मंगेश पाडगावकर – स्वच्छंदी साहित्यिक
——
‘ आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे
झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे,गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे ’
महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या ज्या मोजक्या भाग्यरेषा आहेत त्यातील एका भाग्यरेषेचे नाव आहे कविवर्य मंगेश पाडगावकर.ज्यांच्या शब्दाचं गारुड अधिकाधिक पसरत गेलं त्या विलक्षण कवितांचं महाविद्यापीठ म्हणजे कवी, गीतकार,ललित लेखक, समीक्षक, अनुवादक, वात्रटीकाकार मंगेश पाडगावकर. ‘गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे’ असं म्हणणारे मंगेश पाडगावकर. आपल्या मराठी ओंजळीत हे शुक्रताऱ्याचं नि चांदण्याचं आभाळ आलंय याचा मराठी माणसाला सार्थ अभिमान आहे.
मंगेश पाडगावकर म्हणजे कवितेचं एक सदाबहार झाड.बा.भ.बोरकरांप्रमाणे
कविता लिहिण्याच्या छंदापोटी वयाच्या चौदाव्या वर्षी,
‘ तुज पाहिले, तुज वाहिले, नवपुष्प हे हृदयातील
कवटाळूनी अन चुंबुनी पूजशील का ते मनी? ’
अशा कवितेपासून त्यांनी सुरुवात केली.त्यांच्या कवितांचा सारा पसारा म्हणजे सर्जनाचा प्रदीर्घ सुंदर काव्यपट आहे.
‘ गाणं नसतं बंद घरात एकट्यानं गाण्यासाठी
गाणं असतं एकटेपण विसरून जाण्यासाठी ll
गाण्याची प्रत्येक ओळ फांदी होऊन झुलते
तुझ्यासाठी माझ्यासाठी फुल होऊन फुलते ll
एकट दु:खी वाटलं की नको कुढत कण्हू
झाडाखाली उभं राहून गाणं लाग म्हणू. ll ’
ते म्हणत, ‘जीवनातला काही अनुभव आपले रूप,आपला चेहरा एक कवी म्हणून माझ्याकडे मागू लागतात तेव्हा त्या अनुभवांचं मला गाणं करावंसं वाटतं. एखादं पाखरू येऊन अकस्मात फांदीवर बसतं तशी एखादी ओळ येऊन माझ्या मनात बसते. माझ्या मनात खोल,अंतरी रुजलेल्या अनुभूतींचा क्षण मातीचं कवच भेदून वर येणाऱ्या हिरव्यागार पात्याप्रमाणे केव्हा आणि कसा प्रकट होतो याचं रहस्य मलाही अजूनही उमगलेलं नाही.’
अर्धांग लुळ पडलेल्या एका म्हाताऱ्या गृहस्थाला जेव्हा पाडगावकरांनी तब्येतीबद्दल विचारलं तेव्हा त्या गृहस्थानं त्यांच्या घरात कुंडीत लावलेल्या रोपाला पहिलं फूल आलेली बातमी दिली. हे ऐकून पाडगावकरांनी बोलगाणं केलं,
‘ सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत की गाणं म्हणत,तुम्हीच ठरवा ’
मे महिन्यात उकाड्याच्या दिवसांत मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना पाडगावकरांना ‘श्रावणात घननिळा बरसला’ ही प्रसिद्ध कविता सुचली, असा असतो काव्यनिर्मितीचा आणि अनुभूतीचा संबंध. कवितेची निर्मिती होण्यासाठी प्रत्येक वेळी स्वत:च अनुभव घ्यावा लागतो असे नाही.कल्पनेतले विश्व निर्माण करून त्या जगात प्रवेश केला तरी काव्यनिर्मिती होऊ शकते.पाडगावकरांच्या कवितेमधून गाणं या संकल्पनेला खरोखरच व्यक्तिमत्व प्राप्त झालं आहे.हे गाणं त्यांच्यासमोर प्रकट होतं कधी पाखरांच्या गळ्यातून,कधी शिळेतून.गाणं कधी आठवणीतील असतं.कधी मातीमधल्या बीजाला फुटलेल्या हिरव्या कोंबातलं असतं. ‘गाणं सांगू येतं कुठून? डहाळीला ओंकार फुटून…’ हेच त्या सहजतेचं मर्म आहे.
‘ आयुष्य ही बासरी असते, ती जवळ घेता आली पाहिजे
सुरात वाजविता आली पाहिजे ’
आनंदानं जगायचं नाकारणं योग्य नाही असं पाडगावकरांच आयुष्याविषयीचं
चिंतन आणि तत्त्वज्ञान आहे. कोकणात वेंगुर्ल्यासारख्या देखण्या गावी १० मार्च १९२९ रोजी जन्मलेल्या या जन्मजात कवीला तिथल्या पावसानंच हे ‘प्रतिभेचं अवकाश’ खाऊसारखं हातावर ठेवलं. मराठी आणि संस्कृत प्रमाणे इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते. मंगेश पाडगावकर हे नाव उच्चारताच कविता आणि गाण्यांनी भरून गेलेलं, कोकणातल्या काजव्यांनी भरलेल्या पिंपळासारखं एक झगमगीत झाड डोळ्यासमोर येतं. यात ‘एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून’ अशी जिप्सीला घातलेली साद आहे तर ‘श्रावणात घननिळा बरसला’ अशी हिरव्या गाण्यांची बाग आहे. ‘संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा’ सारखी रात्र जागविणारी मिलनाची रात्र आहे. ‘सलाम भाईयों सलाम’ सारखी समाजव्यवस्थेवर कोरडा ओढणारी विद्रोही कविता आहे. मिश्कीलतेतून येणारी वात्रटिका आहे.‘डोळ्यावरून माझ्या उतरून रात गेली’ अशी गझलेतील व्याकूळ भावना आहे.तसेच ‘सांग सांग भोलानाथ’ अशी शाळकरी बडबड आहे.
‘ अटक मटक चवळी चटक, चवळी पाण्यात भिजवली
बराच वेळ शिजवली चवळी काही भिजेना, पाण्यात काही शिजेना ’
अशा गमतीच्या अंगानं केलेल्या कविता आहेत.पाडगावकरांची अशीच आणखी
बालगीते प्रसिद्ध झाली.‘ रडतच यावे येताना, पण हसत जावे जाताना ’ हे त्यांचे शब्द जगण्याची उभारी देतात.खलील जिब्रानच्या जीवनासक्तीचा आणि चिंतनाचा संस्कार घेऊन पाडगावकरांच्या कविता आल्या आणि त्यांनी स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. व्यवहारात माणसाच्या वाट्याला येणारे वास्तव साधेपणाने सांगत आशेची समजावणी करत ते म्हणतात,
‘ आपल दार बंद म्हणून कुणाचच अडत नाही
बंद घरात बसून कसं चालेल ? जगावर रुसून कसं चालेल ? ’
काव्याच्या क्षेत्रात या माणसाने डोंगराएवढे कार्य केले आहे.आपल्या परीने त्यांनी काळावर विजय मिळविला आहे.
‘ कालची स्वप्ने शिल्लक असतील तर झाकून ठेव
शिळ्या भाकरीसारखी त्यांना चव असते.’
अशी अनुभवातून आलेली प्रगाढ समज त्यांच्या कवितेत आहे.
‘ प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं अगदी सेम असतं.’
असं गुंजत राहणारं बोलगाणंही आहे. त्यांनी संगीतिका लिहिल्या आहेत. राजकीय उपहासिका लिहिल्या आहेत. मीरा, तुकाराम, कबीर यांची भाषांतरे केली आहेत. शेक्सपिअरची टेम्पेस्ट, ज्युलियस सीझर आणि रोमिओ ज्युलीएट ही तीन नाटके त्यांनी मराठीत आणली. ते गद्य लेखनही उत्तम करत. त्यांची गद्य पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.‘निंबोणीच्या झाडामागे’ हा त्यांचा लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहे.सन १९५० मधील ‘धारानृत्य’ ते सन २०१३ मधील ‘अखेरची वही’ असा अखंडपणे प्रवास करणारे पाडगावकर म्हणजे हिरवे तृणपातेच होते. याबद्दल सारा महाराष्ट्र कृतज्ञ आहे.
‘शुक्रतारा मंद वारा,दिवस तुझे हे फुलायचे,तुझे गीत गाण्यासाठी,लाजून हसणे अन, या जन्मावर या जगण्यावर,भातुकलीच्या खेळामधली,भेट तुझी माझी स्मरते, धुंद वादळाची होती रात्र पावसाची,लाख चुका असतील केल्या केली पण प्रिती’अशा शेकडो गाण्यांचा गंध त्यांनी आयुष्यभर मराठी विश्वावर उधळून समग्र मराठी भावजीवन चांदण्याचं केलं. त्यांच्या स्वभावोक्तीची सुभाषिते झाली आणि रसिक मनांत रुंजी घालू लागली.
‘ आपण असतो आपली धून,गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा ’
राजकीय,सामाजिक,वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील विसंवादावर
उपहास आणि उपरोध या दुधारी आयुधांनी प्रहार करणे, हे पाडगावकरांनी आपल्या प्रतिभा धर्माचे लक्ष्य मानलेले होते.कधी वृत्त्तीगांभीर्याने तर कधी नर्मविनोदी स्वरात ते जळजळीत जीवनभाष्य करतं. समुद्रावरती उसळणारी उंच लाट फुटली की,जशी समुद्रातच विसर्जित होते तसं पाडगावकरांचं सर्व लेखन शेवटी काव्यमयतेकडेच झुकतं. त्यांच्यातलं वात्रट पोर सतत जागं असायचं.’वात्रटिका’ हा त्याचाच परिपाक. ते उत्तम टेबलटेनिस खेळायचे. आपली जीवनेच्छा त्यांनी ‘या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ अशा उत्कट शब्दांत व्यक्त केली आहे. ‘अखेची वही’ या काव्यसंग्रहात त्यांनी ‘प्रेम सुंदर आहे म्हणून तर जगणं सुंदर आहे’ अशी आत्मप्रचीती प्रकट करणारी कविता लिहिली आहे. २०१६ मधील ‘दुर्गा’ चित्रपटात मंगेश पाडगांवकर यांचे काव्य रसिकांसमोर आले होते. कवितेचं गमक तर पाडगावकरांना कळलं होतं पण त्यांचं हे काव्यजगत रसिकांनाही पूर्ण पटलं म्हणूनच कबीर पुरस्कार, महाराष्ट्रभूषण, साहित्यभूषण, पद्मभूषण अशा दिग्गज सन्मानांनी त्यांचं कौतुक झालं.१९८० ला भारतातील सर्वोच्च साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या ‘सलाम’ या त्यांच्या कवितासंग्रहामुळे प्राप्त झाला पण त्यांनी मात्र त्याचं झुकतं माप रसिकांच्या प्रेमाला दिलं.
जीवनसंचिताने त्यांना अक्षय आनंद अनुभूतीचा कुंभ दिलेला होता.तो रसिकांना वाटून देणे हे पाडगावकरांनी आपले जीवित ध्येय मानले.म्हणूनच त्यांना ‘आनंदयात्री’ हे बिरूद सर्वार्थाने शोभून दिसते, कारण त्यांच्या कवितेने हजारो रसिकांचे जीवन हे जगण्याची आनंदयात्रा बनवली.असे आनंदयात्री ३० डिसेंबर,२०१५ ला आपल्याला सोडून गेले. पण त्यांची कविता भविष्यातही त्या आनंदयात्रेची पालखी वाहात राहील.
म्हणूनच ते गेल्यानंतर सूरसमाज्ञी लता मंगेशकर म्हणाल्या,‘आज काव्याचा गाभारा रिकामा झाला.’
‘ व्यथा असो वा आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे
माझे जीवनगाणे,माझे जीवनगाणे ’
– लेखिका जयश्री दानवे
(सौजन्य – अथर्व प्रकाशन)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया