‘सामना’ सदैव रंगत राहणार!
अलीकडे दूरदर्शनवर ‘सामना’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या सामन्यात श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाचा ‘सामना’ तर आहेच, पण त्याच बरोबर जब्बार पटेल आणि विजय तेंडूलकर यांच्यातील कलावंतांचाही एक ‘सामना’ आहे जो बरेचदा पाहूनही आपल्या लक्षात येत नाही. आपल्या मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकाला किंवा समीक्षकाला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही. पण पुष्कळदा दिग्दर्शकातील कलावंत इतक्या नाजूकपणे आणि हळूवार हातानं आपली कलाकुसर चित्रपटाच्या फिल्मवर उतरवतो की, ती आपल्या ध्यानातच येत नाही. कधी कधी तर ही इतकी ‘सटल’ असते की ती खुद्द दिग्दर्शकांच्या नकळत त्याच्या अबोध मनातून फिल्मवर उतरली असावी असं वाटत राहतं. ‘सामना’ या चित्रपटाचंही काहीसं असंच झालं आहे. ‘सामना’ हा चित्रपट आता तसा जुना झालाय, त्याच्यावर बरंच लिहीलं व बोललं गेलंय.
खरं तर ‘सामना’ पाहणाऱ्या जवळपास सर्वच प्रेक्षकांना मास्तराच्या व्यक्तिरेखेनं थोडं फार बुचकळ्यात टाकल्याचं आपल्याला दिसतं. हा मास्तर खरा कोण ? तो हिंदुराव धोंडेपाटलाच्या मागे का लागतो ?…. पाटील त्याला का जपतो ? त्याचा काटा का काढत नाही?… तो सारखा दारू का ढोसतो?… तो पोलीस असतो का ?… तो नेहमी तिरकसच का बोलतो?… त्याचे संवाद आणि बोलण्याची पद्धतही काहीशी कृत्रिम व नाटकी वाटते, ती का?… एक न दोन असे अनेक प्रश्न ‘सामना’ बघताना आपल्या मनात उठतात. पण त्याचं मुळ शोधण्याऐवजी ‘असतो एखादा माणूस असा विक्षिप्त’ असं म्हणून डॉ. लागूंच्या अभिनयाचं कौतुक करण्याचा सोपा मार्ग प्रेक्षक आणि समीक्षकही स्वीकारतो. पण मी यावेळी मुद्दामच धोंडे पाटलांच्या मागे लागणाऱ्या त्या मास्तरांच्या मागे लागलो… आणि जे रहस्य माझ्या हाती लागलं ते पाहून स्वत:च स्तिमित होऊन गेलो.
माझ्या मते मास्तरची व्यक्तिरेखा ही ‘सामन्या’त केवळ एक व्यक्ती म्हणून येत नाही तर या चित्रपटाच्या कथानकात मास्तर हा नेहमी दोन पातळ्यांवर वावरतो. त्यामुळेच त्याच्याभोवती नेहमी एक गूढ वलय दिसतं. मला वाटतं, मास्तर ही व्यक्तिरेखा म्हणजे हिंदुराव धोंडे पाटलांचा ‘विवेक’ आहे. जीवनात काय चांगलं, काय वाईट हे ठरविणारी त्याची सद्सद्विवेक बुद्धी म्हणजेच मास्तर!… अर्थातच मग हा चित्रपट म्हणजे एका माणसाचा आपल्या विवेकाबरोबर झालेला ‘सामना’ ठरतो.
मी मांडलेला मुद्दा सहज अधिक स्पष्ट करता येईल. पण मास्तरला जर धोंडेपाटलांची विवेकशक्ती मानलं तर या चित्रपटाचं दिसणारं कथानक अगदी मामुली ठरतं. हिंदुराव धोंडे पाटील नावाचा एक माणूस आपल्या सत्तेचं साम्राज्य उभं करीत असताना नाना खटपटी करतो. एकदा त्याच्या हातून मारोती कांबळे नावाचा एक माणूस या हव्यासापायी मारला जातो… आणि इथूनच आपल्या विवेकाची टोचणी त्याच्या मनाला लागते. तो आपल्या विवेकाची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न करतो, आपल्या कृत्यांचं समर्थन देत बसतो. पण आपल्या विवेकबुद्धीची समजूत तो पटवू शकत नाही. त्याचं सारं सामर्थ्य तोकडं पडतं आणि अखेर तो स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतो. माणूस कितीही बनेल, निर्ढावलेला असला तरी तो आपल्या विवेकाशी झगडून जिंकू शकत नाही एवढं सांगून ही कथा संपते.
मानवी मनात विवेकशक्तीचं जागृत होणं, आणि तिची सतत टोचणी लागणं या दोन्ही गोष्टी ‘सामना’ या चित्रपटात मोठ्या बहारीनं मास्तराच्या व्यक्तिरेखेतून चित्रित करण्यात आली आहेत. मास्तरची एन्ट्रीच गमतीदार आहे. तो एस. टी. पकडण्यासाठी झाडाखाली बसलेला असतो. पण तिथं एस.टी. थांबत नाही. मास्तर दोनतीनदा बाटली तोंडाला लावतो अन चालतच एस.टी. स्टॅंड गाठतो. तिथं त्याला एस. टी. मिळते. ती एस. टी. जेव्हा आपल्या मुक्कामावर थांबते तेव्हा मास्तर झोपलेला असतो. नंतर तो एस. टी. च्या खाली उतरतो आणि मग रस्त्यावरच आडवा होतो. मानवी विवेकशक्तीचं जागृतावस्थेत येणंही काहीसं इतकंच सहज आणि स्वाभाविक असतं, नाही का ?
पण असं असलं तरी मास्तर सरळ उठून धोंडे पाटलांच्या घरी जात नाही. एका रात्री तो पाटलांनाच रस्त्यात पडलेला आढळतो. तेच त्याला उठवून वाड्यावर आणतात. त्याची राहण्याची, खाण्या पिण्याची व्यवस्था करतात. विवेकाचंही असंच असतं. तो बळजबरीनं कुणाच्याही मनाचा ताबा घेत नाही. पण मनाचा एखादा कोपरा मऊ सापडला आणि याचा त्यात शिरकाव झाला तर मात्र तो ती जागा सोडत नाही.
धोंडे पाटलांची अन मास्तराची पहिली मुलाखत फारच सूचक आहे. पाटील त्यांना सकाळी उठवतात तेव्हा त्याला पहाट झाली आहे याचंही भान नसतं. पाटील त्याला नाव, गाव विचारतात. पण तो उत्तर देऊ शकत नाही. आपण आपलं नाव हरवलं आहे आपण कुठून आलो हे महत्वाचं नाही, आपण का आलो हे मलाच ठाऊक नाही, अशी काहीशी तिरकस, उडवाउडवीची वाटावी अशी परंतु खरी उत्तर तो देतो. इथूनच चित्रपटाचं कथानक दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर घडायला सुरुवात होते. मानवी मनात विवेकाची जागृती का होते, तो कुठून येतो याचं उत्तर यापेक्षा वेगळं असूच शकत नाही. मास्तर आपलं नाव सांगत नाही म्हणून पाटीलच त्याला मास्तर हे नाव देतात. आता पाटील त्याला ‘मास्तर’च का म्हणतात हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखं आहे. ते त्याला अण्णा, दादा, भाऊ किंवा सोम्या, गोम्या, पांड्या असं काहीही म्हणू शकले असते. पण तसं होत नाही. कारण माणसाची विवेकबुद्धी ही काहीशी मास्तरासारखीच असते. ती त्याला चांगलं काय वाईट काय, हे शिकवित असते. प्रसंगी झाल्या चुकीबद्दल शिक्षाही सुनवित असते.
धोंडे पाटील अशा या मास्तराला आपल्या वाड्यावरच ठेवून घेतात. सर्जेराव किंवा इतर कुणी त्यांच्यावर हात टाकणार नाही. याचीही काळजी घेतात. त्यांना मास्तराला जीवे मारायचं नसतं तर त्याची समजूत घालायची असते. म्हणून पाटील आपल्या नीतीप्रमाणे साम, दाम, दंड, भेद या साऱ्या मार्गाचा अवलंब करतात. ते त्याला आपल्याबरोबर घेऊन आपण गावासाठी काय काय केलं याचा पाढा पुन्हा पुन्हा वाचतात. रात्री मास्तराच्या सेवेला एक बाई पाठवून देतात. मास्तरला पोल्ट्रीत नोकरी देतात. पण मास्तर बधत नाही. मग ते त्याला पैशाच्या गैरव्यवहारात अडकवू पाहातात. पण मास्तर त्याचा पिच्छा सोडत नाही. अखेरीस धोंडे पाटील मास्तराकडून कुठेही वाच्यता न करण्याचं आणि गाव सोडून जाण्याचं वचन घेऊन मारोती कांबळेचा काटा आपणच काढण्याची कबुली देतात. पण मास्तर पिच्छा सोडत नाहीच. तो निमुटपणे गाव सोडून जातो खरा, पण तालुक्याला जाऊन मारोती कांबळेची चौकशी व्हावी या मागणीसाठी उपोषणाला बसतो. मास्तराच्या या बदललेल्या पवित्र्यामुळे धोंडे पाटलांची फार तगमग होते. ते त्याला म्हणजे आपल्या विवेकाला झटकून टाकण्याचा अखेरचा प्रयत्न करतात तो तालुक्याच्या सभेत ! “पिकावर ‘मिजमाशी’ रोग पडावा तशी आपल्या गावात घाण आली आहे. ती त्या झाडाखाली आहे. तिला आधी बाहेर काढलं पाहिजे!” असं सारं धैर्य एकवटून हिंदुराव म्हणतात खरं, पण सभेत ‘मारोती कांबळेचं काय झालं ? याचा घोषा सुरू होताच पुन्हा कोलमडून पडतात. ते आपलं राज्य सोडून पळून जातात. अज्ञातवास स्वीकारतात.
पण त्यांची विवेकशक्ती त्या अज्ञातवासातही त्यांची पाठ सोडत नाही…. कारण मास्तर तिथंही पोचतो. तो हरलेल्या धोंडे पाटलांना आत्महत्याही करू देत नाही. पोलिसांच्या स्वाधीन होऊन शिक्षेला समोर जाण्यास भाग पाडतो. या अखेरच्या प्रसंगात एका वळणावर धोंडे पाटील हातातल्या पिस्तुलाची नळी मास्तरांच्या डोक्याला लावून त्याला ठार मारण्याची धमकी देतात. तेव्हा मास्तर ‘आम्ही मरणार नाही, मालक !… आम्ही अमर होणार !..’ असं काहीसं म्हणतो. मास्तरचं हे बोलणं त्यानं चित्रपटाभर सांभाळलेल्या टोनशी सुसंगत असलं तरी, ‘मास्तर ही तुमच्या आमच्या सारखी पिस्तुलानं मरणारी व्यक्ती नाही हे सुचविण्यात इथं लेखक-दिग्दर्शकही यशस्वी झाला आहे.
हे सुचविणारी दुसरी अशीच सूचक गोष्ट म्हणजे चित्रपटात मास्तर आणि धोंडे पाटलांचे बहुतेक प्रसंग हे एकांतात आहेत. म्हणजे त्यावेळी ‘फ्रेम’ मध्ये इतर कुणीही नसतो… कारण माणूस स्वतःशी संवाद साधतो तेव्हा तो गर्दीत असला तरी एका अर्थान एकांतातच जातो. पहिली मुलाखत, जेवणाच्या वेळचा प्रसंग, धोंडे पाटील खुनाची कबुली देतात तो प्रसंग किंवा अखेरचा शरणागतीचा प्रसंग, या प्रसंगी पडद्यावर मास्तर आणि धोंडे पाटील या खेरीज कुणीही नसतं. लेखक दिग्दर्शकाची सूचकताही लक्षणीयच आहे.
मारोती कांबळेच्या खुनाचा प्रसंगही या चित्रपटात चांगल्या प्रकारे घेण्यात आला आहे पण तो यावेळी टीव्हीवर का दाखविण्यात आला नाही कुणास ठाऊक?… या प्रसंगी धोंडे पाटलांच्या वाड्यावर गाणं चालू असत. एक नर्तिका ‘सख्या रे… घायाळ मी हरिणी’…. म्हणत आपल मोहजाल पसरीत असते, आणि याच गाण्याच्या नृत्याच्या पार्श्वभूमीवर मारोतीचा खून होतो. साहजिकच मारोती सारख्याचा खून व्यक्तिगत मोहापायी किंवा लालसेसाठीच होऊ शकतो. हा मोह, ही लालसा, मग कसलीही असू शकते… पैशाची, सत्तेची किंवा मग स्त्रीची हे गाण्यातून सुचवलं जातं… अर्थात या भूमिकेशी अधिक सुसंगत ठरतो एवढंच !
चित्रपटात मास्तराच्या तोंडी देण्यात आलेलं… ‘या टोपीखाली दडलय काय ?’ हे गाणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गाण्यात मास्तर रस्त्यावर गर्दी जमवून त्यांना कोडी घालतो आणि उत्तरावर हुकुम आपल्या टोपीखाली कोंबडीच पिल्लू, साखर आणि दारूची बाटली अशा विविध वस्तू काढून दाखवतो. गाणं संपल्यानंतर मास्तर टोपी पुढे करून जेव्हा गर्दीतल्या लोकांना पैसे मागू लागतो तेव्हा धोंडे पाटील त्याच्या मुस्कटात ठेवून देतात. वास्तविक धोंडे पाटीलांनी इतकं रागवायचं काही कारण नसतं. पण यामुळेच या गाण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. टोपीखालून हिंदुरावांनी आपल्या राज्यात निर्माण केलेल्या वस्तूंचं काढून दाखवणं हे त्यांना ‘एक्स्पोज’ करण्यासारखं (म्हणजेच त्यांचा बुरखा फाडण्यासारखंच!) आहे. आणि ते पूर्णतः असे एक्स्पोज झाल्यावर त्यांना अशीच टोपी पुढे करून भिक मागावी लागणार आहे असं तर या गाण्यातून सुचवलं जात नाही ना? असं वाटून जातं! तसं असल्यास मात्र धोंडे पाटलांचा राग आपण समजू शकतो. एवढंच नव्हे तर त्याचं मास्तरांच्या थोबाडीत मारणंही समर्थनीय ठरू शकतं. अन्यथा ‘मास्तर …. मास्तर तुम्ही लाज आणलीत आम्हाला !’ या हिंदुरावांच्या उद्गारांचं तितकंसं समर्थन होऊ शकत नाही.
याच गाण्यात मास्तराच्या मुलीचे, कमलेचे दोन-तीन शॉट्स येतात. त्याचबरोबर ‘पुरे ग कमळे….किती गोड खाशील ?’ असे मास्तरांचे उद्गारही येतात. हा भाग अलीकडच्या टी.व्हीवरील प्रक्षेपणात कापण्यात आला होता. मला वाटतं, स्वप्न सदृश या गाण्यात दाखविण्यात येणारी मास्तरांची मुलगी, कमळा ही सुद्धा एक प्रतिमाच असावी. कदाचित, ती त्याची पापभिरुता किंवा बुद्धिनिष्ठताही असू शकेल. मास्तरांच्या या दशेला तिचा अकाली वियोगच काहीसा कारणीभूत दिसतो. कधी तर मास्तराच्या व्यक्तित्वाची ही वैशिष्ट्ये हिंदुराव धोंडे पाटलांच्या भूतकाळाच्या पाऊलखुणाच वाटतात. कुणी सांगावं, धोंडे पाटीलही आधी असेच खादीधरी, ध्येयवादी वगैरे असतील. पण कधीतरी त्यांची ही कोवळी पापभिरूता, बुद्धीनिष्ठा कुणाकडून तरी पायदळी चिरडली जाते आणि त्यांना काळाशी समझोता करून साखरसम्राटाचा हा मुकुट डोक्यावर धारण करावा लागतो. आपल्या विवेकाला ते आपण केलेल्या सुधारणांची, गावासाठी घेतलेल्या परिश्रमांची दारू पाजून झिंग आणीत राहतात. पण कधीतरी त्यांची त्यावरील पकड जरा ढिली पडते आणि त्याक्षणी बाजी पालटते. विवेक त्यांच्यावर स्वार होतो.
या चित्रपटात धोंडे पाटील विरंगुळा म्हणून कधीतरी मुंबईला जाऊन जीवाची मुंबई करतात असा संदर्भ येतो. एकदा तर ते मास्तरलाही आपल्या सोबत घेऊन जातात. पण मास्तर तेथील स्त्री सहवासात रमू शकत नाही. खरं तर हिंदुराव आपल्या जीवाला लागलेल्या त्या टोचणीचा विसर पडावा म्हणूनच मुंबईला त्या बाईकडे जातो. पण तिथंही तो आपल्या विवेकाला विसरू शकत नाही. तो स्वतःलाच एकप्रकारे फसवत राहतो. वाघावर स्वार होण्याच्या बात मारीत राहतो. दिग्दर्शकानं मास्तराच्या व्यक्तिरेखेला एक वेगळा, मस्करीचा टोन दिलाय. त्यामुळे हा मास्तर जसा अपरिचितच वाटतो तसाच तो परिचितही वाटतो. त्याच्या काही गोष्टी मुद्दाम तपशीलवार घेतल्या आहेत तर काही गोष्टी मुद्दामच धूसर ठेवल्या आहेत. कदाचित ती व्यक्तिरेखा नाही, मानवी मनाचा एक पैलू आहे हे सुचविण्याचा तो प्रयत्न असावा.
या चित्रपटात आणखी एक गोष्ट लक्षणीय वाटली. ती म्हणजे धोंडे पाटलांना मास्तरांना एका दृष्टीने नमवायचे आहे, त्याची समजूत घालून त्याला आपल्या बाजूने घ्यायचे आहे. परंतु तो पाया पडलेला मात्र पाटलांना चालत नाही. ज्या मास्तरावर ते रागावतात, त्यानं आपल्या मनासारखं करावं म्हणून आगपाखड करतात प्रसंगी त्याच्या थोबाडीतही मारतात. त्याच मास्तरनं आपल्या पायाशी लोळण घेतलेली मात्र धोंडे पाटलांना चालत नाही. कारण आपली बाजू लंगडी आहे. असत्याची आहे हे पाटलांना ठाऊक आहे. म्हणूनच आपल्या विवेकानं असत्याच्या पायी लोळण घेतलेली त्यांना पहावत नाही. आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा, सत्याचा नेहमी विजय व्हावा हीच त्यांची मनीषा आहे. मग त्यासाठी आपलं सत्तासाम्राज्य धुळीला मिळालं तरीही ते त्यांना चालण्यासारखं आहे हे अखेरीस दिसलंच.
अलिकडेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधील ‘अवतीभवती’ या सदरात एका स्फूटलेखकानं आपल्या ‘कसोटीचा सामना’ या स्फूटात सामना चित्रपटातील काही घटनांचे संदर्भ आजही आपल्या अवतीभवती कसे सापडतात हे दाखवून या चित्रपटाचा संदर्भ आजही सुटलेला नाही असं विधान केल्याचं आठवतं. ‘सामना’ पाहिल्यावर मला तर वाटतं की, या चित्रपटाचे सारे संदर्भ आजच नव्हे तर कुठल्याही काळाला सहज लागू शकतील. जोवर या पृथ्वीतलावर माणूस जिवंत आहे आणि त्याच्याजवळ योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरविण्याची शक्ती आहे तोवर मानवी मनात हा ‘सामना’ असाच रंगत राहणार आहे. मला वाटत, याबाबत कुणाचं दुमत होऊ नये!
संदर्भ : चित्रस्मृती (पुस्तक)
लेखक : प्रकाश धुळे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया