अतिथी कट्टा

दिनांक : ०९-०६-२०२१

बॅलन्स्ड अभिनेता…



प्रख्यात अभिनेते विवेक यांचा ९ जून हा स्मृतीदिन. त्यानिमित्तानं ‘अभिनेता विवेक’ या ‘सांगाती प्रकाशन’च्या पुस्तकामध्ये दिग्दर्शक राजदत्त यांनी विवेक यांच्याबद्दल जागविलेल्या स्मृती आम्ही प्रकाशित करीत आहोत. रमेश उदारे यांनी या आठवणींचं शब्दांकन केलं होतं.

——

अंधेरीतल्या महेश्वरी नगरमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या घराची बेल मी वाजवली. त्यांनीच दरवाजा उघडला. राजदत्त यांच्यासमोर मी बसलो होतो. चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरू झाल्या. अभिनेता विवेक यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगताना राजदत्तजी म्हणाले, ‘मी पुण्याचा. सिनेसृष्टीशी माझा काहीही संबंध नव्हता. साधारण १९५२चा तो काळ होता. विवेकला मी पहिल्यांदा आप्पा बळवंत चौकात बघितलं. नेहमी पडद्यावर दिसणारा माणूस प्रत्यक्ष दिसला. हा विवेक? काहीतरी चुकतंय असं वाटलं. सिनेमातला हा माणूस एवढा साधा कसा ? रस्त्यावरून पायी चालतोय. आश्चर्य वाटलं. मित्रांना विचारलं, ‘हा कोण माणूस?’ तो पर्यंत मला त्यांचं नाव माहीत नव्हतं. मित्रांनी सांगितलं, ‘हा गणेश अभ्यंकर’ एकदोन वेळा ते रस्त्यावर दिसले. त्यांच्या मागे मागे मी गेलो. त्यांचं चालणं, हावभाव, रुबाब आश्चर्याने बघत होतो. मी सिनेमावाल्या माणसांचे जे चित्र मनात रंगवले होते त्याचा काहीही मागमूस गणेश अभ्यंकरांपाशी नव्हता. त्यांच्यातली सहजता मला वेगळी वाटली. हा काळ साधारण १९५२ ते १९५८चा. मेळे, नाटकांची मला आवड होती. सिनेमा ही कल्पनाच डोक्यात नव्हती. त्यावेळी मी ‘दै. भारत’ मध्ये नोकरीला होतो. नोकरी सांभाळून सिनेमाचं तंत्र शिकावं म्हणून डेक्कन स्टुडिओत मी पाऊल ठेवलं. चित्रपट होता ‘देवघर’. तेथे विवेक यांची भेट झाली. अतिशय साधा, सरळ माणूस. या क्षेत्रातलं, खूप ज्ञान, अनुभव मला आहे, हे दाखविण्याची त्यांची वृत्ती नव्हती.

आप्पा बळवंत चौकातून पुढे गेल्यावर त्या काळातली मोठी अशी एक चाळ होती. तिथे विवेक राहत होते. मला त्याचं खूप अप्रूप वाटलं. जेव्हा मी राजाभाऊ परांजपे यांच्याकडे त्यांचा असिस्टंट म्हणून शिकत होतो. तेव्हा देवघर’च्या सेटवर विवेक मला म्हणायचे, ‘माझा मेकअप झालाय. मी इथे बसतो, हवं तेव्हा हाक मार. मी तयार आहे.’ मला त्यांची ही कृती भावली. कारण मोठे कलावंत असून सेटवर स्वतःहून तयार होऊन थांबणं, हे प्रकरण वेगळंच! बाकीचे कलावंत मेकअपरुममधून बाहेर येत नव्हते. त्यांचा सीन आला की त्यांना बोलविण्याचं काम करावे लागायचं. या उलट विवेक यांचं वागणं! ‘देवघर’ मध्ये त्यांची नायिका होती बेबी नंदा. (मा. विनायकांची मुलगी) तिचा हा पहिला चित्रपट.

चित्रीकरणाचा २/३ महिन्यांचा तो काळ. विवेकचं वागणं ग्रेटच! आपला नावलौकिक, मोठेपणा विसरुन माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, ही त्यांची वृत्ती मला खूप आवडत असे. कुणालाही कधी ऑर्डर्स सोडणं नाही. हुकूमत गाजवणं नाही. असा त्यांचा स्वभाव. कॅरेक्टरला धरुन साधे एक्स्प्रेशन्स विवेक देत असत. ‘देवघर’मधील व्यक्तिरेखा अवघड, पण ते सहज करीत होते.

१९६९ मध्ये मी दिग्दर्शित करीत असलेल्या ‘अपराध’ चित्रपटात त्यांची भूमिका होती. मला ते अरे तुरे करायचे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यांनी विचारलं ‘हं, आता सांग, तुला काय अपेक्षित आहे?’ मी वर्णन केल्यानंतर म्हणायचे, ‘ठीक आहे’ मग ते करून दाखवायचे. ‘जमलं का रे! बरोबर आलं का?’ हा अस्साच भाव नेहमी… गर्व, आढ्यता नाही. त्यांचं वागणं बघून मलाच संकोच वाटायचा. परिस्थितीमुळे पुढे कोणत्याही लहान-मोठ्या भूमिका त्यांना स्वीकाराव्या लागल्या. मिळतील त्या भूमिका सहज व प्रामाणिकपणे करणे, हा त्यांचा महत्त्वाचा गुण. नंतर मी मुंबईला स्थायिक झाल्यामुळे आमच्या भेटी कमी झाल्या. ते आजारी असल्याचे समजले. म्हणून पुणे येथे त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो. थकलेले दिसले. तीच माझी त्यांची अखेरची भेट ठरली. नंतर ते गेल्याचं कळतं. वाईट वाटलं. हा माणूस इतक्या लवकर जाईल असं वाटलं नव्हतं. देखणं रूप ही त्यांना ईश्वरी देणगी होती. त्या माणसाचा बॅलन्स जबरदस्त होता. वागणं, बोलण नम्र. त्यांच्याविषयी कुणीही वाईट-गैर बोललं नाही. आजही विवेक म्हटलं की विवेक नवसार्थ करणारा एक बॅलन्स्ड अभिनेता आठवतो.

– राजदत्त

(शब्दांकन- रमेश उदारे)

(सौजन्य – सांगाती प्रकाशन, डोंबिवली)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया