अतिथी कट्टा

दिनांक : ०९-०१-२०२०

‌‌‌‌‌‌‌‌‌‘तान्हाजी’ चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल – अजय देवगणतानाजी मालुसरे हे शिवकालीन इतिहासामधील एक सुवर्णपान. जगभरातील प्रेक्षकांपर्यंत हे व्यक्तिमत्त्व पोचविण्याचा विडा आता अभिनेता अजय देवगणनं उचलला आहे. अजयनं या तानाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारण्यासोबत ‘तान्हाजी’ या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. ओम राऊत याचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अजयसोबत सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोल हे कलाकारदेखील झळकले आहेत. येत्या दहा जानेवारीला हिंदीसह मराठीत प्रदर्शित होणाऱ्या अजयच्या या शंभराव्या चित्रपटाच्या निमित्तानं अजयचं हे मनोगत.

——

‘तान्हाजी’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप ‘स्पेशल’ आहे. एक तर तो हिंदीबरोबरच मराठीतही प्रदर्शित होतोय. माझ्या शंभराव्या चित्रपटाव्यतिरिक्त हा चित्रपट महत्त्वाचा असण्याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे. भारतीय इतिहासामधील एक वीर योद्धा असा त्यांचा लौकिक आहे. त्यामुळे अशाप्रकारची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारणं ही माझ्यावरची मोठी जबाबदारी होती. आपल्या शालेय इतिहासातील पाठ्यपुस्तकांमध्ये तानाजींबद्दल फक्त दोन पॅरेग्राफ्सची माहिती आहे. परंतु, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. त्याला आपण न्याय द्यायला हवा या हेतूनंही आम्ही हा चित्रपट केला. या चित्रपटाचं शीर्षकच तानाजी द अनसंग वॉरियर असं आहे. तानाजींबद्दल महाराष्ट्रातील जनतेला बरंच काही माहिती असलं तरी इतर देश किंवा जगात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. ती व्हावी या हेतूनंच मी हा चित्रपट केला. तसेच भविष्यात अशा आणखी काही योद्ध्यांची शौर्यगाथा पडद्यावर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागतो. ती व्यक्तिरेखा चुकीची साकारली जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. अ‍ॅक्शन, स्टंट्सबद्दल म्हणाल तर यापूर्वीही मी अनेक चित्रपटांमध्ये अशाप्रकारची दृश्ये केली आहेत. कथानकाची गरज असेल तर मी कितीही अवघड स्टंट असो, मी तो करतोच. असं करताना काही वेळा मला दुखापतदेखील झाली आहे.

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी स्वप्नं बघायचो तेव्हा त्यात हॉलिवुडमधील सिनेमांचीच अधिक दृश्यं यायची. ते चित्रपट पाहत असताना त्यांचा तांत्रिक दर्जा पाहून मी भारावून जायचो. तेव्हा मला वाटायचं असं प्रकारचं तंत्रज्ञान आपल्या चित्रपटांमध्ये का पाहायला मिळत नाही? त्यामुळे विदेशी चित्रपटांच्या समोर उभा राहणारा परीपूर्ण चित्रपट कधी तरी बनवावा हे तेव्हाचं माझं स्वप्न होतं. तसेच त्यांच्या तुलनेत आपल्याकडचं बजेट निम्म्यापेक्षा कमी असतं. तरीदेखील त्यांच्या तोडीचा चित्रपट मला बनवायचा होता. आता ते तंत्रज्ञान आपल्याकडे आलं आहे. तसेच अत्यंत चांगले तंत्रज्ञ नि दिग्दर्शक आपल्याकडे आहेत. तान्हाजी हा चित्रपट माझ्या स्वप्नपूर्तीचा एक भाग आहे.

दिग्दर्शक ओम राऊतच्या मनात आलेली ही कल्पना आहे. त्यानं या चित्रपटाच्या कथानकावर खूप मेहनत घेतली आहे. ओमनं मला जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हाच ती मला खूप आवडली. मग आम्ही हा चित्रपट खूप वरच्या दर्जावर कसा नेता येईल, याबद्दल चर्चा केली. तसेच तानाजींबद्दल इतिहासात खूप माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांनी मला ही व्यक्तिरेखा जशी समजावून सांगितली तशी ती मी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तानाजींसारखा योद्धा त्या काळात कसा वागत असेल, याचा विचार करून त्यांच्या लौकिकाला साजेल अशी ती व्यक्तिरेखा मी साकारली आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची लावणार्‍या ऐतिहासिक व्यक्तिरेखांची मानसिकता समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तसा प्रयत्न मी या चित्रपटात केला आहे. तानाजी मालुसरेंचं व्यक्तिमत्त्व समजून घेतल्यामुळे मला त्यांना चांगल्या पद्धतीनं साकारता आलं आहे.

शूटिंगचा अनुभव खूपच टफ होता. परंतु, माझ्यासह सर्व कलाकारांनी तो एन्जॉय केला. मला स्वतःला नवीन गोष्टी शिकण्यात खूप रस आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मला खूप काही शिकता आलं, याचा आनंद आहे.

बर्‍याच वर्षांनी काजोलबरोबर रुपेरी पडद्यावर काम करण्याचा कसा नक्कीच चांगला होता. शूटिंगऐवजी आपण घरीच आहोत, असा अनुभव मला आला.

आपल्याकडे चित्रपट न पाहताच विरोध करण्याची एक प्रथाच निर्माण झाली आहे. केवळ ट्रेलर पाहूनच काही जण त्यावर आक्षेप घेतात. परंतु, अशांना माझं उत्तर आहे की, आम्ही खूप अभ्यास करूनच हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे त्यात कसल्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली आहे.

हा चित्रपट ‘टुडी’बरोबरच ‘थ्रीडी’ माध्यमातही प्रदर्शित होत आहे. त्याचा वेगळाच आनंद प्रेक्षकांना मिळेल. क्रिकेटसामना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. परंतु, तोच सामना तुम्ही जर घरी टीव्हीवर बसून बघत असाल तर त्याचा आनंद वाढावा, यासाठीही काही प्रयत्न केले गेलेले असतात. असाच प्रयत्न आम्ही केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच त्याची तुलना बाहुबली चित्रपटाशी करण्यात आली होती. माझ्या मते अशी तुलना करणं चुकीचं आहे. कारण बाहुबलीचं कथानक वेगळं होतं नि आमचं वेगळं आहे. तसेच त्यातले कलाकार, तंत्रज्ञही वेगळे आहेत. किंबहुना प्रत्येक कलाकृतीच स्वतःचं वेगळेपण घेऊन येते असं मी मानतो. त्यामुळे अशाप्रकारच्या तुलना होऊ नयेत. बाहुबली एक खूप चांगली फँटसी होती. आमचा चित्रपट हा खऱ्याखुऱ्या इतिहासावर आधारलेला आहे.

गेल्या तीन दशकांमधल्या माझ्या प्रवासाबद्दल मी खूप समाधानी आहे. त्यामुळे समाधानकारक या एकाच शब्दात मी माझ्या प्रवासाचं वर्णन करीन. गेल्या तीन दशकांमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. कारण चित्रपटाच्या शूटिंगसाठीचा प्रत्येक दिवस हा आधीच्या दिवसापेक्षा वेगळा असतो. माझ्या वाट्याला आलेलं काम मी प्रामाणिकपणे केलं. इतर गोष्टींमध्ये फार लक्ष घातलं नाही. त्यामुळेच कदाचित मी शंभराव्या चित्रपटापर्यंत येऊन पोचलो आहे. शूटिंग सुरू असताना दिग्दर्शक ओम राऊतनं मला सांगितलं की हा माझा शंभरावा चित्रपट आहे. तोपर्यंत मलाही आपण एवढ्या मोठ्या टप्प्यावर येऊन पोचलोय याची कल्पना नव्हती. त्यामुळे आपला शंभरावा चित्रपट ‘तान्हाजी’च असावा, असा विचार करून हा चित्रपट आम्ही बनवलेला नाही. हे सर्व काही योगायोगानं नि आपसूक घडून आलं आहे.

– अजय देवगण

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया