मराठमोळी लतादीदी
——
सर्व विश्वाला व्यापून टाकणारं आणि प्रेमाची, शांतीची विश्वमंगलाची एकतानता असलेलं लतादीदींचं ‘माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे’ बालकवींच्या शब्द नंदनवनातून उगम पावल्यावर पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगतीनं अक्षय आणि अभंगतेची शिकवण देणारं सर्व भेद-पंथाला जोडणारं असं एक होऊन राहिलं.
ज्या प्रेमानं भाग्य दिलं, प्रीतीचे रत्नकांचनी पंख दिले, त्या प्रेमाला प्रेमा काय देऊ तुला’ असं मोहकतेच्या सुंदरतेला, लावण्याच्या रूपाला पी. सावळारामांनी शब्दांच्या कलेत गुंफलं. वसंत प्रभूंनी स्वरांच्या निळ्याशार रूपाची हळूवार ओढणी त्यावर ओढली. लतादीदींच्या अधरातून अमृताचे थेंब बरसले.
स्वप्नात सावल्यांची सोबत करणाऱ्या, त्यांचं नेहमी हसू आरशात बघणाऱ्या, सुरेश भटांच्या अंगणातून निघालेल्या या अबोल शब्दांच्या पारिजातकाला हृदयनाथांनी संगीताचा केशरी सुगंध ल्यायला आणि लतादीदींच्या ‘सुन्या सुन्या मैफिलीत’ हे अजून एक गीत निर्माण झालं.
मिटल्या नयनी चित्र रंगविणारे, ‘ओळख पहिली गाली हसते’ हे पी. सावळारामांचे गाणे, वसंत प्रभूच्या संगीत पदार्पणातून हुबेहूब लतादीदींच्या स्वरात ऐकताना श्रोत्याने अनुभवलेली ती एक आठवण असते.
लाजबावरी हर्षित चोरून बघणारी पी. सावळारामांच्या यौवनफुलांनी बहरून टाकलेली, वसंत प्रभूच्या संगीत महालातून प्रकट झालेली, ‘आली हासत पहिली रात’ दीदींनी स्वत:च्या सूरप्रकाशानं उजळली. ‘मावळत्या दिनकरा हे अर्घ्य भा.रा. तांबे यांनी उगवत्या रविराजाला दोन्ही हाताने नमस्कार करणाऱ्या आणि काम होताच मावळत्या दिनकराकडे पाठ फिरविणाऱ्या तमाम जनतेला उत्कृष्ट शब्दांत, हृदयनाथांच्या मृदुमयी संगीताच्या साक्षीनं लतादीदींकडून सुमनात जसा गंध स्वाभाविक तशी सुलभ, शांत स्वररचना करून हृदयनाथानी या प्रेमासाठी, संगीतासाठी आपली बोटे फिरविली आणि दीदी तर साक्षात शांत- गंभीर निशेच्या स्वरूपात, पवित्र रूपात विराजमान होऊन दाही दिशा स्वरांनी ओवाळून टाकून एका खऱ्या सत्यापुढे ‘पाठ’ न फिरविण्याचा संदेश दिला आहे.
निसर्गाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेललेले भाले म्हणजे हृदयनाथांनी बेभान वाऱ्याला संगीताच्या चिमटीत पकडल्यावर, मंगेश पाडगावकरांच्या पिंजलेल्या लाटांच्या थैमानात लतादीदी किती सुरक्षितपणे सुरांना झेलत होत्या, ते स्पष्ट दिसतं.
थोड्या सुखाची, दु:खाची ही दुनिया सोसायला, झुंजायला ऐरणीच्या देवाला आळवणारी कवी जगदीश खेबुडकरांची आणि स्वत:च आभाळागत मायेची चादर ओढून घेतलेली रसिकांची लतादीदी स्वतः संगीत देऊन संगीत दिग्दर्शनाची काही इडापिडा दीदींसाठी नाही, हे जगाला ठासून सांगतात.
भावभोळ्या भक्तीची मंगेश पाडगावकरांची एकतारी भावनांच्या भुकेच्या मुरारीसाठी श्रीनिवास खळे जेव्हा काजळी रात्रीला संगीतानं प्रकाशित करतात, तेव्हा डोळ्यांत पाणी आणून चरणाचा दास बनलेला भक्त लतादीदींच्या भक्तीचा वेडा बनल्याशिवाय राहत नाही.
कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, कधी मेघांच्या धारांतून डोकावणारं कवी वसंत बापटांचं तिमिर तेजोमय गगन, हृदयनाथांच्या मंजूळ स्वर- लालित्यातील, लतादीदींच्या कंठातील, गगन सदन तेजोमय’ हा मनमोहक, भावमधुर अप्रतिम आविष्कार आहे.
नैसर्गिक पार्श्वभूमीवर, प्रिय हृदयातील, जिवासारखं जपणाऱ्या जिवाभावाच्या सोबतीचं वचन देत कविवर्य भा.रा. तांबे तुझ्या-माझ्या प्रेमासाठी तरुवर फुले उधळतो. निर्झर झुळझुळ गातो. पाखरे मंजूळ मंगलाष्टके गातात आणि सहस्त्रकर दिनकर गुलाल उधळतो; त्यांच्या अशा उदात्त कल्पनेला, निर्मळ करून या प्रीतीसाठी जेव्हा सुरांच्या अक्षता उधळतात, तेव्हा प्रेमाच्या या अद्भुत कल्पनाविलासासाठी मंडपी जमलेले गानरसिक या वचनाला साक्ष देत मंगल आशीर्वाद देतात. अर्थातच, हे गाणं म्हणजे ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ हे होय.
याच राजसासाठी कवी सुरेश भट तारकांच्या या रात्रीत, गार गार हवेत प्रेमिकेला कवेत घेत अशी आराधना करतात, तेव्हा ‘मालवून टाक दीप’सारखी प्रणयपूर्ण रचना जन्म घेऊन, हृदयनाथ त्यातील नेमकी उद्याची धुंद पहाट शोधून स्वरांचा सुवास दरवळत ठेवतात. या अगदी मनमोकळ्या प्रेम-प्रेमिकांसाठी लता जेव्हा प्रेमिकेचा वेष घेतात, तेव्हा सुरेश भटांच्या कविकल्पना स्वतः मोकळ्या अंतरंगातून गातात.
‘प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे,’ अशा प्रीतीच्या उत्कट अवस्थेबद्दल कवी यशवंत देव शब्दोचित्रण करतात, तेव्हा हे चित्र स्वत:च सहज स्वरबद्ध करण्यासाठीच त्याचं वेडं स्वप्न पूर्ण करताना लतादीदीच या धुंद क्षणाचा ‘वेगळाच साक्षात्कार’ प्रेमासाठी, जनतेसाठी करतात, हे काय सांगायला हवं? हीच प्रेमिका जेव्हा माता बनते, तेव्हा कवी मंगेश पाडगावकर ‘नीज माझ्या नंदलाला’ ही एक शांत वाऱ्यातील, शांत ताऱ्यातील, शांत आभाळातील मंद झऱ्यासारखी; ‘पाखरंही झोपली, गाईही झोपल्या, आता तू तरी नीज,’ ही शब्दरचना करतात, जेव्हा रातराणीच्या या फुलांना स्वरगंध देण्यास श्रीनिवास खळे तत्पर होतात आणि मांडीतील बाळाला खुद्द लतादीदी माता बनून अंगाईगीत गातात, तेव्हा अशी उत्कट भावना प्रकट होते.
मातृत्वपद ही जगातील उच्च आणि अनंतकाळची भूमिका निभावताना बाळाचे ऋण मनात धरून, ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ असे म्हणत बाळाच्या मुखाचे चुंबन घेतले की अमृताच्या सरितेचा उगम झाल्याची उदात्त भावना हृदयात निर्माण होते, असे लतादीदी पी. सावळारामांच्या शब्दसरितेतून उगम पावलेल्या गीतातून, देवाहून मंगल अशा मातृदैवताची महती वसंत प्रभूच्या संगीतसरितेद्वारे कथन करतात.
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील. माणूस गेल्यानंतर बाकी सर्वांचा क्रम सुरूच राहील. कुणालाही काही अंतराय होणार नाही. नद्या वाहतील, शेते पिकतील, हे जीवनातील कटू सत्य कवी भा.रा. तांबे यांनी शब्दबद्ध केलं. दीदींच्या मधुर ध्वनीतून हे सत्य ऐकताना त्याची कटुता मात्र जाणवत नाही, खरे ना?
बंदराला ये-जा करीत, उधाण वाऱ्यात उठलेल्या डोंगरलाटात, सकाळी जाळी टाकून दर्याचं धन लुटून डाली भरणारी, दर्याच्या राजावर भाळणारी कोळीण, शांताबाई शेळके यांच्या शब्दसागरातून, दीदींच्या मधुर गुंजनामुळे, हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतलाटेवरून घराघरात पोहोचल्यामुळे कोळणीच गोजिरं रूप आम्हांला दिसलं.
पावसाच्या माऱ्यात, भिरभिर वाऱ्यात उठलेल्या तुफान वादळातील प्रियकराचं वेगळं रूप न्याहाळताना, ढगात गडगड करणाऱ्या बिजली उरात धडधड करतात, तसं दीदींच्या स्वरवाऱ्याच्या तुफानानं सरसर चाललेली शांताबाईंची शब्दनौका दूरवर, महाराष्ट्रभर पसरली व ज्यांनी अद्याप दर्याचं रूप बघितलं नाही, अशाही जनमानसात दर्याचं सौंदर्य दिसलं.
कर्ता आणि करविता अशा भगवंताला मी शरण आहे, परमेश्वराच्या श्वासाने पान हलते, फूल फुलते, तेज झळाळते हे पी. सावळाराम परमेश्वरासंबंधी सांगत असताना, ‘सुख-दुःखाची ऊनसावली- तुझीच जाणीव वेळोवेळी’ ह्या पंक्ती, वेळोवेळी चाहत्यांना स्मरणाऱ्या लतादीदींच्या सुरांबद्दल तर नाही सांगत ना?, असा प्रश्न दीदींच्या चाहत्यांना पडणे काही गैर नाही.
निसर्ग आनंदाने गाणे गातो आहे, सर्वत्र मोद विहरतो आहे, चोहीकडे आनंदीआनंद झाला आहे. अशा आनंदमय वातावरणात दंग झालेल्या चित्तवृत्ती आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी बालकवींना स्फुरलेले गान आणि गाण्याला झालेला दीदींच्या सुरांचा स्पर्श यांचा आगळा मेळ जुळून आल्यामुळे निसर्गाचे मूळ सौंदर्य पराकोटीला पोहोचले आहे. निर्झर मंदगतीने धावून, लतिका डोलून, पक्षी मनोहर कूजन करून निसर्गातील वरती-खाली, नभांत, दिशांत विहरणारा आनंदीआनंद वृद्धिंगत करतात यात शंका नाही. परंतु ज्या सूर्यकिरणांच्या नादमधुर तेजाच्या कौमुदीमुळेही जिकडेतिकडे आनंदीआनंद पसरला आहे, त्या लतादीदींच्या संगीतसृष्टीचे वर्णन करण्यास बालकवी हयात नाहीत.
दीदींच्या ह्या अस्सल मराठमोळ्या रूपानं आनंदित होऊन अवघा महाराष्ट्र अभिमानानं मान ताठ करून, ‘दीदी महाराष्ट्राच्या आहेत’ असं म्हणत असताना त्यांनी आपलं विविधभाषिक विशाल रूप दाखवून आपण संपूर्ण भारताच्या दीदी आहोत, हे सिद्ध केलंय. त्यांच्या त्या विशाल रूपाकडे हिमालय आपली शिखर उंचावून कौतुकानं बघतोय आणि समुद्र गर्जना करीत त्यांचं अभिनंदन करतोय.
– रेखा चवरे
(सौजन्य – परचुरे प्रकाशन मंदिर)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया