेन हार्वेस्टिंग’सारख्या प्रकल्पांचा पाणी वाचविण्यासाठी उपयोग करावयास हवा. पाणी हे अमृत असल्यामुळेच त्याची बचतही केली पाहिजे. पाणी वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आह़े जे नैसर्गिक संकट ओढावले आहे त्याला तोंड देता आले पाहिज़े. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पाणी फाऊंडेशन खूप मोठे कार्य करत आहे. त्यांच्या कार्याला जेवढा सलाम करावा तेवढे ते कार्य महान आहे.त्यामुळे अनेक गावं पाण्याबद्दल सजग होताना व श्रमदानात सामील होताना मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करा़. प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे असे जनतेला वारंवार सांगितले जाते. परंतु खरंच आपण पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा. दुष्काळाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सर्वांनाच भूमिका पार पाडायची आहे. दुष्काळग्रस्त लोकांना शक्य त्या प्रकाराने मदत करणे ही एक बाजू झाली, मात्र अशी परिस्थिती उद्भवू नये हाच आपल्यापैकी प्रत्येकाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. आपण एवढे जरी शिकलो तरी परमेश्वरास आनंद होईल की त्याने निर्मिती केलेल्या सर्वात हुशार जीवात अजूनही थोडेसे शहाणपण उरले आहे! कारण ‘दुष्काळ पाण्याचा नाही तर त्याविरुद्ध लढण्यासाठीच्या इच्छाशक्तीचा आहे!’ या चित्रपटातून याच विषयाला, जख्खड झालेल्या मनाला विचाररुपी थप्पड मारण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमाच्या प्रोसेसने मला अनेक गोष्टी दिल्या आहेत. मी स्वतः पाणी वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी माझ्यावर विश्वास दाखवणारे या चित्रपटाचे निर्माते विजय तिवारी व डॉ. प्रवीण भुजबळ तसेच मला कायम मार्गदर्शन करणारे अभिनेते अनंत जोग यांचे सहकार्य मोठे आहे. तसेच माझे कुटुंब ज्यांनी आमच्यात गावात शूटिंग असताना सर्वतोपरी सहकार्य केले. तसेच माझी संपूर्ण टीम… यांच्या मी कायम ऋणात राहीन. सिनेमे अनेक बनतात पण या सिनेमाने काळजात घर केले आहे आणि पाणी वाचवण्यासाठी एक फार मोठी शिकवण दिली आहे.

– आशिष अशोक निनगुरकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया